‘रॉकेट्री - द नंबी इफेक्ट’ देशभक्त संशोधकाची स्फूर्तिदायक कहाणी

विवेक मराठी    18-Jul-2022
Total Views |
@राजेश कुलकर्णी
 इस्रोच्या क्रायोजेनिक्स विभागाचे प्रमुख असलेल्या नंबी नारायणन यांना 1994मध्ये हेरगिरीच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यांच्या कहाणीवर बनवलेला ‘रॉकेट्री - द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने या संशोधकाच्या खर्‍या आयुष्यावर आणि त्यांना सहन कराव्या लाभलेल्या या अन्यायकारक घटनेवर प्रकाश टाकणारा लेख.
 
nambi
 
एखाद्याला आयुष्यातून उठवेल अशा अन्यायाची किती उदाहरणे आपल्याला माहीत असतात? त्यातही आपल्या आजूबाजूच्या कोणावर असा अन्याय झाला असेल, तरच आपण सहसा त्याची विशेष नोंद घेतो. अपवाद असतो निर्भयावर झालेल्या अत्याचारासारख्या प्रकरणांचा. अशा प्रकरणातील क्रौर्यामुळे आपल्याही पोटात ढवळून निघते. इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना आयुष्यातून उठवणार्‍या अन्यायाची माहिती मात्र फारच थोड्या जणांना असते.
 
 
भारताचे अनेक अणुशास्त्रज्ञ व अवकाशशास्त्रज्ञ गेल्या काही दशकांमध्ये अतिशय रहस्यमय पद्धतीने मृत्युमुखी पडलेले आहेत. डॉ. होमी भाभांचा वयाच्या 57व्या वर्षी 1966मध्ये विमान अपघातात झालेला मृत्यू, 1971मध्ये वयाच्या 52व्या वर्षी भारताच्या अंतरिक्ष कार्यक्रमाचे प्रमुख विक्रम साराभाई यांचा तिरुवनंतपुरमजवळील एका रिसॉर्टमध्ये झालेला मृत्यू, 1999मध्ये इस्रोच्या विक्रम साराभाई अंतरिक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. श्रीनिवासन यांचा वयाच्या 58व्या वर्षी झालेला अकस्मात मृत्यू ही याची काही प्रमुख उदाहरणे. याव्यतिरिक्त इस्रोचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. तपन मिश्रा यांच्यावर 2017मध्ये व 2019मध्ये घातक विषप्रयोग झाले. या ज्येष्ठ शास्त्रज्ञांव्यतिरिक्तही इतर अनेक शास्त्रज्ञांचे झालेले अनेक रहस्यमय मृत्यू अद्याप अनुत्तरित आहेत. याबाबतची आकडेवारी वेळोवेळी उपलब्ध करून दिली जात असली, तरी याच्या मुळाशी जाण्याचा गंभीर प्रयत्न आजवर कधी झाल्याचे दिसलेले नाही. त्यामुळे देशातील अतिमहत्त्वाच्या संशोधन क्षेत्रातील शास्त्रज्ञांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न अस्तित्वात आहेत. प्रा. मिश्रा यांच्या सांगण्याप्रमाणे भारतविरोधी शक्तींना अनुकूल वाटणार्‍या अधिकार्‍यांना बढती मिळावी, यासाठी सेवाज्येष्ठतेत फायदा व्हावा याकरिता किंवा जे अधिकारी भारताच्या या क्षेत्रांमधील प्रगतीमुळे इतर देशांच्या हितसंबंधांच्या आड येतील असे वाटते, त्यांना आपल्या मार्गातून दूर करण्यासाठी हे मृत्यू घडवले जातात. इस्रोच्या क्रायोजेनिक्स विभागाचे प्रमुख असलेल्या नंबी नारायणन यांना 1994मध्ये हेरगिरीच्या प्रकरणात अडकवण्याचा झालेला प्रयत्न अशाच स्वरूपाचा होता. त्यांच्या कहाणीवर बनवलेला ‘रॉकेट्री - द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपट बनवण्याची कल्पना प्राथमिक अवस्थेत असताना नारायणन यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान निर्माता-दिग्दर्शक आर. माधवन याच्या लक्षात आले की नारायणन यांची इस्रोमधील कारकिर्द अतिशय विलक्षण अशी होती. त्यामुळे चित्रपटाच्या कथानकाचा आवाका वाढला.
 
