वेदावती तिरावरचे तीर्थक्षेत्र प.पू. श्री सेवागिरी महाराज देवस्थान

विवेक मराठी    08-Jul-2022
Total Views |
सातारा जिल्ह्यातील (ता. खटाव) पुसेगाव हे वेदावतीतिरी वसलेले गाव. येथील श्री सिद्धेश्वराच्या मंदिरात श्री सेवागिरी महाराजांचे वास्तव्य होते. महाराजांचे जीवन वेदावतीच्या तीर्थाप्रमाणे पवित्र व निर्मळ होते, तर सिद्धेश्वराप्रमाणे त्यागी व उदात्त होते. ब्रह्मचर्याचे कडक पालन करणार्‍या महाराजांनी लोकांना क्रोधाऐवजी दया, क्षमा, शांती, सत्य व अपरिग्रह यांची शिकवण दिली.

maharaj
प.पू. पूर्णगिरी महाराजांनी सेवागिरी महाराजांना दशनाम संप्रदायाच्या जुन्या आखाड्याच्या पद्धतीने पंचगुरूंकडून संन्यासदीक्षा दिली. आपला शिष्य सर्व विद्यांमध्ये पारंगत झाला असल्याची जाणीव झाली, तेव्हा पूर्णगिरी महाराज आपल्या शिष्याला म्हणाले, “तू वेदावतीतिरी दंडकारण्य या भूमीत जा, तेथे सिद्धेश्वराचे प्राचीन शिवलिंग आहे व तीच तुझी कर्मभूमी आहे.” आपल्या गुरूच्या आज्ञेनुसार 1905 सालच्या सुमारास आपल्या 10-12 निवडक शिष्यांसह प.पू. श्री सेवागिरी महाराजांचे पुसेगाव (पुसेवाडी) येथे आगमन झाले.
 
 
पुसेवाडी हे गाव वेदावतीतिरी वसलेले 80 ते 100 उंबर्‍यांचे छोटेसे खेडेगाव होते. या ठिकाणी सुमारे 500 वर्षांपूर्वी एका धनगर कुटुंबामुळे पुसेवाडीची ही वसाहत झाली असावी. त्या काळी शासन दरबारी ‘नेर-पुसेवाडी’ अशी या पुसेवाडीची नोंद आहे.
महाराज प्रत्यक्ष श्री शंकर।
 
 
परंपरा दत्त अवतार॥ आले सोडून गडगिरनार।
 
आले उद्धाराया पुसेवाडी॥
 
प.पू. श्री सेवागिरी महाराज हे मूळचे उच्च रजपूत कुळातील असल्याने त्यांची शरीरयष्टी व बांधा मजबूत होता. रंग गोरापान, नाक सरळ, धारदार व डोळे पाणीदार होते. त्याची उंची साधारण 6 फूट इतकी होती. त्यांच्या डोक्यावर जटांचा संभार विशिष्ट पद्धतीने बांधलेला असल्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत रुबाबदार व उठून दिसे. महाराज स्वभावाने निरिच्छ व वृत्तीने त्यागी, तसेच प्रेमळ होते. त्यांना पाहणार्‍यांची मने त्यांच्यापुढे तत्काळ नतमस्तक होत असत.
 
 
महाराजांचे श्री सिद्धेश्वर मंदिरात वास्तव्य
 
महाराज पुसेवाडी (पुसेगाव) येथे श्री सिद्धेश्वराच्या मंदिरात वास्तव्य करू लागले. सिद्धेश्वराची पूजाअर्चा करीत असताना त्यांची दिनचर्या मोठी आखीवरेखीव व योग्याला साजेशी अशीच होती. भल्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून वेदावतीतिरी स्नान करीत. त्यानंतर महाराज मंत्रोच्चारात स्वत: श्री सिद्धेश्वराची पूजा करीत असत. त्यासाठी लागणारा बेल व फुले महाराज स्वत: तोडून आणून ठेवत. महाराज सिद्धेश्वराच्या जागृत व स्वयंभू अशा पिंडीजवळ तासनतास ध्यानधारणेसाठी बसत असत. पिंडीतून सिंहनाद निघत असे. अद्यापही सिंहनाद निघतो.
 
