ट्रस्ट डीडचे महत्त्व

विवेक मराठी    12-Jul-2022
Total Views |
@श्रेया देशपांडे
  
जसजशी संस्था मोठी होत जाते, तसतसे संस्था स्थापन करतानाच्या संस्थेच्या गरजा, कार्यक्षेत्र बदलत जाते. कालानुरूप कायद्यातही बदल होतात. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच्या ट्रस्ट डीडनुसार न्यासाचा कारभार सांभाळणे कठीण होते. त्यामुळे ट्रस्ट डीडमध्ये आवश्यक ते बदल करणे न्यासाच्या सुरळीत कामकाजासाठी हितावह ठरेल.

 
Importance of Trust Deed
न्यासामध्ये सर्वसाधारणपणे तीन व्यक्ती असतात - 1.Settlor म्हणजे संस्थापक अथवा निर्माता, ज्याच्या/ज्यांच्या इच्छेने संस्था निर्माण होते, 2. ट्रस्टी म्हणजेच विश्वस्त ज्यांच्यावर विश्वास ठेवून Settlor न्यासाची जबाबदारी सोपवतात, आणि 3. Beneficiary Beneficiary म्हणजेच लाभार्थी, ज्यांच्यासाठी न्यासाची स्थापना होते.
 
 
 
जेव्हा कोणत्याही न्यासाची स्थापना होते, तेव्हा वरील तीन व्यक्तींमध्ये एक कायदेशीर बांधिलकी निर्माण होते. यातील प्रत्येक व्यक्तीवर काही बंधने असतात, तर काही अधिकार असतात. ट्रस्ट डीड हा संस्थापक व पहिले विश्वस्त यांच्यामधील एक करारच असतो. .Settlor हा त्याच्या इच्छेनुसार सामाजिक, धार्मिक अथवा दोन्ही एकत्र अशा उद्दिष्टांसाठी संस्था स्थापन करू शकतो. विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापन बघतात. संस्था स्थापन करताना .Settlor विश्वस्तांची नेमणूक करतो. .Settlor स्वतःदेखील विश्वस्त होऊ शकतो. विश्वस्तांना ट्रस्ट डीडमध्ये नमूद केलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कार्यवाही करावी लागते. न्यासाच्या सभा, ठराव, पुढील विश्वस्तांच्या नेमणुका, संस्थेचे सर्वसाधारण कार्य हे ट्रस्ट डीडच्या कलमानुसार करणे बंधनकारक असते. विश्वस्त हे न्यासाचे लाभार्थी असू शकत नाहीत.
 
 
 
संस्थांच्या कार्यपद्धतीवर काही कायदेशीर बंधने असतात. ट्रस्ट डीडमधील मजकूरही या कायद्याने आखून दिलेल्या चौकटीमध्येच असणे बंधनकारक आहे. संस्था स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये ट्रस्ट डीडचा मसुदा तयार करणे ही महत्त्वाची पायरी असते. न्यासाची उद्दिष्टे हा ट्रस्ट डीडमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. न्यासाची उद्दिष्टे ही आपल्या ठरवलेल्या कार्यक्षेत्राशी निगडित सर्वसमावेशक असावीत. उद्दिष्टांमधील संस्थासंस्थापकाची संस्था स्थापन करण्यामागची कल्पना स्पष्टपणे दिसून येणे अपेक्षित असते. उद्दिष्टांवरून संस्थेचे कार्यक्षेत्र ठरते. भविष्यात आय करामधील सवलतींसाठी अर्ज करताना, तसेच देणगीदार न्यासाला देणगी देताना संस्थेच्या उद्दिष्टांचा विचार करतात.
 
 
उद्दिष्टे ठरवताना प्रथम मुख्य उद्दिष्टे ठरवून मग त्या अनुषंगाने पूरक उद्दिष्टे ठरवू शकतो. समजा, पर्यावरणाविषयी काम करणे हे एखाद्या न्यासाचे प्रमुख उद्दिष्ट असेल, तर त्या दृष्टीने जनजागृती नियतकालिके, प्रसिद्धीपत्रके प्रकाशित करणे इ. ही त्या नासाची पूरक उद्दिष्टे असू शकतात. शैक्षणिक क्षेत्रात काम करणे हे एखाद्या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असल्यास शाळांची स्थापना, नावीन्यपूर्ण शैक्षणिक पद्धतींचा विकास इत्यादी साहाय्यक उद्दिष्टे असू शकतात.
 
 
 
उद्दिष्टांबरोबरच न्यासामध्ये किती विश्वस्त असावेत व कोणाला न्यासाचे विश्वस्त होता येईल या गोष्टींचा उल्लेखही डीडमध्ये आवर्जून असावा. विश्वस्तांना रोजच्या कामकाजात ट्रस्ट डीड हे एक लिखित स्वरूपातील मार्गदर्शक ठरणे अपेक्षित असते. त्यामुळे विश्वस्तांचे अधिकार व कर्तव्ये यांचा सखोल विचार होऊन त्याविषयी योग्य त्या तरतुदी ट्रस्ट डीडमध्ये असाव्यात. तसेच सभा किती व कशा घ्याव्यात याच्या सूचना कशा द्याव्यात, त्यांचे इतिवृत्त कसे लिहावे याबद्दलही माहिती असणे हितावह ठरेल.
 
 
 
संस्थेकडे अतिरिक्त निधी असल्यास त्याची गुंतवणुकीविषयी कलमेदेखील डीडमध्ये असावीत. ट्रस्ट डीडनुसार संस्थापक नमूद मालमत्ता विश्वस्तांना हस्तांतरित करतात. त्यामुळे त्या मालमत्तेविषयीचे सर्वाधिकार - उदा., गुंतवणूक करणे, विकणे, नवीन विकत घेणे, भाडेतत्त्वावर देणे, इ. विश्वस्तांना असावेत. संस्थेचे हिशेब वेळच्या वेळी ठेवले पाहिजेत, तसेच आर्थिक वर्ष संपल्यानंतर त्याचे ऑडिट करून धर्मादाय आयुक्तांकडे ते जमा केले पाहिजे.
 
 
आवश्यकता वाटल्यास विश्वस्तांपैकी काही विश्वस्तांना ठरावीक जबाबदार्‍यादेखील ट्रस्ट डीडमध्ये नमूद करू शकतो. अध्यक्ष, सचिव, खजिनदार, मुख्य विश्वस्त अशी पदे नमूद केल्यास त्यांचे अधिकार, कर्तव्ये, कार्यकाल व कार्यक्षेत्र यांविषयीच्या तरतुदीदेखील डीडमध्ये असाव्यात.
 
 
न्यासाची उद्दिष्टे पूर्ण झाल्यास अथवा कोणत्याही कारणाने संस्था कार्यरत नसल्यास ती कायदेशीरपणे बंद करणे योग्य ठरते. त्यामुळे ट्रस्ट डीडमध्ये मा. धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीनुसार बंद करू शकण्याविषयीच्या तरतुदीदेखील असाव्यात.
 
 
 
जसजशी संस्था मोठी होत जाते, तसतसे संस्था स्थापन करतानाच्या संस्थेच्या गरजा, कार्यक्षेत्र बदलत जाते. कालानुरूप कायद्यातही बदल होतात. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच्या ट्रस्ट डीडनुसार न्यासाचा कारभार सांभाळणे कठीण होते. त्यामुळे ट्रस्ट डीडमध्ये आवश्यक ते बदल करणे न्यासाच्या सुरळीत कामकाजासाठी हितावह ठरेल.