बारमाही फुलणारा वेलणकर सोनचाफा

विवेक मराठी    04-Jun-2022
Total Views |
@मिलिंद चाळके । 8879894649
केवळ श्रावणात फुलणार्‍या सोनचाफ्याला बारमाही फुलवायची किमया कुडाळच्या उदय वेलणकरांनी दाखवली आणि त्यातून सुरू झाला ‘वेलणकर चाफा’चा प्रवास. ‘वेलणकर चाफा’च्या प्रयोगाने शेतकर्‍याच्या राहणीमानात मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाले. त्याचबरोबर आपल्या घराच्या गॅलरीतच बाग फुलवणार्‍या हौशी लोकांना आता घरच्या कुंडीतच हा चाफा बारा महिने फुलताना पाहण्याचे सौख्य लाभत आहे.
 
 
chafa
उदय वेलणकरांचे वडील 1930पासून या नर्सरीच्या व्यवसायात होते. विजयदुर्गमध्ये वेलणकरांची नर्सरी होती. तेव्हापासून देवगड तालुक्यात आंबा लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी व सोबत इतर फुलझाडे तयार करणारी नर्सरी व विक्री केंद्र होतं. विजयदुर्गला जी काही अनेक प्रकारची रोपं, कलमं तयार व्हायची, ती सगळी कोल्हापूरमध्ये विक्री व्हायची. इतरही अनेक ठिकाणी ती पाठवली जायची, पण आमचं मुख्य केंद्र कोल्हापूरला होतं, असे उदय वेलणकरांनी सांगितले आणि अचंबित झालो. म्हणजे थोडक्यात हा वेलणकरांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे.
 
 
1970 साली वडिलांनी कोल्हापूर सोडून पुन्हा एकदा कोकणची वाट धरली. कोल्हापूरची ती जागा विकल्यानंतर एका नातेवाईकांपैकी ही वेताळ बांबर्ड्याची 20 एकर डोंगर उताराची जमीन वेलणकरांच्या वडिलांनी त्यावेळी विकत घेतली. पाण्याची व्यवस्था, रहातं छोटं घर आणि नारळाची बागायत अशी ही जागा होती. तो सगळा नर्सरीचा कोल्हापूर-विजयदुर्ग दोन्हीकडचा व्याप त्यांनी आवरून इथे आणला. वडील 1980 साली निवर्तले. त्यावेळी उदय वेलणकर अठरा - एकोणीस वर्षांचे होते. ती जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली.
 
 
नर्सरी करत असताना ती सगळी कलमं गावोगावी नेऊन आम्ही विकत असू. कलमं तयार करायची, आठवडा बाजारात नेऊन गाडी लावायची आणि विकायची. त्यावेळी खूप कष्ट केले आणि त्यातून अनेक गोष्टी शिकलो, असे उदय वेलणकर भावनिक होऊन बोलत होते.
 

chafa
 
ते सांगतात, काही नर्सरी फिरत असताना मी एकदा रत्नागिरीला गेलो. तिथल्या नर्सरीत गेलो. मी त्यांना चाफ्याची कलमं तुमच्याकडे असतात का? असं विचारलं. त्यावेळी एक नर्सरीवाले म्हणाले, “नाही हो ते विजयदुर्गला एक वेलणकर होते. ते त्यावेळी करायचे. आता कुठे ते उपलब्ध नाहीत. त्यांच्याकडून आम्ही चाफ्याची कलमं आणायचो आणि तशी खात्रीशीर कलमं आता कुठे मिळत नाहीत. अलीकडे बँगलोरहून कलमं मागवत होतो, पण त्याचा रिझल्ट एवढा काही खास चांगला नसल्याने आम्ही तिथून कलमं आणणं बंदच केलं,” असं ते म्हणाले. त्यावर मी सांगितलं, “मी त्या वेलणकरांचा मुलगा आहे. मी तुम्हाला तशी खात्रीशीर कलमं देईन. त्यावेळी आमची ओळख होऊन अवघ्या 6 ते 7 रुपयांना आम्ही त्यांना कलमं तयार करून दिली. त्यावेळी त्यांची ऑर्डर घ्यायला नियमित रत्नागिरीला जावे लागे. 160 किलोमीटरचा प्रवास मी मोटरसायकलवरून करीत असे. या प्रेरणेतून सोनचाफ्याच्या उद्योगाला लागलो, असे या उद्योगाच्या नव्या प्रवासाबाबत ते बोलत होते.
 
