मध्य मुंबई उपनगराचे शेवटचे टोक म्हणजे मुलुंड. मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स, केळकर महाविद्यालय यांसारख्या शैक्षणिक संस्था, तसेच कालिदास नाट्यगृह ही या परिसराची खास ओळख आहे. या भागात संमिश्र लोकवस्ती आहे. मोठमोठ्या टोलेजंग इमारतींची संकुले इथे आकार घेत आहेत. त्याच जोडीला चाळी आणि झोपडपट्टी परिसरही मोठ्या प्रमाणात आहेत. साहजिकच नागरिकांचे प्रश्नही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. येथील प्रभाग क्रमांक 107च्या नगरसेविका समिता विनोद कांबळे सलग दोन कार्यकाल या समस्या सोडवण्यासाठी धडाडीने काम करत आहेत. त्याविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुम्ही कधी आणि कसा प्रवेश केला?
मी 2012 साली सामाजिक क्षेत्रात प्रवेश केला. माझे वडील बी.ए लवांदे हे आधीपासूनच सामाजिक क्षेत्रात होते. भारतीय बौद्ध महासभेचे ते पहिले मुंबई अध्यक्ष होते. माझे पतीही सुरुवातीपासून रा.स्व. संघाचे आणि भाजपाचे कार्यकर्ता होते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी समाजकारणाचा अनुभव होताच. मी 1996पासून जनकल्याण बँकेत नोकरी करत होते. जनकल्याण ही संघाच्या माध्यमातून चालणारी सहकारी बँक असल्याने संघाच्या वातावरणाशी परिचित होते. 2012मध्ये प्रभाग रचनेत बदल होऊन प्रभाग क्र. 98 अनुसूचित जातीतील महिलेसाठी राखीव झाला. त्या वेळी महापालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षाने मला उमेदवारी दिली. त्यानंतर 2017मध्ये प्रभाग क्रमांक 107 खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाला. आमच्या दोघांचे काम लक्षात घेऊन पक्षाने मला पुन्हा उमेदवारी दिली. दोन्ही वेळी मी निवडून आले. त्यामुळे आता राजकीय कामाविषयीचा अनुभव आणि आत्मविश्वास दोन्ही वाढले आहे.
पहिल्यांदा निवडणूक लढवताना कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला?
माझे पती राजकारणात असले, तरी पहिल्या वेळी निवडणूक लढवताना माझा राजकारणाचा अनुभव शून्य होता. मात्र बँकेत नोकरी करत असल्याने लोकांशी बोलण्याचा अनुभव होता. महापालिकेत आपले प्रश्न कसे मांडायचे, याचे ज्ञान हळूहळू मिळत गेले. आमचे गटनेते खा. मनोज कोटक आणि पक्षातील अन्य स्थानिक वरिष्ठ यांनी याबाबत सातत्याने मार्गदर्शन केले. तसेच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे पक्षाच्या माध्यमातून आम्हा नगरसेवकांना प्रशासकीय कामांबाबत प्रशिक्षणही देण्यात आले होते.
तुमच्या प्रभागातील कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही काम केले?
विकासकामे पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. 2012मध्ये मी नगरसेविका असलेल्या प्रभागाच्या समस्या वेगळ्या होत्या आणि आता असलेल्या प्रभागाच्या समस्या वेगळ्या आहेत. 2012चा प्रभाग क्र. 98 हा मुलुंड कॉलनीचा होता. तिथे राहुल नगर, पंचशील नगर, हनुुमंत पाडा आदी टेकड्यांवरील वस्त्या होत्या. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून येथील वस्ती आहे. तेथे पाण्याची समस्या होती. भांडुपला पंपिंग स्टेशन आहे. मुलुंडला सगळीकडे चोवीस तास पाणी होते, पण त्या भागात पाणी नव्हते. त्यामुळे टेकडीवरच्या भागाला वरच्या बाजूने चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी मी प्रयत्न केले. काही भागात हे प्रयत्न यशस्वीही झाले. तसेच येथे रामगड हा मोठा झोपडपट्टी परिसर आहे. तिथे सार्वजनिक शौचालयांची समस्या होती. त्या वेळी मी तेथील एका प्लॉटवर दोन मजली शौचालये बांधून दिली व असलेल्या शौचालयांची दुरुस्ती करून दिली. तसेच घरोघर शौचालये बांधण्यासाठी पाइपलाइनही टाकून दिली.
