@शिबानी जोशी
ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन झालं. भारदस्त आवाज आणि बातम्या सांगण्याची खास शैली यामुळे ते दूरदर्शनवरील बातम्यांची ओळख बनले होते. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा लेख...
मी जी सांगत आहे, ती साधारण 30 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. त्या वेळी दूरदर्शन ही एकमेव दूरचित्रवाहिनी होती. त्यामुळे त्याला साहजिकच प्रचंड कुतूहल, औत्सुक्य, कौतुक जोडलं गेलं होतं आणि त्या दूरदर्शनवरचे एक आघाडीचे वृत्तनिवेदक होते प्रदीप भिडे. आम्ही निवेदिका (अनाउन्सर) म्हणून जाऊ लागलो होतो. प्रदीप भिडे याच्या बातम्या शालेय जीवनापासून ऐकतच होतो. त्याच्याभोवती एक वलय होतं. तो मोठा आहे, फेमस आहे हे माहीत होतं, पण त्याचं मराठी वृत्तनिवेदन, निवेदन क्षेत्रातील योगदान फार मोठं आहे अशी जाणीव नव्हती.पूर्वी दूरदर्शनमध्ये एकच मेकप रूम होती व सर्व तिथेच मेकप करत असत. मेकप करताना नवीन निवेदिका पाहून त्याने स्वत:होऊन ओळख विचारली, इतर काय केलं आहेस? अशी विचारणा केली. माझी ड्यूटी संपवून मेकप उतरवून निघत होते, तेवढ्यात प्रदीप भिडे बातम्या संपवून बाहेर आला आणि म्हणाला की “मीही निघतोच आहे, तुला घरी सोडतो.” आपण ज्या क्षेत्रात चाचपडत आहोत, त्या क्षेत्रातली established व्यक्ती इतकी सहजपणे बोलते हे पाहूनच मी खूश झाले. त्यानंतर मी अधिक काही शिकत आहे, वेगवेगळे कोर्स करत आहे असं सांगितलं, तेव्हा तो म्हणाला, “शिकत राहा. शिक्षण कधीही फुकट जात नाही.” हा त्याने दिलेला सल्ला मी कायम लक्षात ठेवला आहे आणि तो भविष्यात वारंवार उपयोगीही पडला आहे.
आज यूट्यूब, फेसबुक यामुळे बातम्या पुन्हा लगेच पाहायला मिळतात. पण त्या वेळी हे उपलब्ध नव्हतं. सुजाता - त्याची पत्नी बातम्या रेकॉर्ड करून ठेवत असे आणि तो घरी येऊन स्वत:च्या बातम्या पाहत असे. आपण आपल्याला स्वत: पाहावं, म्हणजे चुका सुधारता येतात असं तो म्हणायचा. अव्वल स्थानावर असूनसुद्धा त्याचा अचूकतेचा ध्यास वाखाणण्यासारखा होता. आवाजाची निसर्गदत्त देणगी, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, towering personality या नैसर्गिक संपदेबरोबर हजरजबाबीपणा, दिलखुलास स्वभाव, नवीन गोष्टी शिकण्याची उमेद, दुसर्याबद्दल तिसर्याला कधीही काहीही वाईट न सांगण्याचा स्वभाव, दुसर्यातील दोष न पाहता गुण पाहण्याचा स्वभाव या त्याच्या गुणांमुळे तो अजातशत्रू होता. आपल्याला असा सहकारी, गुरू, मित्र मिळाला यात आपलं काहीही श्रेय नसून त्याच्या या सर्व गुणांमुळे तो आपल्याला लाभला होता, असं मला नेहमी वाटत आलं आहे.
