हापूस बागांवर हवामान बदलाचा परिणाम

विवेक मराठी    02-Aug-2022
Total Views |
@हृषिकेश गद्रे । 8830722947
 
मागील काही वर्षांत प्रत्येक कलमामागील आंबा उत्पादनामध्ये लक्षणीय घट दिसून आली. 10 वर्षांपूर्वी प्रत्येक कलमामागे साधारण 3 ते 4 पेट्या उत्पादन होत असे, ते आता कमी होऊन 1.5 पेटीवर आले आहे. त्यामागे विविध कारणे आहेत, त्यातील प्रमुख कारण म्हणजे हवामानातील बदल. या विषयावर विशेष संशोधन करून लिहिलेला अभ्यासपूर्ण लेख.

krushi
 
हापूस, केशर, पायरी आंबा, नारळ-पोफळीच्या बागा, जोडीला फणस व काजू, विस्तीर्ण सागरी किनारा अशी दैवी देणगी लाभलेला कोकण प्रदेश. वरुणदेवतेने डोक्यावर हात ठेवल्यासारखी होणारी अमाप पर्जन्यवृष्टी, इतर प्रदेशातील लोकांना हेवा वाटण्यासारखे वातावरण व निसर्गसंपत्ती, शहराच्या मानाने कमी असलेले औद्योगिकीकरण व अनियोजित बांधकामे याचा विचार करता कोकणात हवामान बदलाचा परिणाम झाला नसल्याचा गैरसमज होणे साहजिक आहे. पण वसुधैव कुटुंबकम ही उक्ती निसर्गालाही लागू होते. संपूर्ण जग हे एक व जोडलेले आहे, कोणत्याही प्रदेशातला हवामान बदल हा फक्त त्या प्रदेशातील कारणांवर अवलंबून नसतो. जागतिकीकरणाचे नियम पर्यावरणाच्या बाबतीत तेवढेच खरे ठरतात - अमेरिकेतील प्रदूषणाचा परिणाम आशिया खंडातल्या वातावरणावर होतो, अर्जेंटिनाच्या सागरी किनार्‍यावर होणार्‍या जलप्रदूषणाचा परिणाम ऑस्ट्रेलियातील जलसृष्टीवर होतो, त्याप्रमाणे हवामान बदलाच्या परिणामातून जगातील कोणताही प्रदेश सुटलेला नाही, अर्थातच कोकणही अपवाद नाही.


 
ज्यासाठी कोकण प्रसिद्ध आहे, असा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे हापूस आंबा. आंबा, काजू व त्या संबंधातील जोड उत्पादनांवर कोकणातील बहुतांश बागायतदारांचे उत्पन्न अवलंबून असते. म्हणजेच निसर्गावर अवलंबून असते. महाराष्ट्राचे 4.85 लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून त्यापासून 12.12 लाख मे. टन उत्पादन मिळते.


krushi
 
फुलकिडीचा वाढता प्रादुर्भाव

मागील काही वर्षांत प्रत्येक कलमामागील आंबा उत्पादनामध्ये लक्षणीय घट दिसून आली. 10 वर्षांपूर्वी प्रत्येक कलमामागे साधारण 3 ते 4 पेट्या उत्पादन होत असे, ते आता कमी होऊन 1.5 पेटीवर आले आहे. त्यामागे विविध कारणे आहेत, त्यातील प्रमुख कारण म्हणजे हवामानातील बदल. हापूस आंबा हे अतिशय नाजूक फळ आहे, काही दिवसांचा हवामानातील बदलही त्यावर परिणाम करण्यास पुरेसा असतो.
 
