देवेंद्र फडणवीस संघटन समर्पित स्वयंसेवक

विवेक मराठी    04-Jul-2022   
Total Views |
@रमेश पतंगे 9869206101
  
देवेंद्र यांचा राजकीय भविष्यकाळ अतिशय उज्जवल आहे. कधी कधी राजकारणामध्ये एक पाऊल मागे घ्यावे लागते. पुढची उंच उडी मारण्यासाठी ते आवश्यकही असते. योग्य प्रसंग, योग्य काळ, योग्य वेळ याचे नेमके संतुलन साधावे लागते. असे राजकारणात ज्यांनी ज्यांनी केले आहे, ते छत्रपती शिवाजी झाले, नेपोलियन झाले, वॉशिंग्टन झाले, गॅरिबाल्डी झाले. लोकशाहीच्या रणांगणात विसाव्या शतकात विन्स्टन चर्चिल यांना दीर्घकाळ माघार घेऊन थांबावे लागले होते. रूझवेल्ट यांनादेखील या अनुभवातून जावे लागले. अब्राहम लिंकनदेखील युद्धाच्या विजयाच्या शर्यतीत मागे होता. हे सर्व आज राष्ट्रनायक आहेत. 
 
RSS
 
देवेंद्र फडणवीस हे स्वयंसेवक आहेत. संघ स्वयंसेवकाची काही मूल्ये आहेत. तो स्वार्थासाठी काम करीत नाही, कोणत्याही पदाची लालसा त्याला नसते. देश प्रथम, मी नंतर अशी त्याची भावना असते. तो संघटनशरण असतो. संघाच्या एका उत्कृष्ट गीताच्या चार ओळी अशा आहेत,
 
 
‘पूज्य माँ की अर्चना का, एक छोटा उपकरण हूँ।
उच्च है वह शिखर देखो, मैं नहीं वह स्थान लूंगा।
और चित्रित भित्ती का है, मैं नहीं शोभा बनूंगा
पूज्य है यह मातृमंदिर, नींव का मैं एक कण हूँ॥’

या ओळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदावरील हक्क सोडून सार्थ केल्या आहेत. एक संघ स्वयंसेवक म्हणून त्यांचे स्थान अगणित स्वयंसेवकांच्या हृदयात अढळ झाले आहे. एवढेच नाही तर लाखो मतदारांच्या मनात महाराष्ट्राचे नैतिक मूल्य जपणारे नेते असे त्यांचे स्थान निर्माण झाले आहे. पगडी-पागोट्याचे जातीय समीकरण मोडून देवेंद्र यांनी हे स्थान मिळविले आहे.
 
 
देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतून मुख्यमंत्रीपद नाकारले गेले, त्यांचे अवमूल्यन केले गेले. अमित शहा आणि त्यांचे भांडण आहे, अशा बातम्या लगेच सुरु झाल्या. अशा बातम्या करणारे प्रतिभावंत आपल्याकडे भरपूर आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे सूत्रधार उद्धव ठाकरे आहेत, त्यांनीच ही खेळी खेळली आहे. आपल्याला रंगवून रंगवून सांगणारा व्हिडिओ आपण बघितला असेल, त्यातील हा प्रकार आहे. असली वृत्त वाचायची, स्वतःची करमणूक करून घ्यायची आणि सोडून द्यायचे. अशी वृत्त लिहिणार्‍यांच्या जाळ्यात आपण अडकता कामा नये.
 
 
सत्तेेच्या राजकारणात योग्य वेळी, योग्य गोष्ट उघड करावी लागते. घाई नाशास कारणीभूत होते. भाजपाच्या अनेकजाणांना याची माहीतीही नव्हती. ते त्यांच्या बुद्धीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या बंडावर भाष्य करीत राहिले. देवेंद्र फडणवीस मात्र या सर्व काळात एक चकार शब्दही बोलत नव्हते. योग्य वेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय जाहीर केला.
 
 
अपेक्षेप्रणाणे सर्वांना प्रचंड धक्का बसला. त्यांचे जवळचे सहकारीदेखील आश्चर्यचकित झाले. मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र सिंहासन समोर असताना असे कसे म्हणू शकतात, हा प्रश्न सर्वांना पडला. ‘पथ का अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन चढते जाना’ ही ओळ देवेंद्र फडणवीस जगले. प्रत्येक स्वयंसेवकाला अभिमान वाटावा अशी ही घटना आहे.
 
 
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर बसविणे हा राजनितीच्या बुद्धीबळाच्या डावातील विलक्षण खेळी आहे. या खेळीचा सर्वात मोठा परिणाम 2024च्या निवडणुकीत दिसेल. देवेंद्र फडणवीस यांनी दीर्घकालीन धोरण आखून निर्णय केला. उद्धव ठाकरे यांना कल्पना नव्हती आणि राष्ट्रवादीचे चाणक्य काय बोलावे या संभ्रमात पडले. काँग्रेसच्या फटकेबाज अध्यक्षांना कदाचित असे वाटले असावे की, देवेंद्रने आपल्या गालावरच हा फटका मारला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, नंतर येणार्‍या नगरपालिकांच्या निवडणुका, शिवसेना कोणाची- ठाकरे की शिंदेची, उद्धव ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरे यांचे राजकीय भवितव्य काय, अशा सर्व विषयांवर आता चर्चा सुरू झाली आहे. ती वर्तमानपत्रांवर आणि सोशल मिडियावर उपलब्ध आहे. ‘सौ सोनार की एक लोहेार की’ ही म्हण देवेंद्र यांनी सार्थ करून दाखविली.
 
 
देवेंद्र यांचा राजकीय भविष्यकाळ अतिशय उज्जवल आहे. कधी कधी राजकारणामध्ये एक पाऊल मागे घ्यावे लागते. पुढची उंच उडी मारण्यासाठी ते आवश्यकही असते. योग्य प्रसंग, योग्य काळ, योग्य वेळ याचे नेमके संतुलन साधावे लागते. असे राजकारणात ज्यांनी ज्यांनी केले आहे, ते छत्रपती शिवाजी झाले, नेपोलियन झाले, वॉशिंग्टन झाले, गॅरिबाल्डी झाले. लोकशाहीच्या रणांगणात विसाव्या शतकात विन्स्टन चर्चिल यांना दीर्घकाळ माघार घेऊन थांबावे लागले होते. रूझवेल्ट यांनादेखील या अनुभवातून जावे लागले. अब्राहम लिंकनदेखील युद्धाच्या विजयाच्या शर्यतीत मागे होता. हे सर्व आज राष्ट्रनायक आहेत. देवेंद्र यांनी त्या दिशेने वाटचाल करावी, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.