मंकीपॉक्सजागरूक राहा

विवेक मराठी    03-Jun-2022
Total Views |
@डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे)
 
मंकीपॉक्स संसर्गाचे विविध मार्ग आहेत. मात्र मुख्यतः अधिक काळासाठी नजीकचा रुग्णसंपर्क हे मुख्य कारण आहे. या आजाराविषयी भेदाभेद व कलंकित भावना उत्पन्न होऊ न देता, योग्य ती काळजी घेतल्यास तसेच आजाराविषयी चुकीच्या माहितीला बळी न पडता आजार व प्रसार टाळण्यासाठी योग्य कृती केल्यास मंकीपॉक्स या नव्या आजारापासून भारताला सुरक्षित ठेवणे शक्य आहे. आवश्यकता आहे ती शास्त्रीय दृष्टीकोनाची आणि सहकार्याची!

manki
 
गेल्या महिन्यापर्यंत मंकीपॉक्स या आजाराचे नाव आफ्रिकेबाहेर कोणाला माहीतदेखील नव्हते. मात्र हा लेख लिहिताना (30 मे 2022) जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार मंकीपॉक्सचे रुग्ण 23 देशांमध्ये सापडले आहेत. सध्या जगभरामध्ये 257 रुग्णांना मंकीपॉक्सची बाधा झाल्याचे निदान झाले आहे आणि 120 रुग्ण संशयित म्हणून नोंदले गेले आहेत. ही संख्या आणखी वाढू शकते. कारण आता सर्व देश या आजाराबाबत जागृत झाले आहेत. प्रसार थांबवण्यासाठी प्रत्येक संशयित नोंदवला व तपासला जात आहे.
 
 
गेली दोन-अडीच वर्षे कोविड-19च्या महामारीशी लढल्यानंतर हा नवा आजार सर्वांच्या चिंतेमध्ये भर घालत आहे. आज या आजाराविषयी माहिती घेऊ या, म्हणजे आजाराची भीती कमी होईल.
 
 
मंकीपॉक्स हा काही नवा आजार नाही. 1958मध्ये सर्वप्रथम माकडांमध्ये हा आजार दिसून आल्याने याला मंकीपॉक्स असे नाव देण्यात आले. हा आजार विषाणूजन्य आहे. याचा विषाणू ओर्थोपॉक्स व्हायरस या प्रकारचा आहे - म्हणजे देवीच्या विषाणूचा भाईबंद आहे. तुम्हाला आठवत असेलच की गायींना होणार्‍या काऊपॉक्स या आजारामुळेच देवीच्या आजारावर लस शोधण्यात यश आले होते. हा आजार देवीच्या आजारासारखा आहे, मात्र त्याहून सौम्य आहे आणि मृत्यूचा धोकादेखील देवीच्या आजाराहून कमी - म्हणजे 3-6% इतका आहे.
 
 
1970 साली डॉमिनिकन रिपब्लिक ऑफ काँगो (DRC) या आफ्रिकेतील देशामध्ये सर्वप्रथम मंकीपॉक्सचा मानवी रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून या आजाराचे रुग्ण आफ्रिकेतील विविध देशांमध्ये आढळून येतात. त्या देशांमध्ये हा आजार अंतस्थ (शपवशाळल) झाला आहे. तेथे अधूनमधून रुग्णसंख्या वाढून उद्रेक होत असतात. नायजेरियामध्ये 2017पासून उद्रेक सुरू होता. इंग्लंडमध्ये 7 मे रोजी सापडलेला पहिला रुग्ण हा नायजेरियाचा प्रवासी होता. मात्र त्यानंतर जगभरात सापडलेले सर्वच रुग्ण हे प्रवासी रुग्ण नाहीत. गेला काही काळ हा आजार विविध देशांमध्ये लक्षात न येता पसरत असल्याचे हे लक्षण आहे आणि म्हणून याला जागतिक साथ असे न म्हणता सध्या जागतिक उद्रेक असे म्हटले जात आहे.
 
