एका समर्थसाधकाचा जीवनपट

विवेक मराठी    19-Jul-2022
Total Views |

book
 
शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे।
वसिष्ठापरि ज्ञान योगेश्वराचे।
 
 
असे ज्यांचे वर्णन केले जाते, त्या समर्थ रामदासांचा उपदेश अंगी बाणवून त्यांचे विचार, त्यांची शिकवण समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी तनमनधन अर्पूण ज्यांनी कार्य केले, त्यामध्ये सुनीलजी चिंचोलकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. ‘समर्थव्रती - सुनील चिंचोलकर’ या चरित्रवजा पुस्तकातून त्यांचा जीवनपट साकारला आहे. ‘प्रपंच करावा नेटका’ हे समर्थांचे वचन सुनीलजींनी सत्यात उतरवले होते. त्यांची कन्या डॉ. अपर्णा चिंचोलकर गोस्वामी हिनेच या पुस्तकाच्या पूर्वर्धात याचे अनेक दाखले दिले आहेत. या बापलेकीचे नाते अगदी हळुवारपणे उलगडले आहे. लहानपणापासून अनेक प्रसंगांमधून वडिलांनी तिला घडवले. तिच्यावर संस्कार केले. त्यांचे प्रेम जाणवलेले अनेक प्रसंग अपर्णाने सांगितले आहेत.
 
 
प्रपंच करत असताना सुनीलजींनी अन्य सामाजिक कामे उभी केली. त्यांची साधकावस्था, त्यांची तप:साधना, सज्जनगडावरील वास्तव्यात त्यांनी मिळवलेला आध्यात्मिक अधिकार ही सुनीलजींच्या व्यक्तिमत्त्वाची मोठी वैशिष्ट्ये आहेत. सज्जनगडावरून खाली उतरल्यावर ठिकठिकाणी व्याख्यानांच्या व प्रवचनांच्या निमित्ताने त्यांचे भारतभ्रमण झाले. सगळीकडे आपल्या मृदू बोलण्याने त्यांनी स्नेहबंध निर्माण केले. महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांमध्ये त्यांनी खूप प्रवास केला आणि समर्थविचारांचा प्रचार आणि प्रसार केला. अनेक मान्यवरांनी या पुस्तकात सुनीलजींच्या कार्याचा गौरव केला आहे. गावोगावी त्यांनी उभे केलेले कीर्तनकार, प्रवचनकार यांचीही भलीमोठी सूची या पुस्तकात आहे. तसेच गावोगावी संपर्कात आलेल्या समर्थभक्तांची यादी सुनीलजींच्या जनसंपर्काची झलक दाखवते. अनेक लेखकांना लेखनप्रवृत्त करून सुनीलजींनी त्यांच्या पुस्तकांना सुंदर सुंदर प्रस्तावना लिहिल्या, त्या या पुस्तकात वाचायला मिळतात. तसेच त्यांच्या पत्रलेखनाचाही परिचय करून दिला आहे. सुनीलजींनी स्वत:सुद्धा समर्थ वाङ्मयावर खूप लेखन केले आहे. या पुस्तकांचाही परिचय या पुस्तकात करून दिला आहे. सुनीलजींना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या कार्याचा अनेक ठिकाणी गौरव झाला. त्याचेही दर्शन या पुस्तकात घडते. तसेच प.पू. गोविंददेवगिरी महाराज, पुण्याच्या रामकृष्ण मठाचे अध्यक्ष मा. श्रीकांतानंदजी, पू. चैतन्य महाराज देगलूरकर, सज्जनगडावरील भूषण स्वामी, योगेशबुवा रामदासी, समर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष शरदराव कुबेर अशा अनेकांनी सुनीलजींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
 
 
सुनीलजींचा हा जीवनपट सार्‍या समाजाला निश्चितच प्रेरणादायक आहे. मोरया प्रकाशनचे दिलीप महाजन आणि डॉ. अपर्णा चिंचोलकर गोस्वामी यांनी अतिशय आपलेपणाने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. दिलीपराव हे सुनीलजींचे स्नेही. या दोघांमध्ये जो अलौकिक स्नेहबंध निर्माण झाला, त्याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना येतो. सामान्य वाचकापासून साधकाला, अभ्यासकाला हे पुस्तक एक आगळे विचारधन देऊन जाते, हे नक्की.
 
 
पुस्तकाचे नाव - समर्थव्रती सुनील चिंचोलकर
लेखक - दिलीप महाजन,
डॉ. अपर्णा चिंचोलकर गोस्वामी
प्रकाशक - मोरया प्रकाशन
पृष्ठसंख्या - 304
किंमत - रु. 250/-
 
 
 
डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर
9403703641
लेखिका सज्जनगड येथील श्रीरामदासस्वामी संस्थानच्या विश्वस्त आहेत.