 
1970पासून आतापर्यंतचा त्यांचा सगळा प्रवास खूप रंजक आहे. त्यावेळी त्यांनी वडिलांचे नाव सांगितल्यामुळे, त्या नर्सरीवाल्यांनी चाफ्याची मागणी त्यांच्याकडे नोंदवली. आणि तिथून जे चाफ्याकडे वळलेे ते इथवर येऊन पोहोचले. मग त्यातल्या वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे प्रकार त्यांच्याकडे होतेच. वडिलांनी तयार केलेले चाफ्याचे प्रकारही होतेच. पण त्यातही ‘वेलणकर चाफा’ या नावाने बारमाही फुलणारा सोनचाफ्याचा प्रकार तयार केला होता, तो चाफा लोक फार आवडीने लावत असल्याचे दिसते. अनेक लोकांनी व्यावसायिक उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने हा सोनचाफा लावलेला आहे.


chafa
त्याविषयी उदय वेलणकर सांगतात, “पुण्यातील गुल टेकडी मार्केट, मुंबईतील दादर फुल मार्केट इथे अनेक शेतकरी आपल्या शेतातील फुले घेऊन येतात. तिथे जाऊन मी दिवसदिवस थांबायचो. माझी माहितीपत्रकं, माझे व्हिजिटिंग कार्ड त्या फुलवाल्यांना द्यायचो, त्या दुकानदारांना द्यायचो. ही लागवड करून बघा असं मी त्यांना सांगत असे. काही शेतकर्‍यांनी खिल्ली उडवत नाकारलं. चाफा काय बारा महिने येतो काय? श्रावणातच फुलं येतात. हे काहीतरी बोगस कलम असणार. तर काही शेतकर्‍यांनी धाडस केलं आणि आमची कलमं लावली. रिझल्ट चांगला आला. एकाला जोडून एक असे केवळ माऊथ पब्लिसिटीने ‘वेलणकर चाफा’ प्रसिद्ध होत गेला. पुणे भागात सहकार तत्त्वावर जास्त भर असल्याने त्या परिसरात चाफ्याची शेतीही याच प्रकारे केली जाते.
 
 
शेतकरी 500-1000 अशी घाऊक कलमे घेतो, अशा शेतकर्‍यांना आम्ही स्वतः कलमे देतो. कारण त्यांना त्याची लागवड करून, कष्ट करून त्याचं उत्पन्न काढायचं असतं म्हणून आम्ही किफायतशीर किमतीत आमचा वेलणकर चाफा देतो. शेतकर्‍यांना त्याची माहिती देतो प्रसंगी प्रत्यक्ष जागेवर जाऊन मार्गदर्शन करायची वेळ आली तरी आम्ही त्यांना सेवा देतो.
 
 
प्रतिवर्षी साधारण 10,000 रोपे आम्ही तयार करतो. बहुतांश नोंदणीप्रमाणे रोपे आम्ही तयार करतो. एक कलम तयार करून ग्राहकाच्या हातात देईपर्यंत दोन वर्षांची मेहनत त्या कलमामागे असते. बियांपासून आलेलं रोप रूजवणे, ते मोठं करणं, त्याला पुन्हा झाडावर थेट कलम तयार करणं, ते वाढवणं नंतर पुन्हा ते कुंडीमध्ये बॅगमध्ये वाढवणं आणि मग तुम्हाला देणं यात दोन वर्ष लागतात. आमच्या या प्रक्रियेमागे मनुष्यबळ, कालावधी हा जास्त लागतो. त्यामुळे या एका रोपाची किंमत जास्त असते.”
 
 
1980 सालापासून वेलणकर चाफा बाजारात आला आणि त्यानंतर त्याच्यावरच उदय वेलणकर यांनी लक्ष केंद्रीत केले. अशातर्‍हेने ‘वेलणकर चाफा’ची सफर सुरू झाली. साधारण 41 वर्षे ते यावर काम करत आहेत.
 
 
chafa
 
संबंधित शेतकर्‍याबरोबर गावाला आणि इतर शेतकर्‍यांना फायदा होतो. एकरी चारशे झाडे लागतात. यानुसार 25 एकरवर प्रतिवर्षी नव्याने वेलणकर चाफ्याची लागवड होते. असं गेले चाळीस वर्षं आम्ही सेवा करतो आहोत. म्हणजे जवळपास 1000 एकरवर वेलणकरांचा सोनचाफा बहरतो आहे. साधारण चाळीस-पन्नास एकरवर फुलशेती केली जाते. त्याच्यामध्ये सर्वत्र बहुतांश ठिकाणी वेलणकर चाफा लावला गेला आहे. यात आणखी एक संवेदनशील गोष्ट अशी आहे, की ज्या फुलाला सुगंध असतो ती फुलं जलदगतीने नाशवंत होतात. अ‍ॅस्टर, जरबेरा, झेंडू यांना सुगंध नसतो, ती फुले मार्केटमध्ये गेल्यावरही चार दिवस टिकतात. पण तेच मोगरा, जाई, जुई, सुगंधीत गुलाब आणि सोनचाफा यासारखी फुले ही लवकर नाश पावतात. त्यामुळे त्याच दिवशी त्याची विक्री होणे गरजेचे आहे. मार्केटच्या जवळपासच्या परिसरातील जे शेतकरी आहेत, ज्यांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध आहे, ते शेतकरी ही लागवड करू शकतात. त्यामुळे अशा सुगंधीत फुलांची शेती दोन-तीन तासांवर बाजारपेठ असलेल्या ठाणे, पालघर जिल्ह्यात प्रामुख्याने केली जाते. तामिळनाडूतदेखील वेलणकर चाफ्याच्या लागवडीला चांगले यश मिळाले आहे.
 