प्रदीपने पदवीनंतर रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं होतं. त्याशिवाय रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेतून तो नाटकातही काम करत होता. त्या काळी दूरदर्शनला काँट्रॅक्टवर काम मिळत असे. पोटापाण्यासाठी, काही हवं म्हणून तो आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपनीमध्ये उच्च पदावर कामही करू लागला होता. परंतु आपल्या आवाजाची जादू त्याच्या लक्षात आली. काम चांगलं असेल तर आपोआप बोलावणी येतात. जाहिरात क्षेत्रात त्याच्या आवाजाची जादू पसरली. 50 ते 60 टक्के जाहिराती त्याच्या आवाजात असत. अनेक लघुपट, त्या काळी स्पॉन्सर्ड रेडियो प्रोग्राम होत असत, असे हजारो कार्यक्रम त्याने केले. चांगली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला व फ्री लान्स जगतात उडी घेतली आणि त्याचा त्याला कधीच पश्चात्ताप करावा लागला नाही. त्याच्या सर्व गुणांमुळे तो मराठी आवाजाच्या दुनियेचा बादशहा झाला. मुंबईत, महाराष्ट्रातच नाही, तर अगदी राष्ट्रपती भवन, दिल्लीतील विज्ञान भवन इथेही प्रदीपने मोठमोठ्या कार्यक्रमांची निवेदनं केली आहेत. स्वत: इतक्या उंचीवर पोहोचूनही तो आपल्या क्षेत्रातील निवेदकांना गुरुस्थानी मानत असे. हिंदीतील अमिन सयानी यांना तोड नाही, त्यांच्याच काळात अनंत भावे वृत्तनिवेदक होते, त्यांचं वाचन त्याला खूप आवडत असे. सूत्रसंचालनाच्या क्षेत्रात सुधीर गाडगीळकडून मी खूप शिकतो, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं, तर अंबरीश मिश्र यांचं शुद्ध, सुश्राव्य हिंदी निवेदन ऐकत राहावंसं वाटतं, असं तो म्हणत असे. अमिन सयानी यांच्याशी त्याचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांना पद्मश्री मिळावी म्हणून प्रदीपने प्रयत्न केले होते. आपल्या क्षेत्रातील आपल्या कलीग्जना आपले प्रतिस्पर्धी न समजता त्यांच्यातील मोठेपणाचा आदर करणं प्रदीपकडून शिकावं. “रंगमंचावरील निवेदन आणि टीव्हीवरील वृत्तनिवेदन यात मूलभूत फरक आहे. बातम्या वाचताना एक तटस्थपणा असावा लागतो, तर रंगमंचीय निवेदनात तुम्हाला त्या कार्यक्रमात सहभागी व्हावं लागतं. दोन्ही ठिकाणी हजरजबाबीपणा, चौफेर माहिती या गोष्टी लागतातच, माध्यम पाहून तसं काम करायला लागतं” असं तो म्हणत असे.
त्याच्या नशिबी अतिशय लोकप्रिय व त्याच्या लाडक्या काही व्यक्तींच्या निधनाच्या वार्ता वाचायची वेळही आली होती.त्या काळी निधनाची बातमी ही ‘ब्रेकिंग न्यूज’ नसे, तर ती खरंच दु:खप्रद घटना असे. राजीव गांधी यांचं निधन, काशीनाथ घाणेकर, धुमाळ आणि त्याचे लाडके मोहम्मद रफी यांच्या निधनाची बातमी सांगताना चेहर्यावरचे भाव लपवणं कठीण होतं, असं त्यांनी एकदा सांगितलं होतं. मोहम्मद रफीवरून आठवलं.गीत-संगीत हा त्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय होता. गायक व्हायला आवडलं असतं असं तो अलीकडच्या काळात तर अनेकदा म्हणायचा. त्यासाठी आवड म्हणून त्याने पार्ल्यातील एक हौशी कॅराओके ग्रूप जॉइन केला होता आणि रफी तर त्याचं दैवत होतं. “बदल ही जीवनातील अटळ गोष्ट आहे, त्यामुळे नवीन नवीन गोष्टी करत राहिल्या पाहिजेत” असं तो म्हणत असे. मधल्या काळात कॅसेट्सचं खूप वारं आलं होतं. प्रदीपने असंख्य कॅसेट्सना आवाज दिला. स्वत:च्या प्रॉडक्शन कंपनीतर्फे कॅसेट्स काढल्या. व्हीनस कंपनीसाठी त्याने लहान मुलांसाठी ‘छान छान गोष्टी’चे 12 भाग काढले होते. त्यातील 2-3 भागांतील गोष्टी मी लिहिल्या होत्या. मराठीतील अनेक दिग्गज कलाकारांनी त्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्या कॅसेट्स घरोघरी पोहोचल्या होत्या. तो स्वत: अनेक जाहिरातींना, लघुपटांना आवाज देत असे. त्यातील काम पाहून त्याने स्वत:चा स्टुडियो काढला होता. जे काही करायचं ते दर्जेदार, हा त्याचा स्वभाव असल्यामुळे त्याने अद्ययावत सामग्रीने परिपूर्ण स्टुडियो उभारला होता. आमच्यासारख्या छोट्यापासून अगदी काजोलसारखे हिंदी कलाकारही तिथे डबिंग करून गेले आहेत. दूरदर्शननंतर त्यानी 3 वर्ष झी 24 ताससारख्या खासगी वाहिनीवरही अँकर म्हणूनही काम करून आपली व्यवसयिकता सिद्ध केली होती.