 
आजवर भारतासाठी अतिशय महत्त्वाच्या अशा अंतराळ संशोधनातील महत्त्वाच्या कामगिरीकडे भारतीय चित्रपटसृष्टीचे लक्षच गेले नव्हते. नाही म्हणायला अलीकडेच आलेला मंगलयान मोहिमेवर आधारित एक चित्रपट कथेशी प्रामाणिक न राहिल्यामुळे व मनोरंजनामध्ये वाहवत गेल्यामुळे निष्प्रभ ठरला होता. तो केवळ वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्याचा प्रकार होता. स्वत: माधवन याने सांगितल्याप्रमाणे ज्या चित्रपटामध्ये हाणामारी नसेल, प्रणयप्रसंग नसतील, गाणी नसतील, त्यासाठी अर्थपुरवठा करण्यास कोणता निर्माता तयार होईल? अनंत महादेवन या दिग्दर्शक-अभिनेत्याने नारायणन यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडणारा ‘विचहंट’ हा चित्रपट बनवण्याचे दहा वर्षांपूर्वीच जाहीर केले होते. मोहनलाल या प्रसिद्ध अभिनेत्याचे नावदेखील त्याकरिता ठरवले गेले होते. स्वत: नारायणन यांनी या चित्रपटासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करण्याचे मान्य केले होते. मात्र काही कारणांनी त्या चित्रपटाचे काम पुढे जाऊ शकले नाही. अशा प्रकारे या विषयावरील चित्रपटाबाबत ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास’ असा प्रकार घडला. पुढे माधवन याने ही जबाबदारी स्वीकारल्यावर, वर उल्लेख केल्याप्रमाणे कथेचा आवाका वाढला. त्यातच अनंत महादेवन याने कार्यबाहुल्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यास ऐन वेळी असमर्थता दर्शवल्यानंतर ती जबाबदारीही माधवन याच्यावर येऊन पडली. अर्थातच तोच निर्मातादेखील. अशा अनेक अडचणी येऊनही माधवन याने केवळ कर्तव्य म्हणून हा चित्रपट पूर्ण करण्याचे ध्येय समोर ठेवले आणि ते पूर्ण केलेदेखील.
 
 

nambi
 
             पडद्यावरील (आर. माधवन)                                                                               खर्‍या आयुष्यातील
 
आर. माधवन हे राहुल द्रविड म्हणा किंवा मॅट डेमन यांच्याप्रमाणे अनेकांचे लाडके व्यक्तिमत्त्व आहे. थिल्लरपणात न गुंतणारे, सभ्य आणि कोणत्याही वादात नसणारे. चित्रपटसृष्टीत प्रचंड यश मिळवलेले असूनही त्याच्या बोलण्यात अहंगंडाचा लवलेशही जाणवत नाही. त्याने चित्रपटामध्ये नारायणन यांच्या तरुण आणि वयस्कर भूमिका लीलया पेलल्या आहेत. इंग्लिश, हिंदी व तामिळ अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला आहे. चित्रपटाच्या निर्मितिमूल्याबाबत कसलीही तडजोड न केल्याचे दिसते.
माधवन याला दिग्दर्शनाचा कोणताही पूर्वानुभव नव्हता. चित्रपटाच्या कथानकामध्ये किंवा प्रसंगाच्या चित्रीकरणामध्ये व सादरीकरणामध्ये कोणताही सनसनाटीपणा येणार नाही, याची काळजी त्याने अगदी नेमाने घेतलेली आहे. आणि तरीही दिग्दर्शकीय सराईतपणा नसल्यामुळे काही प्रसंगांमध्ये न्यून राहिल्यासारखे वाटते. पटकथेतील काही त्रुटी आणि दिग्दर्शक म्हणून राहिलेले न्यून याबाबत काही केले गेले असते, तर चित्रपटाने आणखी वेगळीच उंची गाठली असती, यात संशय नाही.
 
