विकसित भारत, श्रेष्ठ भारत अमृतकालाचा महामंत्र

विवेक मराठी    17-Aug-2022
Total Views |
@ल.त्र्यं. जोशी  9699240648
  
पंधरा ऑगस्ट या देशाच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय पंतप्रधानांच्या लाल किल्ल्याच्या प्राचीवरून होणार्यास भाषणाला एक वेगळेच ऐतिहासिक महत्त्व आहे. ती केवळ औपचारिकता नसते. हा दिवस साजरा करण्याची पद्धत आता निश्चित झाली असली, तरी दर वर्षी समारंभपूर्वक पार पाडला जाणारा तो सोपस्कारही नसतो.

bjp

पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्राच्या नियतीशी झालेल्या कराराचा उल्लेख केला होता. दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’चा संकल्प जाहीर केला होता. इंदिराजींनी ‘गरिबी हटाव’चा उद्घोष केला होता. अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘जय जवान, जय किसान’ला ‘जय विज्ञान’ची जोड दिली होती. डॉ. मनमोहन सिंग यांनी कथित संमिश्र अर्थव्यवस्थेला टाटा करून जागतिकीकरणाचा मंत्र दिला होता. राजीव गांधींनी तंत्रज्ञानविकासाला प्राधान्य घोषित केले होते. अशा प्रकारे प्रत्येक पंतप्रधानाने आपापल्या काळातील परिस्थितीच्या संदर्भात स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला एकेक प्रेरक घोषवाक्य देण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदीही त्याला अपवाद नाहीत. मोदींचे वैशिष्ट्य असे की, त्यांना लागोपाठ मिळालेल्या नऊ संधींमध्ये त्यांनी प्रत्येक वर्षी त्या काळाला अनुसरून संदेश देण्याचा प्रयत्न केला. ‘सबका साथ, सबका विकास’पासून त्याची सुरुवात झाली आणि मग दर वर्षी त्याला विश्वास, प्रयास आदी शब्दांची जोड देण्याचा प्रयत्न झाला.
 
या वर्षाच्या भाषणामध्ये मात्र मोदींनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे भान ठेवून आगामी पंचवीस वर्षांसाठी देशाला ‘एक भारत, विकसित भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेभोवती फिरणार्या ‘पंचप्रणां’ची पंचसूत्री देऊन अमृतकालाचा महामंत्रच दिला आहे, असे म्हणावे लागेल. पंतप्रधानांची यापूर्वीची स्वातंत्र्यदिनाची भाषणे पाहिली, तर त्यांनी प्रत्येक वर्षी त्या त्या काळाला अनुसरून संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. पण या वर्षीच्या त्यांच्या भाषणाचा कॅनव्हास मात्र अतिशय व्यापक, किमान पंचवीस वर्षांच्या दूरदृष्टीचा होता. कदाचित त्यामुळेच राजकीय पक्ष व राजकीय निरीक्षक त्यांच्या भाषणाचा अधिक गांभीर्याने विचार करत आहेत, असे दिसते. हे पंतप्रधानांच्या श्रेष्ठ भारत या संकल्पनेसाठी पोषकच आहे, असे म्हणता येईल.


bjp
मोदींनी आपल्या भाषणातून भारतीयांना दिलेले पंचप्रण
१. विकसित भारत
२. गुलामीच्या प्रत्येक अंशापासून मुक्तता
३. आपल्या राष्ट्रीय वारशांचा अभिमान
४. एकता आणि एकजूट
५. नागरिकांची कर्तव्ये

