सर्वस्पर्शी कालिदास

विवेक मराठी    28-Jun-2022
Total Views |
 
@डॉ. प्रशांत पुरुषोत्तम धर्माधिकारी

आषाढ आणखी एका कवीसाठी प्रसिद्ध आहे. कालिदासाच्या 'मेघदूत' या खंडकाव्यात 'आषाढस्य प्रथम दिवसे' असा उल्लेख येतो. या उल्लेखामुळेच आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रख्यात भारतीय कवी कालिदास याचा जन्मदिवस जगभर साजरा केला जातो. याला 'महाकवी कालिदास दिन' असेही म्हणतात. आपल्या साहित्यकृतीतील एका उल्लेखामुळे कवीचा जन्मदिवस साजरा होणारी कदाचित ही एकमेवाद्वितीय गोष्ट असेल.
kalidas
गोव्याचे प्रसिद्ध कवी शंकर रामाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला २६ जून रोजी सुरुवात झाली. 'दर्पणीचे दीप', 'निळे निळे ब्रह्म', 'कातरवेळ', 'आभाळवाटा', 'गर्भागार' इत्यादी कवितासंग्रहांतून त्यांची कविता बहरली. 'वणवण फिरणारे कोण दारात आले|गहण नभ मनाचे पूर्ण आषाढलेले' अशा अत्यंत सुंदर ओळींमधून आषाढ महिन्यातील कातर अवस्था ते व्यक्त करतात.
 
आषाढ आणखी एका कवीसाठी प्रसिद्ध आहे. कालिदासाच्या 'मेघदूत' या खंडकाव्यात 'आषाढस्य प्रथम दिवसे' असा उल्लेख येतो. या उल्लेखामुळेच आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रख्यात भारतीय कवी कालिदास याचा जन्मदिवस जगभर साजरा केला जातो. याला 'महाकवी कालिदास दिन' असेही म्हणतात. आपल्या साहित्यकृतीतील एका उल्लेखामुळे कवीचा जन्मदिवस साजरा होणारी कदाचित ही एकमेवाद्वितीय गोष्ट असेल.
 
विरहकातर झालेल्या कोणा यक्षाने आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशात गर्दी करणाऱ्या मेघांना उद्देशून लिहिलेले हे अजरामर काव्य. कालिदासाचा काळ नेमका कोणता, यावर विद्वानांमध्ये मतभेद आहेत. मात्र त्याच्या प्रसिद्ध कलाकृतींमध्ये आषाढ महिन्याचे एवढे नेत्रसुखद वर्णन आले आहे की हा संपूर्ण महिना कालिदासाच्या मेघदूतातील मंदाक्रांता वृत्तातील सुंदर श्लोकांनी व्यापून गेलेला असतो.
 
'कविताकामिनीचा विलास', 'कविकुलगुरू', 'महाकवी' अशा वेगवेगळ्या नावांनी कालिदासाला ओळखले जाते. कालिदास म्हटले की आपल्यासमोर उभी राहते ती शकुंतला, मेघदूतातील विरहकातर यक्ष, रघुवंश महाकाव्यातील नंदिनीची सेवा करणारे राजा दिलीप व सुदक्षिणा आणि अशी अनेक पात्रे. ज्येष्ठ इंग्लिश लेखक विल्यम जोन्सने कालिदासाला 'भारताचा शेक्सपियर' असे संबोधले होते. यामध्ये दोन्ही साहित्यिकांची जीवनविषयक दृष्टी अधोरेखित होते. कालिदास एक मोठा कवी होऊन गेला एवढे एकच प्रत्येक भारतीयाला माहीत असतो, मात्र या साहित्यिकाच्या लेखनाचा पैस मोठा होता, त्यांनी उभे केलेले मानवी भावविश्व अगाध होते, हे अभ्यासांती समजते.
 
