समता - ममता - समरसतेचा अखंड स्रोत श्री क्षेत्र आनंदगड, जालना

विवेक मराठी    08-Jul-2022
Total Views |
@डॉ. दिवाकर कुलकर्णी
। 9822435531
 
श्री क्षेत्र आनंदगड हा अखंड आनंदाचा स्रोत आहे. हे सांप्रतकाळी समाजाला नवसंजीवनी प्रदान करणारे ऊर्जाकेंद्र आहे. भक्तिभावयुक्त अष्टसात्त्विक भावाने भारित होऊन भेदभावविरहित, समता-समरसतायुक्त, नीतिमान, बलशाली समाजनिर्मिती हाच संतपरंपरेचा हेतू राहिला आहे. भगवद्भक्ती करायची, तीस अनुकूल कृतिरूप द्यायचे आणि ही विश्वकल्याणकारक भगवी हिंदू धर्मपताका सतत गगनात फडकावीत ठेवण्याचे कार्य पूजनीय श्री भगवान महाराज आनंदगडकर उपाख्य पूजनीय श्री बाबा करीत आहे.

pandharpur

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ।
 
हे संतवचन समूर्त साकार जिथे होते, क्षणमात्रही या वचनाचा विसर जिथे पडत नाही, ते समरसता तीर्थक्षेत्र म्हणजे श्री आनंदगड. जालना ते देऊळगाव रस्त्यावर घाटवळणाचा एक छोटेखानी रस्ता आहे. एकेकाळी चोरी, वाटमारी, लूटमार यासाठी हे घाटवळण कुख्यात होते. वाटसरू, प्रवासी यांच्यासाठी ही जागा भयावह होती. या घाटवळणाला आणि माथ्याला एका महान विभूतिमत्वाचा चरणस्पर्श झाला. भयकारक लूटमार, चोरी, दरोडे यासाठी कुख्यात असलेल्या या घाटवळणाच्या माथ्यावर आणि कुशीत एक अद्भुत परिवर्तन साकार होऊ लागले. हे जे साकार होत होते, ते वारकरी संतपरंपरेने अखिल विश्वाला दिलेल्या सारगर्भ अमृततत्त्वाचेच नवनीत होते. ज्यांच्या पावन पवित्र चरणस्पर्शाने ही मरुभूमी चिदानंद स्वरूप धारण करीत होती, ते होते सुप्रसिद्ध वारकरी संत पूजनीय डॉ. श्री भगवान महाराज आनंदगडकर.
 
 
शांतिब्रह्म संत श्री एकनाथ महाराज, संत जनाबाई, राष्ट्रभक्ती आणि प्रखर धर्मनिष्ठा पुन:स्थापित करण्यासाठी जनचळवळ उभारणारे राष्ट्रसंत श्री रामदास स्वामी, संत गोरोबा काका, संतश्रेष्ठ नामदेव महाराज या संतपरंपरेने समृद्ध असलेल्या मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील पिंपळगाव पीर या गावी प.पू. श्री भगवान महाराज यांचा जन्म झाला. चार-पाच शतकात एखाद्या परिवारात महापुरुष जन्मतात. परंतु पूजनीय श्री बाबांच्या परिवारात त्यांच्या वंदनीय मातोश्री आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू हे संततुल्य असेच होते. त्यांच्या मातोश्री वंदनीय ताई या अत्यंत धार्मिक आणि व्रतस्थ होत्या. तब्बल 40 वर्षे या माउलींनी अन्नग्रहण न करता धर्मानुष्ठान अनुचरले. त्यांचे ज्येष्ठ बंधू पूज्य श्री दादाही पंचक्रोशीत संतवृत्तीचे म्हणून प्रसिद्ध होते. पंचक्रोशीत आजही त्यांच्यावर अपार श्रद्धा असलेले हजारो नागरिक आहेत.
 

