पवार जिंकले, उद्धव हरले

02 Jul 2022 17:33:20
उद्धव ठाकरे यांचा बळीचा बकरा कोणी केला? तर तो दोघांनी केला. एक शरदराव पवार आणि दुसरे त्यांचे जिवलग मित्र संजय राऊत. 2019च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी तीन राजकीय घोडचुका केल्या. पहिली चूक त्यांनी केली, ती म्हणजे त्यांनी भाजपाची साथ सोडून दिली. निवडणुका भाजपा आणि शिवसेनेने एकत्र लढविल्या होत्या. बहुमताचा कौल युतीला मिळाला. बहुमताचा आदर करून सत्ता स्थापन करणे आवश्यक होते. त्यांच्या डोक्यात मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्या कोंडाळ्यातील लोकांनी भरली. संजय राऊत त्यांचे नेते. साध्या माणसाच्या मनात महत्त्वाकांक्षा भरली की, त्याची विचारशक्ती कामी येत नाही, तसे उद्धव ठाकरे यांचे झाले.
 
bjp
शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, तेव्हा एक छोटे भाषणदेखील केले. ते भाषण ऐकल्यानंतर मनामध्ये त्यांच्याविषयी सहानुभूतीची एक छोटी लहर निर्माण झाली. सहानुभूती निर्माण होण्याचे कारण असे की, उद्धव ठाकरे हे सत्तेच्या राजकारणाचे बळी ठरले आहेत. त्यांना बळीचा बकरा करण्यात आले. आणि आपल्याला बळीचा बकरा करण्यात आले आहे, हे त्यांच्या शेवटपर्यंत लक्षात आले नाही ही शोकांतिका आहे.
त्यांची अवस्था बघून एक गोष्ट आठवली. एका शेतकर्‍याने एक बोकड पाळला होता. त्याची तो उत्तम निगा राखीत असे. त्याला खूप खायला घालीत असे. त्यामुळे तो धष्टपुष्ट झाला. शेतकर्‍याचे दोन बैलही होते. त्यांना या बोकडाचा हेवा वाटे. शेतात आम्ही मरमर मरतो, पण चांगले खायला मात्र या बोकडाला मिळते. त्यातील मोठा बैल असतो, तो थोडा शहाणा असतो. तो धाकट्या बैलाला म्हणतो,“थोडे दिवस थांब म्हणजे तुला दुःख करण्याचे कारण राहणार नाही.”
शेतकर्‍याच्या घरी मुलीचे लग्न निघते आणि लग्नाच्या मेजवानीसाठी बोकडाच्या गळ्यावर सुरा फिरवला जातोे. मोठा बैल दुसर्‍या बैलाला म्हणतो,“त्याला का एवढं खाऊ घातलं, हे कळल का आता, त्याच्या मनाने आपण फार सुखी आहोत.”
उद्धव ठाकरे यांचा बळीचा बकरा कोणी केला? तर तो दोघांनी केला. एक शरदराव पवार आणि दुसरे त्यांचे जिवलग मित्र संजय राऊत. 2019च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी तीन राजकीय घोडचुका केल्या. पहिली चूक त्यांनी केली, ती म्हणजे त्यांनी भाजपाची साथ सोडून दिली. निवडणुका भाजपा आणि शिवसेनेने एकत्र लढविल्या होत्या. बहुमताचा कौल युतीला मिळाला. बहुमताचा आदर करून सत्ता स्थापन करणे आवश्यक होते. त्यांच्या डोक्यात मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्या कोंडाळ्यातील लोकांनी भरली. संजय राऊत त्यांचे नेते. साध्या माणसाच्या मनात महत्त्वाकांक्षा भरली की, त्याची विचारशक्ती कामी येत नाही, तसे उद्धव ठाकरे यांचे झाले.
आज ते म्हणतात की, मला मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा नव्हती. माझ्या इच्छेविरुद्ध मला मुख्यमंत्री बनविण्यात आले, मी वर्षा बंगला सोडतो, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो, ही सर्व राजकीय भाषणांची वाक्ये आहेत. आणि ती कुणीही शब्दार्थाने घेत नसतात. राजकारणी माणूस त्या-त्या प्रसंगी जे हिताचे असते ते बोलतो. त्याला भावनिक टच देण्याचा प्रयत्न करतो. ऐकणारे सगळेच त्याला बळी पडत नाहीत. आणि तेही उलटे प्रश्न करायला लागतात, गळ्याशी आल्यानंतर सुचलेल्या शहाणपणाला काही अर्थ नसतो. ही वाक्ये सामान्य माणसांची असतात.
 