 
कलमांना वेळेवर मोहोर येणे हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. बागायतदारांच्या सांगण्याप्रमाणे साधारण नोव्हेंबरमध्ये मोहोर येऊन फेब्रुवारी/मार्चमध्ये आंबा झाडावरून काढायला सुरुवात होते व बाजारात येऊ लागतो. पण पावसाळा लांबला की थंडी पडण्यासही उशीर होतो. मोहोर येण्यासाठी आवश्यक असा थंडी पडून येणारा जमिनीचा ताण कलमाला मिळत नाही. मोहोराच्या जागी पालवी मोहोर किंवा पालवी येण्याचे प्रमाण मागील काही वर्षांत वाढले आहे. नोव्हेंबरमध्ये मोहोर यायच्याऐवजी फेब्रुवारीमध्ये मोहोर येऊन आंबा उत्पादन उशिरा - म्हणजे मेमध्ये किंवा जूनमध्ये यायला लागलेय. साहजिकच या काळात आवक वाढलेली असल्यामुळे दर कमी मिळून शेतकर्‍याचे उत्पन्न कमी होते. या वर्षी 2-3-4 डिसेंबर या दिवसांत पाऊस पडला, मोहोर उशिरा आला व बाजारात 20 एप्रिलपर्यंत अल्प प्रमाणात आवक झाली. अचानक 20 एप्रिलनंतर आवक वाढून दर कमी झाले.
 

krushi
 
आलेल्या मोहोराचे संरक्षण करणे हे उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. योग्य संरक्षण केले नाही, तर विविध प्रकारच्या कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोहोरगळ व फळगळ होण्याची शक्यता असते. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण या कारणांमुळे रोगांना पोषक वातावरण तयार होण्याचे प्रमाण वाढले आहे, दुय्यम किडींच्या उद्रेकामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. यापासून बचाव करण्याकरता औषध फवारण्यांची वारंवारिता वाढवावी लागत आहे. दर महिन्याला करावी लागणारी फवारणी आता दर पंधरा दिवसांनी किंवा कधी आठवड्यानेही करावी लागत आहे. यामुळे बागायतदारांचा खर्च तर वाढलाच आहे, त्यापेक्षा त्रासदायक गोष्ट म्हणजे या किडी आता औषध फवारणीनेसुद्धा कमी होत नसल्याचे दिसून आले आहे. यामागे अतिऔषध फवारण्यांना त्या सरावल्याचे कारण आहे.

 
2000 साली कॉन्फिडॉर हे कीटकनाशक प्रति 200 लीटरला 50 मि.ली. या प्रमाणात फवारले जायचे आणि 1 महिन्यापर्यंत त्याचा प्रभाव राहायचा. आता 20-22 वर्षांनी 200 लीटरला 200 मि.ली. एवढ्या प्रमाणात हे कीटकनाशक फवारूनसुद्धा 8 दिवसांत कीटकांचा प्रादुर्भाव परत होतो. एवढा औषधांचा प्रतिकार वाढल्याचे दिसून येत आहे.


krushi
 
फळमाश्यांसाठी लावलेले सापळे
 
फुलकिडीचा (thripsचा) प्रादुर्भाव 2008पर्यंत अतिशय अल्प प्रमाणात होता. नंतर तो वाढू लागला. 2020पर्यंत तो औषधाने आटोक्यात येत असे. या वर्षी 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान फुलकिडीचा प्रचंड उद्रेक झाला व औषधांनीसुद्धा आटोक्यात आला नाही. या उद्रेकामागे हवामानातील बदल हेच प्रमुख कारण आहे. हवामानात सुधारणा झाल्यावर तो आटोक्यात आल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. पण फुलकिड्यामुळे या वर्षी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
फुलकिडी (thrips)बरोबरच फळमाशीनेसुद्धा (fruitflyनेसुद्धा) आंबा फळावर मोठ्या प्रमाणात परिणाम केल्याचे या वर्षी दिसून आले. 24 एप्रिलला अवकाळी पाऊस पडल्यामुळे फळमाशीसाठी पोषक वातावरण तयार झाले. या प्रकारच्या उद्रेकामध्ये जमिनीमध्ये कोषावस्थेत असणार्‍या अळ्यांचे पतंगामध्ये रूपांतर होऊन प्रचंड संख्येने या माश्यांची पैदास होते. पिकत असलेल्या फळांमध्ये डंख मारून माद्या अंडी घालतात व 2 आठवड्यांपर्यंत घालतच राहतात. काही दिवसांनी अळ्या बाहेर येऊन आंब्याचा गराला खाताना छिद्रे करतात. या प्रादुर्भावाची लक्षणे फळाची काढणी झाल्यानंतरच दिसतात. कोषावस्थेत जाण्यासाठी अळ्या जमिनीवर पडतात, जर वातावरण पूरक मिळाले तर 9-12 दिवसांत या कोषातून माश्या बाहेर पडतात.