pandharpur
 
अशा प्रादेशिक आणि परिवारिक धार्मिक सच्छील परंपरेत प.पू. श्री बाबांचे शैशव आणि तरुणपण व्यतीत होत होते.अगदी शालेय शिक्षणकाळापासूनच श्री बाबांनी कीर्तन-प्रवचन करणे आरंभले होते. बालपणापासूनच असलेल्या आध्यात्मिक ओढीने वारकरी संतपरंपरेला समृद्ध करणार्‍या ह.भ.प. श्री किशन महाराज साखरे यांच्याकडे ते गेले. श्री किशन महाराज यांनी पूजनीय श्री बाबांना पंढरपूर येथील घनपाठी भगवानशास्त्री धारूरकर यांच्याकडे पाठविले. पूजनीय श्री बाबांनी धारूरकरशास्त्री यांच्याकडे वेद, संस्कृत, ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी, जगद्गुरू संत तुकारामकृत गाथा, अन्य संतसाहित्य यासह धर्म तत्त्वज्ञानाचा गाढा व्यासंग केला. या सार्‍या तत्त्वज्ञानाचा केवळ ग्रांथिक अभ्यास न करता त्यांनी हे तत्त्वज्ञान आत्मसात केले.
 
 
प्रापंचिक विषयात ते अजिबात राहिले नाहीत. मात्र शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ वनखात्यात नोकरीही केली. त्यांना सैन्यात भरती होण्याचीही संधी प्राप्त झाली होती. ते सारे त्यांनी नाकारले आणि ते वैराग्याच्या पदपथावर मार्गस्थ झाले.
 
 
वारकरी संप्रदायातील एक अधिकारी संत म्हणजे ह.भ.प. श्री रंगनाथ महाराज परभणीकर यांनी न्हावाशेवा जालना येथे एका मठाची स्थापना केली. पू. श्री बाबा या मठाचे मठाधिपती झाले. मठ, आश्रम, संस्था हे कार्य करण्याचे साधन आहे. ते वर्चस्व गाजविण्याचे, उपाध्या मिरविण्याचे किंवा आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यासाठीचे माध्यम होऊ नये. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह या संतशिकवणीचे मूर्तिमंत दर्शन म्हणजे पूजनीय श्री भगवान बाबा. न्हावाशेवाच्या या मठात काही विपरीत व्यवहार घडू लागला. पूजनीय श्री बाबांनी तत्काळ या मठाचा आणि तेथील सर्व अधिकारांचा परित्याग केला. या मठातील अमंगळाचा दूरान्वयानेही आपणास स्पर्श होऊ नये, या विशुद्ध भावाने पूजनीय श्री बाबांनी हा वैभवशाली मठ सोडला.
 
 
पू. श्री बाबा न्हावाशेवा सोडून गोंदेगाव शिवारातील घाटवळणावरील माळरानावर वस्ती करते झाले. या माळरानावर त्यांनी सर्वत्र आनंदाचे तरंग पसरविणार्‍या जगन्माता भवानी श्री आनंदेश्वरी मातेचे मंदिर 13 एप्रिल 1995 रोजी निर्माण केले.
 
 
गोंदेगाव शिवार हा माळ तसा पूर्वी दरोडे आणि लूटमार यासाठी कुप्रसिद्ध! अशा ‘रुखल्या-सुखल्या भूमीवरती, सद्भावाने करुनी वस्ती, संस्काराचे जल शिंपुनिया सोनमळे पिकवीन’ या उक्तीप्रमाणे पू. श्री बाबांनी आपल्या पुण्यपावन वास्तव्याने या ओसाड माळरानावर आनंददायक वारकरी परंपरेला पुष्ट करणारा आनंदगड वसविला, आनंदाचा सोनमळा पिकविला आहे. या परिसरातील वडार वस्तीतील बांधव त्यांच्या पूर्वसुकृत पुण्याईमुळे श्री भगवानबाबांचे भक्त झाले. माळकरी, टाळकरी, वारकरी झाले. चोर्‍या सुटल्या, दारू सुटली, दरोडे-खून सुटले. ह.भ.प. श्री भगवानबाबांनी या वडार बांधवांसोबत त्यांच्याच फडक्यात बांधून आणलेली मीठभाकर खाऊन आनंदगडाच्या पायर्‍यांचे दगड घडविले, घाम गाळला. आनंदगडावर जाण्यासाठीच्या या घडीव सुघट दगडांच्या सोपानावर पूजनीय श्री बाबांच्या स्वत:च्या घामाचे सिंचन झाले आहे. दोन्ही बाजूंनी असलेल्या गर्द झाडीच्या शीतल छायेत एक एक पायरी चढत जाताना मनातील आनंदही चढत्या क्रमाने वाढत जातो, याची अनुभूती एकदातरी घेतली पाहिजे अशीच आहे.
 

