‘कालजयी सावरकर’ लघुपट राजभवनात प्रदर्शित

02 Aug 2022 15:37:20

RSS
 

मुंबई : 'तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण,' ही उक्ती स्वतः राष्ट्रासाठी जगणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर आधारित ‘कालजयी सावरकर’ या लघुपटाचे प्रदर्शन सोमवार, दि. १ ऑगस्ट रोजी राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. ‘कालजयी सावरकर’चा संस्मरणीय अनुभव घेण्यासाठी यावेळी राजभवनात ‘भारतीय विचार दर्शन’चे अध्यक्ष सुश्रुत चितळे, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, संपादक किरण शेलार, बिझनेस हेड रविराज बावडेकर तसेच आ. प्रवीण दरेकर, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार मनोज जोशी, तेजस बर्वे, सौरभ गोखले, समीरा गुजर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखी जी व्यक्तिमत्त्व आपल्या राष्ट्रात होऊन गेली, त्यांचे आयुष्य फक्त चरित्र म्हणून ओळखले जाऊ नयेत, तर खर्या् अर्थाने त्यांच्या ‘कालजयी’ विचारांचा पुरस्कार व्हावा आणि त्यांचे चरित्रपट हे विचारपट म्हणून स्वीकारावेत म्हणून ‘कालजयी सावरकर’ हा लघुपट निर्माण करण्यात आला आहे. ‘विवेक समूह’ गेली अनेक वर्षे विविध कार्यक्रम आयोजित करत आहे. त्यात अतिशय तेजस्वी आणि अभिमानस्पद पाऊल म्हणजे, ‘दुर्दम्य लोकमान्य’ हे प्रथम पुष्प आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील ‘कालजयी सावरकर’ हे द्वितीय पुष्प.
 
 
‘कालजयी सावरकर’ विचारपट प्रदर्शनाचे आयोजन राजभवनात करण्यात आले. लघुपटानंतर अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ‘खाद्यतेल व्यापारी असोसिएशन’चे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर म्हणाले की, “हा लघुपट भारताला नवी दिशा, नवे विचार देणारा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे विचार आजच्या काळात आचरणात आणणे अतिशय महत्त्वाचे आहेत.”


vivek
 
“काळाच्या पुढे नेणारे हे विचार आहेत, या चित्रपटाच्या लेखकांशी मी जेव्हा संवाद साधला, तेव्हा लेखक म्हणाले, जेवढ्या वेळा लिहीत गेलो तेवढ्या वेळेस आम्हाला सावरकर नव्याने उलगडत गेले. सावरकर हे असे व्यक्तिमत्त्व आहे जे सहज समजणे शक्य नाही. तरुण मुलांमध्ये हा लघुपट रुजायला हवा, त्याचा प्रचार प्रसार व्हायला हवा,” असे रवींद्र नेने, ‘योगीराज पॉवरटेक’चे एमडी म्हणाले. एक प्रेक्षक म्हणाले की, “सावरकरांवर आधारित हा लघुपट इतक्या मान्यवरांबरोबर पाहणे हा अविस्मरणीय अनुभव होता. भारतीयांसाठी आणि विशेषतः तरुणांसाठी हा अतिशय प्रेरणदायी लघुपट आहे. त्यामुळे दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ’विवेक समूहा’चे कौतुक करावे तेवढे कमी आहे.”
 
 
भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मयुरेश जोशी म्हणाले की, “महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त शाळांमध्ये हा लघुपट दाखवला जावा, यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि अशा पद्धतीने तरुण पिढीमध्ये सावरकर हे मैलाचा दगड म्हणून त्यांचे विचार कसे रुजवता येतील, याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू.” अभिनेते प्रमोद पवार म्हणाले की, “समुद्रातून एक एक मोती वेचून काढावा, तसे सावरकरांचे विचार आहेत. आणि या माध्यमातून त्यांच्यातले पैलू उलगडणे, नक्कीच आव्हानात्मक आहे. स्वतः ते महासागर आहेत, त्यामुळे त्यांचे कालजयी विचार तरुणांपर्यंत वेचून या लघुपटामधून मांडलेले आहेत.”
 
- www.mahamtb
Powered By Sangraha 9.0