 
यावर नियंत्रण म्हणून बागायतदार सापळे लावतात, सापळ्यांमध्ये आमिष लावून माश्यांना आकर्षित केले जाते व कीटकनाशकाद्वारे नियंत्रित केले जाते. पण या सापळ्यांनी फक्त 10-20%च नियंत्रण केले जाऊ शकते, असे बागायतदारांचे म्हणणे आहे. आणि असे सापळे त्या भागामध्ये असणार्‍या सर्व बागांमध्ये लावणे गरजेचे आहे, अथवा ज्या बागेत सापळे आहेत, तिथे आजूबाजूच्या बागांमधून माश्या आकर्षित होऊन सापळा लावलेल्या बागेमध्ये प्रादुर्भाव आणखी वाढतो. फळमाश्यांनी खराब केलेली फळे वेगळी काढण्यासाठी जास्तीचे मनुष्यबळ लागून आणखी खर्च वाढतो. एवढे करून काही खराब फळे नजरचुकीने तशीच राहून पाठवली जातात व खरेदीदारांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.
 
भर हंगामामध्ये पाऊस पडल्यामुळे बुरशीमुळे आंबा खराब होत असल्याचे दिसून येत आहे. एखाद दिवस कमी प्रमाणात पाऊस पडून कडाक्याचे ऊन पडले, तर बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही. परंतु या वर्षी 16 मे ते 20 मेपर्यंत सलग पाऊस पडला. 21 मेनंतर काढलेल्या फळांपैकी 80 फळे खराब झाल्यामुळे टाकून द्यावी लागली आहेत.


 
जसा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो, त्याप्रमाणे तापमान वाढीचा कलमांवर परिणाम होतो. साधारणत: मे महिन्याच्या शेवटी झाडांची पानगळ सुरू होते व जूनमध्ये पाऊस पडल्यावर नवीन पालवी फुटते. त्या वेळी योग्य खते वापरून झाडाला पोषक घटक दिले जातात. सध्या तापमान वाढीमुळे एप्रिलमध्येच पानगळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे. एप्रिलमध्ये पानगळ झाल्यानंतर काही दिवसांत झाडाला पाणी मिळणे आवश्यक आहे, ते न मिळाल्यामुळे नवीन पालवी फुटत नाही.


krushi
 
बदलत्या ऋतुचक्रामुळे अशा विविध प्रकारच्या समस्यांना बागायतदारांना तोंड द्यावे लागत आहे. आंबा उत्पादन दिवसेंदिवस कमी होऊनसुद्धा मजूर, खते, कीटकनाशके, वाहतूक या सर्वांचा खर्च मात्र दर वर्षी वाढत आहे. यामध्ये नफ्याचे गणित जुळवण्यासाठी चढ्या भावाने विक्री करावी लागत आहे. पण या चढ्या विक्रीचा फायदा बागायतदारांना होतोच असे नाही. स्वत: शहरात विक्री करणारे बागायतदार सोडले, तर बाकीच्यांना बाजारामध्ये आंबे पाठवण्यावाचून गत्यंतर नसते, या प्रकारात विक्री करणार्‍यांची साखळी वाढल्यामुळे नफ्यातील खूप छोटा हिस्सा छोट्या बागायतदारांपर्यंत पोहोचतो, अथवा नुकसानही सोसावे लागते.
निसर्गामुळे नुकसान झाले असेल व बागायतदारांनी पीककर्ज घेऊन त्यावर पीकविमा काढला असेल, तर पीकविमा कंपन्या त्या त्या भागातल्या सर्वेक्षणाप्रमाणे नुकसानभरपाई बँक खात्यामध्ये जमा करतात. ही रक्कम जरी होणारे नुकसान पूर्णपणे भरून काढणारी नसली, तरी काही प्रमाणात शेतकर्‍यांना दिलासा मिळतो. ही नुकसानभरपाई त्या त्या भागातल्या विमा कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणावर अवलंबून असते. ठरवून दिलेले निकष जर सर्वेक्षणामध्ये आढळून आले, तरच त्या भागातील बागायतदार यासाठी पात्र ठरतात. यातील निकष बदलण्याची गरज आहे, असे शेतकर्‍यांचे मत आहे - उदा., 1 मेनंतर पाऊस पडला तर भरपाई मिळत नाही, मे महिना हा आंबा हंगामाचा मध्य असल्यामुळे हा निकष 1 जून केला पाहिजे. किंवा 2 दिवस सतत तापमान वाढले किंवा सतत पाऊस असा निकष आहे, यातील ‘सतत’ हा शब्द काढावा, अशी बागायतदारांची मागणी आहे.
 
 
अशा बदलत्या समीकरणामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा काय बदल केले पाहिजेत यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यांतील प्रयोगशील बागायतदार एकत्र येऊन एकमेकांचे अनुभव सांगून त्याद्वारे सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून माहिती एकमेकांपर्यंत पोहोचवत आहेत. बैठका घेत आहेत.
 
 
बागायतदारांना कृषी विद्यापीठाचे साहाय्यही मिळत आहे. कृषी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर farmers cornerशी असा विभाग आहे, त्यावर मागील आठवड्याचे हवामान (तापमान, पावसाचा अंदाज, आर्द्रता इत्यादी), पुढील आठवड्याचा हवामानाचा अंदाज दर आठवड्याला उपलब्ध करून देत आहेत, एवढेच नाही, तर पुढील आठवड्यातील हवामान अंदाजावरून फळाची कोणती काळजी घ्यावी, कोणत्या औषधाच्या फवारण्या कराव्या याबद्दल तपशीलवार माहितीसुद्धा दिली जाते. शेतकर्‍यांनी जर या माहितीचा उपयोग करून घेतला, तर होणारे नुकसान टाळता येऊ शकते.परंतु सर्वसामान्य शेतकर्‍यांना याबद्दल माहीत नाही किंवा ती माहिती घेण्याचे माध्यम त्यांच्याकडे उपलब्ध नाही.
 
 
एकंदरच या विविध समस्यांची वरवर दिसणारी कारणे वेगवेगळी असली, तरी हवामानातील होत चाललेला बदल हे यामागे मुख्य कारण आहे. हा बदल थांबवणे हे काही फक्त त्या शेतकर्‍यांच्या हातात नाही. जगातल्या सर्वच देशांमध्ये वाढत चाललेले कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण, वाढते औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या, हवा-पाणी-वायुप्रदूषण, शहरीकरण, बेकायदेशीर बांधकामे अशी असंख्य कारणे या हवामान बदलामागे आहेत. तो एका वेगळ्या लेखाचा विषय आहे. तर याचा परिणाम पिकांवर होऊन शेतकर्‍यांचे नुकसान तर होत आहेच आणि कमी प्रतीची उत्पादने आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. यावर काही ठोस रामबाण उपाय नसला, तरी शेतकर्‍यांनी सजग राहून, संघटित होऊन, उपलब्ध माहितीचा उपयोग करून स्वत:चे नुकसान कमी करून फळांची गुणवत्ता राखण्याकडे भर दिला पाहिजे.