ग्रँडमास्टर प्रग्यानंद भारतीय बुद्धिबळाचे भविष्य उज्ज्वल

विवेक मराठी    04-Jun-2022
Total Views |
@केदार लेले
जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला सलग दुसर्‍यांदा पराभूत करत बुद्धिबळाच्या पटावर भारताचे नाव पुढे ठेवणार्‍या ग्रँडमास्टर प्रग्यानंदच्या रूपाने भारतीय बुद्धिबळाचे उज्ज्वल भविष्य समोर आले आहे. अशाच खेळाडूंमुळे भारत बुद्धिबळाची महासत्ता म्हणून उदयास येत आहे.

PHOTO
 
जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत करणार्‍या माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंद आणि जुनियर जगज्जेता पेंटाल्या हरिकृष्ण यांच्या पंक्तीत मान मिळवत भारताचा यशस्वी ग्रँडमास्टर प्रग्यानंदचा प्रवास अचंबित करणारा आणि वाखाणण्यासारखा आहे!
एकदा नव्हे, तर सलग दुसर्‍यांदा, नॉर्वेच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत करणार्‍या 16 वर्षांच्या ग्रँडमास्टर प्रग्यानंद याने आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रग्यानंदचे विशेष कौतुक केले आहे. आपल्या कल्पकतेच्या जोरावर बुद्धिबळ विश्वात मिळवलेल्या यशामुळे प्रग्यानंदने आपली जागा कायमस्वरूपी सुनिश्चित केली आहे.
प्रग्यानंदचा बुद्धिबळातील प्रवास
 
प्रग्यानंदचे पूर्ण नाव रमेशबाबू प्रग्यानंद असे आहे. प्रग्यानंदचा जन्म 10 ऑगस्ट 2005 रोजी चेन्नईमध्ये झाला.
प्रग्यानंदची मोठी बहीण वैशाली हीदेखील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आहे. वैशाली टीव्हीच्या आहारी जात आहे असे लक्षात येताच त्यांच्या आईवडिलांनी वैशालीला बुद्धिबळ प्रशिक्षण द्यायचे ठरवले. मोठ्या बहिणीला बुद्धिबळ खेळताना पाहून प्रग्यानंदलाही बुद्धिबळाची आवड निर्माण झाली.
दोन मुलांना बुद्धिबळ शिकवणे शक्य नसल्याने, प्रग्यानंदच्या बुद्धिबळाला आधी वडिलांचा थोडा विरोध होता. घरची परिस्थिती तशी बेताची असल्याने प्रग्यानंदने बुद्धिबळ खेळू नये असे त्याच्या वडिलांचे मत होते. पण प्रग्यानंदची बुद्धिबळातील प्रगती पाहता कुटुंबाने त्याला पाठिंबा दिला.PHOTO
 
प्रग्यानंद एक युवा चॅम्पियन
प्रग्यानंदने 2013 साली 8 वर्षांखालील चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यामुळे त्याला अवघ्या सातव्या वर्षी फिडे (FIDE) मानांकन मिळाले. 2015 साली त्याने दहा वर्षाखालील जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपदही मिळवले.
प्रग्यानंदने 2016 साली नवा इतिहास रचला. सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय मास्टर बनण्याचा मान प्रग्यानंदने 2016मध्ये मिळवला. त्या वेळी त्याचे वय अवघे 10 वर्षे 10 महिने आणि 19 दिवस इतकेच होते!
90व्या मानांकनासह प्रग्यानंद बुद्धिबळ विश्वचषक 2021मध्ये सहभागी झाला होता. चौथ्या फेरीत त्याचे आव्हान संपुष्टात आले. त्याला लेग्राव याने पराभूत केले. 2022 साली त्याने मास्टर्स विभागातही सहभाग घेतला. या स्पर्धेत त्याला सव्वापाच गुणसंख्येसह 12व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

 
रशिया - बुद्धिबळाची महासत्ता
तसे बघायला गेले, तर बुद्धिबळाचा उगम सहाव्या शतकात झाला. जागतिक सर्वोच्च शंभर प्रतिभासंपन्न खेळाडूंमध्ये भारताचे फक्त दहा खेळाडू आहेत, तर रशियाचे 23 खेळाडू आहेत. रशियाकडून अनेक जगज्जेते मिळाल्यामुळे अजूनसुद्धा रशियाला बुद्धिबळाची महासत्ता किंवा महाशक्ती मानले जाते. पण आता हे चित्र थोडेसे बदलताना दिसत आहे!
 
भारत-बुद्धिबळाची भावी महाशक्ती
भारतातून आता 73 ग्रँडमास्टर आहेत, जे 2007मध्ये केवळ वीस होते. त्यापैकी दोन महिला ग्रँडमास्टर आहेत. त्यातील 34 वर्षीय कोनेरू हम्पी, माजी महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियन आहे. दोन वर्षांच्या प्रसूती विश्रांतीनंतर डिसेंबर 2019मध्ये तिने विजेतेपद पटकावले होते.
प्रग्यानंद आणि द थ्री मस्केटियर्स - प्रग्यानंदचे तीन समवयस्क त्याच्या पिढीतील सर्वात आश्वासक खेळाडूंपैकी आहेत, ते म्हणजे निहाल सरीन (18 वर्षे) स्पीड चेस मास्टर आणि 2019 आशियाई ब्लिट्झ चॅम्पियन, अर्जुन एरिगाइसी (18 वर्षे) ज्याला पाच वेळा विश्वविजेता विश्वनाथन आनंद ‘भारताच्या सर्वोत्तम आशांपैकी एक’ म्हणतो आणि गुकेश (15 वर्षे) जो 2019मध्ये खेळाच्या इतिहासातील दुसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनला.
 
 
भारताचे उज्ज्वल भविष्याचा विचार करताना माजी जगज्जेते व्लादिमीर क्रॅमनिक आणि विश्वनाथन आनंद यांनी पुढाकार घेत अनेक उत्तम आणि तरुण भारतीय ग्रँडमास्टर्सची कार्यशाळा घेतली आहे. तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांची निवड करण्यात आली आहे.

 
21व्या शतकात प्रग्यानंद हा भारतात बुद्धिबळाच्या वाढत्या प्रभावाला मूर्त रूप देणार्‍या तरुण पिढीचा एक उत्तम प्रतिनिधी आहे. भारत बुद्धिबळाची महाशक्ती म्हणून उदयास येत आहे, हे नक्की!