भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समिती कार्यकारणी जाहीर
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. भाजपाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०१९ साली झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपाने अभूतपूर्व यश मिळवले होते. तसेच गोवा, बिहार येथे प्रभारी म्हणून काम करताना त्यांनी उत्तम रणनीती आखली होती. यामुळे भाजपाच्या अधिक जागा निवडून आल्या होत्या. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने याची दखल घेऊन भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये त्यांना स्थान दिले आहे. केंद्रीय निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी जे.पी. नड्डा, सचिवपदी बी.एल. संतोष आहेत, तर सदस्य म्हणून फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, बी.एस. येदियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के. लक्ष्मण, इक्बालसिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जेटिया, भूपेंद्र यादव, ओम माथुर, वनथी श्रीनिवास यांचा समावेश आहे. तसेच भाजपाच्या केंद्रीय संसदीय मंडळाची नियुक्तीही करण्यात आली. याच्या अध्यक्षपदी जे.पी. नड्डा, सचिवपदी बी.एल. संतोष आहेत, तर सदस्य म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, बी.एस. येदियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के. लक्ष्मण, इक्बालसिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जेटिया यांचा समावेश आहे.
भाजपाच्या एकूण रचनेमध्ये केंद्रीय संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समिती यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे यामध्ये निवड होणे महत्त्वाचे मानले जाते. केंद्रीय निवडणूक समितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करून पक्षाने त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे.