विश्वबंधुत्वाचा पाया हिंदू बंधुत्व

विवेक मराठी    19-Jul-2022   
Total Views |
सरसंघचालक मोहनजी भागवत सध्या आपल्या अनेक भाषणांतून या देशातील मुसलमान, ख्रिश्चन बांधवांविषयी मते मांडीत असतात. हे सगळे आपलेच बांधव आहेत, त्यांना आपल्यात सामावून घ्यायचे आहे, हा भाव त्यामागे असतो. रक्षाबंधनाच्या माध्यमातून रूढार्थाने हिंदू असलेल्या जनसमूहात बंधुभावना निर्माण करण्याचे काम आजवर आपण करीतच आलो आहोत. या बंधुभावनेच्या कक्षेत एकेकाळचे जे हिंदू होते, परंतु आपल्याच चुकांमुळे जे परधर्मात गेले, त्यांना बंधुभावनेने आपलेसे करावे लागेल.

RSS
डॉ. हेडगेवार यांनी ‘हे हिंदुराष्ट्र आहे’ हा शाश्वत, सनातन, सार्वकालिक सिद्धान्त मांडला. हिंदू राष्ट्राची अनुभूती त्यांनी स्वत: घेतली. हे अनुभूत ज्ञान हिंदूंना देण्याची संघशाखांची कार्यपद्धती विकसित केली. हिंदू राष्ट्राचे पतन झाले. ते का झाले? याची सैद्धान्तिक चर्चा अनेक थोर पुरुषांनी केली आहे. डॉक्टरांनी विद्वत्तापूर्ण चर्चा केली नाही. त्यांनी एकच गोष्ट पूर्णपणे जाणली, ती म्हणजे हिंदू राष्ट्राचे पतन झाले, कारण हिंदू समाज आत्मविस्मृत झाला. तो हजारो जातींत विभागला. शेकडो पंथांमध्ये विभागला. विभाजन माणसाला स्वार्थी करते. हिंदू माणूस स्वार्थी झाला.
 
 
हा दोष दूर करायचा असेल, तर प्रत्येक हिंदू माणसाला आत्मभान दिले पाहिजे. जाती-पंथाच्या पलीकडे विचार करून मी फक्त आणि फक्त हिंदू आहे हीच माझी ओळख, अशी अनुभूती त्याने धारण केली पाहिजे. हिंदू समाजातील प्रत्येक व्यक्ती ही माझी बंधू आहे, भगिनी आहे, माता आहे हा भाव त्याच्या मनात निर्माण झाला पाहिजे. जातीपातीच्या भिंती तोडून, अस्पृश्यतेला गाडून, पंथभेद समाप्त करून हिंदू युवक उभा राहिला पाहिजे. त्यासाठी त्यांनी हिंदू समाजापुढे अत्यंत साधे उपक्रम ठेवले. त्यातील एक उपक्रम रक्षाबंधनाचा आहे.
 
 
आपला समाज उत्सवप्रिय आहे. प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता तरी उत्सव असतो. उत्सवामागे धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय भाव असतो. विस्मृतीचा रोग लागला की या भावांचे विस्मरण होते आणि केवळ कर्मकांड राहते. उत्सवाचे गोड पदार्थ राहतात, आशय लयाला जातो. डॉ. हेडगेवारांनी पारंपरिक उत्सवांमध्ये नवीन सामाजिक आशय निर्माण केला.
 
 
बहिणीने भावाला राखी बांधणे या पद्धतीने रक्षाबंधन हा उत्सव समाजात साजरा केला जातो. डॉ. हेडगेवारांनी संघात हा उत्सव आणला. त्यात थोडा बदल केला आणि हिंदू बांधवांनी एकमेकांना राखी बांधावी, असे त्याला नवीन रूप दिले. ‘बंधुभाव हाच धर्म आहे आणि हीच मानवता आहे’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगत असत. आपल्या राज्यघटनेच्या उद्देशिकेत बंधुभाव हा शब्द अशा प्रकारे आला आहे -
 
‘राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता’
 
 
परंतु उद्देशिका बंधुभाव कसा निर्माण करायचा हे मात्र संगत नाही. उद्देशिकेने इच्छा प्रदर्शित केली आहे. ही उद्देशिका निर्माण होण्यापूर्वी डॉ. हेडगेवारांनी बंधुभाव निर्माण करण्याचा एक मार्ग हिंदू समाजापुढे ठेवला.
 
 
रक्षाबंधनाच्या दिवशी संघस्वयंसेवक परस्परांना राखी बांधतात. नंतर समाजात जाऊन आपल्या समाजबांधवांनाही राखी बांधतात. बंधुभावनेचे उदात्त तत्त्व ज्यांच्या डोक्यावरून जाते आणि जे जातीच्या संकुचित डबक्यात लोळत असतात आणि जे संकुचित विचाराच्या अहंकारात बुडालेले असतात, ते या राखीचा स्वीकार करीत नाहीत. अशांची संख्या अल्प आहे. उर्वरित सर्व समाज या बंधुभावनेच्या राखीचा स्वीकार करतो.
 