pandharpur
 
पूजनीय श्री भगवानबाबांना अनेक भाषा उत्तम येतात. वडार समाज बोलतो ती तेलगू भाषा, बंजारा समाज बोलतो ती राजस्थानी भाषा, गुजराती भाषा, उत्तम हिंदी ते बोलतात. संस्कृत भाषा आणि महर्षी पाणिनी यांचे व्याकरण यावर पूजनीय श्री बाबांचे विशेष प्रभुत्व आहे. अनेक संताचे अभंग आणि षट्दर्शन, गीता, भागवत यातील दाखले ते सहज देतात. परंतु त्या दाखले देण्यात त्यांचा विद्वत्ता प्रदर्शित करण्याचा कधीच प्रयत्न नसतो. ते जनसामन्यांच्या बोली भाषेत शुद्ध अद्वैत सांगत असतात. उपस्थित श्रोते आणि पू. श्री बाबा एकाच पातळीवर असतात.ते श्रोत्यांच्या पातळीपर्यंत खाली झुकतात. रडणार्‍या बालकाला जशी माउली स्नेहभरल्या हृदयाने खाली वाकून आपल्या हृदयाशी लावते, तसेच हे आपसूक घडत जाते. त्यामुळे वक्ता-श्रोता असा द्वैतभाव न राहता श्री क्षेत्र आनंदगडावर एकत्वभाव, समरस भाव सर्वत्र भरून राहतो.
 
 
पूजनीय श्री बाबांच्या भक्तमंडळींमध्ये श्री तुळशीराम अण्णा आहेत. त्यांनी श्री बाबांच्या प्रेरणेने वडार (तेलगू) भाषेत अभंग रचलेले आहेत. त्यांना ते पाठ आहेत. ते त्या अभंगांचे मराठीत निरूपणही करतात. त्यांनी कुठलेही लौकिक शिक्षण घेतलेले नाही, हे इथे उल्लेखनीय होय. पूजनीय श्री बाबांच्या अलौकिक अशा पद्धतीने शुद्ध वेदान्त तत्त्वज्ञान सहज सोपे करून सामन्यातील सामान्य व्यक्तीच्या हृदयात प्रस्थापित करण्यामुळे हा चमत्कार घडू शकला आहे. असे अनेक श्री तुळशीराम अण्णा आपणास गडावर भेटू शकतात.
 
 
श्री क्षेत्र आनंदगडावर श्री आनंदेश्वरी माता मंदिर, श्री आनंदेश्वर महदेव मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री शबरी माता मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री खंडोबा मंदिर, श्री सेवालाल महाराज मंदिर, आद्य क्रांतिपिता गुरुवर्य लहुजी साळवे पुतळा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुतळा, श्री संत चोखामेळा पुतळा, वंदनीय मातोश्री विठाबाई गौ धाम, पूजनीय श्री बाबांचे निवासस्थान अशी स्थळे विकसित झाली आहेत. नजीकच्या काळात प्राचीन ऋषी मातंग यांचा भव्य पुतळा लवकरच प्रतिष्ठापित केला जाणार आहे.
 
 
भक्तजनांचा प्रवाह या गडावर अखंडपणे वाहत असतो. भक्तिमार्गाला कर्ममार्गाची जोड देऊन धर्म पुन:स्थापनेचा मार्ग म्हणजे वारकरी संप्रदाय. अनेक दिंड्या गडावर विसावा मुक्कामासाठी सातत्याने येत असतात. त्यांची सारी वास्तपुस्त माहेरी आलेल्या लेकीसारखी स्वत: पूजनीय श्री बाबा करीत असतात. भोजन-प्रसाद प्रत्येकालाच मिळतो. गडावरून कुणीही कधीही भोजन-प्रसादाशिवाय परत फिरत नाही. हा श्री आनंदेश्वरी मातेचा भोजन-प्रसाद साधाच डाळ, भात, भाजी, भाकरी, ठेचा, प्रसंगी पक्वान्न असा असला, तरी त्याची अमृततुल्य गोडी अविस्मरणीय अशीच आहे.
 
