पश्चिमद्वार देवता - गणपतीपुळ्याचा लंबोदर

विवेक मराठी    26-Aug-2022
Total Views |
देशाच्या अष्टदिशांचे रक्षण करणार्‍या अष्टविनायकांपैकी एक म्हणजे गणपतीपुळ्याचा लंबोदर. समुद्रकिनार्‍यालगत असलेल्या हिरव्यागार वनराईत या स्वयंभू गणेशाचे स्थान आहे. गणपतीपुळे पंचक्रोशीत घरोघरी गणपती आणण्याची प्रथा नाही. सर्वांनी एकत्र येऊन स्वयंभू गणेशाची पूजाअर्जा व उत्सव साजरा केला जातो.
 
ganpati bappa
 
बईपासून सुमारे 350 किलोमीटरवर असलेले, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थान पेशवेकालीन अतिप्राचीन आहे. मुद्गल पुराणादी प्राचीन वाङ्मयात ‘पश्चिमद्वार देवता’ या नावाने या सिद्धिविनायकाच्या स्थानाचा इतिहास आहे.
कोकणातील प्रत्येक देवस्थानाविषयी आणि देवतांविषयी वेगवेगळ्या दंतकथा आहेत.
 
 
हिंदुस्थानच्या आठ दिशांत आठ द्वारदेवता आहेत. त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिमद्वार देवता आहे. आज ज्या ठिकाणी गणेशमंदिर आहे, त्या ठिकाणी मोगलाईच्या काळात (साधारणपणे इ. स. 1600पूर्वी) स्वयंभू गणेशमूर्ती सापडली होती.
समुद्रालगत असलेल्या पुळणीच्या भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे पुढे या गावाला गणपतीपुळे म्हटले जाऊ लागले.
 
 
जुन्या व नूतनीकरण केलेल्या मंदिराची रचना व परंपरा
 
 
निर्गुण, गणेशस्वरूप मानल्या गेलेल्या गणपतीच्या डोंगराचे क्षेत्रफळ सुमारे 20 एकराचे आहे. ही जमीन संस्थानाच्या मालकीची आहे.
 
 
मंदिराची परंपरा अतिप्राचीन - 400-500 वर्षांपूर्वीची आहे. त्या वेळी छत्रपतींच्या आदेशावरून 8ु8 आकाराच्या पारंपरिक वास्तुशिल्पाला अनुसरून चुन्यात चिर्‍याचे बांधकाम करून गाभारा उभा केला. आत स्वयंभू गणेशाचे गंडस्थळ व उदररूप असणारी शिला व पार्श्वभूमीवर हिरव्यागार वनराईने नटलेले टेकडीस्वरूप मस्क या सर्व टेकडीलाच गणपती मानून प्रदक्षिणा घालण्याची प्रथा येथे आहे.
 
 
पश्चिमेकडून मंदिरात येताना नतमस्तक होऊन यावे, या दृष्टीने 4 फुटी भिंगाचे प्रवेशद्वार. त्या दरवाज्यावर हरभटबुवा पटवर्धनांचे तैलचित्र होते. उत्तरेकडे पंचांच्या बैठकीसाठी व देवाचे जडजवाहीर व किमती वस्तू ठेवण्यासाठी बांधलेला जामदारखाना याचे वैशिष्ट्य असे की, याला तीन कुलपे आहेत. एक कुलूप पंच मंडळींकडे, एक कार्यालयातील मुख्य लिपिकाकडे व एक गुरवाकडे. तिघांनी एकाच वेळी एकत्र आल्याशिवाय जामदारखाना उघडू शकत नाही.
 
 
विशेष प्रसंगी महाप्रसादाच्या वेळी स्वयंपाकघर (पाकशाळा) म्हणून दक्षिणेकडे असलेल्या इमारतीचा उपयोग केला जायचा. पूर्वी येथील मंदिराबाहेर अकरा दीपमाळा होत्या. कार्तिक पौर्णिमेला त्यावर पणत्या लावीत. वर्षातील बारा संकष्टीचतुर्थी, दिवाळी, दसरा, पाडवा, भाद्रपद व माघ शु. चतुर्थी अशा एकूण 17 वेळा पेशव्यांनी दिलेल्या चांदीच्या गणेशमूर्तीची पालखीतून मिरवणूक काढली जाते. पालखी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर मंदिरात गेल्यावर आरती, देवे व प्रसादवाटपाने पालखी सोहळा पूर्ण होतो. गाभार्‍यात दैनंदिन प्रवेश सोवळे नेसूनच दिला जातो. मात्र भाद्रपदातील गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी 6.30 ते दुपारी 12.30पर्यंत (सूर्योदयापासून सहा तास) सर्वांनाच गाभार्‍यात देवदर्शनासाठी प्रवेश दिला जातो. गणपतीपुळे पंचक्रोशीत घरोघरी गणपती आणण्याची प्रथा नाही. सर्वांनी एकत्र येऊन स्वयंभू गणेशाची पूजाअर्जा व उत्सव साजरा केला जातो.
 