 
नारायणन यांच्या इस्रोमधील कारकिर्दीचा भाग स्वैर बदल न करता चित्रपटात वस्तुस्थितीला धरून दाखवलेला आहे. अपवाद एका प्रसंगाचा - बालकृष्णन या नारायणन यांच्या सहकार्‍याला एका खास कामगिरीसाठी भारतातून फ्रान्समध्ये बोलावलेले असते. या दरम्यान त्याच्या लहान मुलाचा मृत्यू होतो. नारायणन यांचा कर्तव्यकठोरपणा दाखवण्यासाठी चित्रपटात हा करुण प्रसंग नाट्यमय केला गेला आहे. प्रत्यक्षात मात्र ही दुर्दैवी बातमी कळूनदेखील बालकृष्णनच्या कामात बाधा येऊ नये, म्हणून ती त्याच्यापासून लपवून ठेवत तो भारतात गेल्यावर घरी पोहोचण्यापूर्वी म्हणजे तेवढी उशिरा त्याला सांगितली गेली. साहजिकच बालकृष्णन नारायणन यांच्यावर अतिशय चिडला; मात्र त्याला लगेचच त्यांची बाजूही कळली आणि पुढे त्या दोघांची भारतात भेट झाल्यानंतर झाल्या प्रसंगाचा उल्लेखही न करता त्यांनी उत्तम पद्धतीने एकत्र काम केले.
 
 

nambi
 
 तरुण वयातील नंबी नारायणन
चित्रपटात अनेक तांत्रिक उल्लेख आहेत. थोडीफार उत्सुकता असेल तर त्या बाबी समजू शकतात. मुळात तिरुवनंतपुरमला भेट देणार्‍या किती पर्यटकांना माहीत असते की शहरापासून काही कि.मी. अंतरावर इस्रोचे अतिशय सुंदर असे संग्रहालय आहे! तेथे अगदी प्रथमपासून भारताने सोडलेल्या रॉकेट्ससह अनेक उपग्रहांच्या प्रमाणबद्ध प्रतिकृती ठेवलेल्या आहेत आणि इच्छुकांना हे सारे व्यवस्थित समजावून सांगण्याची अतिशय उत्तम सोय तेथे आहे. प्रत्येक पर्यटकाने आपल्या भेटीमध्ये या संग्रहालयाचा ठरवून समावेश करायला हवा. तर सांगायचे म्हणजे भारतीय शास्त्रज्ञ बरीच वर्षे घन इंधनावरील संशोधनातच अडकून पडले होते आणि नारायणन यांनी मात्र थेट द्रव इंधनावरील संशोधनाचा हट्ट धरला तो कशासाठी, पुढे नारायणन क्रायोजेनिक इंधनावरील तंत्रज्ञानाशी संबंधित विभागाचे प्रमुख का झाले, या घन, द्रव व क्रायोजेनिक इंधनांचे घटक कोणते असतात, हे समजणे थोडेसे तांत्रिक होईल, परंतु ते अजिबात क्लिष्ट नाही. चित्रपटात या तपशिलांना फाटा देण्यात आला आहे व केवळ घन व द्रव इंधन असे मोघम उल्लेख आहेत.
 
 
 
