चिरतरुण, कार्यमग्न व्यक्तिमत्त्व - बापूराव कुलकर्णी

विवेक मराठी    06-Jun-2022
Total Views |
 @सुधाकर पोटे । 9423575815
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे अनेकांच्या जीवनाला परीसस्पर्श झाला. समाजसमर्पित आयुष्य जगण्याची अनेकांना प्रेरणा लाभली. ही प्रेरणाच बापूराव कुलकर्णींचीही जीवनप्रेरणा आणि कार्यप्रेरणा झाली. बापूराव म्हणजे संपूर्ण पुणे महानगरातील चिरपरिचित व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचा जनसंपर्क अतिशय दांडगा आहे. वयाच्या 83 वर्षीही त्यांच्या कामाचा उरक आणि सपाटा तरुणांनाही लाजवील असा असतो. अशा या चिरतरुण, कार्यमग्न व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा गौरव करणारा लेख...
 
RSS
पुण्यातील बापूराव कुलकर्णी हे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व. सध्या त्यांचे वय 83 वर्षे झाले आहे. बरेच जण सेवानिवृत्त झाल्यावर कार्यरत राहण्याची इच्छाशक्तीच गमावतात आणि आलेला दिवस पुढे ढकलत आयुष्य जगत राहतात. पण बापूरावांच्या कामाचा सपाटा आपण पाहिलात तर तरुण व्यक्तीनेही त्यांच्याकडून कार्याची प्रेरणा घ्यावी असे म्हणावे लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे अनेकांच्या जीवनाला परीसस्पर्श झाला. समाजसमर्पित आयुष्य जगण्याची अनेकांना प्रेरणा लाभली. ही प्रेरणाच त्यांची जीवनप्रेरणा आणि कार्यप्रेरणा झाली. बापूराव म्हणजे संपूर्ण पुणे महानगरातील चिरपरिचित व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचा जनसंपर्क अतिशय दांडगा आहे. अनेक घरांशी आणि अनेक कुटुंबांशी जोडला गेलेला दुवा म्हणजेच बापू. बापू जेव्हा कुणाच्या घरी येतात, तेव्हा त्यांना आपल्याच घरातील एक वडीलधारी व्यक्ती घरी आली, असे वाटते.
 
 
सुधाकरराव मार्तंड उपाख्य बापूराव कुलकर्णी यांचा जन्म 19 जुलै 1939 रोजी झाला. 1983 साली अपर्णा सुधाकर बोकारे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांचे पुत्र सुधांशू व सून डॉ. अनुजा व नातू मिहीर यांचे वास्तव्य सध्या अमेरिकेतील सानहोजे येथे आहे. बापूराव यांचा संघशाखेशी बालवयातच परिचय झाला. ग्राहक पंचायतीचे संस्थापक स्व. बिंदुमाधव जोशी हे त्यांचे शाखेतील शिक्षक होते. वाढत्या वयाबरोबर संघशाखेशी बापूरावांचा संबंध वर्धिष्णू होत राहिला. मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर घरची आर्थिक लक्षात घेता त्यांना नोकरी करणे गरजेचे होते. त्या वेळी 1957च्या सुमारास शारीरिक शिक्षण शाळांमध्ये सक्तीचे करण्याचा शासकीय आदेश निघाला होता. बापूरावांनी शा.शि. पदविका पूर्ण केली असल्याने नागपूर येथे एका शाळेत त्यांची नियुक्ती झाली. नागपूरला प्रस्थान हा बापूरावांच्या आयुष्यातील ‘टर्निंग पॉइंट’ ठरला. पाच वर्षे नागपूरला महालमधील संघकार्यालय डॉ. हेडगेवार भवन येथे पू. श्रीगुरुजींचे वास्तव्य असलेल्या शेजारच्या खोलीतच बापूरावांना निवासाचे भाग्य लाभले. साहजिकच संघशाखा व दायित्व यांचा बापूरावांचा संबंध अधिकच घट्ट झाला.

 
बाळासाहेब देवरस, एकनाथजी रानडे, यादवराव जोशी, कृष्णराव मोहरीर, भाऊराव देवरस, बाबासाहेब आपटे, मोरोपंत पिंगळे, पांडुरंगपंत क्षीरसागर, दंत्तोपंत ठेंगडी, पं. दीनदयाळ उपाध्याय या कर्तृत्ववान प्रचारकांचा बापूरावांना जवळून सहवास लाभला. अखिल भारतीयचे कार्यकर्तेही जवळून अनुभवता आले. कार्यकर्ता म्हणून बापूरावांच्या जडणघडणीत सगळ्याचा परिणाम झालेला आहे. पुण्यातील ज्येष्ठ स्वयंसेवक व बापूरावांचे स्नेही आत्मारामपंत देशपांडे मला नेहमी सांगत, “अरे सुधाकर, सारी जडणघडण नागपूरची देणगी आहे.” 1963च्या सुमारास पुण्यात घरी आल्यावर दीर्घकाळ संघकार्य करावयाचे असल्याने त्यांनी संघशाखा कामासाठी सुविधाजनक ठरेल म्हणून दुधाचा व्यवसाय निवडला. या व्यवसायामुळे त्यांना भरपूर मोकळा वेळ मिळत असे.
 