 
मंकीपॉक्सचा विषाणू हा कोरोनाप्रमाणे ठछअ विषाणू नसून RNA विषाणू आहे. यामध्ये जवळपास 2 लाख लरीशी आहेत आणि आकार 390 पा इतका आहे. हा मानवी शरीराबाहेर अधिक काळापर्यंत टिकू शकतो. मंकीपॉक्स संसर्गाचे विविध मार्ग आहेत. मात्र मुख्यतः अधिक काळासाठी नजीकचा रुग्णसंपर्क हे मुख्य कारण आहे. रुग्णाच्या शरीरातील स्राव, फोडांमधील स्राव, रुग्णाचे कपडे वा अंथरुणे, फोडाच्या खपल्या व काही प्रमाणामध्ये खोकणे व शिंकणे याद्वारे विषाणू संपर्कातील लोकांपर्यंत पोेहोचतो. मात्र संसर्ग काही मिनिटांत न होता त्यासाठी अधिक कालावधी आवश्यक आहे. म्हणजेच रुग्णाची काळजी घेणार्‍या व्यक्तींनी आणि वैद्यकीय व्यक्तींनी संसर्ग टाकण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. रुग्णाची काळजी घेताना मास्क वापरणे, हातांची वारंवार स्वच्छता, रुग्णांना हाताळताना ग्लोव्ह्ज वापरणे, रुग्णाला इतरांपासून विलग ठेवणे या उपायांनी सुरक्षित राहता येते.
 
 
संसर्ग झाला असल्यास साधारण 5 ते 21 दिवसांनी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे संपर्कातील व्यक्तींना 3 आठवडे अलगीकरण करणे / निरीक्षणाखाली ठेवणे ही बाब कोणत्याही देशातील उद्रेक थांबवण्यासाठी अत्यावश्यक बाब आहे आणि यासाठी संपर्क साखळी शोधणे हेही खूप महत्त्वाचे आहे आणि यासाठी जनतेचे तसेच वैद्यकीय व्यवसायिकांचे सहकार्य आवश्यक आहे.
 
 
मंकीपॉक्सची लक्षणे थोडी कांजण्यांसारखी आणि थोडी फ्लू/कोविडसारखी वाटतात मात्र दोन्हीमध्ये फरक आहेत. संसर्ग झाल्यानंतर 5 ते 21 दिवसांनी आजाराची सुरुवात तापाने होते. 1010ऋ (38.50उ) किंवा अधिक ताप येतो. त्यासह डोकेदुखी, स्नायुदुखी, पाठदुखी, तसेच अत्यधिक थकवा जाणवू शकतो. मात्र काखेतील, जांघेतील, गळ्याजवळील लसिका ग्रंथी सुजतात ((Lymphadenopathy)). हे लक्षण असल्यास तसेच ताप आल्यानंतर साधारण 3 दिवसांनी शरीरावर विशिष्ट प्रकारची पुरळ/फोड उठल्यास मंकीपॉक्स या आजारासाठी तपासणी करणे आवश्यक आहे.
 
 
मंकीपॉक्सची पुरळ उठल्यानंतर रुग्णापासून संसर्ग पसरण्यास सुरुवात होते. लक्षणविहीन प्रसाराविषयी अद्याप अधिक खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. मंकीपॉक्सच्ये फोड देवीच्या आजाराहून सौम्य, मात्र कांजण्या (वाराफोड) आजारापेक्षा अधिक तीव्रतेचे असतात. सुरुवात होताना चेहरा, हात व पावले यांवर अधिक फोड असतात आणि शरीरावर कमी असतात. (कांजण्यांमध्ये मात्र शरीरावर जास्त फोड उठतात.) हे फोड आधी लालसर पुरळ स्वरूपात येतात, नंतर पाण्याने भरलेले फोड तयार होतात जे नंतर पांढरे अथवा पिवळे होऊ शकतात. साधारण 2 ते 4 आठवड्यांनंतर हे फोड वाळून त्यावरील खपली पडते. सर्व खपल्या पडल्यानंतर रुग्णापासून आजार पुढे पसरत नाही.
 
 
मंकीपॉक्सचा विषाणू देवीच्या विषाणूचा भाईबंद असल्याने देवीच्या आजारावरील लस मंकीपॉक्सपासून 85% सुरक्षा देऊ शकते. मात्र देवीचा आजार 1980 साली जगभरातून नाहीसा झाल्यानंतर देवी रोगाचे लसीकरण बंद करण्यात आले. 1980 सालानंतर जन्मलेल्या लोकांना देवीची लस मिळाली नसल्याने त्यांना मंकीपॉक्स आजाराचा धोका अधिक आहे. 42 वर्षांवरील व्यक्तींना देवीची लस मिळाली असली, तरीदेखील तिचा परिणाम कमी झाला असण्याची शक्यता आहे, त्यामुळे रुग्णाशी संपर्क आल्यास कुटुंबातील सर्वांनीच काळजी घ्यायला हवी.
 