 
स्थानिक बाजारपेठेतील प्रतिसादाविषयी उदय वेलणकर सांगतात, “इथे आमच्या गावात व आसपासच्या गावात सर्वांच्या दारात माझा चाफा पोहोचला आहे. पण व्यावसायिकदृष्ट्या इथल्या बाजारपेठा विकसित नाहीत. ज्या काही तालुक्याच्या बाजारपेठा आहेत, त्यात फुलं विकत घेण्याचा ट्रेंड तेवढा रुजलेला नाही. त्याचं कारण सगळ्यांच्या परसात फुलझाडे असतात किंवा दुसर्‍याच्या परसातली फुले काढून ती वापरली जातात. व्यावसायिकदृष्ट्या लागवड जर म्हटली, तर आता चिपी विमानतळ झाले आहे. तिथली वाहतूक नियमित झाली तर इथली फुलंदेखील मुंबईला जाऊ शकतात. अजून हे प्राथमिक अवस्थेत आहे. त्यामुळे एक वर्षभरात त्याचं चित्र स्पष्ट होईल.
 
 
सध्या एक हजार फुले सावंतवाडी आणि 500 फुले कुडाळला रोज जातात. गेल्या दोन वर्षात कोरोना काळात त्यात खंड पडला. त्याचा मोठा फटका बसला आहे. पण आता पुन्हा ही बाजारपेठ खुली होईल, याचा विश्वास आहे. फुलांचा ट्रेंड आम्ही रुजवत आहोत. त्यामुळे 500 फुले तरी कुडाळ मार्केटमध्ये खपतात.”
 
 
 
मात्र हे आपण कोणत्याही पुरस्कारासाठी, सन्मानासाठी केलेले नसल्याचे वेलणकर स्पष्टपणे सांगतात. शेतकर्‍यांना सदैव सेवा देण्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले. अलीकडेच केंद्रातील कृषी विभागाने या वेलणकर चाफ्याची स्वतःहून दखल घेतली आहे. ते यावर अभ्यास करून लवकरच या ‘वेलणकर चाफ्या’ला मान्यता देण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात येते.
 
 
शेतकर्‍याच्या भविष्यातील योजना
 
 
गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये सोशल मीडियावर वेलणकर सोनचाफ्याचा खूप प्रसार होऊ लागला आहे. उदय वेलणकरांच्या काही परिचितांनी आणि मित्रांनी फेसबुकवर, इतर सोशल मीडियावर माहिती प्रसारित केली. त्यावरून गेल्या तीन-चार वर्षांत पुणे, मुंबई इथल्या सोसायट्यांमध्ये रहाणार्‍या लोकांना कुंडीत लावायला चाफा पाहिजे, ही मागणी वाढू लागली.
 
 
“आतापर्यंत शेतकरी माझ्या संपर्कात होते. शेतकरी 10-20 झाडे लावत, 100-200 झाडे लावत असतं. अगदी 2000, 4000 झाडे नेऊन लावत असतं. पण मला बाल्कनीत कुंडी ठेवायचीय, फ्लॅटमध्ये झाडे लावण्यासाठी रोपे द्या अशी मागणी वाढायला लागली आहे. अशा लोकांकडे मी पोहोचणार कसा? मी काय प्रत्येकाकडे जाऊन देऊ शकत नाही. मग काही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि फेसबुक पेजेस तयार झाली. निसर्ग प्रेमी, गच्चीवरील बाग, मातीविरहीत बाग असे गट निर्माण झाले. त्यांचे अ‍ॅडमीन म्हणाले की, तुम्ही फक्त आम्हाला रोपे पुरवा, आम्ही ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सगळं नियोजन करतो. आम्ही त्यात अट अशी ठेवली की यात कुठेही व्यापारीकरण होता कामा नये. ग्राहकाला हे महाग पडलं असं कुठेही वाटता कामा नये. लोकांनी त्यात फक्त वाहतूक खर्च वाढवून आमच्या किमतीला विकायला सुरवात केली. आता अशा माध्यमातून नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद म्हणजे महाराष्ट्रातील जेवढी मोठी शहरं आहेत तिथे असे अनेक मध्यस्थ तयार झाले. त्यांनी त्या-त्या शहरात लोकांना कलमं पुरवली आणि त्या लोकांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. रोज फुले मिळत असल्याने लोक खूश आहेत. एकाने तर 20 फुले एका दिवशी फुलल्याची माहिती मला दिली. हे ऐकल्याने मला एवढं समाधान वाटलं की आपण जे करतो आहोत याला यश मिळतय याची खात्री पटली.”
 
 
‘वेलणकर चाफा’च्या प्रयोगाने शेतकर्‍याच्या राहणीमानात मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालं आहे. त्याचबरोबर आपल्या घराच्या गॅलरीतच बाग फुलवणार्‍या हौशी लोकांना आता घरच्या कुंडीतच हा सोनचाफा बारा महिने फुलताना पाहण्याचे सौख्य लाभत आहे.