 
आता मंदिर परिसराचे काम पूर्ण झाले असून रमाबाई पेशवे धर्मशाळा निवास येथे भाविकांना अल्प मोबदल्यात राहण्यासाठी खोल्यांची सोय केली आहे. तसेच धर्मशाळेच्या सभामंडपात 300-400 लोकांना मोफत राहण्याची सोयही उपलब्ध झाली आहे. याच इमारतीमध्ये प्रसादासाठी भक्तांना हॉल उपलब्ध आहे.
 
 
गणपतीपुळ्याचे मंदिर ज्या गोल डोंगराच्या पायथ्याशी आहे, त्या डोंगराभोवती अडीच हात रुंदीची फरसबंदी केलेली प्रदक्षिणेची पाखाडी आहे. प्रदक्षिणेच्या पाखाडीच्या आत चार दिशांना चार द्वारदेवतांची स्थाने आहेत. तसेच प्रदक्षिणा मार्गावर श्रींच्या डोंगरमाथ्यावर सोंडेचा आकार आहे. त्या स्थानास ‘शुंडास्थान’ असे संबोधतात. प्रदक्षिणा मार्गावर विश्रांतीसाठी हे स्थान उपयुक्त आहे. डोंगराभोवती वडाचे आणि अश्वत्थाचे पार जागोजागी बांधले आहेत. देवालयाच्या दक्षिणभागी एक तलाव आहे. या तलावास ‘वानीचे तळे’ असे म्हणतात. तलावाजवळच एक विहीर आहे. देवालयाच्या दोन्ही बाजूंना दोन चौधरे बांधलेले असून त्यावर दोन्ही बाजूंना पाच पाच त्रिपुर बांधलेले आहेत. देवालयाच्या दक्षिणेला देवळाला लागून पाकशाळा होती. आज तिचे नूतनीकरण करण्यात आले आहे. पाकशाळा म्हणून त्याचा उपयोग करण्यात येतो.
 
 
 
प्रदक्षिणा मार्गावर ध्यानगुंफेचे (मठाचे) नूतनीकरण करण्यात आले आहे. यामध्ये भक्तजनांना ध्यानासाठी बसण्याची व्यवस्था आहे. मंदिरातील सभागृहाच्या दक्षिणेकडील भागात श्रींच्या शयनाची जागा आहे. त्या ठिकाणी श्रींचा पलंग, वरती गाद्या, अंथरूण, तेथे श्रींचे शयनगृह सुशोभित केले गेले आहे. देवाच्या गाभार्‍यात पूर्वेकडील बाजूच्या भिंतीच्या मध्यभागी कमानदार खोबण असून त्यातच श्रींची साकार मूर्ती आहे. नैर्ऋत्येला कोपर्‍यात नंदादीप आहे. ज्या वेळी मूर्तीला सिंदूरलेपन करतात, त्या वेळी एक लहान मूर्ती पुढे पाटावर ठेवून ती पूजेकरिता ठेवण्याची प्रथा आहे.
 
 
देवळाच्या ईशान्य कोपर्‍यात डोंगरात मोठ्या काळ्या दगडी असून त्यातून झरझर असे पाणी वाहत असे. भाविक ते तीर्थ म्हणून प्राशन करीत असत. त्यास ‘नाभीगंगोदक’ असे म्हणतात. कालौघात आता फक्त पावसाळ्यात हा झरा वाहतो.
1) वक्रतुंड (मद्रास), 2) एकदंत (केरळ), 3) महोदर (रामेश्वरजवळ), 4) गजानन (तंजावर), 5) लंबोदर (गणपतीपुळे), 6) विकट - (काश्मीर), 7) विघ्नराज (हिमालय) व 8) धूम्रवर्ण (तिबेट). भारत देशाच्या अष्टदिशांचे हेच अष्टविनायक असून ते या देशाचे आणि देशवासीयांचे रक्षण करीत असतात.
 
 
या देवस्थानात केलेली सेवा व प्रार्थना भक्तजनांस अनुकूल फळ देते, असा विश्वास असल्यामुळे भाविक यात्रेकरू येथे दर वर्षी हजारोंच्या संख्येने येतात. सोमवार दि. 3 फेब्रुवारी 2003 रोजी श्री शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती (कांची कामकोटी पीठ) यांच्या हस्ते नवीन मंदिराचे कलशारोहण झाले. त्या वेळी हजारोंची उपस्थिती होती. देवस्थानातील कर्मचार्‍यांच्या सौजन्यशीलतेमुळे अनेक भक्त पूजा, अभिषेक, नैवेद्य याद्वारे आपली सेवा रुजू करतात. त्यांना तेथेच किंवा नंतर पोस्टाने प्रसाद पाठविला जातो. देवस्थानमार्फत जे धार्मिक विधी केले जातात, त्याची माहिती कार्यालयात उपलब्ध आहे.
 
