सरसंघचालकांच्या भेटीला मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री

विवेक मराठी    02-Aug-2022
Total Views |

RSS

मुंबई :
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. १ ऑगस्ट) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची दादर येथील पितृछाया या संघ कार्यालयात भेट घेतली. शपथविधीनंतर पहिल्यांदाच झालेली ही भेट होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शाल देऊन त्यांचे स्वागत केले. तर सरसंघचालकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना रा.स्व.संघावरचे पुस्तक भेट देऊन फडणवीस-शिंदे सरकारच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या.
 
"सरसंघचालक हे आमच्यासाठी कायम आदरणीय आहेत. आमच्यात झालेली ही सदिच्छा भेट होती. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत हिंदुत्वाच्या नात्याने जोडल्या गेलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच्या अनेक जुन्या आठवणींना उजळा सरसंघचालकांनी यावेळी दिला.", असे एकनाथ शिंदे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
 
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालकांच्या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. या भेटीबाबत फडणवीस म्हणाले की, “100 टक्के हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झालीच. याचबरोबर सरसंघचालकांनी एवढेच सांगितले की, सचोटीने काम करा. एकमेकांना सोबत घेऊन काम करा. हिंदुत्व हा तर आमचा अजेंडा आहेच. मुख्यमंत्र्यांना सरसंघचालकांची भेट घ्यायची होती. त्यानुसार सरसंघचालक आज मुंबईत होते, तर आम्ही वेळ घेतली, त्यांची भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले. यावेळी इतरही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली,” अशी माहिती फडणवीसांनी दिली.
 
 
-- mahamtb