आत्मतेज जागवणारे स्वामी विवेकानंद

विवेक मराठी    05-Aug-2022
Total Views |
 @सिद्धाराम भै. पाटील । 8806555588
  भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर स्वामी विवेकानंदांचा मोठा प्रभाव होता, हे खरे असले तरी केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरताच तो मर्यादित नव्हता. पुढील हजारो वर्षे भारत परतंत्र होणार नाही याची पायाभरणी त्यांनी केली आणि जगद्गुरू भारताची संकल्पना मांडली आणि त्यासाठीचे तत्त्वज्ञानही उभे केले.

india
स्वामी विवेकानंदांच्या काळापासून आपल्या देशात खूप मोठे परिवर्तन झाले. त्या काळी तमोगुण, अकर्मण्यता तसेच निष्क्रियता लोकांच्या रोमारोमांत भिनली होती. नाही म्हणायला असंतोष आणि परिवर्तनाची मंद मानसिकता तयार होत होती. परंतु, स्वातंत्र्याविषयी विचार करावे इतके साहसी लोक तेव्हा नव्हते. त्या काळातील अत्यंत प्रबुद्ध व्यक्तीसुद्धा इंग्रजांसमोर सीमित प्रतिनिधित्वाची विनंती, आर्जव करीत होते. ते लोक इंग्रजांची राजवट म्हणजे भारताच्या हितासाठी ईश्वरी संकेत समजायचे. अशा मानसिकतेच्या लोकांमुळे स्वामी विवेकानंद व्यथित झाले होते. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी यामध्ये मोठे परिवर्तन झाले. ब्रिटिशांच्या गुलामीतील भारतात स्वाभिमान जागवण्याचे काम स्वामी विवेकानंद यांनी केले.

 
थोर चिंतक प्रा. धरमपाल यांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना भारताकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहायला शिकवलं. त्यांनी निद्रित अवस्थेतील भारताचा आत्मा जागवला आणि यातून देशात जागृतीची एक लाट उसळली. विवेकानंदांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन अनेकजण स्वातंत्र्य आंदोलनाचे नेतृत्व करू लागले. देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे या मागणीमागची प्रेरणाही विवेकानंदच होते. याची परिणिती पुढे जाऊन भारताला स्वातंत्र्य मिळण्यात झाली.’


लोकमान्य टिळक यांच्या शब्दांत, “स्वामी विवेकानंद हे राष्ट्रविमोचनाच्या चळवळीचे पिता होते.” स्वामी विवेकानंद यांनी कोट्यवधी देशबांधव, शेकडो क्रांतिकारक आणि नेत्यांमधे देशभक्तीची भावना जागवली. यातून भारत स्वतंत्र झाला. स्वामी विवेकानंदांच्या कार्याचे इतरही अतिशय महत्त्वाचे आयाम आहेत.


स्वामी विवेकानंद हे एक बहुआयामी आणि चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांनी पूर्ण भारतभर भ्रमण केलेले होते आणि भारताच्या बाहेरही त्यांनी बर्‍याच देशांतून भ्रमंती केलेली होती. त्यामुळे त्यांना जगाचे दर्शन अगदी जवळून घेण्याची संधी प्राप्त झाली होती. माणसांच्या कमतरता आणि शक्तिस्थाने, विविध संस्कृती तसेच मानवाच्या जीवनावर प्रभाव गाजविण्याची त्यांची शक्ती यांचेही दर्शन त्यांना घडलेले होते. या संबंधात शतकभरात जगभर झालेले विचारमंथन स्वामी विवेकानंद यांनी समजून घेतले होते. त्यांनी लोकांना आध्यात्मिकदृष्ट्या आहे त्या स्तरावरून वरच्या स्तरावर नेण्यासाठीच सातत्याने भाषणे केली. भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय तरुणांसाठी व्याख्यानांची एक मालिका गुंफली. कोलंबो ते अल्मोडा किंवा भारतीय व्याख्याने या ग्रंथात ही संकलित करण्यात आली आहेत.


