आरेचीच काळजी का?

विवेक मराठी    04-Aug-2022
Total Views |
@अभय पालवणकर  
 
 
पर्यावरणप्रेमींच्या अट्टहासामुळे देशाचे नुकसान होत असते. कोणतेही मोठे प्रकल्प जलदगतीने राबवता येत नाहीत. कोर्ट, हरित लवादा मंजुरी अशा अनेक कटकटीमुळे आजही अनेक प्रकल्प रखडले आहे. आरे कारशेडचे कामही आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण प्रेमामुळे गेली अडिच वर्षे रखडले होते. आता मविआ सरकार पडल्यानंतर फडणवीस -शिंदे सरकारने आरेतच पुन्हा कारशेडचे काम सुरू केले आहे. त्यामुळे आरेच काम जलदगतीने झाल्यास मुंबईच्या विकासाला हातभार लागणार आहे, हे पर्यावरणप्रेमींनी समजून घेतले पाहिजे.
 

shivsena
 
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आरे कारशेडच्या विरोधात आंदोलन करणारे सर्वत्र दिसून येत आहेत. “आरेची काळजी रे, आरेची काळजी रे, मला आरेची काळजी रे” गीत गात काही युवक मेट्रो, रेल्वे स्टेशनवर दिसून येत असतात. या हे युवक सनदशीर मार्गाने विरोध करत असतात. त्यामुळे त्यांचा कोणाला त्रास होत नाही. पण पर्यावरणप्रेमीचा हा विरोध मुंबईच्या विकासाला विरोध आहे. पर्यावरणाचा र्‍हास थांबलाच पाहिजे याबद्दल कोणाचेही दुमत नाही. पण पर्यावरण आडून अनेक जण विकासाला विरोध करीत असतात. यामुळे मात्र देशाचे, राष्ट्राचे आणि तेथील नागरिकांचे नुकसान होत असते. अशा प्रकारचा आरे मेट्रो कारशेडला विरोध आहे, यामुळे आरेचे जंगल नष्ट होईल असे त्यांचे म्हणणे आहे, अनेक झाडे तोडण्यात येतील त्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होईल असा आरोप करून निदर्शने करीत आहेत. यामध्ये काही पर्यावरणवादी संघटनांसहित शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. स्वाभाविक त्यामुळे शिवसैनिकही मोठ्या संख्यने याला विरोध करत आहेत. मग त्यासाठी सेव्ह आरे, पथनाट्य, गीत अशा मार्गांने विरोध केला जात आहे. पण खरंच आरे कारशेडला नसून तेथील भूखंडाला आहे. आजपर्यंत अनेक भूखंडांचे श्रीखंड झाले आहे. तसेच ही जागा आता अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात आहे. मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत व होत आहेत. यात प्रामुख्याने झोपड्या, छोटी-मोठी देवळे, मांत्रिक-बाबा यांचे अड्डे अशा विविध गोष्टी वसत आहेत. त्यामुळे स्वाभाविकच ही मंडळी विरोध करणारच... कारण कारशेड झाले तर त्यांचे काम थांबेल...
 
 
आरेचा इतिहास
 
 
आरे दुग्धवसाहतीचा इतिहास पाहता 1949 साली सरकारने ही जमीन दुग्धप्रकल्पासाठी अधिग्रहित केली. 1951 साली येथे आशियातील पहिली दुग्धशाळा स्थापन केली. या भागात म्हशींचे व गायींचे 32 गोठे आहेत. यातील जनावरांसाठी 160 हेक्टर जमिनीवर कुरणांची लागवड होते. 1990च्या दशकापर्यंत मुंबई शहराला आरे दुग्ध योजनेद्वारे दूधपुरवठा होत होता. दुग्धवसाहतीत आता सरकारी दुग्धव्यवसाय होत नसल्यामुळे गेल्या दोन दशकांत आरे वसाहतीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत व होत आहेत. झोपड्या, छोटी-मोठी देवळे, मांत्रिक-बाबा यांचे अड्डे अशा विविध गोष्टी वसत आहेत. पण आरे वाचावा घोषणा देणार्‍यांना काहीच देणे-घेणे नाही. पण 30 हेक्टर जमिनीवर बांधल्या जाणार्‍या कारशेडलाच यांचा विरोध आहे. यावरून विरोधकांचे लक्ष्य हे फक्त भाजपा आहे हे स्पष्ट होते. विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडल्याची छायाचित्रे, झाडे तोडण्याचे व्हिडीओ व्हायरल केले जातात, सोशल माध्यमातून तरुणाई सेव्ह आरेसाठी साद घालत आहेत. यानिमित्ताने लोकांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला जातो. पण प्रत्यक्षात मात्र कारडेपोच्या जागेत एकूण 3691 झाडे होती. 2 हजार 141 झाडे तोडण्यात आली. त्यापैकी 461 झाडांचं पुनर्रोपण होणार आहे, तर 1045 झाडे तशीच्या तशी ठेवण्यात आली आहेत. रस्ते विकास असो किंवा मोठा प्रकल्प उभारतांना झाडांची तोडणी करावीच लागते. ठाकरे सरकारच्या काळात समृद्धी महामार्गाचे काम असो वा मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू होते. तेव्हा झाडांची तोडणी करण्यात येत होती. पण पर्यावरणप्रेमी व आदित्य ठाकरे यांना ती तोडणी दिसली नाही का? असा सवाल उपस्थित होतो.
 