 
जैविक युद्धाच्या भीतीपोटी अमेरिकेसारख्या देशांनी देवीच्या लसींचा साठा उपलब्ध ठेवलेला आहे. तसेच मंकीपॉक्सविरुद्धदेखील एका लसीला तिथे मान्यता आहे. त्यामुळे अतिजोखमीच्या व्यक्तींना तसेच संपर्कातील व्यक्तींना लस देण्याचा निर्णय भविष्यामध्ये घेतला जाऊ शकतो. सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कातील सर्वांना लसीकरण तसेच त्या परिसरातील लोकांचे लसीकरण - म्हणजे ठळपस र्ळााीपळूरींळेप हा मार्गदेखील काही देश वापरू शकतात. मात्र कोविडप्रमाणे सार्वत्रिक लसीकरण करण्याची वेळ येणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
 
 
काही देश अलगीकरण आणि विलगीकरण तंत्राचा प्रभावी वापर करत आहेत. उदा., बेल्जियममध्ये आजाराचे निश्चित निदान झाल्यावर रुग्णाला सर्व जखमा भरेपर्यंत विलगीकरण करण्यास व संपर्क टाळण्यास सांगितले जातेय. यू.के.मध्ये रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना 21 दिवसांसाठी स्वयं अलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
 
या आजारावर प्रभावी औषध मुक्तपणे उपलब्ध नाही. देवीच्या आजारावरील औषध यावर चालते, मात्र ते महाग असून सर्वत्र उपलब्ध नाही. हा आजार कांजण्यांप्रमाणे 2 ते 4 आठवड्यांमध्ये बरा होणारा आजार आहे. त्यामुळे या काळामध्ये लक्षणांनुसार उपचार, विश्रांती, पाण्याचे प्रमाण योग्य राखणे, स्वच्छता ठेवणे जेणेकरून विषाणू संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे, संसर्ग झाल्यास प्रतिजैविके घेणे हे उपाय पुरेसे ठरतात. फोड उठल्यावर सहसा ताप कमी होतो. मात्र फोड बरे झाल्यानंतर त्याच्या खुणा मात्र शरीरावर राहू शकतात. हे फोड गुप्तांगावर, तोंडामध्ये तसेच डोळ्यामध्येदेखील उठू शकतात व त्यामुळे अधिक त्रास होऊ शकतो. डोळ्यामध्ये फोड झाल्यास दृष्टी जाण्याचा धोकादेखील असतो.
 
 
हा आजार लहान मुलांमध्ये अधिक गंभीर असू शकतो. त्यामुळे ताप व पुरळ दिसून आल्यास आजार अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. ज्यांच्यामध्ये कोणत्याही कारणाने इम्युनिटी (रोगप्रतिकारशक्ती) कमी आहे - उदा., एच.आय.व्ही.बाधित, स्टीरॉइडचा वापर करणारे, इतर गंभीर आजारग्रस्त व्यक्ती, यांनी रुग्णांच्या संपर्कात न येण्याची काळजी घ्यावी. तसेच आजार झाल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार काळजी घ्यावी. गरोदर स्त्रियांना या आजारापासून सुरक्षित ठेवायला हवे. कारण यामुळे गर्भपाताचा धोका तसेच नवजात शिशूला जन्मतः आजाराचा धोका वाढतो.
 
 
सध्या जगभरामध्ये आढळणारे रुग्ण 2018मधील विषाणूच्या नमुन्यासारख्या विषाणूमुळेबाधित झालेले आहेत. मात्र नव्या विषाणूमध्ये सुमारे 50 डछझी (एक प्रकारचे उत्परिवर्तन) आढळून आले आहेत. या बदलांमुळे विषाणूला मानवी प्रसाराची सुलभता प्राप्त झाली असावी, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. कोविडमुळे सर्वांच्या इम्युनिटीवर अनिष्ट परिणाम झालेले असल्याने या आजाराला योग्य प्रतिसाद देता येत नसावा, असाही एक कयास आहे. इतक्या वर्षांनंतर हा आजार आफ्रिकेबाहेरील विविध देशांमध्ये पसरण्याच्या कारणांचा शोध सुरू आहे. अधिक माहिती मिळेल त्यानुसार सुरक्षेसाठी सूचना निर्गमित केल्या जातील. वेळोवेळी निर्गमित केल्या जाणार्‍या सूचनांचे पालन करणे देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे.
 