वृत्तनिवेदन क्षेत्रातील प्रदीपचं योगदान यावर खूप लिहिता येईल. 1972मध्ये मुंबई दूरदर्शन सुरू झालं. तिथे 1974पासून 2015पर्यंत प्रदीप वृत्तनिवेदन व त्याबरोबर असंख्य कार्यक्रमांमध्ये मुलाखतकार म्हणून सहभागी राहिला आहे. त्यानंतर 3 वर्षं झी 24 तासला होता. अनेक वृत्तपत्रांत खूप लिखाण केलं, मराठी जाहिरात क्षेत्रात आपला आवाज बुलंद केला, तरीही दूरदर्शनशी त्याचं नाव कायमच जोडलं जाईल. एखाद्या क्षेत्रात प्रवेश करणं एक वेळ सोपं आहे, परंतु 32 वर्षं टिकणं आणि एकसुरीपणा नसणं फार कठीण आहे. ते प्रदीपने करून दाखवलं. सर्जनक्षेत्रात लोकांना एकसुरीपणाचा कंटाळा येतो, पण प्रदीपचा पडद्यावरील वावर कधीच नकोसा झाला नाही, उलट तो पडद्यावर दिसावा असंच लोकांना वाटत असे. बातमी वाचताना तटस्थ भूमिकेतून द्यावी हे खरं असलं, तरी आवश्यक चढउतार, तरीही मार्दव, शुद्ध शब्दोचार यामुळे बातम्या परिणामकारक होतात, असं तो सांगे. त्याचं संयत, सुस्पष्ट, प्रगल्भ, शांत, प्रसन्नवदना वृत्तनिवेदन आजकालच्या नव्या न्यूज अँकर्सनी शिकलं पाहिजे.परंतु आश्वासक आणि आपुलकी असलेला, निखळपणा, प्रसन्न वावर या गुणांमुळे त्याच्याकडून एक माणूस म्हणूनही खूप काही शिकता येण्यासारखं आहे. भारदस्त आवाज हे त्याचं शस्त्र त्याने मंत्रासारखं वापरलं आणि बोलणं कायमच मधाळ राहिलं. माणसांच्या गर्दीत राहूनही वाहत न जाण्याचा गुणही घेण्यासारखा आणि चिकाटी, जिद्द आणि महत्त्वाकांक्षा हीसुद्धा त्याची बलस्थानं होती.
त्याला 6 वर्षांपूर्वी जेव्हा गंभीर आजाराची कल्पना आली होती, त्या वेळीही त्याने तो आजार अत्यंत संयत आणि सकारात्मकतेने स्वीकारला होता. तो म्हणाला होता की “आयुष्याच्या या वळणावर मी खूप आनंदी, समाधानी आहे. मी यथाशक्ती केलेल्या कामाला दैवाची साथ लाभली. मला आवडत्या क्षेत्रात काम करायला मिळालं. आत्ता मरण आलं, तरी मी ते हसत हसत स्वीकारीन.” कोण जाणे, ’फिरुनी नवे जन्मेन मी’ असं म्हणत गायक होण्याची इच्छा पूर्ण करण्याचा तो प्रयत्नही करेल.
गुड बाय प्रदीप
@शिबानी जोशी