राज्य गेले, राजेपद गेले, राजा जागा होईना..

विवेक मराठी    27-Jul-2022
Total Views |
@अभय पालवणकर 
निष्ठा, समर्पणाच्या बाबतीत अशी प्रतिज्ञापत्रे लिहून घेण्यापेक्षा किमान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उदाहरण जरी उद्धव ठाकरे यांनी घेतले असते तरी आज ही वेळ आली नसती. ज्या संघावर काँग्रेस व सोनियांची मर्जी राखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी निरर्थक टीका केली, हिंदुत्वाची खिल्ली उडवली त्याच हजारो स्वयंसेवकांनी संघसमर्पित होऊन आपले बलिदान दिले, वैयक्तिक आयुष्याचा त्याग केला, घरावर तुळशीपत्र ठेवले. हे काम करणार्‍या हजारो स्वयंसेवकांनी एक रुपयाचा साधा फॉर्मही भरला नाही, कोणतेही प्रतिज्ञापत्र लिहून दिले नाही. तरी आज संघ शताब्दीच्या उंबठ्यावर आहे. कदाचित तीन दशके जुन्या मैत्राच्या मातृसंस्थेतून शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी हा एवढा तरी आदर्श घ्यायला हवा होता..

shivsena
पूर्वीच्या काळी राजाला खूश करण्यासाठी राजाचे भाट व अन्य व्यक्ती राजाची वारेमाप स्तुती करत असत. ते त्यांचे नेमून दिलेले कामच असे. या स्तुतीने प्रभावित होऊन राजा त्यांना नजराणे देत असे. आज राजे गेले, राजेशाही गेली. परंतु शिवसेनेचे राजकारण मात्र या राजेशाही वातावरणातच अजूनही रममाण असल्याचे दिसते. नुकत्याच संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीत राऊत यांनी राजाची किती स्तुती करावी याचा एक नवाच आदर्श दाखवून दिला. आणि विशेष म्हणजे राजालाही आपली स्तुती करून घेण्यास आवडल्याचे दिसून आले.
राजाला म्हणजे उद्धव ठाकरे यांना बहुधा अजूनही असे वाटते की, आम्ही अजूनही प्रजेला म्हणजे शिवसैनिकांना किती पद, प्रतिष्ठा देत असतो, त्यामुळेच त्यांचे अस्तित्व आहे. रिक्षावाला, पानटपरीवाला, सफाईवाला हे आज आमच्यामुळेच मोठे झाले आहेत आणि आम्ही ठरवले तर आम्ही कोणालाही मोठे करू शकतो, या आविर्भावात असलेल्या राजाला अजूनही वास्तवाचे भान आल्याचे दिसत नाही. अवघा पक्ष, पक्षाचे आमदार-खासदार, आता नगरसेवक व अन्य कार्यकर्तेही बंड करून गेले, आता आपण आणि आपले दोनचार भाटच शिल्लक राहिलो आहोत या वास्तवाचे भान राजाला अजूनही येत नाही, हेच दाखवणारी ही मुलाखत व्हिडीओ स्वरूपात प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीची दखलही घ्यावी असे विरोधकांना वाटले नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर 'फिक्स असलेली मॅच आम्ही बघत नाही' असे एका वाक्यात वर्णन करून मुलाखतीला केराची टोपली दाखवली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील त्यांचा आवेश, त्यातील उत्तरे व अन्य गोष्टी पाहिल्या असता अजूनही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड गांभीर्याने घेतलेले नसल्याचे दिसून येते. आज या बंडाचे लोण आमदारांपासून ते सामान्य शिवसैनिकांपर्यंत पोहोचले आहे. शिंदे गटात सामील होणार्‍यांची संख्या पाहता ते काही दिवसांत शिवसेना भवन, धनुष्यबाण चिन्हसुद्धा मिळवतील असे चित्र दिसत आहे. तरीही त्यांना ‘पालापाचोळा बाजूला झाला..’ अशा शेलक्या शब्दात हिणवले जात आहे. या मुलाखतीत ते शिंदे गटाला भावनिक आवाहन करून पक्षफूट थांबवण्याचा प्रयत्न करतील, असे वाटत होते. पण ते न करता त्यांनी आपला रागच व्यक्त केला. खरे तर शिंदे गट अजूनही उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करीत नाही. उलट सोमय्या किंवा अन्य भाजपा नेत्यांनी टीका करू नये यासाठी आ. दीपक केसरकरांनी भाजपाच्या नेत्यांना आवाहन केले, यावरून शिंदे गटाने 'आम्हीच शिवसेना' हा संदेश सर्वत्र पोहोचवण्यासाठी किती बारकाईने नियोजन केले आहे, हे लक्षात येते.