तसाच विचार केला, तर या भाषणातही एक महत्त्वाचा राजकीय मुद्दा होताच. विशेषत: त्यांनी भ्रष्टाचार व घराणेशाही यावर चढविलेला प्रखर हल्ला वादग्रस्त ठरतो की काय, अशी शंका येत होती. खरे तर हा मुद्दा त्यांनी प्रथमच मांडला असे नाही. आपल्या पहिल्या पदग्रहणाच्या वेळीच त्यांनी ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ असा निर्धार व्यक्त करून भ्रष्टाचाराविरुद्धच्या मोहिमेचे सूतोवाच केले होते. त्यानुसार गेल्या आठ वर्षांत ठोस पावलेही उचलली होती. हल्ली ई.डी. किंवा सी.बी.आय. यासारख्या केंद्रीय तपास संस्थांकडून केल्या जाणार्या कारवाया त्याच ध्येयपूर्तीचा निर्धार सूचित करत आहेत. पण काँग्रेससहित सर्व विरोधी पक्ष सरकारवर सूडबुद्धीचा आरोप करून, घराणेशाहीचा आधार घेत आपली चामडी वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर तो मुद्दा वादग्रस्त ठरण्याची पूर्ण शक्यता होती. पण आजतरी विरोधी पक्षांसहित सर्व विचारकांनी वा बुद्धिवाद्यांनीही पंतप्रधानांच्या भाषणातील दीर्घकालीन आवाहनांची गांभीर्याने दखल घेतलेली दिसते व तेच या उद्बोधनाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. अर्थात आगामी वर्षात काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका व २०२४मध्ये लोकसभेची निवडणूक होणार असल्याने हा मुद्दा ऐरणीवर येणारच नाही, याची खात्री देता येत नाही. पण आजतरी विशेषत: देशहिताचाच प्राधान्याने विचार करणार्या समाजघटकांनी पंतप्रधानांच्या आवाहनाचा त्यांना अपेक्षित असलेला अर्थच लक्षात घेतलेला दिसतो. हे स्वस्थ समाजाचे सुचिन्हच समजावे लागेल.
 
केवळ पंधरा ऑगस्टचे लाल किल्ल्यावरील भाषणच नव्हे, तर या वर्षी साजरा करावयाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा पंतप्रधानांनी फार पूर्वीच अतिशय गंभीरपणे विचार केलेला दिसतो. सुमारे दीडशे कोटी लोकांना या महाआयोजनात सहभागी करून घेणे हे एक फार मोठे आव्हानच होते. त्या सर्वांना राष्ट्रभक्तीच्या एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न करणे, त्यात त्यांना सहभागी करून घेणे व त्यात उत्स्फूर्तता भरणे ते तर त्यापेक्षाही मोठे आव्हान होते. पण असे आव्हान समोर असले की पंतप्रधानांमधील चैतन्याचा गाभारा उचंबळून येतो व ते अशक्य वाटणारी कामे लीलया पार पाडतात. या संदर्भातही त्यापेक्षा वेगळे घडलेले नाही. या महोत्सवातील एकेका आयोजनाचा बारकाईने विचार केला, तर आपल्या हातात ते महान सूत्र येऊ शकेल.


bjp
 
साधी गोष्ट ‘घर घर तिरंगा’ मोहिमेची. विषय म्हटले तर अतिशय साधा व सोपा. राष्ट्रध्वज विकत घेणे, एका काठीवर तो लावून आपल्या घरावर उभारणे हे काही खूप कष्टाचे काम नाही. पण कोट्यवधी लोकांकडून ते विशिष्ट काळात प्रत्यक्षात घडवून आणणे हे अतिशय महाकठीण. पण ते त्यांनी या निमित्ताने करून दाखविले. पण प्रश्न फक्त ‘घर घर तिरंगा’चाच नाही. या महाआयोजनातील एकेक संकल्पना विशिष्ट उद्देश नजरेसमोर ठेवूनच आखण्यात आली होती. अन्यथा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतानाच त्यांनी विभाजनाच्या विभीषिकांचे लोकांना स्मरण करून देण्याचे भान ठेवले नसते. मोदींच्या विरोधकांचा नेहमी आरोप असतो की, ते प्रत्येक विषयाचा इव्हेंट बनवितात. कदाचित या आयोजनाला तसे दूषण देण्याचा मोह त्यांनी आवरला असेल, पण हे आयोजन कथित इव्हेंटच्या किती तरी प्रचंड प्रमाणात पुढे होते. त्यातील प्रत्येक संकल्पना एकराष्ट्रीयत्वाचा, आत्मनिर्भर नवभारताच्या निर्मितीचा, त्यासाठी सामूहिक पुरुषार्थ प्रकट करण्याच्या निर्धाराचा संदेश देणारीच होती. पंधरा ऑगस्टचे पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरील भाषण हा त्या आयोजनाचा कळसाध्याय होता, असे नमूद करावे लागेल.

