जनतेचे हिंदुत्व आणि अपेक्षा

27 Jul 2022 15:07:35
ज्याला घर नाही त्याला घर देता येईल का, काम करण्याची क्षमता आहे, पण त्याला काम नाही, त्याला काम देता येईल का, शिक्षणाची प्रचंड भूक आहे, पण परिस्थितीमुळे ती भूक भागविता येत नाही, त्याला शिक्षण देता येईल का, हे सर्व करणे म्हणजे हिंदुत्व. या सर्वांचे दृश्य रूप दाखविणे म्हणजे हिंदुत्व. जनतेची अपेक्षा या हिंदुत्वाची आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सहकार्‍यांनिशी ती पूर्ण करावी.

fadanvis
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शासन गेले आणि शिवसेनेचेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची? असा नवा वाद सुरू झालेला आहे. या वादात आपल्याला शिरायचे नाही. महाराष्ट्रात सत्ताबदल झाला, ही अतिशय महत्त्वाची घटना आहे. नवीन सत्तेकडून लोकांच्या अपेक्षा काय आहेत, याचा थोडा विचार करू या.
उद्धव ठाकरे यांचे शासन गेले याचे दुःख ठाकरे परिवार सोडून अन्य कुणाला झाल्याचे दिसले नाही. शिवसेनेचा इतिहास पाहता शिवसेनेतून जेव्हा काही जण फुटून बाहेर पडतात, त्यांच्याविरुद्ध शिवसैनिक चवताळून उठतात. ‘गद्दारांना क्षमा नाही’ हेे एकेकाळी शिवसेनेचे आवडते वाक्य होते. आता एवढे आमदार फुटून बाहेर पडले, पण शिवसैनिक काही घराबाहेर पडला नाही, तो शांत राहिला. याचा अर्थ असा झाला की, त्यालादेखील असे वाटत असावे की, हे शासन पडावे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेली अभद्र युती संपुष्टात यावी. त्याची इच्छा पूर्ण झाली, त्यामुळे तो शांत बसला. शिवसेनेचे प्रवक्ते डरकाळ्या फोडीत बसले. बहुतेकांना त्या डरकाळ्या न वाटता मांजरीचे म्याँव म्याँव वाटले.
 
 
आता नवीन सरकार अधिकारावर आलेले आहे. या सरकारकडून जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. बंड करताना एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आपले भाजपाशीच जमू शकते, म्हणून त्यांनी भाजपाची साथ घेतली. विचारधारेचा विचार करता एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे स्वागत केले पाहिजे आणि याच भूमिकेवर ते दीर्घकाळ ठाम राहतील असा विश्वासही ठेवू या.
 
 
परंतु जनतेच्या स्तरावर जाऊन विचार केला, तर विचारधारा आणि राजकीय पक्ष यापेक्षा जनतेला काम करणारा पक्ष जवळचा वाटतो. मी भाजपाच्या अनेक नगरसेवकांना प्रश्न विचारला होता, “पक्षाची भूमिका हिंदुत्वाची आहे. तुम्ही जेव्हा मते मागायला जाता, तेव्हा हिंदुत्वासाठी मते द्या असे म्हणता की आणखी काही म्हणता?” असे विचारल्यावर ते हसले आणि मला म्हणाले, “आपण जी कामे करतो, त्या भांडवलावर मते मागावी लागतात. तुम्ही हिंदुत्ववादी आहात की आणखी कुणी आहात याच्याशी सर्वसामान्य मतदाराला काही घेणेदेणे नसते. माझ्या व्यक्तिगत काही समस्या आहेत, माझ्या वस्तीच्या समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी तुम्ही काय करता किंवा काय केले, हे प्रश्न निवडणुकांच्या राजकारणात महत्त्वाचे ठरतात. पक्षबांधणीसाठी विचारधारा आवश्यक असते आणि मते मिळविण्यासाठी कार्याची कामगिरी आवश्यक असते.”
 
 
अडीच वर्षांनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि भाजपाला मतदारांना सामोरे जायचे आहे. आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलो, अयोध्येेतील राममंदिरासाठी आम्ही संघर्ष केला, औरंगाबादचे, उस्मानाबादचे नामांतर केले, एवढे विषय सांगून जिंकून येण्यासाठी मते मिळतील या भ्रमात राहू नये. जिंकून येण्यासाठी काम काय केले हे लोकांना दाखवावे लागेल. उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या मेट्रोचे काम आरे की कांजूरमार्ग या वादात रखडवून ठेवले. रोज प्रवास करणार्‍या मुबंईकरांचे होणारे हाल प्रत्येक आमदाराने अनुभवले पाहिजेत. मुंबई जिंकायची असेल तर मुंबई जिंकण्याचा एक मार्ग मेट्रो रेल्वेचा मार्ग आहे. ती युद्धपातळीवर पूर्ण केली पाहिजे.

fadanvis 
 
जागोजागी लागणार्‍या आमदारांच्या फसव्या हास्याच्या होर्डिंगपेक्षा आणि जी रोज पाहताना त्या चेहर्‍याविषयी फक्त घृणाभावच निर्माण होतो, त्याऐवजी मेट्रोची स्थानके उभी केली पाहिजे, ती आपल्या कर्तृत्वाची प्रतीके असतील. पावसाळा सुरू झाला की रस्त्यांवर खड्डे पडायला सुरुवात होते. अपघात होतात, त्यात काही जण मरतात. हे खड्डे युद्धपातळीवर बुजविण्याचे काम सतत करीत राहिले पाहिजे. रस्त्यावरून वाहन चालवताना जरासादेखील धक्का लागता कामा नये. वाहनचालक आणि प्रवासी याचे सर्व श्रेय शासनाला देईल. त्याला हिंदुत्वाचे प्रवचन देण्याचे कारण नाही.
 
