सरदार विंचूरकर वाड्याचा इतिहास

26 Aug 2022 16:37:37
सरदार विंचूरकर म्हणजे मूळचे सासवडचे दाणी. धान्याचा हिशोब ठेवण्याचे काम त्यांच्याकडे होते. प्रत्येक बलुतेदाराकडून मूठ दाण्याचा मान, म्हणून त्यांना ‘दाणी’ हे नाव पडले. विठ्ठल दाणी यांचे शौर्य पाहून छ. शाहू महाराज खूश झाले. शाबासकी म्हणून त्यांना घोडा बक्षीस दिला. येथूनच दाणींच्या कार्यास सुरुवात झाली.

ganpati bappa
 
बाजीराव पेशव्यांबरोबर खांद्याला खांदा लावून लढणारे व कायम आघाडीवर राहून व समरांगणी शत्रूशी लढा देणारे विठ्ठल दाणी हे विंचूरकर घराण्याचे संस्थापक. 
 
 शनिवारवाड्याचे बांधकाम झाल्यानंतर अनेक सरदारांनी वाडे उभे केले. या सदाशिवरावांच्या पेठेतच विंचूरकरांनी दोन चौकी दुमजली वाडा बांधला.
 
 
शंभर वर्षांपूर्वी विंचूरकर वाड्याला गायकवाड वाड्याइतकेच महत्त्व होते. लोकजागृती आणि संघटन करण्यासाठी टिळकांनी जे जे कार्य केले, त्या सर्व कार्याची पायाभरणी या वाड्यातच झालेली आहे.
 
 
 
1891च्या उत्तरार्धापासून पुढील चौदा वर्षे लोकमान्य टिळकांचे वास्तव्य या वाड्यात होते. 1905नंतर टिळक गायकवाड वाड्यात राहायला गेले. 1894 साली विंचूरकर वाड्यातून लोकमान्य टिळकांनी प्रथम सार्वजनिक गणपतीची सुरुवात केली, त्या वेळी त्या गणपतीला ‘लॉ क्लासचा गणपती’ म्हटले जात असे. पूर्वी टिळक याच वाड्यात कायद्याचे शिकवणी वर्ग घेत असत.
 
 
 
गणेशोत्सवाच्या काळात टिळक स्वत:च्या गणपतीपुढे एखादे तरी व्याख्यान देत आणि इतरत्रही व्याख्यानाकरिता जात असत. गणेशोत्सवात हिंदू धर्मावर दीड तास भाषण देत असत. न्यायमूर्ती रानडे यांच्यावरील अप्रतिम मृत्युलेख आणि जून 1892मध्ये स्वामी विवेकानंद आणि टिळक यांचे याच विंचूरकर वाड्यात दहा दिवस एकत्र वास्तव्य, या सर्व घटनांचा हा वाडा साक्षीदार आहे. 1894 ते 1905पर्यंत विंचूरकरांच्या वाड्यातील गणपतीपुढे ह.भ.प. पांगारकर, प्रो. जिनतीवाले, शिवरामपंत परांजपे, तात्यासाहेब केळकर, कृष्णाजीपंत खाडिलकर, चिंतामणीराव वैद्य, वि.ग. भानू इत्यादी मान्यवर वक्त्यांची भाषणे झाली. केसरी-मराठा या वृत्तपत्रांचे प्रथम कार्यालय याच वाड्यात होते. अशा ऐतिहासिक वाड्यास भेट देऊन श्रींचे दर्शन घ्यावे, ही विनंती.
 
 
 
लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणपती ट्रस्ट, पुणे.
727, सरदार विंचूरकर वाडा,
कुमठेकर रोड, सदाशिव पेठ,
पुणे - 411030.
स्थापना - 1894,
संस्थापक - लोकमान्य टिळक
Powered By Sangraha 9.0