स्वा. सावरकरांचे जीवनकार्य सांगतोय आजचा युवा भारत!

‘कालजयी सावरकर‘ - विचारधन देणारा चित्रानुभव

विवेक मराठी    29-Jun-2022   
Total Views |
विज्ञाननिष्ठ हिंदुत्व, प्रखर राष्ट्रवाद आणि गुलामीच्या शृंखला मोडून क्रांतीच्या ज्वाला प्रज्वलित करणारे विचार मांडून फक्त स्वतंत्र भारताचीच नव्हे तर प्रगत हिंदुस्थानची स्वप्न पाहणारे क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार दर्शन करणाऱ्या 'कालजयी सावरकर' या चरित्रपटाची निर्मिती विवेक समूहाने केलेली आहे. या चरित्रपटाची संकल्पना विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांची आहे तसेच दिग्दर्शन गोपी कुकडे यांनी केले आहे. हा लघुपट चरित्रात्मक माहितीपट स्वरूपाचा आहे.
 

1
 
सावरकरांचे स्वदेशीसाठीचे योगदान तसेच तुरुंगातील कैद्यांना दिलेले शिक्षण या अशा अनेक बाबी सावरकरांनी केल्या. त्यांच्या आयुष्यातील असे अनेक पैलू आहेत ज्याविषयी फार बोलले जात नाही. ते या विचारपटातून उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सावरकरांनी भारताबद्दल जे विचार मांडले होते ते आजही कसे कालसुसंगत आहेत हे चित्रपट पाहताना लक्षात येते. आत्मनिर्भर भारत अंतर्गत स्वदेशी उत्पादनांवर भर देण्याची मोहीम मोदींनी राबवली तो स्वदेशीचा विचार सावरकरांनी अनेक वर्षांपूर्वी विदेशी कपड्यांची होळी करून समाजाला दिला होता. गुलामी आणि पारतंत्र्याच्या बेड्या हातात जखडून असलेला स्वातंत्र्यपूर्व भारत आपल्याला सावरकरांच्या पूर्वायुष्याविषयी सांगतो तसंच त्यांच्या क्रांतीकारी चळवळीची ओळख करून देतो. तर हातात बासरी घेतलेला नवा तरुण भारत स्वातंत्र्यवीर सावरकारांविषयी आपल्या मनात आदर निर्माण करतो. बासरीच्या सुरांप्रमाणे प्रवाही विचारांचे संस्कार देणारे कृष्णासारखे मुत्सद्दी रूप या नव्या भारताचे आहे. एवढ्या मोठ्या सावरकर विचाराची ओळख करून द्यायची म्हणजे मनोरंजनाचा लवलेशही न उरता फक्त वैचारिक खाद्य असेल असे वाटले होते परंतु सव्वा तासाचा लघुपट पाहता जराही कंटाळा येत नाही. असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. तसेच सव्वा तासात सावरकरांचे विचार, त्यांचे चरित्र मांडणे कठीण आहे परंतु सर्व टीमने हे आव्हान यशस्वीरीत्या पेललेले दिसते. आजचा भारत विकसनशील आहे. कृष्णासारखाच शांत, संयमी व धोरणी आहे. त्यामुळे तरुण भारताकडे पाहिल्यावर कृष्णाच्या राजनीतीची आठवण आल्यावाचून राहत नाही.
 
दिग्दर्शक गोपी कुकडे हे जाहिरात क्षेत्रातील मोठे नाव आहे. फक्त ३० सेकंदात विषयाची ओळख समर्थपणे करून देण्यात त्यांचा हातखंडा आहे. परंतु, लघुपटाचे दिग्दर्शन करण्याची त्यांची पहिलीच वेळ असल्याने मात्र एवढा मोठा सावरकर विचार एवढ्या कमी वेळात कसा मांडावा असे आव्हान आपल्या समोर होते असे ते म्हणतात. जशी जशी फिल्म तयार होऊ लागली तशी अनेक आव्हाने सहज सुटत गेली तर काही नवी आव्हानेही समोर आली. परंतु सहकारी टीम चांगली मिळाल्याने लघुपट सुरळीतपणे पार पडला असे ते म्हणतात. ते पुढे म्हणतात, "सावरकरांचे आयुष्य, त्यांचे विचार, त्यांचा क्रांतिकारी प्रवास असे अनेक विषय एका तासात बसवायचे होते तेही अत्यंत कमीदिवसांत हे सर्वच टीम समोरील आव्हान होते. चित्रपट म्हणजे एक कलाकृती आहे, एक चित्र आहे, जे कधीच पूर्ण होत नाही. त्यामुळे चरित्रपट तयार झालेला असूनही मी त्याविषयी समाधानी नाही. काही ठिकाणी रंगसंगती, संकलनाच्या बाबतीत अजून चांगले काम करता आले असते असे मला चित्रपट पाहताना वाटते. लघुपटाची रचना करताना स्वातंत्र्यपूर्व भारत आणि नवा भारत अशी संकल्पना ठेवली याचे कारण असे की भारत सतत बदलत आहे. जो त्याकाळी भारत होता तो आज राहिलेला नाही सावरकरांचे विचार त्यासाठी कारणीभूत आहेत असे मला वाटते. पूर्वीचा अप्रगत भारत ही जनमानसातील प्रतिमा आज झपाट्याने बदलत आहे म्हणून नवा भारत असे त्याचे रूप ठेवले. नव्या भारताच्या हातात बासरी देण्याची दोन करणे आहेत. बासरी म्हणजे कानाला ऐकायला मधुर सूर, वापरण्यास सोपी, व विचारी कृष्णाची आठवण व्हावी म्हणून नव्या भारताच्या हातात बासरी दिली आहे."
 
