दत्तोपंतांच्या विचारांचे मंथन करणारा व त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा विशेषांक- विचारमहर्षी दत्तोपंत ठेंगडी

विवेक मराठी    27-Jul-2022   
Total Views |

भारतीय मजदूर संघाच्या मुंबई विभागाचा ६७ वा वर्धापन दिन २३ जुलै रोजी पार पडला. त्यानिमित्त २६ जुलै रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला गेला. या दिनाचे औचित्य साधून साप्ताहिक विवेकच्या विचारमहर्षी दत्तोपंत ठेंगडी या विशेषांकाचे प्रकाशन झाले. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांच्या जीवनावर अनेक लेख आपल्याला या अंकातून वाचावयास मिळतील. सर्वसामान्य जनतेला समजेल अशा भाषेत या अंकाचे संपादन केलेले आहे.

 
sangh

संघविचाराची मुलभूत मांडणी आणि भविष्यवेध हे दत्तोपंतांच्या विचारविश्वाचे नेहेमीच वैशिट्य राहिले आहे. विचार आणि त्याबरोबरच कृती करून त्यांनी राष्ट्रहित जपणाऱ्या संघटनांची उभारणी केली. या नेतृत्वाचा परिचय आजच्या काळात करून देणे गरजेचे आहे. 'विचारमहर्षी दत्तोपंत ठेंगडी' या विशेषांकाच्या माध्यमातून दत्तोपंतांच्या विचारांचे मंथन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दत्तोपंतांच्या व्यापक विचारांचा मागोवा घेताना समकालीन संदर्भात विविध मान्यवरांच्या लेखांतून राष्ट्रवाद अधोरेखित करण्याचा प्रयत्न या अंकातून झालेला आहे.

 

भारतीय मजदूर संघाचा ६७ वा वर्धापन दिन दिनांक २६ जुलै २०२२ रोजी मुंबई विभागातील दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या इमारतीत पार पडला. येथील सुरेंद्र गावस्कर सभागृहात अनेक कामगार व गुणवंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साप्ताहिक विवेकच्या विचारमहर्षी दत्तोपंत ठेंगडी या विशेषांकाचे प्रकाशन पार पडले. या अंकाची किंमत ९० रुपये इतकी आहे, परंतु प्रकाशनाचे औचित्य असल्याने सवलत मूल्य ७०रुपयांत उपलब्ध झाला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॅड. अनिल ढुमणे तसेच महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मोहन येणूरे यांची मुख्य उपस्थिती लाभली होती. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष व जेष्ठ विचारवंत व लेखक रमेश पतंगे यांनीही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली होती. सोबतच साप्ताहिक विवेकचे सह कार्यकारी संपादक रवींद्र गोळे हेसुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी रमेश पतंगे यांनी आणीबाणीच्या काळातील आपल्या व दत्तोपंत ठेंगडी यांच्या आठवणींचा जागर केला तसेच दत्तोपंतांच्या स्वभावाचे काही किस्से सांगितले. तर प्रमुख पाहुणे अनिल ढुमणे यांनी हा अंक प्रत्येक कामगाराने आवर्जून विकत घ्यावा असे सांगितले. याचवेळी दत्तोपंतानी संघटीत केलेल्या कामगारांना घेऊन येत्या २१ डिसेम्बर रोजी भव्य मोर्चा मुंबईत आयोजित करत आहोत तरी सर्वांनी कामगारांच्या हक्कासाठी मोर्चास उपस्थिती लावावी असेही आवाहन केले. त्याच बरोबर मोहन येणूरे यांनी विचारमहर्षी दत्तोपंत ठेंगडी या विशेषांकाबद्दल बोलताना दत्तोपंत ठेंगडी यांचे मजदूर संघातील महत्व अधोरेखित केले व रवींद्र गोळे यांनी या अंकासाठी विशेष मेहनत घेतल्याचेही आपल्या भाषणातून नमूद केले.

 

या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय मजदूर संघ मुंबई विभागाचे अध्यक्ष बापू दडस, सचिव संदीप कदम, संघटन सचिव विद्याधर वडुलेकर व कोषाध्यक्ष रमेश गोरे यांनी केले होते.

मृगा वर्तक

मुंबई विद्यापीठातून पत्रकारिता व संज्ञापन विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयांवर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी  विषय घेऊन मुक्तछंदात काव्यलेखनाची आवड.