नाशिक, रा.स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाचा प्रकट समारोप

04 Jun 2022 15:55:22

RSS

नाशिक, रा.स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाचा प्रकट समारोप नुकताच पार पडला. प्रथम वर्ष शिक्षा वर्गाच्या समारोपाप्रसंगी प्रकट कार्यक्रमांमध्ये स्वयंसेवकांनी संचलन, विविध वाद्यांसह घोष, प्रात्यक्षिक, दंडयुद्ध यांची प्रात्यक्षिके, आसने, सामूहिक समता, व्यायाम, योग व गीतगायनाचे प्रात्यक्षिक सर्वांसमोर सादर केले. भोंसला सैनिकी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेल्या या संघ शिक्षा वर्गात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांतील 168 शिक्षार्थी सहभागी झाले होते. तसेच 15 शिक्षक आणि 50 स्वयंसेवकदेखील या वर्गात सहभागी झाले होते.

 
या प्रसंगी रा.स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक सुरेशनाना जाधव, ‘गुरुगोविंद सिंह फाउंडेशन’चे अध्यक्ष बलबीरसिंह छाब्रा, नाशिक विभाग संघचालक कैलास उर्फ नाना साळुंके, शहर संघचालक विजयराव कदम व अन्य अधिकारी गण स्वयंसेवक उपस्थित होते. या प्रकट कार्यक्रमाला नाशिक शहरातूनदेखील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या वेळी स्वच्छता, सामाजिक समरसता, स्वधर्माभिमान, राष्ट्रप्रेम, पर्यावरण जागृती अशा अनेक विषयांवर आधारित प्रशिक्षण व प्रात्यक्षिकेही सादर झाली.
 
 
RSS
पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक सुरेशनाना जाधव उपस्थित नागरिक आणि स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, “संघाच्या स्थापनेपासूनच समाजाला अशा कार्यक्रमांचे निमंत्रण देऊन एकत्र करण्याचा प्रयत्न सातत्याने होत असतो. समाजाशी संपर्क करून निमंत्रण देणे, यातून समाजाला संघाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न संघ नेहमी करत असतो. या माध्यमातून संघ नेमके काय करतो हे जाणून घ्यावे व जाणून घेता घेता संघगंगेत सहभागी होऊन प्रभावी व्हावे, तसेच संघाचे घटक बनावेत, हादेखील या कार्यक्रमांमागील प्रयत्न व दृष्टीकोन असतो.”
 
 
पुढे ते म्हणाले की, “अशा प्रकारच्या वर्गातून सहभागी स्वयंसेवक गणवेश, प्रवास खर्चाशिवाय शुल्क देऊन राहतात. त्यांना प्रशिक्षण देणारे कार्यकर्तेही स्वखर्चाने येतात. त्यांना कोणतेही मानधन नाही. यातून समाजासाठी पदरमोड करायची असते, मग ती वेळेची असो वा धनाची, असा संस्कार रुजू लागतो. या वर्गाच्या माध्यमातून स्वयंसेवकांची शारीरिक, मानसिक व बौद्धिक तयारी करून घेण्याची परंपरा गेल्या 96 वर्षांपासून चालू आहे.
 
 
ग्रामीण भागामध्ये धर्मांतराचा मुद्दा मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. खासकरून हिंदू धर्मपद्धतीनुसार सण साजरे करायला पुरोहित वर्ग तिथे उपस्थित नव्हता. त्यामुळे संघाने त्या ग्रामीण भागातील विशिष्ट वर्गातील लोकांना पूजेचे प्रशिक्षण देऊन पाच प्रमुख विधी शिकवले, जेणेकरून तेथील धर्मांतराला आळा बसावा व हिंदू समाज संघटित राहावा. स्वावलंबी भारत या अभियानामार्फत संघ उद्योजकता विकास, आर्थिक प्रशिक्षणाद्वारे समाजात काम करणार आहे. 2030पर्यंत ‘बिलो पॉवर्टी लाइन’ शून्य करण्यासाठी संघ प्रयत्न करणार आहे” असेही जाधव म्हणाले.
 
Powered By Sangraha 9.0