माझ्या काळात मार्गी लागलेले या भागातील सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे ईशान्य मुंबईतील सुपरस्पेशालिटी रुग्णालयांपैकी एक असलेले अग्रवाल हॉस्पिटल. या प्रभागातील माझ्याआधीचे भाजपाचे नगरसेवक, मी आणि आमच्या मतदारसंघातील खासदार, आमदार आम्ही सर्वांनी मिळून ते उभारण्यात पुढाकार घेतला. अग्रवाल हॉस्पिटलच्या आधी दोन छोट्या इमारती होत्या. एक पडीक जमिनीवर दोन मजली इमारत होती, तर दुसरी 4-5 मजली होती. तिथे रुग्णालय उभारायचे असे आम्ही ठरवत होतो. पण ती धोकादायक इमारत म्हणून जाहीर झाली होती. त्यामुळे मी तत्कालीन पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याशी चर्चा केली आणि हे रुग्णालय लवकरात लवकर बांधण्याबाबत कार्यवाही करावी, अशी त्यांच्याकडे मागणी केली. त्या वेळी मनीषा म्हैसकर या पालिकेत अतिरिक्त आयुक्त होत्या. त्यांनी येथे येऊन जागेची पाहणी केली आणि तत्काळ निर्णय घेतला की आधी असलेले अग्रवाल हॉस्पिटल पूर्ण पाडून 11 मजल्यांची इमारत बांधायची.
वालजी रद्दा रोड, सीडी दास, एस.एम.पी.आर. स्कूल रोड या रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी मी पाठपुरावा केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुरू केलेल्या आयुष्मान भारत योजनेचा 800 लोकांना लाभ मिळवून दिला. त्याशिवाय नगरसेवक निधीतून अनेक विकासकामे केली आहेत.
कोविड काळात मुलुंड परिसरात तुमच्या माध्यमातून कशा प्रकारे मदतकार्य करण्यात आले?
कोविडच्या पहिल्याच टप्प्यात महापालिकेने औषध फवारणी सुरू करण्याच्या आधी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या भागात औषध फवारणी करून घेतली. तसेच अग्निशमन दलाचे सहकार्य घेऊन मोठ्या रस्त्यांवरही आम्ही फवारणी करून घेतली.
तसेच घरोघर जाऊन मास्कवाटप केले. या काळात पालिकेने पुरवलेल्या फूड पॅकेट्सचा दर्जा चांगला नव्हता. भाजपा खासदार मनोज कोटक आणि आमदार मिहीर कोटेचा यांच्या माध्यमातून मुलुंड परिसरात एक किचन सुरू करण्यात आले होते. त्या किचनमध्ये तयार होणारे जेवण आम्ही आपापल्या भागात घरोघरी जाऊन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या धान्यवाटपाच्या योजना आम्ही आमच्या भागात राबवल्या. आम्ही चांगल्या दर्जाच्या धान्याचे वाटप केले. मुलुंडमधील अनेक संस्थांनी यात आम्हाला सहकार्य केले. आर्सेनिकम अल्बमच्या गोळ्या, काढ्याची पाकिटे यांचेही वाटप केले. या सगळ्या कामासाठी आम्ही व्यवस्थित रचना लावली होती. तृतीयपंथीयांकडे कोणाचेच लक्ष नव्हते. आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना अन्नधान्याची किट्स दिली.
पहिल्या टप्प्यातील कोविडमध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक बाधित झाले होते. माझ्या प्रभागातील एका वृद्धाश्रमात 27 ज्येष्ठ नागरिक होते. ते सर्व कोविडबाधित झाले होते. त्या वेळी कोणालाही बेड उपलब्ध होत नव्हते. मला एका संध्याकाळी त्याबद्दलचा फोन आला. खासदार मनोज कोटक आणि मी या सर्वांना हिंदुजा, बीकेसी आदी खासगी रुग्णालयात दाखल केले. दुसर्या दिवशी सकाळी 4-5 वाजेपर्यंत आम्ही सर्वांना रुग्णालयात दाखल करू शकलो. या सर्व रुग्णांपैकी दोन रुग्ण जे अत्यवस्थ होते, ते वाचू शकले नाहीत. बाकी सर्व आजही व्यवस्थित आहेत.
पंतप्रधान मोदीजींनी कोविड लसीकरण मोहीम सुरू केली. तसेच त्यांनी भारतीय लसनिर्मितीला प्राधान्य दिले. आम्ही आमच्या जम्बो सेंटरमध्ये लसीकरण सुरू केले. सुरुवातीला फ्रंट वर्कर्सचे - आरोग्य कर्मचारी, पालिका कर्मचारी, मेडिकल दुकानदार यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर आम्ही सामान्य जनतेसाठी लसीकरण सुरू केले. खा. मनोज कोटक यांनी ‘संजीवनी आप के द्वार’ ही मोहीम सर्व सोसायट्यांमध्ये सुरू केली. तसेच सलून असोसिएशनच्या माध्यमातून सर्व सलून, ब्युटी पार्लरमधील कर्मचार्यांना एकत्र करून त्यांच्यासाठी एक लसीकरणाचा कॅम्प घेतला. यामध्ये 500हून अधिक सलून आणि पार्लर कर्मचार्यांचे लसीकरण केले.
