@मधुबाला आडनाईक । 9011030047
सर्व जातिधर्मांसाठी खुला असलेल्या कणेरी मठाला 1400 वर्षांची परंपरा आहे. भूकंप, महापूर, दुष्काळ अशा अनेक नैसर्गिक आपत्तींनी ग्रस्त असणार्या लोकांसाठी श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठातर्फे जीवनावश्यक वस्तूंची व वैद्यकीय सेवेची तत्काळ मदत केली जाते. जगभर कोरोनाचे तांडव सुरूच असताना या मठाने हजारो लोकांना जेवण, अन्न-धान्य अशी मदत देत दिलासा दिला आहे. कोणत्याही आपत्तीच्या काळात आपद्ग्रस्तांंच्या हाकेला प्रतिसाद देणारा मठ म्हणून या मठाची ख्याती आहे.
कणेरी हे कोल्हापूरच्या दक्षिणेला 12 किलोमीटर अंतरावरचे एक गाव. राष्ट्रीय महामार्गाला लागून असणार्या या गावात हा सिद्धगिरी मठ आहे, म्हणूनच त्याला कणेरी मठ असेही म्हणतात. महाराष्ट्राच्या संतभूमीत भारतीय संस्कृती जपणारा मठ म्हणून कणेरी मठ प्रसिद्ध आहे. या मठात भारतीय संस्कृतीची शिकवण दिली जाते. हे एक प्राचीन तीर्थस्थान आहे.
संशोधित व प्राप्त ऐतिहासिक संदर्भानुसार श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाला 1350 वर्षांपेक्षा अधिक प्राचीन परंपरा लाभली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह चार राज्यांच्या सीमावर्ती भागात रेवणसिद्ध, अमोघसिद्ध, मूरसिद्ध, करीसिद्ध, हालसिद्ध, वेताळसिद्ध यासारखे अनेक सिद्ध होऊन गेले आहेत. त्यांच्या नावांचे संप्रदायही निर्माण झालेले आहेत. यापैकीच काडसिद्ध हे सिद्धपुरुष आहेत. या संप्रदायाचे मूळ स्थान म्हणजेच कणेरी मठ. सिद्धगिरी क्षेत्र अत्यंत पुरातन, धार्मिक व आध्यात्मिक पीठ आहे. ‘जगद्गुरू काडसिद्धेश्वरांचा मठ’ अशी याची ओळख आहे. काडसिद्धेश्वर हे संप्रदायाचे मूळ संस्थापक. सरसंघचालक मोहन भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, बाबा रामदेव यांच्यासारख्या अनेकांनी या मठाच्या कामाचे वेळोवेळी कौतुक केले आहे. अनेक केंद्रीय मंत्र्यांनी मठाला प्रत्यक्ष भेट दिली आहे.
असा आहे कणेरी सिद्धगिरी मठ
लिंगायत समाजाच्या बळावर येथे नैसर्गिक सौंदर्य असलेल्या कणेरीच्या घनदाट अरण्यात एका शिवपिंडीची स्थापना करण्यात आली. मठाच्या मध्यभागी सिद्धेश्वरांचे देवालय आहे. त्याच्या भोवती समाधी, अडकेश्वर, चक्रेश्वर, रुद्रपाद देवालयेही आहेत. येथील प्रमुख निलगार हे लिंगायत आहेत. जगद्गुरू काडसिद्धेश्वर हे मूळचे हेमांडपंथी शिल्पकलेचे भव्य शिवमंदिर आहे. त्याच्या आत कोरीव बाजूच्या बाहेरील दोन मंडप आहेत. ह्या मंदिराची बांधणी मोठ्या व कोरीव दगडात केली आहे. 500 वर्षांपूर्वी लिंगायत धर्माकार काडसिद्धेश्वर यांनी ह्या मंदिराची बांधणी केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी या मंदिराला भेट दिली व मदत केली. मुस्लीम धर्माच्या मुख्य मिरासाहेब या शिवभक्त होत्या. त्यांनी मिरज येथील टेकडीवर अशा प्रकारच्या मंदिराची स्थापना केली. या काडसिद्धेश्वरांची पहाटे पाच वाजता, सकाळी अकरा वाजता, दुपारी दोन वाजता आणि संध्याकाळी सात वाजता अशी दिवसातून चतुष्काल पूजा होते. मंदिरात नित्य रुद्राभिषेक चालतो. भाविकांसाठी या मठात सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत बाराही महिने अन्नछत्र चालू असते. मठाभोवती दगडी तटबंदी आहे.