खरे तर पंतप्रधानांनी या भाषणातून मांडलेला एकेक मुद्दा हा एकेका स्वतंत्र लेखाचाच विषय ठरू शकतो. असे म्हणतात की, कोणताही राजकारणी सामान्यत: पुढील निवडणुकीपर्यंतचाच विचार करत असतो, पण राष्ट्रनिर्माते मुत्सद्दी त्यापेक्षा कितीतरी पुढचा विचार करत असतात. वास्तविक मोदीजीही राजकारणीच आहेत. आपण किती यशस्वी राजकारण करू शकतो, हे त्यांनी लागोपाठ तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषवून आणि लागोपाठ दोन वेळा भारताच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारून सिद्धही केले आहे. पण त्यांचे नेतृत्व आणि कर्तृत्व राजकारणासारख्या सीमित क्षेत्रात बंदिस्त करता येऊ शकत नाही, हे त्यांनी या भाषणातून सिद्ध केले आहे. स्वतंत्र भारताच्या शताब्दीपूर्तीपर्यंतचा आगामी पंचवीस वर्षांचा कॅनव्हास त्यांनी भारतीयांसमोर ठेवला आहे. त्यावर कोणते चित्र रेखाटायचे आहे, त्यासाठी कुणाकुणाला, काय काय करावे लागेल हेही अतिशय स्पष्ट आणि नेमक्या शब्दात अतिशय तळमळीने मांडले आहे. त्यामुळे भाषण ऐकणारी प्रत्येक व्यक्ती राष्ट्रभक्तीने उद्दीपित झाली असेल, तर ते अतिशय स्वाभाविक म्हणावे लागेल. मोदींच्या द्रष्टेपणाचे दर्शन घडविणारे भाषण म्हणून त्याचा उल्लेख केला, तर त्यात कुठलीही अतिशयोक्ती होणार नाही. भाषणाच्या प्रारंभापासून शेवटापर्यंत श्रोत्याच्या मनावर केवळ हाच संदेश प्रतिबिंबित होतो.
 
आपल्या भाषणातून त्यांनी उल्लेखिलेले ‘पंचप्रण’ हा तर त्यांच्या भाषणाचा पंचप्राणच ठरतो. आगामी पंचवीस वर्षांत एक भारत, नवभारत व श्रेष्ठ भारताचा संकल्प जर आपल्याला पूर्ण करायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला काही निर्धार करावे लागतील. त्यांना पर्यायच नाही, असे नमूद करून त्यांनी हे ‘पंचप्रण’ राष्ट्रासमोर मांडले. त्यातील पहिला प्रण आहे भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा. जगात आज हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच विकसित देश आहेत. भारताने सातत्याने विकासाचा ध्यास घेतला असला, तरीही अजूनही आपण विकसनशील देशांच्या यादीतच आहोत. आता आपल्याला तेवढ्यावरच समाधान मानता येणार नाही. ‘फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी’ या उल्लेखापर्यंत विसावता येणार नाही. आपल्याला विकसित राष्ट्र म्हणूनच जगासमोर यावे लागेल व त्यासाठीच आगामी पंचवीस वर्षांचे नियोजन करावे लागेल, हे त्यांनी निक्षून सांगितले व त्यासाठी पाळावयाची पथ्येही पाठोपाठ विशद केली. त्यातीलच पहिले व महत्त्वाचे सूत्र आहे गुलामी विसरण्याचे. आपण गुलाम होतो ही पराभूत मानसिकता जोपर्यंत आपल्यातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत आपण विकसित भारताचे स्वप्नदेखील पाहू शकणार नाही, हे हेरूनच त्यांनी गुलामीची पराभूत भावना काढून फेकण्याचे आवाहन केले.