दुसरी घोडचूक केली, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी सहकायर्र् करण्याची. शरदराव पवार यांच्याबरोबर हातमिळविणी करण्याची. ज्याच्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही असा देशातील महत्त्वाचा राजनेता कोण, असा प्रश्न विचारला तर सर्वजण त्याचे एकच उत्तर देतात, अशा नेत्याचे नाव आहे शरदराव पवार. आपल्या सहकार्‍याचा आणि पक्षाचा विश्वासघात करण्याचा त्यांचा दीर्घइतिहास आहे. त्याची पुर्नरावृत्ती मी येथे करीत नाही. राजकीय लेख वाचणार्‍या वाचकांना त्याची माहिती आहे असे गृहित धरतो. अशा राजनेत्याशी हातमिळविणी करून उद्धव ठाकरे यांनी आपला प्रसन्न चेहरा आणि निरागस हास्य विश्वासघाताचा चेहरा आणि हास्य केले. व्यक्तीगत जीवनात आणि राजकीय जीवनात ही केवढी मोठी घोडचूक आहे. राजकारणात तर प्रत्येक पाऊल अतिशय विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक टाकावे लागते. या शरदपवारांविषयी बाळासाहेब ठाकरे एकदा म्हणाले होते की, हे कुरमुर्‍याचे पोते आहे. त्यांचे आणि शरद पवारांचे कधीही राजकीयदृष्ट्या पटले नाही. विचाराच्या दृष्टीने दोघांचीही दोन टोके होती. वीस जूनपासून उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जप किती वेळा केला याची कुणीतरी गिणती केली पाहिजे. परंतु त्यांच्या मार्गाने ते गेले नाहीत, हेदेखील खरे.
 
 
तिसरी चूक त्यांनी केली ती म्हणजे असंगाशी संग करून स्वतःच मुख्यमंत्री झाले. शिवसेनचा विशेष गुणवत्तेचा मुद्दा म्हणजे ठाकरे कुटुंबीय कधीही राजसत्तेच्या पदाच्या शर्यतीत उतरले नाही. बाळासाहेब ठाकरे किंगमेकरच्या भूमिकेत राहिले. शेकडो कार्यकर्त्यांना त्यांनी लहानाचे मोठे केले. साध्या साध्या घरात जन्मलेल्या व्यक्तीला राज्याच्या नेतृत्त्व पदावर नेऊन बसविले. स्वतः मात्र कधीही अमुक पद तमुक पद याच्यामागे लागले नाहीत. त्यांचे शिवसेनाप्रमुख पद हे स्वंयभू होते. एक संस्कृत सुभाषितकार म्हणतो,
 
 
‘नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते मृगैः।
 
विक्रमार्जितराज्यस्य स्वयमेव मृगेंद्रता॥’
याचा अर्थ असा होतो, कुठलाही अभिषेक न होता किंवा राज्यारोहणाचा विधी न होता सिंह जंगलाचा राजा होतो. जो स्वपराक्रमाने राज्य मिळवितो तो स्वयंभू मोठा असतो.
 
 
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद मिळवून हे स्थान धुळीला मिळविले. आणि सगळ्यात वाईट याचे वाटते की, आपण आपले एकमेव वैशिष्ट्य गमावून बसलो आहोत हे त्यांच्या लक्षातही आले नाही. आताच्या त्यांच्या भाषण मालिकेतील एका भाषणात ते म्हणाले की, आमची तिन्ही पक्षांची बैठक झाली. शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद असावे असे ठरले. शरद पवार मला बाजूच्या खोलीत घेऊन गेले आणि म्हणाले की, मुख्यमंत्री तुम्हीच झाले पाहिजे. तुम्ही झालात तर शिवसेनेचे आमदार, मंत्री यांच्यावर नियंत्रण राहील. महत्त्वाकाक्षेचा टिळा संजय राऊत यांनी अगोदरच त्यांच्या मनात भरलेला असल्यामुळे पवारांच्या सल्याला ते बळी पडले आणि फसले.
 