यापूर्वी केलेल्या उल्लेखाप्रमाणे, नारायणन यांच्यावरील अन्यायापुरते कथानक असलेल्या मूळ प्रस्तावित चित्रपटाचे नावच मुळात ‘विचहंट’ असे होते. त्यात नारायणन यांना कोणी व कोणत्या कारणाने लक्ष्य केले, याचे तपशील येणे क्रमप्राप्त होते. ‘रॉकेट्री’ या चित्रपटामध्ये मात्र या भागाला जवळजवळ पूर्णपणे फाटा का देण्यात आला आहे, हे कळू शकत नाही. वास्तविक नारायणन यांना अटक झाली ती 1994मध्ये. त्यांच्याविरुद्ध दिलेले पुरावे इतके फुसके होते की हे प्रकरण बनावट असल्याचे एकाच महिन्याच्या तपासामध्ये सीबीआयच्या लक्षात आले आणि मे 1996मध्ये सीबीआयने तसे कनिष्ठ न्यायालयाला सांगितलेदेखील. न्यायालयाने सीबीआयचे म्हणणे ग्राह्य धरून सर्वांना निर्दोष जाहीर केले. मात्र 1996मध्ये केरळमध्ये सत्ताबदल होऊन कम्युनिस्ट सरकार आले आणि या प्रकरणाचा नव्याने तपास करण्याचे आदेश देण्यात आले. 1998मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा नव्याने तपास करण्यास नकार दिला. तेव्हापासून केरळ सरकारने आपल्या भ्रष्ट पोलीस अधिकार्‍यांना संरक्षण दिले. केरळ पोलिसांमधील संघर्ष, सीबीआय आणि इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) यांच्यातील संघर्ष आणि आयबीमधील भ्रष्ट अधिकार्‍यांची भ्रष्ट केरळ पोलिसांना साथ या सार्‍यातून हे प्रकरण चिघळले. त्यांना या प्रकरणात खोटेच गुंतवणार्‍या केरळच्या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करावी, यासाठी नारायणन 2017मध्ये न्यायालयात गेले. गुजरातमधील 2002च्या दंगलीच्या वेळी तेथे वरिष्ठ पोलीस अधिकारी असलेल्या आर.बी. श्रीकुमार यांना गुजरातचे तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध खोटी प्रकरणे बनवण्याच्या आरोपावरून नुकतीच अटक करण्यात आली. हेच श्रीकुमार आयबीचे उपप्रमुख असताना त्यांनी नारायणन यांच्याविरुद्ध कुभांड रचले होते, असा आरोप आहे. श्रीकुमार यांनी शिफारस केलेल्या व्यक्तीला इस्रोमध्ये नोकरी देण्यास नारायणन यांनी नकार दिल्यामुळे त्यांनी नारायणन यांच्यावर डूख धरले व त्यातून हे सारे घडल्याचे सांगण्यात येते. मात्र नारायणन यांच्याकडे इस्रोमध्ये असलेली विशेष महत्त्वाची जबाबदारी पाहता इस्रोच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या काळात याबाबत स्वीकारलेले मौनदेखील इस्रोमध्ये सारे काही आलबेल नाही हे दर्शवते. त्यामुळे एकट्या श्रीकुमार यांनी डूख धरण्यातून हे सारे घडले असेल, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कारण अटकेदरम्यान नारायणन यांचा जो छळ केला गेला, त्यात इस्रोच्या क्रायोजेनिक म्हणजे नारायणन यांच्याच विभागाच्या आणखी वरिष्ठ अधिकार्‍यांना गुंतवण्यासाठीही त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. मात्र नारायणन या दबावाला बधले नाहीत. सीबीआयने लगेचच दोषमुक्त केल्यानंतरही नारायणन यांना पुन्हा सेवेत घेण्याची संधी न मिळू देण्याचे षड्यंत्र या सार्‍यामागे असल्याचे स्पष्टपणे दिसते. त्या काळात केंद्र सरकारमध्ये असलेल्या अस्थैर्यामुळे भारताच्या अवकाश संशोधन प्रकल्पांकडे केवढे अक्षम्य दुर्लक्ष झाले असेल, याची कल्पना येते. नारायणन यांना अशा कारस्थानाद्वारे इस्रोमधून बाहेर काढण्याच्या भयंकर प्रकारात कोणाही उच्चपदस्थाने कसा हस्तक्षेप केला नाही, याचे राहून राहून आश्चर्य वाटते. 1994 ते 2003 अशी तब्बल नऊ वर्षे इस्रोचे प्रमुख असलेले प्रसिद्ध शास्त्रज्ञ के. कस्तुरीरंगन यांनी सीबीआयने नारायणन यांच्याविरुद्धच्या प्रकरणात काही तथ्य नसल्याचे जाहीर केल्यानंतरही हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. इस्रोच्या शास्त्रज्ञावरील हेरगिरीच्या आरोपाखालील कारवाई ही केरळ पोलिसांच्या नव्हे, तर केंद्रीय यंत्रणांच्या अखत्यारीतील बाब असूनही इस्रोने पोलीस हस्तक्षेपास विरोध केला नाही. ‘देशहित सर्वोपरी’ या भावनेने काम करणार्‍या इस्रोच्या एका ज्येष्ठ संशोधकाला पोलीस तपासादरम्यान मरण्याची वेळ येईपर्यंत बेदम मारहाण होऊ शकते, हा संदेशच इस्रोसाठी काम करू इच्छिणार्‍या संशोधक वृत्तीच्या कित्येक हुशार व्यक्तींचेच नव्हे, तर इस्रोमधीलच संशोधकांचेही मानसिक खच्चीकरण करणारा ठरू शकतो, याची इस्रोच्या सर्वोच्च अधिकार्‍यांना फिकीर असल्याचे दिसले नाही. हा भाग चित्रपटामध्ये फारच त्रोटकपणे सादर केला गेला आहे. त्यामुळे नारायणन यांच्यावर असा भयानक स्वरूपाचा अन्याय करणारे प्रत्यक्षात कोण होते, हे गुलदस्त्यातच राहते.
 

