गणेशोत्सवात श्रींच्या पूजेतील बहुतांश भांडी तांब्या-पितळेची असतात आणि श्रींच्या विसर्जनापर्यंत ती चकाकत राहतील असा घरातील वडीलधार्यांचा कटाक्ष असतो. सजावटीतही तांब्या-पितळेच्या वस्तूंचे स्थान आजही अबाधित आहे. या खास सणाच्या निमित्ताने तांब्या-पितळेच्या वस्तूंचा संग्रह करून त्या जतन करणार्या मेधा दिवेकर यांच्या या अनोख्या छंदाचा परिचय करून देणारा लेख.
श्रावण-भाद्रपद म्हणजे सण-उत्सव, व्रतवैकल्ये यांची रेलचेल. त्या निमित्ताने मग देवघरातील तांब्या-पितळेचे देव आणि भांडी चकाकू लागतात. त्यांचे उजळलेले रूप या उत्सवी चैतन्यात भर घालतात. गणेशोत्सवातही श्रींच्या पूजेतील बहुतांश भांडी तांब्या-पितळेची असतात आणि श्रींच्या विसर्जनापर्यंत ती चकाकत राहतील असा घरातील वडीलधार्यांचा कटाक्ष असतो. सजावटीतही तांब्या-पितळेच्या वस्तूंचे स्थान आजही अबाधित आहे. अगदी दोन-तीन पिढ्या मागे जाऊन पाहिले, तर स्वयंपाकघरात तांब्या-पितळेच्या भांड्यांचे वर्चस्वच अधिक होते. आता स्टेनलेस स्टीलच्या, जर्मन स्टीलच्या, काचेच्या किंवा चिनी बनावटीच्या क्रॉकरीने त्यांची जागा घेतली असली, तरी तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठीचे महिला वर्गाचे प्रेम अजूनही कायम असल्याचे दिसते. अर्थातच रोजच्या धावपळीत या प्रेमाला मर्यादा येतात. त्यांच्याविषयी प्रेम असले, तरी अशी भांडी, वस्तू घेण्यापूर्वी दहा वेळा विचार केला जातो आणि घेतलीच तरी त्यांचे काय करायचे, त्या कुठे ठेवायच्या, कशा स्वच्छ ठेवायच्या असे प्रश्न असतातच. मुलुंडच्या मेधा दिवेकर यांनी मात्र तांब्या-पितळेची भांडी, अँटिक वस्तू यांचा मोठा संग्रहच त्यांच्या घरी केला आहे. बरे, संग्रह म्हणजे नुसत्या वस्तू जमा करून ठेवल्या आहेत असे नाही. त्यांच्या घराच्या दिवाणखाण्यातील कोपरा न् कोपरा अशा वस्तूंनी सजला आहे.
मेधाताईंच्या या तांब्या-पितळेच्या खजिन्यात पारंपरिक हंडा-कळशी, पाणी तापवण्याचा बंब, इडलीपात्र अशी पिढ्यानपिढ्या जपलेली कितीतरी भांडी आहेत. देवघरातील भांड्यांचे तर कितीतरी वैविध्य पाहायला मिळते. त्याशिवाय मागच्या पिढ्यांनी जतन करून ठेवलेल्या, अनेक सुहृदांनी विश्वासाने सोपवलेला, देशाच्या वेगवेगळ्या भागांतून आणि परदेशातूनही शोधून शोधून गोळा केलेल्या दुर्मीळ वस्तूंचे दर्शन मनाला सुखावणारे आहे. डॉक्टर असलेल्या आजेसासर्यांंचा कांस्याचा इंजेक्शन स्टरलाइझ करण्याचा डबा, आजेसासूची कुंकू लावण्याची जुन्या काळची डबी असे सगळे दाखवताना त्यांच्या चेहर्यावर कौतुकमिश्रित आनंद दिसतो.
त्याशिवाय पर्शियन कोरीवकाम असलेली फूलदाणी, हिंदुस्थानी वाद्यांचा आणि वादकांचा मिनिएचर संच, त्या संचातील छोटी मयूरपंखी वीणा, स्वयंपाकघरातील दोन्ही बाजूंनी वापरता येणारी गळापकडी पकड, लंडनच्या प्रवासात मिळालेल्या पितळी घंटा, डॉल्फिन, कचरा भरण्याचे पितळी सूप आणि पितळेचे कव्हर असलेले ब्रश, कोळशावर चालणारी छोटी पितळी इस्त्री, माशाच्या आकाराचे कुलूप असे बरेच काही पाहायला मिळते.