सुरुवातीला राज्य सरकारला केंद्र सरकारकडून लसींचा कोटा मिळायचा. पण राज्य सरकार त्या लसींचा साठा करून ठेवायचे. आम्हाला आमच्या भागांतील लसीकरणासाठी कमी लसी द्यायचे. ईशान्य मुंबईतील आम्हा सर्व नगरसेवकांना खासदार मनोज कोटक यांनी दिल्लीला नेले होते. त्या वेळी आम्ही आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची भेट घेतली आणि त्यांना आमची समस्या सांगितली. आमच्या सेंटरवर फक्त 150-200 लसी येतात, तर एकेक दिवस येतसुद्धा नाही. त्या वेळी त्यांनी आम्हाला तक्ता दाखवला आणि सांगितले की आम्ही 15 दिवस आधी लसींचा कोटा राज्य सरकारकडे पाठवतो. पण राज्य सरकार त्या लसी आपल्याकडेच साठा करून ठेवते, असे त्या वेळी लक्षात आले.
बँकेतील नोकरीमुळे तुम्हाला लोकांशी संवाद साधण्याची सवय होतीच, तरीही नगरसेविका झाल्यानंतर जनसंपर्क वाढवण्यासाठी तुम्हाला कोणते वेगळे प्रयत्न करावे लागले?
जनसंपर्काच्या दृष्टीने गेल्या दहा वर्षांत मी विशेषकरून महिलांसाठी अनेक उपक्रम राबवलेत. महिला दिनाला कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करणेे, महिला क्रिकेट सामने भरवणे, महिलांची दहीहंडी आयोजित करणे इत्यादी. नुकतेच योग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यकमातही 150 महिलांनी सहभाग घेतला होता. महापालिकेत महिलांसाठी अनेक योजना असतात. बचत गट बनवायचे, त्यांना प्रशिक्षण द्यायचे, छोट्या व्यवसायांसाठी त्यांना कर्ज द्यायचे अशी कामे मी माझ्या प्रभागात केली आहेत. उदाहरणार्थ, एका बचत गटाला मी कॅटरिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी महापालिकेच्या योजनेतून गॅस शेगडी, ओव्हन, फ्रीज आदी आवश्यक गोष्टी मिळवून दिल्या. ज्या बचत गटातील महिलांनी शिवणकामाचे प्रशिक्षण घेतले होते, त्यांना शिलाई मशीन मिळवून द्यायला सहकार्य केले. ज्या महिला वाती वळण्याचा उद्योग करायच्या, त्यांना त्यासाठीचे मशीन मिळवून दिले.
या परिसरात गुजराती समुदायही मोठ्या संख्येने आहे. येथील गुजराती महिला नवरात्रीतील देवीच्या घटाचे विसर्जन करण्यासाठी अंबाजी धाम येथील मंदिरात आणून ठेवायचे. तेथून ते लॉरीने विसर्जनासाठी नेले जायचे. पण कोविड काळात मंदिराने तसे करण्यास नकार दिला. त्या वेळी या महिला माझ्याकडे आल्या. आम्ही मध्य मुलुंडमध्ये गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम जलतरण तलाव तयार करून घेतला होता. त्यातच घट विसर्जनासाठी पालिकेकडून परवानगी मिळवून घेतली.
वटपौर्णिमेला महिला वडाच्या फांद्या तोडून घरी नेतात आणि पूजा करतात. हे टाळण्यासाठी मी दर वर्षी वडाचे झाड लावते आणि तिथे येऊन महिलांना पूजा करता येते.
तसेच 14 एप्रिल रोजी बौद्ध समाजातील उच्चशिक्षित तरुणांचा सत्कार केला. कोविडमध्ये स्वच्छता कर्मचार्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अशा स्वच्छता कर्मचार्यांना प्रमाणपत्र, तुळशीचे रोप आणि मिठाई भेट देऊन त्यांचा सत्कार केला होता.
पक्षाच्या स्थानिक वरिष्ठांचे सहकार्य, पाठिंबा कशा प्रकारे असतो?
आमच्या भागातील आमदार-खासदार सर्वांचेच खूप चांगले सहकार्य असते. आम्ही भाजपाचे सर्व स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी एखाद्या कुटुंबाप्रमाणे एकमेकांशी जोडलेले असतो. उदाहरण द्यायचे तर, माझ्या प्रभागात कालिदास सभागृहाच्या मागे एक खासगी मैदान होते. ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी खासदार मनोज कोटक यांनी सहकार्य केले. तसेच नंतर त्या मैदानाचा विकास करण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. दुसरा एक भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित करून पब्लिक हॉलसाठी आरक्षित करण्याचे कामही मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
सामाजिक आणि राजकीय जीवनात तुम्ही कोणाला आदर्श मानता?
अटलजींचे, मोदीजींचे राजकारणातून समाजकारण करण्याचे विचार मला खूप प्रेरणा देतात. महिलांमध्ये विचाराल तर सुषमा स्वराज आणि स्मृती इराणी या माझ्या आदर्श आहेत.
या सर्व काळात घरच्यांचा पाठिंबा कसा होता?
मी आधीच म्हटले तसे मी नोकरी करणारी महिला होते. पण माझे पती, सासूबाई पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या. त्यामुळे मी माझे काम चांगल्या प्रकारे करू शकले.
राजकारणात येऊ इच्छिणार्या महिलांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
या क्षेत्रात यायचे असेल, तर तुम्हाला काम करण्याची इच्छा हवी. पण ते करताना घरच्यांचा पाठिंबाही मिळवायला हवा.