nambi
 
वर उल्लेख केलेला घटनाक्रम पुरेसा नाही म्हणून की काय, मुळात नारायणन यांना या प्रकरणात कसे गोवले गेले, याची राजकीय साखळी पाहिली तर मती अक्षरश: गुंग होते. या सार्‍याच्या मुळाशी होती ती के. करुणाकरन आणि ए.के. अँटनी या केरळ काँग्रेसच्या दोन नेत्यांमधील सत्तास्पर्धा. विजयन नावाच्या पोलीस इन्स्पेक्टरने मरियम रशिदा या मालदीवी महिलेकडे लैंगिक संबंधांची मागणी केली. तिने नकार दिल्यावर विजयन याने चिडून तिला अटक केली व तिच्यावर हेरगिरीचा आरोप लादला. मुख्यमंत्री करुणाकरन यांच्या विश्वासातील पोलीस प्रमुख रमण श्रीवास्तव यांना अडचणीत आणण्यासाठी अँटनी यांच्याशी जवळीक असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी ही संधी साधली. रशिदावर हेरगिरीचा आरोप लादायचा, तर त्याचा इस्रोशी संबंध लावायला हवा; याकरता आधी नारायणन यांचे कनिष्ठ सहकारी डी. शशिकुमारन, रशियाच्या अवकाश संस्थेचे प्रतिनिधी के. चंद्रशेखर, मजूर पुरवणारा एक कंत्राटदार आणि रशिदाची मैत्रीण अशा चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून थातूरमातूर कागदपत्रे ‘जप्त’ करण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्यांनी नारायणन यांनाही अटक झाली. रशिदाने या दोघांना हनीट्रॅपमध्ये अडकवल्यानंतर तिने त्यांच्याकडून इस्रोची अतिसंवेदनशील कागदपत्रे पाकिस्तानकडे पोहोचवण्यासाठी मिळवली, असा आरोप ठेवण्यात आला. सुमारे पन्नास दिवसांच्या या अटकेच्या काळामध्ये त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. एक वेळ तर अशी आली की नारायणन यांचा जीव जाईल असे वाटल्यावर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले गेले.
 
 
नारायणन यांना या प्रकरणात गोवण्यातील सहभागाचा आरोप असलेले केरळचे माजी पोलीस महासंचालक टी.पी. सेनकुमार हे 2019मध्ये भाजपाकडून केरळमधून लोकसभेची उमेदवारी मिळवण्यास इच्छुक होते. नारायणन यांना पद्मभूषण हा सन्मान जाहीर झाल्यानंतर सेनकुमार यांनी त्या निर्णयावर टीका केली होती. मात्र केरळमधील एका प्रचारसभेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी नारायणन यांचा ‘देशभक्त व थोर संशोधक’ अशा नि:संधिग्ध शब्दांमध्ये जाहीर उल्लेख केल्यानंतर त्यांच्या या प्रयत्नावर पाणी पडले.
 