 
अडीच वर्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अस्मानी-सुलतानी संकटे आली. चिपळूण, महाड यांनी पावसाचा प्रलय अनुभवला. कोकणाने वादळ झेलले, सार्‍या महाराष्ट्राने कोरोना झेलला. या आपत्तीत लाखो परिवार सापडलेले आहेत. आपत्ती आली की बातम्यांसाठी माध्यमे चेहरे शोधत राहतात, नुकसानीचे फोटो शोधत राहतात आणि मग पुढच्या बातमीसाठी पुढच्या आपत्तीची वाट बघत राहतात. शासनाचे काम जनतेला संरक्षण देण्याचे, अश्रू पुसण्याचे, सन्मानाने दोन घास मिळतील हे पाहण्याचे असते. अडीच वर्षे फेसबुक लाइव्हवरून महाराष्ट्र चालविण्यात आला. राहिलेल्या अडीच वर्षांत जनता लाइव्ह महाराष्ट्र चालविता आला पाहिजे. म्हणजे खेडोपाडी गेले पाहिजे, वस्त्या-पाड्यांवर गेले पाहिजे, लोकांबरोबर बसले पाहिजे, ते देतील ती चटणी-भाकर खाल्ली पाहिजे, त्यांच्याशी समरस झाले पाहिजे.
 
 
आपले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ऐंशी वर्षांचे झाले आहेत, तरीही त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. मागील पंधरा ते वीस वर्षांत राज्यपालांनी जेवढे कार्यक्रम केले असतील, तेवढे कार्यक्रम तीन-चार वर्षांत कोश्यारी यांनी केलेले आहेत. घटनात्मकरित्या ते कार्यकारी अधिकारी नाहीत, राज्याचे निर्णय ते करू शकत नाहीत. आपल्या आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी विचार केला पाहिजे की, ते जर एवढे फिरू शकतात तर आम्ही का फिरू शकत नाही..
 
 
शेतकर्‍यांच्या आत्महत्या महाराष्ट्राच्या पाचवीला पूजलेल्या आहेत. अडीच वर्षांच्या कालखंडात आत्महत्याविरहित महाराष्ट्र हे चित्र शासनाला उभे करता आले पाहिजे. त्यासाठी योजना केल्या पाहिजेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे जे अहवाल आले असतील त्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि ठोस उपाययोजना केली पाहिजे. असे आपल्याला अभिमानाने म्हणता आले पाहिजे की, एकेकाळी महाराष्ट्र हा शेतकरी आत्महत्यांचा प्रदेश होता, आज तो शेतकरी सन्मानाने जगणारा प्रदेश झालेला आहे.
 
 
जनता म्हणजे तरी कोण? या जनतेत फेरीवाले, भाजीविक्रेते, सिग्नलला गाडी थांबली की छोट्या-मोठ्या वस्तू विकायला येणारे, गावकुसाबाहेर राहणारे, ज्यांना जमीन नाही, स्थिर वस्ती नाही असे भटकंती करणारे कोट्यवधी बंधू येतात. त्यांच्यापर्यंत स्वातंत्र्याची मधुर फळे पुरेशा प्रमाणात गेलेलीच नाहीत. त्यांच्यासाठी काही योजना करा. शेवटच्या पंगतीतील शेवटचा माणूस हे पंतप्रधान मोदींच्या योजनांचे सूत्र असते, त्याची गिरवणी महाराष्ट्रात केली पाहिजे. जो दीन, दुःखी, पददलित, जंगल-दर्‍यात राहणारा, भटकंती करणारा हाच समाज आपल्या समाजाची मोठी शक्ती आहे. त्यांच्यात अफाट क्षमता असणारे परंतु त्या क्षमतेला विकसित करण्याची संधी न मिळालेले लाखो जण आहेत. त्यांचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास. सिल्व्हर ओक बारामती, मातोश्री, लवासा सिटी, अलिबागचे बंगले म्हणजे विकास नव्हे. ही सर्वसामान्य माणसाच्या विकासावर चढलेली बांडगुळे आहेत.
 
ज्याला घर नाही त्याला घर देता येईल का, काम करण्याची क्षमता आहे, पण त्याला काम नाही, त्याला काम देता येईल का, शिक्षणाची प्रचंड भूक आहे, पण परिस्थितीमुळे ती भूक भागविता येत नाही, त्याला शिक्षण देता येईल का, हे सर्व करणे म्हणजे हिंदुत्व. या सर्वांचे दृश्य रूप दाखविणे म्हणजे हिंदुत्व. जनतेची अपेक्षा या हिंदुत्वाची आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सहकार्‍यांनिशी ती पूर्ण करावी.
Powered By Sangraha 9.0