मठ सर्व जातिधर्मांसाठी खुला
ब्रह्मलीन जगद्गुरू श्री मुप्पिन काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी मठ पूर्वीप्रमाणे सर्व जातिधर्मांसाठी खुला केला. त्यांनी वर्णभेद, वर्गभेद, लिंगभेद यासाठी समाजाचा रोष ओढवून घेतला, पण ते विचलित झाले नाहीत. त्यांनी समाजाला पुरोगामित्वाची खर्या अर्थाने जाणीव करून दिली. त्यांच्या या कार्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे. तीनशे एकरात पसरलेला हा संस्थान मठ असून धर्मप्रसार हा या मठाचा मूळ उद्देश आहे. संस्थानांप्रमाणे सर्व प्रकारचे वैभव या मठाला आहे. पाठीमागे पश्चिमेला उजव्या बाजूस मुप्पिन काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांचे समाधिस्थान व गुरुदेव ध्यानमंदिर आहे. मुख्य मंदिरांच्या बाजूस श्री सिद्धरामेश्वर महाराजांची प्रतीकात्मक समाधी असलेला मंडप आहे. बाहेरील बाजूस जलमंदिर आहे. मागील बाजूस पंचकर्म चिकित्सालय आहे. येथे जुन्या, असाध्य अशा आजारांवर इलाज करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म पद्धतीने उपचार केले जातात. याच्या शेजारी क्राँक्रीटचे दोन महाकाय हत्ती यात्रेकरूंचे लक्ष वेधून घेतात. पायर्या उतरल्यानंतर महाकाय नंदी व पिंडीच्या आकाराच्या छोट्या मंदिरावर 25 फूट उंचीची शंकराची मूर्ती सगळ्यांना आकर्षून घेते. पश्चिमेस भक्तनिवास आहे. तेथेच प्रसादनिलय व अतिथीगृह आहेत. भक्तांसाठी दोन भव्य प्रवचन मंडप आहेत. पहाटे पाच वाजता, सकाळी अकरा वाजता, दुपारी दोन वाजता आणि चतुष्काल पूजा होत असते. याशिवाय मंदिरात नित्य भजन, रुद्राभिषेक आणि अन्नछत्र सुरू असते. दासबोध प्रमाणग्रंथ आणि त्रिकाळ भजन हे या संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे.
बाल ब्रह्मचारी उत्तराधिकारी
बाल ब्रह्मचारी उत्तराधिकारी या मठाचा अधिपती म्हणून निवडला जातो. सातव्या शतकापासूनची ही परंपरा आहे. संन्यासी परंपरा असणार्या या मठाच्या अनुयायांचा मोठा वर्ग आहे. श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाला मठाधिपतींची शेकडो वर्षांची उज्ज्वल परंपरा आहे, आजमितीस या मठाचे 49 मठाधिपती झाले असून सद्य:स्थितीस 50वे मठाधिपती स्थानापन्न आहेत.
श्री अदृश्य काडसिद्धेश्वर
सध्याचे अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज हे सिद्धगिरी मठाधिपतींच्या शृंखलेतील 49वे मठाधिपती आहेत. त्यांचा जन्म सन 1964मध्ये विजापूर जिल्ह्यातील एका गावात झाला. ते उच्चविद्याविभूषित असून सन 1989मध्ये ते ब्रह्मलीन मुप्पिन काडसिद्धेश्वरांच्या अनुज्ञेने सिद्धगिरी मठाधिपती झाले. पूज्यश्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या अथक परिश्रमांतून श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाचा झालेला कायापालट पाहून लोक त्यांना भगीरथ महर्षींची उपमा देतात. त्यांच्या आधिपत्याखाली आजपर्यंत 50च्या वर ग्रंथ व विविध पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. आजपर्यंत सर्व मठाधिपतींनी केलेल्या कार्यात पूज्यश्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींनी कळसाप्राय कार्य केलेले आहे व आजही करत आहेत. मठाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दशके मठाधिपती राहून त्यांच्या संकल्पानुसार अल्पावधीतच पुढील 50वे मठाधिपती म्हणून श्री मुप्पिन काडसिद्धेश्वर यांची नेमणूक करून त्यागाचा एक भव्य आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

कळसाप्राय कार्य
अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या प्रेरणेने या मठामार्फत 1997 साली सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशनची स्थापना झाली. विज्ञान व अध्यात्म यांची उत्तम सांगड घालून ते मठाचा कार्यभार सांभाळत आहेत. त्यांच्या शिष्यांपैकी योगगुरू मारुती लांबोरे, दत्ता पाटील, सौ. दाभोळकर, गणेश ठाकूर, वसंत मोरे (मामा), दत्ता आखाडे, रणजित सडोले, आचारी निंबाळकर (काका) यांचे मठाला प्रगतिपथावर नेण्यासाठी नेहमी प्रयत्न सुरू असतात. युवक-युवतींच्या व्यक्तिमत्त्व विकासाकरिता या मठामार्फत वर्षातून दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये दहा दिवसीय बाल-चेतना व युवा-चेतना शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिरात प्रामुख्याने योगअभ्यास, प्रवचन, संस्कृत अभ्यास आणि भजन आदी विषयांवर म्हैसूर, विजापूर अक्संबा, पतंजली आदी ठिकाणांहून येणार्या योगगुरू व प्रवचनकार यांच्यामार्फत शिक्षण दिले जाते. या मठात शिक्षण घेण्यासाठी शिष्यगण/योगी, महात्मे देशभरातून सतत येतात.