 
परंपरेने चालत आलेल्या विषयांमध्ये कालसुसंगत अर्थ भरणे ही भारताची महान परंपरा आहे. वेद-उपनिषद काळात मूर्तिपूजा नव्हती. भगवान गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भगवंतांच्या मूर्ती बनू लागल्या. सगुण-साकाराची पूजा सुरू झाली. पंढरपूरचा विठ्ठल हे सगुण-साकार रूप आहे, हे सर्वांना माहीत आहे. खरा यज्ञ कोणता, हे भगवंतांनी एका राजाच्या कथेत सांगितले. शेतकर्‍यांना बी-बियाणे देणे, शेतीची अवजारे देणे, व्यापार-उद्योेग करू इच्छिणार्‍यांना भांडवल देणे, रस्ते बांधणे, अनाथांची काळजी घेणे हा खरा यज्ञ आहे आणि तो पुण्यप्रद आहे, हे भगवंतांनी सांगितले. यज्ञवेदी जाऊन तोडल्या नाहीत. अशा त्यांच्या अनेक कथा आहेत. डॉ. हेडगेवारांनी ही आपली सनातन परंपरा जपली. पारंपरिक विषयाला नवीन अर्थ देण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
 
 
 
एकराष्ट्रीयता निर्माण होण्यासाठी लोकांत बंधुभावना निर्माण होणे फार आवश्यक आहे. बंधुभावना म्हणजे प्रेमभावना, एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होण्याची भावना, सगळेच आपले आहेत, आपल्याला कुणी परका नाही, अशा आत्मीय भावनेने प्रत्येकाशी व्यवहार करणे. ही भावना समाजाला घट्ट बांधून ठेवते. नैसर्गिक संकट आले असता आणि परकीय आक्रमण आले असता या भावनेमुळे समाज एक विराटपुरुषाच्या रूपात उभा राहतो. असा समाज अजेय असतो. ही भावना आपल्या देशात साठ-सत्तर वर्षांत देशात क्षीण होती, आज ती प्रबळ आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी, कोरोना काळात, पाकिस्तानच्या आणि चीनच्या आक्रमणाच्या काळात आपण याचा अनुभव घेतलेला आहे.
 
 
 
ही भावना रूढार्थाने हिंदू असलेल्या समुदायापुरती मर्यादित व्हावी अशी डॉ. हेडगेवारांची इच्छा नव्हती. तशी भावना धरणे हे आपल्या राष्ट्रीय ध्येयाशी विसंगत ठरेल. ‘हे विश्वची माझे घर’ हे आपले राष्ट्रीय ध्येय आहे. विश्वबंधुत्व हा आपला अंतिम टप्पा आहे. ते शिखर आहे. शिखरावर चढण्यासाठी पायथ्यापासून सुरुवात करावी लागते. हळूहळू वर चढत जावे लागते. ‘हिंदू बंधुत्व’ हा विश्वबंधुत्वाचा पाया आहे. तोंडाने नुसत्या विश्वबंधुत्वाच्या शाब्दिक वाफा सोडायला फार सोपे असते. शब्द बापुडे केविलवाणे असतात. असे शब्दांचे बुडबुडे सोडणे हे संघाचे काम नाही. अगोदर तसे जगायचे आणि मग बोलायचे, ही संघरीत आहे. ही डॉ. हेडगेवारांनी रुजविली आहे.
 
 
विद्यमान सरसंघचालक मोहनजी भागवत सध्या आपल्या अनेक भाषणांतून या देशातील मुसलमान, ख्रिश्चन बांधवांविषयी मते मांडीत असतात. हे सगळे आपलेच बांधव आहेत, त्यांना आपल्यात सामावून घ्यायचे आहे, हा भाव त्यामागे असतो. रक्षाबंधनाच्या माध्यमातून रूढार्थाने हिंदू असलेल्या जनसमूहात बंधुभावना निर्माण करण्याचे काम आजवर आपण करीतच आलो आहोत. या बंधुभावनेच्या कक्षेत एकेकाळचे जे हिंदू होते, परंतु आपल्याच चुकांमुळे जे परधर्मात गेले, त्यांना बंधुभावनेने आपलेसे करावे लागेल. डॉक्टरांनी जेव्हा संघ सुरू केला, तेव्हा हिंदू समाजात बंधुभावना निर्माण होणे अशक्य आहे असे विद्वान आणि राजकीय नेते म्हणत असत. आजही विद्वान आणि हिंदू समाजाचे स्वयंभू नेते हेच म्हणतात की, मुसलमान आणि ख्रिश्चन यांच्यात बंधुभावना निर्माण करणे अशक्य आहे. अशक्य तेच शक्य करण्यासाठी संघाचा जन्म झालेला आहे. तुकाराम महाराज सांगून गेले, “असाध्य ते साध्य, करिता कायास। कारण अभ्यास। तुका म्हणे।”
 
 

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.