 
नारायणन विक्रम साराभाईंच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते, त्या काळात - म्हणजे सत्तरीच्या दशकामध्ये इस्रोच्या प्रकल्पांना पुरेसे अर्थसाहाय्य न मिळणे ही अतिशय सामान्य बाब होती. खिसा फाटका असताना मोठमोठी स्वप्ने पाहण्याचा तो प्रकार होता. त्यामुळे येणार्‍या मर्यादांमध्येच इस्रोच्या शास्त्रज्ञांना काम करावे लागायचे. शिवाय आर्थिक पाठबळ मिळाले तरी त्यातून हाती घेता येऊ शकणार्‍या प्रकल्पाचा आवाका जागतिक स्तराशी मेळ खाणारा नसल्यामुळे त्याला अनेकदा व्यावसायिक व्यवहार्यता नसे व त्यामुळे शास्त्रज्ञांमध्ये नैराश्य येणेही साहजिक असे. पदव्युत्तर संशोधन विक्रमी वेळात संपवल्यावर नासामध्ये मिळालेल्या घसघशीत पगाराच्या नोकरीकडे पाठ फिरवून भारतातच संशोधन करायचे, या हेतूने भारतात परतलेल्या नारायणन यांचा हिकमती स्वभाव चित्रपटाच्या कथानकातून अतिशय प्रभावीपणे दिसतो. हा हिकमती स्वभाव कोणता? तर ‘अशक्य’ हा शब्दच नारायणन यांच्या शब्दकोशात नव्हता. त्यांनी विक्रम साराभाई यांनाही याची झलक दाखवली होती. पुढे भावी संशोधनासाठीची स्वत:ची गरज म्हणून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे ठरवले आणि तेदेखील अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातील जगप्रसिद्ध संशोधक प्रा. लुइजी क्रॉको यांच्याकडे. वास्तविक आपल्या कौटुंबिक कारणांमुळे हे प्राध्यापक त्या काळात कोणा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत नव्हते. तरीही नारायणन यांनी स्वत:च त्यावरचा उपाय शोधून काढला आणि आपली इच्छा पूर्ण करून घेतली. ब्रिटन त्यांच्याकडील तब्बल चाळीस कोटी पौंडांचा संशोधनाचा प्रकल्प मोडीत काढणार असल्याचे कळल्यावर तो भारताला मोफत द्यावा असे रोल्स रॉयस कंपनीच्या अध्यक्षांना सांगण्याचे धाडस नारायणन यांनी केले आणि तो प्रत्यक्षात भारतात हलवण्यात यशही मिळवले. मात्र हे सढळ हस्ते मिळालेले दान घेण्यासाठी इस्रोचीच झोळी कशी फाटकी होती आणि पुढे इस्रोतील विविध शास्त्रज्ञांनी त्याचे एकूणच कसे मातेरे केले, त्याची कहाणी नारायणन यांनी आपल्या पुस्तकात सांगितली आहे. पुढे आपल्या भारतीय सहकार्‍यांना संशोधनाच्या उत्कृष्ट सोयींचा अनुभव मिळावा, याकरता त्यांनी तब्बल पन्नास तरुण भारतीयांना फ्रान्सला नेण्याची किमया केली. ते एक उत्कृष्ट ‘डुअर’ म्हणजे घडवणारे होते. ते आपल्यासमोरील अनंत अडचणींचे पाढे वरिष्ठांकडे वाचणार्‍यांपैकी नव्हते, तर त्या अडचणींवर स्वत: उपाय शोधून मगच त्यांच्याकडे जाणारे होते. असे नंबी नारायणन क्रायोजेनिक इंधनावरील इंजिनावर आधारित संशोधनाकडे वळणार, म्हणजे त्यात यशस्वी ठरणार हे निश्चित होते आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणाकोणाचे हितसंबंध दुखावले गेले असते हे सांगण्याची गरज नाही. आणि त्यामुळे अशा हिणकस पद्धतीने त्यांचा काटा काढण्यात आला. त्यांना या प्रकरणात गोवल्यानंतर पुढची किमान दोन दशके तरी भारत क्रायोजेनिक इंधन क्षेत्रामध्ये फारशी कामगिरी दाखवू शकला नाही, यावरून हे नुकसान केवढे मोठे होते याचा अंदाज बांधता येईल. प्रेक्षक म्हणून आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात यायला हवी आणि ती म्हणजे नारायणन यांना या कटात अडकवले गेले, तो काळ देशातील राजकीय अस्थिरतेचा होता. अशा अस्थिरतेचा देशाचे शत्रू कोणत्या मार्गाने फायदा घेतील याची शाश्वती नसते. स्वत: नारायणन यांनी यासाठी अमेरिकेला जबाबदार ठरवले आहे. त्यामुळे एक विचार मनात येतो. नारायणन इस्रोऐवजी नासामध्ये मिळालेली नोकरी करत असते तर? त्यापुढील काळामध्ये तर भारतीय संरक्षण दलांच्या गरजांची नोंद घेऊनही त्याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे देशाची संरक्षणसिद्धताच धोक्यात आणली गेल्याचेही देशाने पाहिले. ‘योगायोग’ असा की वर उल्लेख केलेले ए.के. अँटनी हेच या काळात देशाचे संरक्षण मंत्री होते. या सार्‍या कालखंडाचा समग्र आढावा घेतल्यास भारताचे कोणकोणत्या आघाड्यांवर केवढे अपरिमित नुकसान झालेले आहे, हे लक्षात येऊ शकेल.
 