दुसरीकडे हे बंड कोणामुळे झाले, का झाले याचे उत्तर न शोधता पक्षप्रमुख त्यांना दूषणे देणेच अधिक पसंत करीत आहेत. काही दिवसांपासून शिवसेना कार्यकर्त्यांकडून कट्टर शिवसैनिक असल्याची प्रतिज्ञा लिहून घेतली जात आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता नेहमीच ठाकरे कुटुंबीयांच्या पाठीशी उभा राहिला आहे. आजवर अनेक बंड झाली, पण सामान्य शिवसैनिक नेहमीच ठाकरे कुटुंबीयांच्या सोबत राहिला. बाळासाहेबांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी आपल्या अंगावर कोर्टाच्या केसेस घेतल्या, तुरुंगवास भोगला, तडीपार झाले. आज याच शिवसैनिकांकडून चक्क प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे लागते, यासारखी लाजीरवाणी व अमानवी गोष्ट शिवसेनेत घडत आहे. अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांनी याला विरोधसुद्धा केला आहे. शिवसैनिकांची कट्टरता रक्तात भिनलेली आहे, त्यासाठी प्रतिज्ञापत्राची गरज नाही, असे त्यांचे म्हणणे. शिवसैनिकांची कट्टरता ही बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांतून आली होती, त्यांनी दिलेल्या शिकवणीतून आली होती. आज या विचारांनाच ठाकरे कुटुंबीयांनी तिलांजली दिली असता असल्या प्रतिज्ञापत्रातून ती कट्टरता, ती निष्ठा येईल का? असा सवालही शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.
निष्ठा, समर्पणाच्या बाबतीत अशी प्रतिज्ञापत्रे लिहून घेण्यापेक्षा किमान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उदाहरण जरी उद्धव ठाकरे यांनी घेतले असते तरी आज ही वेळ आली नसती. ज्या संघावर काँग्रेस व सोनियांची मर्जी राखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी निरर्थक टीका केली, संघाच्या हिंदुत्वाची खिल्ली उडवली त्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लाखो स्वयंसेवक हे राष्ट्रभक्ती, राष्ट्राभिमान या निकषावर संघाशी जोडले गेले आहेत. संघसमर्पित होऊन हजारो स्वयंसेवकांनी आपले बलिदान दिले, वैयक्तिक आयुष्याचा त्याग केला, घरावर तुळशीपत्र ठेवले. १९२५ पासून अत्यंत प्रतिकूल काळात महाराष्ट्रातून आसाम, नागालँड यासारख्या दुर्गम भागात जाऊन संघाचे काम केले, संघटन उभे केले. हे काम करणार्‍या हजारो स्वयंसेवकांनी एक रुपयाचा साधा फॉर्मही भरला नाही, कोणतेही प्रतिज्ञापत्र लिहून दिले नाही.. तरी आज संघ शताब्दीच्या उंबठ्यावर आहे. यासाठी सरसंघचालकांना आपल्या या स्वयंसेवकांकडून आपल्या निष्ठेबाबत आणाभाका घ्यायला लावाव्या लागल्या नाहीत. कदाचित तीन दशके जुन्या मैत्राच्या मातृसंस्थेतून शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी हा एवढा तरी आदर्श घ्यायला हवा होता.. असो.
 
एकंदरीतच मुलाखतीतील उद्धव ठाकरे यांचा आवेश पाहिला, तर ते अजूनही मुख्यमंत्रिपदीच आहेत, आपल्या आदेशावर वाटेल ते करायला सारी पक्ष यंत्रणा उभी आहे, अशा भ्रमात असल्याचेच वाटत होते. आपल्याच परिवारातील वृत्तपत्राला / मुखपत्राला मुलाखत द्यायची, हवे तसे बोलून छापून आणायचे.. डास चावल्यावर कसे खाजवायचे वगैरे बाष्कळ व निरर्थक बडबड करायची, वाट्टेल त्या शाब्दिक कोट्या करायच्या, या सवयीतून पक्षप्रमुख अजूनही बाहेर पडत नाहीत. राज्य गेले, राजेपद गेले, आता पायाखालची वाळू सरकून समुद्राला जाऊन मिळाली, तरीही उद्धव ठाकरे यांना जाग आली नसल्याचेच या मुलाखतीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.