 
गावातील भक्तमंडळी व शिष्यगण नित्यनेमाने सिद्धेश्वराच्या दर्शनाला येत असत. महाराज त्या सर्वांना प्रसन्न मनाने आशीर्वाद देत व त्यांच्या क्षेमकुशलाची वास्तपुस्त करीत असत. मध्यान्हसमयी महाराज भिक्षेसाठी बाहेर पडत असत. त्या वेळी महाराजांचा वेष यतिधर्माला साजेसा असा असे. विभूतीचर्चित काया, भैरवी-बाणा परिधान करून काखेमध्ये झोळी, उजव्या भुजेवर भैरवाची मूर्ती, डाव्या भुजेवर त्रिशूल, पायी खडावा व उजव्या हातामध्ये भिक्षापात्र अर्थात खापर व डाव्या हातात चिमटा असा वेष परिधान करून महाराज प्रथम अखंड धुनीसमोर जात असत व धुनीमातेला “अलख निरंजन” असे गर्जत असत. नंतर सिद्धेश्वरापुढे जाऊन “अलख निरंजन” गर्जून मंदिराबाहेर पडत असत. गावातील भक्तांच्या दारासमोर जाऊन अलख निरंजन असे गर्जून भिक्षा मागत असत. असा त्यांचा नित्याचा दिनक्रम असे.
 
 
दत्त मंदिर
 
 
महाराजांनी दत्त मंदिराची उभारणी केली व महाराजांची भक्ती करणार्‍यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत जाऊ लागली. श्री सेवागिरी महाराज सिद्धेश्वर मंदिराजवळच पर्णकुटी बांधून तेथे वास्तव्य करू लागले. ते स्थान अत्यंत भयावह होते. तिथे दिवसा-उजेडीसुद्धा मनुष्यमात्र जाण्यास धजावत नसे, असे ते महाभयाण व भकास स्थान होते. परंतु महाराजांनी स्वत:च्या पर्णकुटीप्रमाणे तेथे दत्त मंदिर बांधले. त्या मंदिरात दत्तगुरूंची सुंदर अशी संगमरवरी मूर्ती बसविली. तेथे दत्तजयंती सुरू केली. दत्त मंदिरासमोर 1 खणाचा मंडप बांधला. शेजारी विहीर खोदून बांधकाम केले व विहिरीच्या पाण्यावर बाग-बगिचा तयार केला. पुढे महाराजांनी देवस्थानासाठी 4 एकर जमीन घेऊन ठेवली. भविष्यात येणार्‍या काळाची चाहूल ओळखून त्यांनी स्वत:च्या संजीवन समाधीसाठी जागा निर्माण करून सदर मंदिराचा व त्या परिसराचा आमूलाग्र कायापालट केला. महाराज आता मठात आनंदाने वास्तव्य करू लागले. हरिजनांसाठी या मंदिराची दारे खुली करून त्यांनी समाजक्रांतीचे एक पाऊल टाकले. महाराजांचे जीवन वेदावतीच्या तीर्थाप्रमाणे पवित्र व निर्मळ होते, तर सिद्धेश्वराप्रमाणे त्यागी व उदात्त होते. ब्रह्मचर्याचे कडक पालन करणार्‍या महाराजांनी लोकांना क्रोधाऐवजी दया, क्षमा, शांती, सत्य व अपरिग्रह यांची शिकवण दिली. भक्ती करणार्‍या भक्तगणांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाऊ लागली. लहानांपासून थोरांपर्यंत सर्व जण मठात जाऊन महाराजांच्या आज्ञेत वागू लागले. महाराजांना लहान मुले अतिशय प्रिय होती. मुलांना ते श्लोकपठण, विष्णुसहस्रनाम, विविध स्तोत्रे, आरत्या व भूपाळ्या इत्यादी शिकवत असत.
 
