“चार्टर्ड अकाउंटंटना अटक ही धोक्याची घंटा समजावी” - अ‍ॅडव्होकेट किशोर लुल्ला

विवेक मराठी    06-Jun-2022
Total Views |
सीजीएसटी कायद्याचे कलम 69 आणि 132 याचा तपशीलवार अभ्यास केल्यास असे लक्षात येते की जोपर्यंत एखादा चार्टर्ड अकाउंटंट किंवा त्यासारखा व्यावसायिक स्वत:हून एखादे गैरकृत्य करत नाही किंवा दुसर्‍याला गैरकृत्य करायला भाग पाडून स्वतः नफा मिळवत नाही, आणि सदरची रक्कम जोपर्यंत 5 कोटींच्यावर असत नाही तोपर्यंत त्यांना अटक करणे हे कायद्याविरुद्ध आहे. जर सरकारला असा कोणत्याही प्रकारचा संशय आला तर त्यांनी नोटीस काढून कलम 74अंतर्गत लेखी आदेश पारित केला पाहिजे आणि त्यानंतरच अटक करण्याचा विचार केला पाहिजे.
 
CA
 
गुरगाव येथे एका नोंदीत व्यापार्‍याने चुकीचा परतावा मागितला या आरोपाअंतर्गत जीएसटी अधिकार्‍यांनी तेथील दोन चार्टर्ड अकाउंटंटना अटक केली. सदरची बाब क्षुल्लक नसून सर्व कर सल्लागारांनी ही धोक्याची घंटा आहे असे समजावे, असे ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्सचे कार्यकारणी सदस्य अ‍ॅडव्होकेट किशोर लुल्ला यांनी जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे. चार्टर्ड अकाउंटंट, अ‍ॅडव्होकेट, कॉस्ट अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी आणि कर सल्लागार हे सरकारला कर मिळवून देण्यासाठी मदत करत असतात. सरकारने पारित केलेले किचकट कायदे हे सोप्या भाषेत व्यापार्‍यांना समजावून सांगणे, त्यांच्यासाठी विवरणपत्रके भरणे, तपासणी करून घेणे, परतावे मिळवणे अशासारखी सर्व अनुषंगिक कामे वरील मंडळी करीत असतात. यासाठी त्यांनी प्रचंड अभ्यास करून पदवी मिळवलेली असते. तसेच संबंधित नियामक मंडळांकडून हा व्यवसाय करण्याचा परवानादेखील मिळवलेला असतो. वर्षभरात अनेक वेळा विविध चर्चासत्रांतून स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी प्रयत्न केला जात असतो. 99% चार्टर्ड अकाउंटंट आणि इतर समव्यावसायिक हे प्रामाणिकपणे त्यांचा व्यवसाय करीत असल्याचे गेल्या पन्नास ते साठ वर्षाच्या आकडेवारीवरून सिद्ध झालेले आहे. भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या अधिकार्‍यांची संख्या यापेक्षा कितीतरी जास्त आहे.
सीजीएसटी कायद्याचे कलम 69 आणि 132 याचा तपशीलवार अभ्यास केल्यास असे लक्षात येते की जोपर्यंत एखादा चार्टर्ड अकाउंटंट किंवा त्यासारखा व्यावसायिक स्वत:हून एखादे गैरकृत्य करत नाही किंवा दुसर्‍याला गैरकृत्य करायला भाग पाडून स्वतः नफा मिळवत नाही, आणि सदरची रक्कम जोपर्यंत 5 कोटींच्यावर असत नाही तोपर्यंत त्यांना अटक करणे हे कायद्याविरुद्ध आहे. जर सरकारला असा कोणत्याही प्रकारचा संशय आला तर त्यांनी नोटीस काढून कलम 74अंतर्गत लेखी आदेश पारित केला पाहिजे आणि त्यानंतरच अटक करण्याचा विचार केला पाहिजे.

  अ‍ॅडव्होकेट, कर सल्लागार, चार्टर्ड अकाउंटंट हे समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यामुळे मागचा पुढचा विचार न करता अगदी सहजासहजी चार्टर्ड अकाउंटंटना अटकेची कारवाई करणे ही बाब अत्यंत निंद्यनीय आहे. यासाठी देशभर आंदोलन झालेले दिसत नाही ही आश्चर्याची बाब आहे.

शासनाचे काम करत असताना जर एखाद्या शासकीय अधिकार्‍याने कोणतीही चूक केली तर त्याला दंड अगर शिक्षा होत नाही, अशी सुरक्षा देण्याची तरतूद सर्व कायद्यांमध्ये केलेली आहे. अशीच तरतूद कर सल्लागारांसाठीदेखील असली पाहिजे आणि त्यासाठी देशातील सर्व कर संघटनांनी आवाज उठवला पाहिजे, असे प्रतिपादन किशोर लुल्ला यांनी केले आहे.
 
CA
 
अ‍ॅडव्होकेट किशोर लुल्ला