 
 
एखाद्या अतिक्लिष्ट गोष्टीचा उल्लेख ‘रॉकेट सायन्स’ असा केला जातो. मात्र नारायणन यांनी द्रव इंधन वापरून बनवलेले रॉकेटसाठीचे ‘विकास’ इंजीन भारतीय अवकाश मोहिमांसाठी इतके विश्वासार्ह ठरले आहे की हे शब्दश: रॉकेटचे असलेले सायन्स हा इस्रोच्या डाव्या हाताचा मळ वाटावा. नारायणन यांचे देशासाठीचे योगदान एवढे मोठे आहे. चित्रपटातील काही उणिवांचा वर उल्लेख केला असला, तरी हा चित्रपट आवर्जून का पाहावा? वर म्हटले तसे हा चित्रपट म्हणजे केवळ नारायणन यांच्यावरील अन्यायाची कहाणी सांगत नाही, तर एक तरुण हुशार मुलगा आपल्या जिद्दीने एक मोठा संशोधक कसा झाला, गलेलठ्ठ पगाराच्या व निधीची कमतरताच पडू न देणार्‍या नासातील नोकरीच्या पायघड्या घातलेल्या असताना ती नाकारून मायभूमीसाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करण्याची तळमळ असल्यामुळे तो भारतात परत कसा आला, रूढार्थाने संशोधनातील पी.एचडी.ची पदवी मिळवलेली नसली तरी आज भारतीय अवकाश क्षेत्राला आजचे वैभव मिळवून देण्यात भागीदार कसा झाला, आपल्या सहकार्‍यांच्या हिताचा व पर्यायाने देशहिताचा विचार त्याने नेहमीच कसा केला, आयुष्यातून उठवणारे संकट येऊनही त्याने न डगमगता त्याचा सामना कसा केला, हे सारे सांगणारी ही यशोगाथा आहे. ‘झरीींळेींळीा ळी ींहश श्ररीीं ीशर्षीसश ेष र ीर्लेीपवीशश्र’ हे वाक्य असंबद्धपणे फेकणारे आपल्या आवतीभोवती अनेक जण दिसतात. त्यांनी या चित्रपटातील खरा पॅट्रियट पाहिला, तर ते तसा थिल्लरपणा थांबवतील. याकरता ही यशोगाथा पाहायलाच हवी. नंबी नारायणन यांच्यावर झालेल्या अन्यायाचे चटके केवळ त्यांनाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबाला आणि सार्‍या देशाला सहन करावे लागले आहेत. त्यांच्यावरील व त्यांच्या कुटुंबावरील अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी आपण आपण वेगळे काही करू शकत नाही. देशासाठी अतीव महत्त्वाच्या असलेल्या या क्षेत्रातील या महर्षीवर झालेल्या अन्यायाची अंशत: का होईना परतफेड करण्याचा एक अतिशय प्रामाणिक प्रयत्न आर. माधवन याने केला आहे. त्यातील नफ्यातोट्याचा विचार न करता त्याने ही गाथा आपल्यासमोर आणली आहे. त्याच्या या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता दर्शवण्यासाठीदेखील हा चित्रपट पाहायला हवा. या चित्रपटाबद्दल तुमच्या आप्तमित्रमंडळींना आवर्जून सांगा. वास्तविक ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहण्याचे आवाहन करण्यासाठी अनेक लोक जसे स्वयंस्फूर्तीने पुढे आले होते, तसेच या चित्रपटाबाबतही घडायला हवे. न जाणो, आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असलेल्या एखाद्या व्यक्तीला यातून स्फूर्ती मिळेल आणि ती देशहिताचा विचार करण्यास आणि त्या दिशेने पावले टाकण्यास प्रवृत्त होईल!