युवराजांसाठी आणखी किती ‘कुरबान्या‘?

विवेक मराठी    09-Jun-2022
Total Views |
@अभय पालवणकर 
आदित्य ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग सोपा केला म्हणून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. मात्र त्यामुळे ज्येष्ठ शिवसेना नेते दिवाकर रावते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना मात्र नारळ द्यावा लागला आहे. शिवसेनेच्या जडणघडणीत रावते व देसाई यांचे योगदान मोठे आहे. सेनेच्या पहिल्या फळीतील, बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले हे कार्यकर्ते आहेत. मात्र आज आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ सुरक्षित राहावा यासाठी या अशा दोन दिग्गज नेत्यांना घरी बसवण्याची पाळी सेना नेतृत्वावर आली आहे. 
 
shivsena
 
आदित्य ठाकरे यांच्या सहज विजयासाठी 2019मध्ये सचिन अहिर यांना शिवसेनेत घेतले, तेव्हा एक संदेश फिरत होता - ‘तुमचे मैदान, तुमची बॅट, तुमचे स्टंप, सर्व तुमचे... पण बॅटिंग मीच करणार.. कारण मी युवराज आहे..’ आज या संदेशाची आठवण येण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला निवडणूक होत आहे. यासाठी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यामध्ये शिवसेनेने उभे केलेले सचिन अहिर हे नाव लक्षवेधी ठरत आहे. कारण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभेतून सहज विजय व्हावा, यासाठी सचिन अहिर यांना राष्ट्रवादीतून शिवसेनेत आणले गेले होते. कारण 2009साली सचिन अहिर यांनी वरळीतून शिवसेनेला धक्का देत विजय मिळवला होता. अहिर यांनी दलित, मुस्लीम आणि काही प्रमाणात मराठी अशी बर्‍यापैकी संघटनात्मक बांधणी केली होती. ते राष्ट्रवादीकडून मंत्रीही झाले होते. त्यामुळे अशा तगड्या उमेदवाराची शिवसेनेला अडचण नको, म्हणून अहिर यांनाच शिवसेनेत घेऊन 2019मध्ये युवराजांचा विजय सुलभ केला होता. आता याची परतफेड म्हणून विधानपरिषदेची उमेदवारी अहिर यांना देण्यात आली आहे. मात्र या परतफेडीपोटी ज्येष्ठ शिवसेना नेते व बाळासाहेबांसोबत काम केलेल्या सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांना नारळ द्यावा लागला आहे.
 
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक घोषणा केली होती, “आम्ही कधी निवडणूक लढणार नाही.’‘ त्यांनी स्वत:ही कधीच निवडणूक लढवली नाही. पण बाळासाहेबांनंतरच्या तिसर्‍या पिढीतील आदित्य यांना मात्र निवडणुकीत उतरवल्याशिवाय गत्यंतर नाही, याची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जाणीव झाली. यासाठी त्यांनी आपल्या घराण्याचा निवडणूक न लढवण्याची प्रतिज्ञा मोडून आदित्य यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची घोषणा केली. शिवसेनेकडून अनेक मतदारसंघ पाहिले गेले, त्यातील वरळी आणि माहिम हे मराठमोळे मतदारसंघ समोर आले. त्यात माहीम मतदारसंघात मनसेचा प्रभाव आहे. त्यामुळे तेथून आदित्य यांचा विजय अवघड होऊ शकतो. त्यामुळे वरळीच्या मतदारसंघातून निवडणूक लढवणे अधिक सुलभ होईल, असे राजकीय सल्लागारांनी सांगितले. यावर शिवसेना नेतृत्त्वाने तर शिक्कामोर्तब केले, पण त्यात आदित्य ठाकरे यांना मुख्य अडचण होती, ती म्हणजे वरळीतील राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांची. त्यांनी वरळीतून 2009साली शिवसेनेच्या आशिष चेंबूरकर यांचा मनसेच्या मतविभाजनाचा फायदा घेऊन पराभव केला होता. आणि शिवसेनेचा बालेकिल्ला हिसकावून घेतला होता. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना त्यांची अडचण होऊ शकते. म्हणूनच शिवसेनेने अत्यंत चाणाक्षपणे अहिर यांना आपल्याकडे वळवले... आणि शिवसेनेच्या युवराजांचा विजय अगदीच सोपा झाला. मात्र आज अहिर यांचे ऋण फेडताना मात्र सेनेला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. या परतफेडीची यादी मोठी आहे.
 