 
पूजनीय श्री भगवान महाराजांनी हा प्रवाह पुष्ट करण्याचा, समृद्ध करण्याचा उत्तम आदर्श प्रस्तुत केला आहे. हा कर्मयोगी भक्तिमार्ग पुष्ट होण्यासाठी पू. श्री बाबांच्या मार्गदर्शनात काही महत्त्वाचे उपक्रम होत आहेत. पू. श्री बाबांनी बारा गावांच्या एकादशी मंडळांचे संघटन घडवून आणून याचा प्रारंभ केला. जालना परिसरात बारा महादेव मंदिरांची स्थापना करण्यात आली. येथील एस.आर.पी. परिसरातील माळावरील श्री गणपती मंदिराची निर्मिती ही पूजनीय श्री बाबांच्या प्रेरणेने झाली आहे.
 
 
ह.भ.प. श्री भगवान महाराज भक्त मित्रमंडळाद्वारे ‘समता-ममता-समरसता मेळावा’ आयोजित करण्यात येतो. 17 सप्टेंबर 1996 रोजी असा मेळावा भरविण्यात आला होता. चराचरात परमेश्वरी अंश असेल तर जातीय उच्च-नीचता येतेच कशी? ती लवकरात लवकर नष्ट होऊन निर्दोष जातिभेदविरहित हिंदू समाज घडविण्याची प्रक्रिया गतिमान करण्याचा संकल्प या मेळाव्याच्या माध्यमातून भक्तजन पूजनीय श्री बाबांच्या प्रेरणेने करीत असतात. असे मेळावे ठिकठिकाणी आयोजित होत असतात.
 
 
‘ज्ञानामृत मिशन’ हे अन्य विविध सेवा कार्ये व विविध उपक्रम चालविण्यासाठी निर्मिलेले एक व्यासपीठ आहे. त्याचप्रमाणे, ‘संतानुग्रह’ हे मासिक, चैतन्य साधना शिबिर (अखंड मौन आणि आत्मचिंतनयुक्त ईश्वरसान्निध्य साधना), अखंड हरिनाम सप्ताह व या सप्ताहादरम्यान भव्य रोगनिदान शिबिर, महिला उद्योजिका प्रशिक्षण शिबिर आदी उपक्रमही आहेत.
 
 
रंगपंचमीस श्री क्षेत्र आनंदगड जालना येथे उर्दू मुशायरा आणि हिंदी कविसंमेलन आयोजित केले जाते. संतश्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज पुण्यतिथी दिनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराला पोहोचणारी समरसतेची वारी आनंदगडावरून प्रस्थान करून श्री क्षेत्र संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथांच्या समाधिस्थळी पौष वद्य एकादशीस पोहोचते. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वारी/दिंडी निघते. कार्तिक अमावास्येस जालन्यापासून निघून लोणी ता. जि. वाशीम येथे पोहोचणारी ह.भ.प. श्री सखाराम महाराज लोणीकर दिंडी आहे.
 
 
पंढरपूर येथे टेंभुर्णी रस्त्यावर चंद्रभागेतिरी 2013 साली श्री दत्तधाम मंदिराची स्थापना करण्यात आली. एक हजार लोक एकत्र बसून हरिभजन-कीर्तन करू शकतील अशी वास्तू इथे 20 गुंठे क्षेत्रावर साकार झाली आहे.
 
 
पूजनीय श्री बाबांचे जीवन म्हणजे मूर्तिमंत समरसता दर्शन आहे. आद्य क्रांतिपिता गुरुवर्य लहूजी साळवे यांचे जीवन म्हणजे प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि जाज्वल्य धर्मनिष्ठाच. मोठी धार्मिक आणि पराक्रमाची परंपरा लाभलेल्या मातंग समाजात त्यांचा जन्म झाला. जुलमी इंग्रजी सत्तेविरुद्ध दर्‍याखोर्‍यातील पराक्रमी जनसामन्याला उभे करण्याचे महान कार्य त्यांनी केले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सुधारणांमध्ये मोठे योगदान आद्य क्रांतिपिता गुरुवर्य लहूजी साळवे यांनी दिले. ते प्रखर धर्माभिमानी होते. आज मात्र मातंग समाज बंधुभगिनी आपल्या सनातन हिंदू धर्मरूपी कल्पवृक्षाची शीतल छाया सोडून असहिष्णू एकेश्वरवादी ख्रिश्चन मत स्वीकारीत आहेत. त्यांची मोठी दिशाभूल होते आहे. पूजनीय श्री बाबा प्रारंभापासून संभ्रमित समाजबांधवांच्या घरवापसीसाठी प्रोत्साहित करीत आहेत. आद्य क्रांतिपिता गुरुवर्य लहूजी साळवे यांच्या प्रेरक जीवनाने मातंग समाजाला एक प्रखर अस्मिता मिळाली. गडावर क्रांतिपिता गुरुवर्य लहूजी साळवे यांचे कायम स्मारक व्हावे, असे पूजनीय श्री बाबांच्या मनात येत होते. त्यांनी यासाठी खूप पाठपुरावा केला आणि श्री क्षेत्र आनंदगड येथे भव्य असा पुतळा स्थापित झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांताचे पूर्व प्रांतसंघचालक स्व. गंगाधर उपाख्य दादा पवार यांच्या आणि पूजनीय श्री बाबांच्या पावन उपस्थितीत या लहू तीर्थाचे लोकार्पण झाले. आता इथून पुढे श्री क्षेत्र आनंदगड हे समरसता तीर्थ म्हणून ओळखले जावे, ही जनमनातील भावना साकार झाली.
 
 
पूजनीय श्री बाबांच्या मातोश्री वंदनीय ताई यांनी श्री बाबांकडे मनातील एक खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “इतके सारे करतोस, पण आपल्या सार्‍यांची माता असलेल्या गोमातेसाठी मात्र काही करीत नाहीस.” सत्य संकल्पाचा दाता खरोखरीच श्री परमेश्वर असतो. पिंपळगावी श्री दत्तधामाजवळच गोमातेसाठी सुविधा निर्माण करण्यात आली. ज्या गायी कुणीही सांभाळणार नाही, अशा गायी तिथे आल्या. त्यांना वंदनीय ताईंचा प्रेमळ सहवास मिळणे प्रारंभ झाले. पूजनीय श्री बाबांनी तत्काळ वंदनीय मातोश्रींच्या आज्ञेचे पालन केले. वंदनीय ताईंच्या जीवनाच्या इतिश्रीनंतर ही गोशाळा आज श्री क्षेत्र आंनदगडावर, मातोश्री विठाबाई गौ धाम म्हणून विराजित झाली आहे. इथे आज गोधन आहे. येथील दुभत्या गाईंचे दूध काढले जात नाही. ते केवळ गाईच्या वासरासाठीच असते.
 
 
श्री क्षेत्र आनंदगड हे सर्व भक्तगणांचे आश्रयस्थान आहे. खरे तर हे आलेल्या प्रत्येकाचे माहेरच आहे. इथे येणारी प्रत्येक व्यक्ती भोजन-प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ शकत नाही. आलेल्या प्रत्येकाला जगज्जननी श्री आनंदेश्वरी मातेचे दर्शन, पूजनीय श्री बाबांचे आश्वासक दोन शब्द आणि पावन दर्शन झाले की सर्व शीणभाग क्षणात नष्ट होतो. येथील पवित्र वातावरणात मिळणारी ऊर्जा प्रत्येकाला नवसंजीवनी प्रदान करीत राहाते. गडावर समता-ममता-समरसतेचा अखंड वर्षाव होत असतो. पूजनीय श्री सर्वांना सहज उपलब्ध होतात. त्यांना कुणीही कधीही भेटू-बोलू शकतो. श्री बाबांची कृपादृष्टी समभावाने सर्वांवर होत असते.
 
 
श्री क्षेत्र आनंदगडाच्या विकासाची कोणतीही मध्यवर्ती योजना केली जात नाही. ज्याची गडावर श्रद्धा आहे, तो गडावरील मंदिरांच्या आणि इतर स्मारक स्थळांच्या निर्मितीचा संकल्प करतो. पूजनीय श्री बाबा त्यास आशीर्वाद देतात. सत्य संकल्पाचा दाता श्री परमेश्वर असतो, हे पूजनीय श्री बाबा यांचे प्रतिपादन असते. पूजनीय श्री बाबा म्हणतात, “हे सर्व या गावच्या (विश्वाच्या) श्री देवराव पाटलाच्या इच्छेवर आणि आशीर्वादावर होत असते. त्यानुसार सर्व काही होईल. इथे जे काही घडते, ते सहज घडत असते. त्यासाठी कुणीही कशाचाही आटापिटा करीत नाही. सारे काही आपसूक घडत जाते.” श्री क्षेत्र आनंदगड हे आनंदनिर्मितीचे प्रचंड मोठे भांडार आहे, याची अनुभूती येत राहते.
 
 
वारकरी संप्रदायाची भगवी पताका उंचावत असतानाच पूजनीय श्री बाबा कुठल्याही पंथाभिनिवेशात न अडकता भारत उद्भव वैदिक, शैव, शीख, बौद्ध, जैन, महानुभावी ज्ञानपरंपरा, संत रामदासी परंपरा या सार्‍याच विचारधारा पुष्ट झाल्या पाहिजेत, त्या सार्‍या अखिल मानवजातीचे कल्याण साधणार्‍या आहेत, त्या सार्‍या परस्परसंवादी असल्या पाहिजेत यासाठी पूजनीय श्री बाबा सतत प्रयत्नशील असतात. पूजनीय श्री बाबांच्या प्रेरणेने अनेक गावांत श्री दासबोध ग्रंथ पारायण सोहळे आयोजित होत आहेत. श्री समर्थ रामदास स्वामींनी निर्मिलेले हे अफाट ज्ञानभांडार पूजनीय श्री बाबांच्या ओघवत्या सहज आकलनीय रसाळ वाणीतून गावागावात जोमाने प्रसारित होत आहे. पंथीय गर्व आणि अभिनिवेश सर्वार्थाने त्याज्य आहे, हेच या आयोजनातून जनमानसात स्थापित होत आहे.
 
 
विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाचे सन्माननीय सदस्य म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले आहे. श्रीरामजन्मभूमी आंदोलनात प्रमुख मार्गदर्शक संत आणि प्रत्यक्ष कार्यकर्ता म्हणूनही पूजनीय श्री बाबा सक्रिय राहिले आहेत. आज श्री क्षेत्र अयोध्या येथे निर्माण होत असलेल्या भव्य श्रीराममंदिराचे निर्माणकार्य हे पूजनीय श्री बाबांच्या आणि सर्व संतसमाजाच्या अतुलनीय त्यागाचेच फलित आहे.
 
 
संत चोखामेळा यांची मूर्ती गडावर विराजमान झाली आहे. पूजनीय श्री बाबांच्या मनात त्यांचे शुद्ध चोख प्रतिपादन गडावर येणार्‍या प्रत्येकाने आकळावे असे आहे, म्हणूनच गडावर श्री संत चोखामेळा उपस्थित आहेत. संत श्री चोखामेळा यांनी आपल्या अमृततुल्य वाणीने दांभिकतेवरील कठोर प्रहार केला.
 
 
श्री क्षेत्र आनंदगड हा अखंड आनंदाचा स्रोत आहे. हे सांप्रतकाळी समाजाला नवसंजीवनी प्रदान करणारे ऊर्जाकेंद्र आहे. भक्तिभावयुक्त अष्टसात्त्विक भावाने भारित होऊन भेदभावविरहित, समता-समरसतायुक्त, नीतिमान, बलशाली समाजनिर्मिती हाच संतपरंपरेचा हेतू राहिला आहे. भगवद्भक्ती करायची, तीस अनुकूल कृतिरूप द्यायचे आणि ही विश्वकल्याणकारक भगवी हिंदू धर्मपताका सतत गगनात फडकावीत ठेवण्याचे कार्य पूजनीय श्री भगवान महाराज आनंदगडकर उपाख्य पूजनीय श्री बाबा करीत आहेत. त्यांच्या श्रीचरणी आषाढी एकादशीनिमित साष्टांग प्रणिपात.