आपद्ग्रस्तांंच्या हाकेला प्रतिसाद देणारा मठ
भूकंप, महापूर, दुष्काळ अशा अनेक नैसर्गिक आपत्तींनी ग्रस्त असणार्या लोकांसाठी श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठातर्फे जीवनावश्यक वस्तूंची व वैद्यकीय सेवेची तत्काळ मदत केली जाते. जगभर कोरोनाचे तांडव सुरूच असताना अशा अस्मानी संकटात कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी येथील श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाने हजारो लोकांना जेवण, अन्न-धान्य अशी मदत देत दिलासा दिला आहे. कोणत्याही आपत्तीच्या काळात आपद्ग्रस्तांंच्या हाकेला प्रतिसाद देणारा मठ म्हणून या मठाची ख्याती आहे. नेपाळ असो, केरळ असो, कोल्हापूर-सांगलीचा गतवर्षीचा महापूर असो.. काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुमारे दीडशेहून अधिक स्वयंसेवकांची फळी या मदतकार्यात तत्काळ उतरलेली आहे.
मदतकार्य
वादळग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी स्वामींनी गवंडी, लोहार, सुतार, प्लंबर, वेल्डर, इलेक्ट्रिकल यांचा समावेश असलेल्या लोकांबरोबर घरबांधणी, दुरुस्तीसाठी विटा, सिमेंट, पत्रे, वाळू, लोखंडी सळई, बांधकाम साहित्य, दरवाजे, खिडक्या, इलेक्ट्रिकल साहित्य, संडास-बाथरूमसाठी लागणारे प्लंबिंग साहित्य, कौले, मेणबत्ती, काडेपेटी, शैक्षणिक साहित्य - वह्या, कंपास, पेन, स्कूल बॅग अशा एक ना अनेक स्वरूपात आणि अर्थातच आर्थिक स्वरूपात मदत घेऊन दस्तुरखुद्द स्वामी लोकांचे अश्रू पुसण्यासाठी तळकोकणात उतरले. कोकणातील पाजपंढरी, खरसई, खेड, दापोली, चिपळूणसह रायगड जिल्ह्यातील काही भागात हे मदतकार्य करण्यात आले, पुनर्वसनासाठी ‘सिद्धगिरी निसर्ग वादळ मदत कक्ष’ स्थापन करण्यात आला. कोरोनाचा फटका बसलेल्यांना मदत करणार्या कोल्हापूर पोलीस दलाला रोज मठाच्या वतीने जेवण पुरवण्यात येत आहे. याशिवाय मुंबईतही तीन महिने गरीब कुटुंंबांपर्यंत तांदूळ, रवा, मीठ, डाळ, साखर, तेल यापासून अगदी काडेपेटीपर्यंत किट मदत पोहोचवण्यात आली.
दोनशे स्वयंपूर्ण खेड्यांचा प्रयोग
शहरीकरणाचा तोटा समजून घेऊन अनेक जणांना आपापल्या खेड्यातच उद्योग उभारून त्यांना स्वयंपूर्ण बनण्यासाठी दोनशे स्वयंपूर्ण खेडी उभारण्यात येणार आहेत. शहरातून आलेली माणसे परत जाऊ नयेत यासाठी हा प्रयत्न आहे. या दोनशे गावांतच उत्पादनांची निर्मिती केली जाणार असून त्यांची विक्रीही या दोनशे गावांतच केली जाणार आहे. हा एक प्रयोग आहे. यातील जादा उत्पादने शहरात विकली जातील आणि शहरातील नवनवे तंत्रज्ञान या खेड्यात आणले जाईल, असा हा प्रयोग आहे. विद्याचेतना प्रकल्पाअंतर्गत सध्या दोनशे गावांत सुरू असलेल्या शाळेतील मठाचे शिक्षकच या नव्या प्रकल्पासाठी सज्ज आहेत.