 
श्रींचे संस्थान व पंच कमिटी
 
पूर्वी पेशवाईत रत्नागिरी सुभ्यातून कारकून येऊन देवाच्या जामदारखान्याचे काम करीत असे. पुढे 1841 साली तत्कालीन व्हाइसरॉय ऑकलंडच्या कारकिर्दीत येथील देवस्थान हे संस्थान करून कारभार पाहण्यासाठी पंच नेमले. त्या वेळेपासून सुयोग्य कर्मचारी नेमून पंचांच्या देखरेखीखाली संस्थानचे सर्व काम चालते.
 
 
संस्थान श्रीदेव गणपतीपुळे - विद्यमान पंच कमिटी
 
 
1) डॉ. विवेक यशवंत भिडे - सरपंच, 2) श्री. निलेश श्रीकृष्ण कोल्हटकर - खजिनदार, 3) प्रा. विनायक तुकाराम राऊत - सचिव, 4) डॉ. श्रीराम विश्वनाथ केळकर - पंच, 5) श्री. अमित प्रभाकर मेहेंदळे - पंच, 6) श्री. विद्याधर वासुदेव शेंड्ये - पंच, 7) वे.मू. श्रीहरी जनार्दन रानडे - पंच.
सरकारकडून पेशवेकालापासून देवस्थानला वार्षिक 5000/- रुपये नेमणूक मिळत होती. भक्तांनी दिलेल्या देणग्यांतूनच संस्थानचा सर्व खर्च चालतो. या देवस्थानला दिल्या जाणार्‍या देणग्यांच्या रकमेवरील आय कर सरकारने 80-जी नियमाप्रमाणे माफ केला आहे.
 
 
उपक्रम
 
श्रीमंत सौ. रमाबाई पेशवे निवास व धर्मशाळा - येथे भाविकांना अल्प मोबदल्यात निवासासाठी 9 खोल्यांची सोय केली आहे. तसेच धर्मशाळेच्या सभामंडपात 300-400 भक्तजनांसाठी विनामूल्य राहण्याची सुविधा उपलब्ध आहे.
 
 
श्रींचा प्रसाद
 
अधिक श्रावण शु. 1, दि. 18 जुलै 04पासून सर्व भक्तांसाठी दुपारी 12.30 ते 2 या वेळेत देवस्थानने खिचडी प्रसाद योजना सुरू केली. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून दररोज सरासरी 2500 भक्तजन प्रसादाचा लाभ घेतात. दि. 1 एप्रिल 2013पासून सायंकाळी 7 ते 8.15 या वेळेत प्रसाद सुरू करण्यात आला आहे. भक्तजनांना प्रसाद म्हणून पुलाव व शिरा दिला जातो. दररोज सरासरी 1000 भक्तजन प्रसादाचा लाभ घेतात.
 
 
 
वैद्यकीय सुविधा व रुग्णवाहिका सेवा
 
 
अनेक गरजू भक्तांना खर्चीक आजारांसाठी संस्थानामार्फत आर्थिक मदत केली जाते. कोविड काळात पंतप्रधान व मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी संस्थानाने भरघोस मदत केली होती. तसेच या काळात संस्थानाच्या भक्तनिवासामध्ये कोविड सेंटरही उभारण्यात आले होते. तसेच कोल्हापूर-सांगली महापुरात संस्थानाने आर्थिक तसेच वस्तुरूपाने मदतकार्य केले होते.
दि. 6 जानेवारी 2014 रोजी संस्थानाने विनामूल्य रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. बँक ऑफ इंडिया, रत्नागिरी शाखा यांच्याकडून देवस्थानला देणगी म्हणून ही रुग्णवाहिका देण्यात आली होती.
 
 
नियोजित उपक्रम
 
पुढील उपक्रमांसाठी पंच कमिटी प्रयत्नशील आहे. संस्थान श्रीदेव गणपतीपुळेने वेदांचे अध्ययन करण्यासाठी वेद पाठशाळा, नक्षत्र उद्यान, आयुर्वेदिक वनस्पती उद्याने इत्यादी योजना हाती घेतल्या आहेत. भक्तजनांनी दिलेल्या देणग्यांच्या मदतीने वरील योजना पूर्णत्वास गेल्यानंतर संस्थानाचे स्वरूप अधिक दिमाखदार व लोकाभिमुख होणार आह
- प्रतिनिधी