तांब्या-पितळेच्या वस्तू जमा करण्याचा छंद कसा लागला? याचे उत्तर देताना मेधाताई सांगतात, “छंद किंवा संग्रहालय तयार करायचं असं मनात काहीच नव्हतं. लहानपणापासून भांड्यांची आवड होती, त्यामुळे भातुकलीचा खेळ ही खरी सुरुवात होती. भातुकलीत सुरुवातीला सगळी पितळेची भांडी, मग स्टीलची आली, काही तांब्याची भांडी होती. त्याशिवाय जुन्या काळी घरात तांब्या-पितळेची भांडी होतीच, जसं पाणी तापवायचा बंब होता, स्वयंपाकघरातील जेवण करण्याची भांडी होती. आपण प्रत्येक जण हे सगळं बघत बघत मोठे झालेले असतो. लग्न झाल्यानंतर सासरचं घर मोठं होतं. एकदा माळा आवरताना आजेसासूबाईंची बरीचशी भांडी दिसली, त्यात ढोकळापात्र, बंब, गूळ ठेवायची गोळी अशा 3-4 गोष्टी दिसल्या. आजेसासूबाईंनी त्यांची आवड जपली होती. मी एकेक भांडं स्वच्छ करून दिवाणखाण्यात ठेवलं, तशी त्याची शोभा वाढली. मग आईकडच्या माळ्यावरची भांडी तिच्याकडून मागून घेऊन आले.
कुठेही एखादी वेगळी वस्तू दिसली ती घेऊन यायची, ही आवड मला आणि माझे पती धनंजय यांना होतीच. मग अशी एकेक गोष्ट जमा होऊन संग्रह वाढू लागला.”
या प्रवासात त्यांना अनेक वेगळे अनुभव आले. एकतर अशी भांडी किंवा अँटिक वस्तू मिळवण्याचे ठिकाण म्हणजे जुन्या बाजारातील भंगाराची दुकाने. ही अशी भंगाराची दुकाने मेधाताईंच्या रडारवर आली. सुरुवातीला हे दुकानदार त्यांना उडवून लावायचे. पण नंतर जेव्हा त्यांच्या लक्षात यायचे की ही खटपट चांगल्या विचाराने आहे, ही विचारणा करणारी व्यक्ती खरेच अशा वस्तूंची संग्राहक आहे, तेव्हा मात्र ते चांगला प्रतिसाद द्यायचे. गोव्याच्या एका प्रवासात मेधाताई तिथल्या एका भंगाराच्या दुकानात गेल्या होत्या. तिथे नेहमीचाच अनुभव आला. दुकानदाराने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. खूप समजावल्यानंतर दुकानदाराने थोडा वेळ प्रतीक्षा करायला सांगितली. मेधाताईंचा मुलगा लहान होता. पण आईची आवड माहीत असल्याने तोही थांबायला तयार झाला. थोडा वेळ बाहेर फिरून दुकानात आल्यानंतर दुकानदाराने एक-दोन गोणीच त्यांच्यासमोर उघड्या करून त्यातील वस्तू जमिनीवर पसरल्या. ते पाहून मेधाताईंचेही डोळे दिपले. कारण त्याने ओतलेल्या त्या वस्तूंमध्ये त्यांच्या संग्रहासाठी अनेक वेगळ्या वस्तू त्यांना मिळाल्या होत्या. त्यात बोटीच्या अँकरच्या आकाराची दाराची कडी, दाण्याचा कूट करण्याचे यंत्र, मोराच्या आकाराची पेशवेकालीन कुयरी, पितळी वाइन ग्लास, उजऋऋएए अशी अक्षरे लिहिलेला पितळी मग असा खजिना त्यात सापडला. यातील बहुतांश वस्तू मिळाल्या, तेव्हा काळ्याकुट्ट अवस्थेत होत्या. त्या स्वच्छ करून उजळवल्यावर त्यांचे खरे वैभव पाहायला मिळाले.
गिरगावात फेरफटका मारताना एका दुकानात एक पॅरेट लँप मिळाला, जो उलटा केल्यानंतरही त्यातील तेल सांडत नाही. उज्जैनला गेल्यावर मेधाताई तेथील हंडे घेऊन आल्या. अशा प्रकारे हा संग्रह वाढत राहिला. परिचयातील अनेकांना मेधाताईंच्या या छंदाची माहिती होती. त्यांनी आपला हा संग्रह कसा जिवापाड जपलाय हे त्यांनी पाहिले होते. अशांपैकी अनेकांनी आपल्या घरातील जुन्या तांब्या-पितळीच्या वस्तू विश्वासाने मेधाताईंच्या स्वाधीन केल्या. त्यांनीही त्यांना आपलेसे करून आपल्या संग्रहात स्थान दिले.
मेधा दिवेकर या खरे तर कथ्थक नृत्यांगना आणि प्रशिक्षक. संस्कृत, मराठी, हिंदी भाषांमधील नाटकांमध्ये त्या अभिनय करतात. मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयात त्या प्राध्यापक होत्या. लॅण्डस्केपिंग आणि नेचरोपथी या विषयांमध्ये स्वारस्य असल्याने त्यातही त्यांचे योगदान आहे. हे सर्व सांभाळून ते आपल्या या संग्रहाचे जतन, जोपासना करतात.
हा संग्रहरूपी खजिना अर्थातच दृश्यरूपाने पाहणे हे अधिक आनंददायक आहे. त्यासाठीच विवेक डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आम्ही एक खास व्हिडिओ चित्रित केला आहे. वर दिलेला कोड स्कॅन करून ही मुलाखत पाहता येईल. या मुलाखतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तांब्या-पितळेच्या भांड्यांच्या स्वच्छतेचे कठीण काम सोपे कसे करायचे, याच्या खास टिप्स मेधाताईंनी यात दिल्या आहेत. गणराजाच्या स्वागताची तयारी करताना त्या नक्कीच उपयोगी पडतील.