 

1
 
मुख्य भूमिकेत असणारा अभिनेता सौरभ गोखले याचे उत्कृष्ट सावरकर साकारल्याबद्दल प्रेक्षकांमधून कौतुक होताना दिसते. सावरकरांची भूमिका करण्याविषयी विचारले असता सौरभ म्हणतो, "मी स्वतः हिंदुत्ववादी असल्याने सावरकरांची विचारधारा मला नेहेमीच पटली आहे. मी त्यांचे साहित्य वाचले आहे, त्यांची काव्य ऐकलीयेत, माझ्या शाळेतून नूतन मराठी विद्यालयातून मला लहानपणीच सावरकर विचारांचं बाळकडू मिळालं. अत्यंत कमी दिवसांत चित्रपट पूर्ण करायचा असल्याने मला फार पूर्वतयारी करता आली नाही. माझा स्वभाव काहीसा सावरकरांसारखा स्पष्टवक्ता असल्याने ही भूमिका मला सहज जमली. आमच्या पिढीत पुस्तके वाचून माहितीचे हस्तांतरण होत असे. परंतु यासाठी आता चित्रपट हे पर्यायी साधन उपलब्ध झाले आहे. त्यांचे विचार भविष्याचा वेध घेणारे आहेत. आजच्या समाजालासुद्धा स्वीकारताना जड जातील इतके ते भविष्यवेत्ते आहेत. ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आता जे माध्यम समोर दिसतेय ते म्हणजे हा लघुपट.
 
शनिवारी पुणे येथे कालजयी सावरकर या लघुपटाचा पहिला शो पार पडला. हा फक्त निमंत्रितांसाठी आयोजित केलेला होता. यावेळी विक्रम गोखले यांची उपस्थिती लाभली. खास निमंत्रितांसाठी येत्या २ जुलै रोजी नाशिक येथे विक्रम संपत यांच्या मुख्य उपस्थितीत होणार आहे, तसेच त्यानंतर मुंबईतसुद्धा निमंत्रितांसाठी या लघुपटाचे स्क्रीनिंग होणार आहे. यानंतर महाराष्ट्रातील अनेक संस्थांसोबत जोडले जाऊन त्या त्या संस्थांमार्फत हा लघुपट लोकांना पाहता येणार आहे. त्याचबरोबर ओटीटी माध्यमांवरून लघुपट प्रदर्शित होण्याविषयी संबंधित माध्यमांशी बोलणे सुरु आहे. या लघुपटासाठी मुख्य निर्मिती व्यवस्थापन अमोघ पोंक्षे यांनी केले आहे तर कार्यकारी निर्माते रविराज बावडेकर आहेत. तसेच संशोधन साहाय्य अक्षय जोग यांनी केले आहे. क्रिएटिव्ह दिग्दर्शक विनोद पवार, संहिता लेखन डॉ. समीरा गुजर व अमोघ पोंक्षे, चित्रीकरण दिनेश कंदरकर, संगीत अमित पाध्ये तर सहायक दिग्दर्शक व संकलन समीर अन्नारकर यांनी केले आहे. सावरकरांच्या मुख्य भूमिकेत अभिनेता सौरभ गोखले आहे तर स्वातंत्र्यपूर्व भारत व तरुण भारत यांच्या भूमिकेत अनुक्रमे प्रख्यात अभिनेते मनोज जोशी व तेजस बर्वे आहेत. सावरकरांचे विचार नवोदितांच्या मनात रुजतील अशी विशेष उल्लेखनीय बांधणी करण्यात सर्वच टीम यशस्वी झाली आहे.
 

1 

मृगा वर्तक

मुंबई विद्यापीठातून पत्रकारिता व संज्ञापन विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयांवर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी  विषय घेऊन मुक्तछंदात काव्यलेखनाची आवड.