वस्तुसंग्रहालय, स्वावलंबी, जिवंत खेडे!
काडसिद्धेश्वराच्या मठाशेजारीच 10 एकरावर वसलेले सिद्धगिरी वस्तुसंग्रहालय आहे. शहरीकरणामध्ये लुप्त होऊ पाहत असलेल्या ग्रामीण जीवनशैलीचे मूर्तिमंत नमुने असलेले स्वावलंबी, जिवंत खेडे! ग्रामीण संस्कृतीवर आधारित असा हा आगळावेगळा प्रकल्प कोल्हापूरच्या पर्यटन स्थळांतील एक मानबिंदू ठरलेला असून आशिया खंडातील अव्वल दहा म्युझियममध्ये त्याचा समावेश झाला आहे. या वस्तुसंग्रहालयाच्या सुरुवातीला बारा राशींची बारा शिल्पे आहेत. त्यानंतर एका गुहासदृश प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच प्राचीन भारतातील कपिलमुनी, पतंजली, वेदव्यास, महर्षी कणाद, नारद, चिरकारिक, भगीरथ, विष्णुशर्मा, गार्गी, अक्षपात गौतम, जैमिनी, चरक, सुश्रुत, जीवक, आर्यभट्ट, नागार्जुन, वाल्मिकी महर्षी, हर्षवर्धन, विद्यावाचस्पती, भरत (शकुंतलेचा), भरतमुनी, पाणिनी, एकलव्य, शबरी, वराहमिहीर, सुरपाल, यशोदा, चाणक्य, महर्षी पराशर आणि काश्यप यांच्यासह 32 ऋषिमुनींचे सिमेंट-क्राँकीटमध्ये तयार केलेले कोरीव पुतळे आहेत. ऋषींची नावे, त्यांची विद्या आणि त्यांचे योगदान याची सामान्य माणसाला ठाऊक नसलेली माहिती तेथे लिहिली आहे. या गुहेतून बाहेर पडल्यावर दोन्ही बाजूंना हिरवीगार शेते आणि त्यांत काम करणार्या माणसांच्या प्रतिकृती दिसतात. धान्याची पेरणी करण्यापासून ते धान्य घरात येईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया या प्रतिकृतींमधून दाखवल्या आहेत. याचबरोबर शेतामध्ये बैल, गाय, म्हशी या जनावरांचा असणारा वावर, लगोरी, सूरपारंब्या, लंगडी यांचे प्रत्यक्ष दर्शन या प्रतिकृतींमध्ये जिवंत वाटाव्या इतक्या बारकाईने टिपल्या गेल्या आहेत. कोष्टी, कुंभार, चांभार, न्हावी, लोहार, शिंपी, सोनार यांसह पिंगळा, वासुदेव यांचीही शिल्पेही त्या-त्या जीवनशैलीचे दर्शन घडवतात. ग्रामीण भागांत असलेल्या घरांचे विविध नमुने येथे पाहावयास मिळतात. वतनदाराचा वाडा, पाटलाचा वाडा, शिंप्याचे घर यांच्या हुबेहूब त्रिमित प्रतिमा येथे ठेवल्या आहेत.

गुरुकुल पद्धत
कणेरी मठावर शंभर टक्के स्वयंपूर्ण बनवणार्या, 14 विद्या आणि चार वेद, सहा शास्त्र आणि 64 प्रकारच्या कला शिकवणार्या देशातील या एकमेव अनोख्या गुरुकुल विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यांतून व परदेशातूनही अर्ज येतात. 7 ते 10 वयोगटातील शंभर जणांना नि:शुल्क आणि निवासी प्रवेश देऊन त्यांना देशातील 150 आधुनिक व पारंपरिक प्रकारचे शिक्षण येथे देण्यात येते. या विद्यालयातून 12 वर्षांनंतर स्वयंपूर्ण होऊन बाहेर पडणार्यांसाठी एकाच विषयात पीएच.डी. करण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठही स्थापले जाणार आहे. गुरुदक्षिणा देण्याची परंपरा हे विद्यार्थी पाळतात.