shivsena
 
आरेकारशेड आडून भाजपाला विरोध
 
 
शिवसेनेचा भाजपा व देवेंद्र फडणवीस यांना उघड होता. अगदी 2014 साली सत्तेत एकत्र बसल्यानंतरही अनेकवेळा भाजपाच्या निर्णयांना विरोध केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरेमध्ये कारशेड करण्याचा निर्णय घेतला तेव्हाही कोणतेही कारण न देता विरोध केला होता. 2019ला भाजपाशी मैत्री तोडून काँग्रेस व राष्ट्रवादीशी हातमिळवून करून जेव्हा उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा आरेकारशेडच्या कामाला स्थगिती दिली. त्यानंतर भाजपाने नियुक्त केलेल्या प्रकल्पाच्या अधिकारी अश्विनी भीडे यांची तेथून उलबांगडी केली. आरेकारशेड ऐवजी पर्यायी जागा म्हणून कांजूरची जागा निश्चित केली. आता पुन्हा फडणवीस-शिंदे सरकार येताच आरेकारशेडचे काम सुरू करताच शिवसेने काही पर्यावरण प्रेमींना हाताशी धरून विरोध करायला सुरू केली आहे. यावरून स्पष्ट होते की, आरेच्या आडून भाजपाला विरोध आहे.
 
 
आदित्य ठाकरेंचा पर्यावरणप्रेमी चेहरा
 
 
शिवसेनेला येणार्‍या महानगरपालिका निवडणुका या आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्व व चेहर्‍याखाली लढवायच्या आहेत. मविआ सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण मंत्रीपदी काम केले आहे. आदित्यचा यानिमित्ताने एक पर्यावरणप्रेमी चेहरा निर्माण करायचा आहे. मुंबईमध्ये शिवसेनेचा पारंपरिक मतदार असलेला मराठी टक्का कमी झाला आहे, दक्षिण मुंबईत तर आज मराठी टक्का पूर्णपणे घसरला आहे. त्यामुळे मी मुंबईकर, आम्ही हिंदू, गुजराती आपडा, अजान स्पर्धा याबरोबरच उच्च भू्र मतदारांनाही आपलेसे करण्याचा प्रयत्न शिवसेना करू लागली आहे. उच्चभू्र लोकांमध्ये नेहमी पर्यारवणाबद्दल जागृती असते. यांना आकर्षिक करण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा पर्यावरणप्रेमी चेहरा दाखवण्याची ही संधी शिवसेना साधत आहे. त्यामुळे काही प्रमाण यांची मते मिळवू शकतो. असे समीकरण आहे. त्यामुळेच आरे कारशेडला विरोध करून शिवसेनेचा मुंबई महानगरपालिकेत आदित्य ठाकरे यांचा पर्यावरणप्रेमी चेहरा निर्माण करायचा आहे. असे दिसून येत आहे.
 
 
भारतातील पर्यावरणवादी सातत्याने कुठल्याही विकासकामाला विरोध करताना दिसतात. प्रत्येक गोष्टीचा पर्यावरणाच्या नजरेतूनच विचार करावा असा त्यांचा दृष्टिकोन असतो. काही प्रमाणात झालाही पाहिजे. पण त्यांच्या अट्टहासामुळे देशाचे नुकसान होत असते. कोणतेही मोठे प्रकल्प जलदगतीने राबवता येत नाहीत. कोर्ट, हरित लवादा मंजुरी अशा अनेक कटकटीमुळे आजही अनेक प्रकल्प रखडले आहे. आरेचे  कामही आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण प्रेमामुळे गेली अडिच वर्षे रखडले होते. आता मविआ सरकार पडल्यानंतर फडणवीस -शिंदे सरकारने आरेतच पुन्हा कारशेडचे काम सुरू केले आहे. त्यामुळे आरेच काम जलदगतीने झाल्यास मुंबईच्या विकासाला हातभार लागणार आहे, हे पर्यावरणप्रेमींनी समजून घेतले पाहिजे.