मंकीपॉक्स जागतिक रुग्णसंख्या नोंदी इथे उपलब्ध आहेत -
https://monkeypox.healthmap.org/

अधिक माहितीसाठी संदर्भ -
• https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/monkeypox
• https://www.cnbc.com/2022/05/27/how-to-protect-yourself-against-monkeypox-what-to-do-if-you-catch-it.html
 
 
हा विषाणू प. आफ्रिकन देशात आढळणार्‍या प्रकारचा विषाणू आहे व मध्य आफ्रिकेतील विषाणूपेक्षा सौम्य आहे, ही चांगली गोष्ट आहे. (कारण मध्य आफ्रिकेतील विषाणू संसर्गाचा मृत्युदर 10% होता.) मात्र अपेक्षित असलेला 3 ते 6 % इतका मृत्युदरदेखील अधिक असल्याने प्रत्येक रुग्ण ओळखणे व नियंत्रण व्यवस्थेकडे त्याची नोंद करणे, संपर्क साखळी शोधून (contact tracing)) आजाराचा प्रसार टाळणे, अलगीकरण व विलगीकरण करून संसर्ग साखळी तोडणे, आजार गंभीर होऊ नये म्हणून काळजी घेणे या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
 
 
2003 साली अमेरिकेमध्ये या आजाराचा उद्रेक झाला होता. त्या वेळी (Prairie )जातीच्या कुत्रांमध्ये याचा संसर्ग पसरल्याने त्यांच्यापासून मानवी संसर्ग झाला होता. हा मुख्यतः प्राणिजन्य आजार असल्याने काही प्राणी - माकडे, कुत्रा तसेच लहान प्राणी (rodents) - उंदीर, घुशी, खारी अशा प्राण्यांमध्येदेखील संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. एखाद्या देशामध्ये असे घडल्यास तो आजार तेथे अंतस्थ (endemic) आजार होऊ शकेल आणि मग आजाराचे नियंत्रण थोडे अवघड होऊ शकेल. मंकीपॉक्सचे देवीप्रमाणे उच्चाटन होणे सहज शक्य नाही. आजार देशामध्ये अंतस्थ होऊ न देणे महत्वाचे आहे.
 
 
हा आजार अजून भारतामध्ये सापडलेला नाही, मात्र पाकिस्तानमध्ये एक संशयित रुग्ण सापडलेला आहे. सध्या प्रत्येक संशयित रुग्ण ओळखणे ही अत्यावश्यक बाब आहे. ताप आणि पुरळ असा आजार अंगावर न काढता वैद्यकीय यंत्रणेला याविषयी माहिती द्या, इतरांशी संपर्क टाळा. हा आजार सर्व वयोगटांमध्ये होऊ शकतो. परदेशी प्रवास केलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्या. 21 दिवस स्वतःवर काळजीपूर्वक लक्ष ठेवा. सर्व डॉक्टरांनी तापाच्या सर्व रुग्णांची तपासणी करताना पुरळ आहे का, तसेच लसिका ग्रंथींची वाढ झालेली आहे का, याची तपासणी अवश्य करा व सार्वजनिक आरोग्य विभागाकडे प्रत्येक संशयित रुग्णाची नोंद करा. पुण्यातील छखत या संस्थेमध्ये रुग्णाच्या शरीरावरील फोडांमधील स्रावाची तपासणी होऊ शकते. या आजारावरदेखील rtPCR टेस्ट विकसित करण्यात आली आहे. परदेशातील काही रुग्ण समलैंगिक गटातील असल्याने समलैंगिक गटानेदेखील ताप व पुरळ असल्यास इतरांशी नजीकचा संपर्क टाळावा, तसेच तपासणी करून घ्यावी.
 
 
या आजाराविषयी भेदाभेद व कलंकित भावना उत्पन्न होऊ न देता, योग्यती काळजी घेतल्यास तसेच आजाराविषयी चुकीच्या माहितीला बळी न पडता आजार व प्रसार टाळण्यासाठी योग्य कृती केल्यास मंकीपॉक्स या नव्या आजारापासून भारताला सुरक्षित ठेवणे शक्य आहे. आवश्यकता आहे ती शास्त्रीय दृष्टीकोनाची आणि सहकार्याची!
 
 
समाजाचे आरोग्य लोकसहभागाखेरीज शक्य नसते! आपण सर्वांनी मंकीपॉक्सपासून सुरक्षेसाठी जागरूक होऊ या आणि मंकीपॉक्सला गावापासून, राज्यापासून, देशापासून दूर ठेवू या!
 
 
लेखिका मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनऔषध वैद्यकशास्त्र विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत.