दातृत्वाची लिटमस टेस्ट

विवेक मराठी    01-Aug-2022   
Total Views |
 सा. विवेकने प्रकाशित केलेल्या ‘परिसांचा संग’ या पुस्तक प्रकाशनाचे सहा कार्यक्रम महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी संपन्न झाले. वाचकांच्या अलोट प्रतिसादामुळे पहिली आवृत्ती संपली. या पुस्तकाला जोडून एक उपक्रम राबवण्यात आला, त्यालाही वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करणारा लेख इथे प्रकाशित करत आहोत.


RSS
आपल्या हिंदू धर्मात आणि जीवनपद्धतीमध्ये दान ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. आता कमावता झालास, काही दानधर्मसुद्धा करत जा असा उपदेश आजीने केला होता. दान या शब्दाला जोडून येणारा धर्म हा शब्द इथे कर्मकांड अशा अर्थाने येत नाही, तर वृत्ती म्हणजे आचरण किंवा व्यवहार अशा अर्थाने येतो. दान करणे, दान देणे म्हणजे आपला धर्म जगणे होय. हा आपला संस्कार आहे आणि तो बालवयापासूनच आपल्याला मिळत असतो. आपण केवळ घेणारे न होता देणारेही झाले पाहिजे, हा संस्कार विविध मार्गांनी आपल्यावर होत असतो. दान सत्पात्री करावे, दान करताना त्याचा गाजावाजा करू नये, आपण कोणावर तरी उपकार करत आहोत, हा भाव असू नये असे अनेक नीतिनियम दानाच्या बाबतीत सांगितले जातात. दयाभाव, कारुण्यभाव जागल्यामुळे केलेली मदत ही दान नसते, तर कोणतेही पूर्वग्रह न ठेवता, कोणतीही अपेक्षा न करता जे केले जाते, ते दान असते.


RSS
दान धार्मिक असते, तसे सामाजिकही असते. याची असंख्य उदाहरण आपल्या इतिहासात पाहायला मिळतात. तथागत गौतम बुद्धांनी आपल्या शिष्याला यज्ञाची संकल्पना सांगताना शेतकर्‍यांना बैल देण्याची सूचना केली होती. गोरगरीब लोकांना उत्तम अन्न, निवास, औषधे दिली जावीत, हाच यज्ञ आणि हेच दान आहे असे तथागत म्हणतात. आपल्या पूर्वजांमध्ये स्वप्नात केलेले दान जागृत अवस्थेत व्यवहारात आणणारा राजा हरिश्चंद्र आहे. थेट देवी अहिल्याबाई होळकर यांच्यापर्यंत तोच वारसा आलेला आपण पाहत आहोत. हा दानाचा संस्कार आणि वारसा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हस्तांतरित होत गेला, हे हिंदू समाजाचे वैशिष्ट्य आहे. काम व्यक्तिगत असो किंवा सामूहिक असो, आपण आपला वाटा दिला पाहिजे ही या समाजवैशिष्ट्याची चिरंजीव धारणा आहे आणि त्यामुळे प्राचीन काळापासून आपला समाज समर्थ, समृद्ध करण्यासाठी - म्हणजेच ‘कुणी ना राहो दुबळा येथे’ हा भाव प्रत्यक्षात आणण्यासाठी अविरत प्रयत्न केले गेले आहेत.
 
 
संघजीवनातही हाच धागा पाहण्यास मिळतो. आज देशभर संघस्वयंसेवकांनी चालवलेली लाखो सेवा कार्ये समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काम करत आहेत आणि या सेवा कार्यांच्या पाठीशी हजारो दाते आपली दातृत्वशक्ती घेऊन उभे आहेत. अगदी उदाहरण द्यायचे, तर यमगरवाडी प्रकल्पाचे देता येईल. येथे भटके विमुक्त समाजातील मुलामुलींना शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि मागील तीस वर्षांत त्याला यश लाभत आहे. या प्रकल्पात शिकलेले अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रांत नावलौकिक मिळवत आहेत. प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळात आर्थिक चणचण, सामाजिक अनास्था यांचा सामना करावा लागत होता. अशा वेळी सा. विवेकसारखे नियतकालिक या प्रकल्पाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. अंकातून प्रकल्पाच्या यशोगाथा सांगताना मदतीचे आवाहन केले जात असे आणि हिंदू सज्जनशक्ती त्याला भरपूर प्रतिसाद देत असे. रत्नागिरी जिल्ह्यातील पटवर्धन नावाचे एक गृहस्थ दरमहा पाचशे रुपयांची मनीऑर्डर पाठवत आणि एक सूचना करत - ‘या पैशाचे तेल घ्या आणि यमगरवाडीला पाठवा.’ एकदा त्यांच्याशी बोलण्याचा प्रसंग आला, तेव्हा मी त्यांच्या सूचनेमागची भूमिका विचारली.तेव्हा ते म्हणाले होते, “आपले शरीर सुदृढ व निरोगी व्हावे, म्हणून आपण मारुतीची उपासना करताना तेल वाहतो. आपला समाज सबळ, निर्दोष व्हायला हवा असेल, तर यमगरवाडी हा ‘समाजमारुती’ मानायला हवा.” किती भव्य कल्पना मांडली होती पटवर्धनांनी! असे असंख्य दाते यमगरवाडीच्या पाठीशी उभे राहिले. एका वर्षी ‘सा. विवेकच्या वर्गणीबरोबर यमगरवाडी प्रकल्पाला दरमहा एक रुपया द्या’ असे विवेकच्या वाचकांना आवाहन केले गेले आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला होता, हा इतिहास आपण जाणताच. सारा समाज यमगरवाडी प्रकल्पाच्या पाठीशी उभा राहिला आणि त्यातूनच सामाजिक परिवर्तनाची पदचिन्हे उमटत गेली. यमगरवाडीसारखाच दुसरा प्रकल्प म्हणजे ‘समरसता पुनरुस्थान गुरुकुलम्’. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड शहरात हा प्रकल्प चालू आहे. पारंपरिक ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची व शिक्षणाची जोड देऊन गिरीश प्रभुणे मागील पंधरा वर्षे येथे भारतीय संस्कृती, संस्कार आणि कलाकौशल्ये यांचे बीजारोपण करत नवी पिढी घडवत आहेत. या प्रकल्पासाठीही सामाजिक दातृत्वशक्ती सढळ हाताने मदत करत आहे. वरील दोन्ही प्रकल्पांना शासनमान्यता असली, तरी प्रकल्प म्हणून खूप मोठे खर्च असतात. त्यांची पूर्तता करण्यासाठी दातृत्वशक्तीचीच आराधना करावी लागते आणि त्या आराधनेला समाजदेवता प्रसन्न होत असते.