पुण्यात आल्यावर पुण्यातील पूर्व भागात म्हणजे मंगळवार पेठेतील राजाराम शाखेवर मुख्य शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. शाखा, संस्कार, सेवा, सहवास, संवाद, समर्थ संपर्क, समर्पण या आधाराने बापूरावांनी संघकामाचा सर्वदूर प्रभाव निर्माण केलेला आहे. राजाराम शाखेतून अनेक कुशल कार्यकर्ते निर्माण झाले - उदा. हेमंत हरहरे, स्व. सुधाकर काळे, रवी रबडे इ. पुढे नगर कार्यवाह, पुणे महानगर कार्यकरिणी सदस्य, पुणे महानगर संपर्क विभाग अशा चढत्या श्रेणीने बापूराव संघकामात कार्यरत राहिले. याच काळात अणीबाणीत भूमिगत कार्य, तळजाई प्रांत शिबिर असे त्यांच्या यशाचे देदीप्यमान टप्पे ठरावेत! संघाच्या अन्य विविध कामांत त्यांचा नेहमीचा सक्रिय सहभाग असतो. ‘संघकामावीण काळ घालवू नको रे!’ ही उक्ती सार्थ ठरवीत आजही वृद्धापकाळात.. नव्हे, नवतारुण्यात बापूराव कार्यमग्न असतात. त्यांचा आदर्श समोर ठेवूनच अनेक स्वयंसेवक संघकामात संलग्न होत आहेत.
 
मोरोपंत पिंगळे हे बापूरावांचे श्रद्धास्थान! 2005मध्ये पुण्यातील काही मंडळींनी एकत्र येऊन गोविज्ञान संशोधन संस्था स्थापन केली. बापूराव या संस्थेचे कार्यवाह आहेत. या संस्थेच्या माध्यमातून देशी गाय किती मौलिक आहे याबाबत प्रबोधन करून महाराष्ट्रात गो-आधारित शेतीसाठी चळवळ उभी केली आहे. पू. श्रीगुरुजी जन्मशताब्दी वर्ष 2005पासून पुणे शहरातील पूर्वीच्या कसबा मंडळातील जुन्या संघस्वयंसेवकांची यादी करून प्रतिवर्षी 1 मे रोजी त्यांचा स्नेहमेळावा साजरा करण्याचा उपक्रम बापूरावांनी सुरू केला. या उपक्रमातून दर वर्षी संघाच्या अ.भा. अधिकार्‍यांनी संबोधित केले आहे. तसेच संघपरिवारातील अनेक संस्थांना आतापर्यंत सुमारे 12 लाखापर्यंत निधी रूपात अर्थसाहाय्य केले गेले आहे. यामध्ये रा.स्व. संघ धर्मजागरण विभाग, पू. श्रीगुरुजींचे मूळ गाव गोळवली, चिपळूण येथील प्रकल्प, सांस्कृतिक वार्तापत्र, रा.स्व. संघ जनकल्याण समिती, केरळमधील अत्याचारपिडीत समाजबांधवांसाठी कार्यरत संस्था, मोतीबाग संघ कार्यालय विस्तार निधी, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, गो-विज्ञान संस्था या विविध प्रकारे राष्ट्रोत्थानाचे काम करणार्‍या संस्थांचा समावेश आहे.

कोविड काळात मात्र हिंडण्या-फिरण्यावर बंधने घातली गेल्यामुळे बापूराव प्रत्यक्ष संपर्क करू शकले नाहीत. पण मोबाइलचा सुयोग्य वापर कसा करावा, हे बापूराव यांच्याकडून शिकावे! त्यांच्याकडे संपर्कात असणार्‍या जवळजवळ 2-3 हजार व्यक्तींचे फोन नंबर्स आहेत. सर्वांशी संपर्क करून याही विषम काळात त्यांनी ‘विवेक’च्या ग्रंथासाठी काम केले आहे. हा एक संपर्कांचा ‘मानदंड’ समजावा लागेल. बापूरावांनी सा. विवेक प्रकाशित ‘राममंदिर ते राष्ट्र मंदिर’ या ग्रंथांसाठी संपूर्ण पुणे महानगरातून 176 ग्रंथांची नोंदणी केली. त्यानंतर प्रकाशित झालेल्या ‘संघमंत्राचे उद्गाते डॉ. हेडगेवार’ या विशेषांकाच्या एकूण 1400 प्रतींची पुणे महानगरातून नोंदणी केली. तसेच ‘लोकनेता ते विश्वनेता - नरेंद्र मोदी’ या ग्रंथाची 38 प्रतींची नोंदणी केली व बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली वाहणार्‍या ‘शिवऋषी आणि शिवसृष्टी’ या विशेषांकाच्या 1700 प्रतींची नोंदणी केली. या वयातही त्यांच्या कामाचा उरक आणि सपाटा तरुणांनाही लाजवील असा असतो.

पू. बाळासाहेब देवरस म्हणत की, “समाजावर अकस्मात येणार्‍या संकटात त्वरित व निरपेक्ष मदतीचे आशाकेंद्र म्हणजे संघ होय.” या वचनावर बापूरावांचा पूर्ण विश्वास आहे आणि त्याच मार्गाने ते अग्रेसर आहेत.