 
आदित्य ठाकरे यांच्या विजयासाठी मेहनत घेणार्‍या किशोरी पेडणेकर यांना महापौर करावे लागले. वरळी कोळीवाड्यातील भागात वर्चस्व निर्माण करण्यासाठी हेमांगी वरळीकर यांना उपमहापौर केले गेले . 2009च्या निवडणुकीतील शिवसेना उमेदवार आशिष चेंबूरकर यांची नाराजी नको, म्हणून त्यांना बेस्ट समितीचे अध्यक्ष केले. वरळीतील तत्कालीन आमदार सुनील शिंदे यांनी आदित्या यांच्यासाठी आपली जागा सोडली, म्हणून त्यांना 2021मध्ये विधान परिषदेवर घेण्यात आले. त्यानंतर आता सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग सोपा केला म्हणून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. मात्र त्यामुळे ज्येष्ठ शिवसेना नेते दिवाकर रावते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना मात्र नारळ द्यावा लागला आहे. शिवसेनेच्या जडणघडणीत रावते व देसाई यांचे योगदान मोठे आहे. सेनेच्या पहिल्या फळीतील, बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले हे कार्यकर्ते आहेत. मात्र आज आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ सुरक्षित राहावा यासाठी या अशा दोन दिग्गज नेत्यांना घरी बसवण्याची पाळी सेना नेतृत्वावर आली आहे.
 
 
आपला पत्ता कट झाल्यावर सुभाष देसाई म्हणाले की, “ मी उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेत उद्धवजींसोबत असतो. त्यामुळे मीच उमेदवारी न घेण्याचा निर्णय घेतला आहे.“ उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेत आहे म्हणून स्वत: उमेदवारी घेतली नाही हा तर्क सर्वसामान्य नागरिक सोडाच कोणत्याही शिवसैनिकांसदेखील पटणारी नाही. त्यामुळे ही प्रतिक्रिया म्हणजे सारवासारव करण्याचा प्रयत्न आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
 
 
एकंदरीत काय, तर एकट्या आदित्य ठाकरे यांना ‘सेफ‘ ठेवण्यासाठी शिवसेनेला एवढे सर्व करावे लागले आहे. शिवसेनेचे आमदार दत्ताजी नलावडे यांनी वरळीचा बाल्लेकिल्ला निर्माण केला होता. अशा मतदारसंघात केवळ आदित्य यांच्या राजकीय करिअरसाठी ज्येष्ठांना डावलून बाहेरच्यांना झुकते माप का? असा प्रश्न सामान्य शिवसैनिकास पडला नाही तरच नवल.
 
 
शिवसेना हा एका कुटुंबाला वाहिलेला पक्ष आहे. पूर्वी बाळासाहेब असताना त्यांचा शब्द अंतिम असे. दसर्‍या मेळाव्यातील अगदी शेवटच्या भाषणामध्ये त्यांनी भावनात्मक आवाहन करताना सांगितले होते की, “उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा.” बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे या पिता-पुत्रांना सांभाळण्याचेच एकमेव काम शिवसेना कार्यकर्त्यांना उरले असल्याचे चित्र आहे. या सांभाळण्याच्याच कामात अनेकांना जनतेचा रोष सहन करावा लागतो आहे तर अनेकांना आपल्या करिअरला पूर्णविराम द्यावा लागत आहे.
 
 
‘मातोश्री‘ला सांभाळत सांभाळत रामदास कदम यांचीही टर्म अशीच संपली. अनंत गीते, शिवाजीराव आढळराव, आनंदराव आडसूळ अशा कितीतरी ज्येष्ठ माजी खासदारांचे राजकीय भवितव्य अधांतरीच आहे. आणि आता वरळीतील युवराजांना सुरक्षित ठेवण्याच्या या नादात बलिदानांच्या या यादीत आणखी दोन दिग्गज नेत्यांची भर पडली आहे. हिंदुत्त्व आणि स्वाभिमान यांची तर ‘कुरबानी‘ या आधीच देऊन झालेली आहेच आता ‘उद्धव-आदित्यला सांभाळत‘ आणखी किती कुरबान्या द्याव्या लागणार, याचीच धास्ती आज तमाम शिवसैनिकांना भेडसावू लागल्याचे चित्र दिसते आहे.