विकसित भारतासाठी उत्साहवर्धक शिदोरी म्हणून आपल्या रोमहर्षक वारशाचे स्मरण करून देण्यासही मोदी विसरले नाही. रम्य काळ त्यांचाच असतो, ज्यांचे पूर्वदिव्य तेजस्वी असते, असे म्हटले जाते. पंतप्रधानांनीही तेच अधोरेखित केले आहे. आपण अतिशय भाग्यवान आहोत की, संपूर्ण विश्वाला कवेत घेण्याचे सामर्थ्य असलेला वारसा आपल्याला लाभला आहे. त्याच्या अभिमानाबरोबरच आपली पुढची आव्हानात्मक वाटचाल सुकर होऊ शकते, हा आत्मविश्वास मनामनात भरण्याचा प्रयत्न त्यांनी या तिसर्यात प्रणातून केला आहे. सर्व प्रकारच्या कृत्रिम भेदाभेदांना बाजूला सारून केवळ आणि केवळ आपल्या एकत्वाचा साक्षात्कार घडविणे आणि त्यासाठी क्षणोक्षणी आपल्या कर्तव्याचे भान ठेवणे किती आवश्यक आहे, हेही त्यांनी या पंचप्रणातूनच दिग्दर्शित केले आहे. या पंचप्रणांना नजरेसमोर आणण्याचा निर्धार केला, तर विकसित भारताची स्वप्नपूर्ती आपल्या आवाक्यात आल्याशिवाय राहू शकत नाही, असा प्रचंड आत्मविश्वास त्यातून स्वाभाविकपणेच निर्माण होतो.
 
 
 
पंतप्रधानांच्या भाषणातील सर्वात महत्त्वाचा दुसरा मुद्दा.. किंबहुना त्यांच्या भाषणातील सौंदर्यबिंदू म्हणून ज्याचा उल्लेख करता येईल, तो म्हणजे महिला सक्षमीकरणाकडे त्यांनी वेधलेले लक्ष. सामान्यत: आपल्या समाजात महिलांना गृहीत धरण्याचीच वृत्ती आढळून येते. पण काळाच्या ओघात महिलांनी जवळपास प्रत्येक क्षेत्रात सिद्ध केलेला आपल्या कर्तृत्वाचा ठसा मात्र दुर्लक्षिला जातो, याकडे त्यांनी आवर्जून लक्ष वेधले. समाजातील महिलांची पन्नास टक्के संख्या लक्षात घेतली, तर आपण राष्ट्रीय व सामाजिक ऊर्जेची किती प्रचंड प्रमाणात उपेक्षा करतो, हे निदर्शनास आणून देण्याचा त्यांनी परोपरीने प्रयत्न केला. याचाच अर्थ असा की, भ्रष्टाचार व घराणेशाही यासारख्या राजकीय समजल्या जाणार्या मुद्द्यांव्यतिरिक्त पंतप्रधानांनी राष्ट्राच्या पंचवीस वर्षांच्या दूरगामी विकासाची नीलपत्रिकाच (ब्ल्यू प्रिंट) देशासमोर मांडण्याचा प्रयत्न आपल्या भाषणातून केला आहे. त्याचे मर्म जर आपण लक्षात घेणार नसू आणि आपल्या तात्कालीक व्यक्तिगत वा पक्षगत स्वार्थात अडकून राहणार असू, तर आपल्यासारखे करंटे आपणच ठरू. एक प्रकारे पंतप्रधान मोदी यांनी या भाषणाच्या निमित्ताने एकशेतीस कोटी भारतीयांना आगामी पंचवीस वर्षांत सामूहिक पुरुषार्थाचे आव्हान परिश्रमपूर्वक पेलण्याचे आवाहनच केले आहे. राष्ट्रोत्थान हवे असेल, तर त्यांनी आपल्यासाठी दुसरा पर्यायच ठेवलेला नाही.