 
अंत:पुरातील गुजगोष्टीपासून हिमालयाच्या उत्तुंग शिखरापर्यंत कालिदासाची लेखणी लीलया संचार करते. भोग व त्याग, शृंगार व वैराग्य, काम व मोक्ष यांचा सुरेख समन्वय कालिदास साधतो. डॉ. के.ना. वाटवे यांनी म्हटल्याप्रमाणे वाल्मिकीच्या नीतीला आणि व्यासांच्या बुद्धीला कालिदासाने सौंदर्याची जोड दिली. व्यासांनी सत्य, वाल्मिकीने शिव, तर कालिदासाने सौंदर्य यांची प्रचिती प्रामुख्याने दिली. 'व्यास, वाल्मिकी आणि कालिदास यांच्यात भारतीय संस्कृतीचे सार साठवलेले आहे,' असे महर्षी अरविंद म्हणतात ते याचमुळे.
 
कालिदासाने रघुवंश व कुमारसंभव ही दोन महाकाव्ये लिहिली. या काव्यात उपमा, उत्प्रेक्षा वगैरे अलंकारांची रेलचेल आहे. कथेच्या दृष्टीने महाकाव्याला साजेसा अत्यंत मोठा पट कालिदास आपणासमोर उभा करतो. त्यातील सांस्कृतिक, राजकीय, भौगोलिक व मानसशास्त्रीय संदर्भ आजदेखील समयोचित वाटतात. तत्कालीन समाजाचे आकलन करण्यासाठी ही महाकाव्ये म्हणजे महत्त्वाचे साधन ग्रंथ आहेत. प्रसन्न भाषा, अलौकिक प्रतिभाविष्कार आणि अभिजात कल्पनाविलास या गुणांमुळे ही महाकाव्ये अजरामर झाली.
'ऋतुसंहार' ही कालिदासाची पहिली रचना असे समजले जाते. इथे 'संहार' या शब्दाचा अर्थ एकत्र करणे, बांधणे, गुंफणे अशा अर्थाने योजला आहे. ऋतुसंहार म्हणजे ऋतूंची शोभायात्रा. सहा ऋतूंचे सहा सोहळे पाहून रसिकांचे भान हरपून जाते. 'ऋतुसंहार' या काव्यात ग्रीष्मादी ऋतूंच्या प्रभावामुळे चराचरात होणारे बदल आपल्या सौंदर्यशोधक नजरेने टिपून या काव्यात अक्षरबद्ध केले आहेत. कालिदासाच्या संवेदनक्षम प्रतिभेचा हा सुरुवातीचा आविष्कार. या काव्यातून कवीची सौंदर्यदृष्टी प्रतीत होते.
 
 
'मेघदूत' या खंडकाव्यात हिमालयाच्या कुशीत अलकानगरीत राहणाऱ्या एका यक्षाची कथा आहे. पत्निवियोगाचा शाप मिळाल्यामुळे दूरवर दक्षिणेत रामगिरी पर्वतावर तो वास्तव्य करतो. आषाढाच्या पहिल्याच दिवशी पर्वतावर धडका देणाऱ्या काळ्याकभिन्न मेघांना पाहून त्याची विरहवेदना दाटून येते. मेघाला दूत समजून आपल्या प्रियाला दिलेला संदेश मेघदूत या काव्यात येतो. कालिदासाची सौंदर्यदृष्टी मंदाक्रांता वृत्तातील प्रत्येक श्लोकामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
 
 
विशेषत: मराठी साहित्यिकांनी तर मेघदूतावर जिवापाड प्रेम केले आहे. मराठीत या काव्याचे जवळपास २८ अनुवाद झाले असून यामध्ये कृष्णशास्त्री चिपळूणकर, चिं.द्वा. देशमुख, रा.ची. श्रीखंडे, ना.ग. गोरे, बा.भ. बोरकर, कुसुमाग्रज, वसंत बापट व शांता शेळके यांचाही समावेश आहे.
 
वानगीदाखल शांता शेळके विरह वेदनेने त्रस्त झालेल्या यक्षपत्नीची भावनिक आंदोलने खालील श्लोकात मांडतात -
 
उंबरठ्यावर फुले मांडुनी एक एक ती दिवस मोजिते

किती विरहाचे मास राहिले पुन्हा पुन्हा अजमावुनी बघते

रमते तेव्हा कल्पनेत मम सहवासाची चित्रे रेखून
 
विरहा मध्ये रमणी बहुधा असेच करिती मनोविनोदन।

 
कालिदासाच्या मेघदूताने हिंदी साहित्यविश्वावरदेखील मोहिनी घातली आहे. ज्येष्ठ हिंदी नाटककार मोहन राकेश यांचे 'आषाढ का एक दिन' हे एक महत्त्वाचे नाटक आहे. कालिदासाच्या जीवनातील आणि साहित्यातील काही घटनांचा उपयोग करून लिहिलेले हे एका व्यापक जीवनविषयक समस्येला भिडणारे नाटक.
 
 
गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनीदेखील कालिदासाचा मोठा व्यासंग केला होता. मेघदूतावर त्यांचे विशेष प्रेम होते.
 
 
ते लिहितात की, 'आज मी पूर्वेकडच्या श्यामल वंग देशात बसून मेघदूत वाचतोय. पावसाच्या धारा बरसत आहेत, विजा चमकत आहेत. अशा वेळी घराचे दार बंद करून मी एकटाच बसलोय. हे कवी, तुझ्या मंत्रानं माझ्या हृदयात कोंडलेली व्यथा मोकळी झाली. मला अनंत सौंदर्यात चिररात्री एकाकी जागून विरह वेदना सोसणाऱ्या विरहिणी प्रियेचा विरहरूपी स्वर्गलोक मिळाला'.
कालिदास जसा कवी होता, तसाच एक क्रांतदर्शी नाटककारदेखील होता. त्याने तीन नाटके लिहिली.
 
'मालविकाग्निमित्र' या पाच अंकी नाटकात राजा अग्निमित्र आणि मालविका या राजकन्येबरोबर झालेल्या प्रणयकथेला नाट्यरूप दिले आहे. 'विक्रमोर्वशीयम' या नाटकात आपल्याला वेदवाङ्मयात आणि पुराणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या पुरुरवा आणि उर्वशी यांच्या प्रेमकथेचे दर्शन होते. कालिदासाचे सर्वात प्रसिद्ध नाटक म्हणजे 'अभिज्ञान शाकुंतल'. 'काव्येषु नाटकं रम्यम् तत्र रम्या शकुंतला' असे एका कवीने म्हटले आहे. अर्थात सर्व नाटकात श्रेष्ठ असे हे शाकुंतल नाटक म्हणजे संस्कृत नाट्यसृष्टीचे अमोल लेणे आहे. जर्मन कवी गोएथे शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला असे म्हटले जाते. कालिदासाच्या प्रतिभावेलीवरचे सर्वात टवटवीत, सुगंधाने भरलेले पुष्प म्हणून या नाटकाचा उल्लेख केला जातो. अभ्यासकांच्या मते शेक्सपियरच्या 'द टेम्पेस्ट' या नाटकाची कालिदासाच्या 'अभिज्ञान शाकुंतल' नाटकाशी तुलना होऊ शकते. विशेष म्हणजे या दोनही नाटकातील नायिका शकुंतला व मिरांडा यांच्यामध्ये साम्यस्थळे आढळतात.
 
 
वसंत बापट यांनी म्हटले आहे, "संस्कृत वाङ्मयाचा महासागरात चित्रमय पोळ्यांची बेटे आहेत, अलौकिक रत्नगुंफा आहेत त्या कालिदासाच्या कलाकलापाच्या. बघणाऱ्या, बघशील किती, असे हे रंगाचे वैभव आहे. कितीतरी शतके कालिदासाची कविता मानवी मनाला निर्विकल्प समाधीचा आनंद देत आहे."
 
वाणीला परतत्त्वाचा स्पर्श झाल्यावर जे साहित्य निर्माण होते, ते अक्षर वाङ्मय होय. भारतीय उपखंडाचे समग्र सांस्कृतिक संचित आपल्या लेखणीतून दृग्गोचर करणारा महाकवी कालिदास आपल्याला जगण्याकडे पाहण्याची एक व्यापक दृष्टी देतो. विद्वत्ता व सौंदर्यानुभूती, कवित्व आणि रसिकत्व याचा सुंदर मिलाफ म्हणजे कालिदासाचे साहित्य. चराचरामध्ये परमतत्त्वाचा साक्षात्कार करून देणारी कालिदासाची चैतन्यानुभूती पुढच्या पिढ्यांना नेहमीच दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत राहील. आजच्या दिवशी या महाकवीला कृतज्ञ वंदन.
 
@डॉ. प्रशांत पुरुषोत्तम धर्माधिकारी
(लेखक विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयात इंग्लिशचे प्राध्यापक आहेत.)