विद्याचेतना प्रकल्प
मठाच्या विद्याचेतना प्रकल्पाअंतर्गत या विद्यालयातून बाहेर पडणारा प्रत्येक जण स्वयंपूर्ण, स्वयंसिद्ध बनणार असून उपजीविकेसाठी कुणापुढेही हात पसरणार नाही. गोपालक, एक हजार वर्ष टिकणारे घर बनवणारा इंजीनिअर, प्रक्रिया उद्योजक, व्यावसायिक, शिल्पकार, संगीतकार, पाकशास्त्र, ज्योतिषशास्त्र (खगोलशास्त्र), हवामानशास्त्र, हॉर्स व बुल रायडिंग, इतिहास, पाठांतर (आयुर्वेदाचे श्लोक), शिल्पवेद, धनुर्वेद, गंधर्ववेद, युद्धकला, मॅनेजमेंट, नॅचरल सायन्स, वैदिक गणित, ब्युटी पार्लर अशा असंख्य कौशल्यात ते पारंगत होतात. हे सर्व शिकवताना संस्कृतला, मातृभाषेला, आश्रमभाषेला, राष्ट्रभाषेला आणि शेवटी इंग्लिश भाषेला महत्त्व दिले जाते. तसेच संगणकाचेही अत्याधुनिक शिक्षण दिले जाते.
संघाच्या माध्यमातून ईशान्येतील शंभर मुले मठात
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून कणेरीच्या या मठात ईशान्येतून आलेल्या शंभर विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. तिसरी-चौथीपासून अकरावी-बारावीपर्यंतचे हे विद्यार्थी आहेत. मठाच्या परिसरातील दहा शाळांमध्ये शारीरिक शिक्षण देणारे शिक्षक मठाचे आहेत. जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावणारे 40पैकी 25 खेळाडू मठाच्या माध्यमातून चमकतात, हे अभिमानास्पद आहे. याशिवाय सरकारी 335 शाळा मठाकडून दत्तक घेतल्या आहेत.
कृषी विज्ञान केंद्र
धर्म, शिक्षण याबरोबरच कृषी क्षेत्रातही मठाचे मोेठे काम चालते. नैसर्गिक पद्धतीने शेती, सेंद्रिय उत्पादने घेण्यासाठी मठाकडून शेतकर्यांसाठी खास कृषिविज्ञान केंद्राची स्थापना झाली आहे. धान्य, फळ, भाजीपाला या शेतीमालासाठी हमीभाव देणारी बाजारपेठही मठाकडून तयार केली आहे. सध्या हक्काचे असे शंभर ग्राहक आहेत. सध्या दीडशे एकरात शेतीप्रयोग केले जातात. भविष्यात ते 1000 एकरापर्यंत जाईल अशी आशा आहे. येत्या वर्षभरात यासाठी स्वतंत्र मोबाइल अॅप तयार करण्यात येणार आहे.
सिद्धगिरी प्रॉडक्ट
मठाकडूनही जवळपास 40हून अधिक उत्पादनांची निर्मिती केली जाते आणि त्यासाठी मुंबई, पुणे यासारख्या अनेक शहरांत आउटलेटही आहेत. भारतीय वंशातील देशी गाईंचा समावेश असलेल्या मठाच्या 40 गोशाळा आहेत. या गोशाळेत सुमारे 700 ते 1000 गाईंचे संवर्धन होत आहे. या गाईंपासून मिळणारे दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र यापासून विविध पदार्थ या मठात तयार केले जातात. देशी गाईचे दूध 100 रुपये लीटरने, तर 300 रुपये किलोने तूप विकले जाते. देशी गाईचे शेणखत आणि गांडूळ खत हे मठाचे वैशिष्ट्य राहिले आहे. गोमूत्रापासून विविध आरोग्यविषयक औषधी तयार केल्या जातात. शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी सिद्धगिरी बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे. 25 प्रकारचे पापड, 8 प्रकारच्या चटण्यांचा समावेश असलेले विविध व्यवसाय सुरू आहेत.
आरोग्य क्षेत्र
धर्म, शिक्षण, कृषी या क्षेत्रांबरोबरच आरोग्य क्षेत्रातही मठाने मोठे काम उभारले आहे. 250 खाटांचे, सर्व सुविधायुक्त भव्य हॉस्पिटल व 50 खाटांचे नामांकित आयुर्वेदिक आरोग्यधामही बांधण्यात आले आहे. सिद्धगिरी धर्मादाय हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर मठाच्याच आधिपत्याखाली चालते. गेल्या दहा वर्षांपासून गरिबांना अल्पदरात उपचार देण्यासाठी या हॉस्पिटलमध्ये तरुण आणि तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. न्यूरो विभाग, हृदयरोग विभाग यासाठी माजी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नाने साडेतीन कोटी रुपयांची अद्ययावत यंत्रणा हॉस्पिटलसाठी मिळवून दिली आहे. भविष्यात पन्नास हजारात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सध्या बायपाससाठी अँजिओग्राफीही मोफत केली जाते.