 
गिरीश प्रभुणे हे सिद्धहस्त लेखक आहेत. ‘पालावरचं जीणं’, ‘लोक आणि संस्कृती’ ही त्यांची गाजलेली पुस्तके सा. विवेकने प्रकाशित केली आहेत. नुकतेच ‘परिसांचा संग’ हे गिरीश प्रभुणे यांचे पुस्तक सा. विवेकने प्रकाशित केले आणि त्याची पहिली आवृत्तीही संपली. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने सा. विवेकने एक छोटा उपक्रम राबवला. साधारणपणे महाशिवरात्रीला हे पुस्तक प्रकाशित होईल अशी योजना करताना, पुस्तकाच्या मूळ किमतीपेक्षा पन्नास रुपये अधिक घेऊन जमणारा निधी प्रभुणेकाकांकडे दिला जाईल, असे मा. रमेश पतंगे यांनी सुचवले. वाचक मूळ किमतीपेक्षा अधिक पन्नास रुपये देतील का? असा प्रश्न त्या वेळी मनात उभा राहिला होता. पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? ज्यांना मूळ किमतीत पुस्तक हवे असेल, त्यांना पन्नास रुपयांसाठी जबरदस्ती करायची नाही. विवेकचे प्रतिनिधी, वाचक यांच्यासमोर हा विषय मांडला. त्याला कोणीही विरोध केला नाही, उलट विषय अधिक जोरकसपणे उचलला आणि बघता बघता अवघ्या चार महिन्यांत ‘परिसांच्या संग’ची पहिली आवृत्ती संपली. या विक्रीतून 37,100 रुपये इतकी रक्कम जमा झाली. एका अर्थाने समाजाच्या दातृत्वशक्तीची ही लिटमस टेस्ट होती. जो समाज एका साध्या कल्पनेला इतक्या मोठ्या प्रमाणावर उचलून धरतो, तो समाज काहीही करू शकतो याची प्रचिती या निमित्ताने आली.
 

RSS
24 जुलै रोजी समरसता गुरुकुलममध्ये जमा झालेला निधी सुपुर्द करण्याचा छोटेखानी कार्यक्रम झाला. गुरुकुलम्चे शिक्षक, कर्मचारी, हितचिंतक, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत, जमा झालेल्या निधीचा धनादेश रमेश पतंगेंनी गिरीश प्रभुणे यांच्या स्वाधीन केला. त्या वेळी भाषण करताना रमेश पतंगे म्हणाले, “समाजाची दातृत्वशक्ती खूप प्रचंड आहे. आज पन्नास रुपये देणारे वाचक उद्या लाखो रुपयांची मदत देतील. सा. विवेक अशा उपक्रमाच्या माध्यमातून जसे दातृत्वशक्तीला आवाहन करतो, तसाच आपला समाज बलशाली व्हावा हे संविधानाने पाहिलेले समतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकारही घेतो. हे गुरुकुल म्हणजे संविधानाने दिलेल्या अधिकाराची पूर्तता आहे. आपली संस्कृती, आपले ज्ञान, आपला वारसा, आपली परंपरा जपण्यासाठी असे प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावत असतात.”
 
 
एकूणच काय, तर सा. विवेकने सामाजिक जाणिवांना आवाहन करत हिंदू समाजाच्या दातृत्वाची लिटमस टेस्ट केली आणि त्यातून समोर आली हिंदू समाजाची मानसिकता, जी केवळ स्वत:चा विचार करत नाही. मी सुखी आहे, इतरांना सुखी करण्यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे, समाजगंगेत माझीही एक ओंजळ प्रवाहित झाली पाहिजे, हाच भाव या निमित्ताने समोर आला.

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001