 
महाराजांना बाग-बगिचाचा मोठा छंद होता. विहिरीवर स्वत: मोट चालवून महाराज बागेला पाणी देण्यात तल्लीन होऊन जात. मंदिरात नित्यनेमाने भल्या पहाटे व सायंकालीन आरती होऊ लागली. रोजच्या आरतीच्या घंटानादाने पुसेगाव नगरी दुमदुमून जात होती. त्यामुळे साहजिकच गावात अनीती, अविचार, भ्रष्टाचार, दुर्गुण यांना थारा मिळेनासा झाला. महाराजांची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती. देवादिकांचे भजन, पूजन, कथा, पोथीपुराण यांचे नित्य वाचन, श्रवण, चिंतन व मनन करून महाराजांनी पुसेगावकरांना पूर्ण आस्तिक बनविले.
 
 
प.पू. श्री सेवागिरी महाराजांचे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही असंख्य भक्त होते. त्यांचा नावलौकिक व ख्याती सर्वदूर झाली होती. महाराजांचे फलटण येथील एक परमभक्त होते. ते बरीच वर्षे महाराजांच्या मठात व सान्निध्यात होते. एक दिवस मठात ग्रंथ वाचत बसले असता सहज त्यांच्या मनात चहा पिण्याचा विचार येऊन गेला. आणि आश्चर्य असे की, महाराज त्याच समयी तेथे आले व त्या भक्ताला म्हणाले, “चहा पिण्याची इच्छा झालीच आहे तर चहा घेऊन ये.”
 
 
अशा रितीने महाराज भक्तांच्या मनातील भावना जाणत असत. दर्शनाला येणार्‍या लोकांना ते ’ॐ नमो नारायणा’ असा आशीर्वाद देत. कारण दशनाम पंथाचा तो सिद्धमंत्र आहे.
 
 
विद्यमान मठाधिपती प.पू. श्री सुंदरगिरी महाराज
 
 
प.पू. सुंदरगिरीजी महाराजांचा जन्म सन 1968मध्ये अंजनी, ता. तासगाव, जि. सांगली येथे गिरी घराण्यात झाला. पूर्वीच्या काळी मातापिता ज्याप्रमाणे आपल्या बाळाचे जीवन सार्थक व्हावे, तो सर्वशास्त्रसंपन्न आणि कलानिपुण व्हावा व ज्ञानी बनावा म्हणून गुरुकुलात पाठवीत असत, तद्वतच महाराजांच्या माता-पित्यांनी त्यांना गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाखाली धर्म व अध्यात्मशास्त्र, संस्कृत भाषा, पाठपूजा व आयुर्वेद यांचे सर्व शिक्षण दिले.
 
 
प.पू. आत्मगिरी महाराज दि. 14 ऑगस्ट 2003 रोजी झाले. त्यांनी आपल्या हयातीत आपला उत्तराधिकारी कोण असावा हे बोलून दाखविल्यानुसार व त्यांच्या महानिर्वाणानंतर बोलविण्यात आलेल्या ग्रामसभेतील एकमुखी ठरावानुसार, तसेच दशनाम पंथातील गुरू-शिष्य परंपरेने प.पू. सुंदरगिरी महाराज हे श्री सेवागिरी महाराज देवस्थानचे चौथे मठाधिपती म्हणून गादीवर विराजमान झाले. सध्या त्यांच्या आधिपत्याखाली व कुशल मार्गदर्शनाखाली देवस्थानचा कारभार यथायोग्य सुरू आहे. चौफेर विकास साधला जात आहे. त्यांनी देवस्थानामध्ये अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्तम आयोजन करून सुनियोजितरित्या पार पाडले आहेत. त्यांनी आपल्यातील नेतृत्वकौशल्याची चुणूक वेळोवेळी दाखवून दिली आहे. सध्या त्यांच्या कुशल व आत्मविश्वासपूर्ण नेतृत्वाखाली देवस्थान ट्रस्टची सर्वांगीण विकासाकडे गतीने वाटचाल चालू आहे. तर याप्रमाणे आतापर्यंतच्या सर्व मठाधिपतींनी श्री सेवागिरी देवस्थानासाठी खूप मोठे व मौलिक योगदान दिलेले आहे. आम्ही सर्व ग्रामस्थ व भक्तमंडळी त्यांच्या चरणी कायम नतमस्तक व सदैव ऋणी आहोत.
 
 
(‘प.पू. श्री सेवागिरी महाराजांचे जीवनचरित्र’ या पुस्तकातील संपादित अंश.)