 
ते मुख्यमंत्री होताच जे संदेश गेले ते असे - उद्धव ठाकरे हे इतर महत्त्वाकांक्षी राजनेत्यांपैकी एक आहेत. पक्षाचा उपयोग त्यांनी सत्तेसाठी केला. त्यांचे अढळ स्थान संपले. आपल्या पुराणात प्रल्हादाची गोष्ट सांगितली जाते. ज्या दिवशी प्रल्हादाने आपले शील सोडून दिले, त्या दिवसापासून त्याच्या पतनाला सुरूवात झाली. लक्ष्मी गेली, सरस्वती गेली, आणि नंतर राजलक्ष्मी त्याला सोडून गेली. या सगळ्या कथा प्रतिकात्मक असतात, आणि त्या गांभिर्याने वाचायच्या असतात. या कथेत उद्धव ठाकरेंची कथा जोडायला काही हरकत नाही.
 
 
शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य असे म्हणतात, म्हणू बापडे. ज्यांच चाणक्याचं ज्ञान चाणक्य शब्दापलीकडे नाही, ते कुणालाही चाणक्य म्हणतात. कधी ते अमित शहांना चाणक्य म्हणतात, तर कधी देवेंद्र फडणवीसांना चाणक्य म्हणतात. शरद पवार यांच्या राजकारणाच गमक कोणतं आहे? त्यांच्या राजकारणाच मुख्य सूत्र आहे, सदैव सत्तेत राहायचे किंवा सत्तेच्या जवळ राहायचे हे राजकीय जीवनाचे एकमेव लक्ष्य आहे.
 
 
 
हे लक्ष्य गाठण्यासाठी जे काही करायला लागेल ते करायचे. पाठीत खंजीर खुपसायचा असेल तर खुपसायचा. जातवादी राजकारण आवश्यक असेल तर करायचे, मुस्लिम तुष्टीकरण जेथे आवश्यक असेल तर तेही करायचे. सत्तेच्या जवळ राहण्याचा कोणताही मार्ग निषिद्ध नाही हे पवारांच्या राजकारणाचे मुख्य सूत्र आहे. महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचा विचार करता जर शिवसेना आणि भाजपा एकत्र आले आणि राहिले तर आपण मरेपर्यंत नव्हे तर, आपली पवार पिढी संपेपर्यंत महाराष्ट्रात आपल्या हाती सत्ता येणार नाही, हे पवार जाणतात. म्हणून त्याच्या नितीतील पहिला डाव होता, शिवसेनेला भाजपापासून वेगळे करणे. या कामी संजय राऊत त्यांचे दूत बनून काम करू लागले. आणि 2019 साली ते यशस्वी झाले. ते यशस्वी झाले म्हणजे शिवसेनेचे पतन सुरू झाले.
हा सगळा घटनाक्रम - एपिसोड - ही शोकांतिका आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा मोह सोडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील, असे घोषित केले. सत्तेच्या राजकारणातील हा त्यांचा मास्टर स्ट्रोक समजला पाहिजे. सत्तेच्या प्रमुख स्थानी शिवसेनेचाच माणूस आहे आणि तोच उद्या शिवसेनेचे नेतृत्त्व करील हा त्यामागील संदेश आहे. उद्धव ठाकरे यांना आता आपल्या अस्तित्त्वाची लढाई लढावी लागेल. त्या कामी संजय राऊत किंवा शरदराव पवार या दोघांपैकी कुणीही कामाला येणार नाही. हे त्यांना समजले तर चांगली गोष्ट आहे. जर नाही आकलन झाले तर माय भवानी त्यांचे रक्षण करो, अशी प्रार्थना आपण करूया.
 
 
Powered By Sangraha 9.0