india
स्वामी विवेकानंद हे विश्व दिग्विजय करून भारताच्या भूमीवर पाऊल ठेवले ते कोलंबो (श्रीलंका) येथे. श्रीलंकेतील जनता तेव्हा स्वत:ला भारतीयच समजत होती, हे आपल्याला कोलंबोवासीयांनी स्वामी विवेकानंदांना दिलेल्या मानपत्रावरून दिसून येते. कोलंबो येथे स्वामी विवेकानंदांनी दिलेले पहिले व्याख्यान म्हणजे महान राष्ट्रद्रष्टा संन्याशाने दिलेला राष्ट्रमंत्रच होय. या देशाचे पुनरुत्थान कसे करता येईल, यासाठीच्या कार्याची दिशा काय असेल यासंबंधीची स्पष्टता आणि दूरदृष्टी त्यांच्या व्याख्यानातून दिसून येते. भारताच्या पुनरुत्थानाची महान योजना त्यात मांडली आहे.


भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर स्वामी विवेकानंदांचा मोठा प्रभाव होता, हे खरे असले तरी केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरताच तो मर्यादित नव्हता. पुढील हजारो वर्षे भारत परतंत्र होणार नाही याची पायाभरणी त्यांनी केली आणि जगद्गुरू भारताची संकल्पना मांडली आणि त्यासाठीचे तत्त्वज्ञानही उभे केले.

वेदांत हा भावी जगाचा धर्म असेल, असेही त्यांनी सांगितले. भारताने जगाकडून शिकले पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत हे खरेच आहे; पण त्या बदल्यात भारताने जगाला अध्यात्माचे ज्ञान दिले पाहिजे. ही भारताची नियती आहे, असे ठाम प्रतिपादन स्वामीजींनी केले.

स्वामी विवेकानंद आपल्याला इशारा देतात की, “अध्यात्माचा संदेश देणे म्हणजे तत्त्वज्ञान देणे आहे. आपण वर्षानुवर्षे छातीशी कवटाळून बसलो आहेत त्या अंधश्रद्धा आणि रूढी देणे नाही. त्या आपल्याला या आपल्या देशातही नष्ट करायच्या आहेत, फेकून द्यायच्या आहेत. त्या कायमच्या संपाव्यात यासाठी त्यागायच्या आहेत.” (खंड 3 पृष्ठ 277-278)

मानवी जातीचे हे आध्यात्मीकरण कसे होणार आहे? हे सांगताना स्वामीजींनी शत्रूंपासून सावधही केले होते.
 
स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते, ”शूर लोकच जगाचा उपभोग घेऊ शकतात. तुमचे शौर्य दाखवून द्या, त्याचा कालानुरूप आविष्कार घडवा, तुमच्या शत्रूत फूट पाडा, भेद निर्माण करा, वेळ पडल्यास लाच द्या, त्यांच्यात बंडखोरीची पेरणी करा आणि तुमच्या शत्रूविरुद्ध उघड युद्ध पुकारा, त्याला जिंका आणि जगाचा आनंद लुटा. तरच तुम्ही खरे धार्मिक राहाल. अन्यथा इतरांनी तुम्हाला लाथाडले, सतत अपमानित केले आणि तरी तुम्ही ते अपमान गिळून अध:पतित जीवन जगत राहाल, तर तुमचे आयुष्य म्हणजे एक नरकवास ठरेल! नंतर तर तुम्हाला नरकात जावे लागेलच, हेच शास्त्राने सांगितले आहे.”
विजयासाठी वाट्टेल ते करण्याचा संदेश देणारे स्वामी विवेकानंद दुसर्‍या ठिकाणी म्हणतात, ”माझ्या आयुष्यात मी एक मोठा धडा शिकलो आहे की, आपण जे साध्य करतो, ते साध्य तर पवित्र असले पाहिजेच, परंतु त्यासाठी वापरलेले साधनसुद्धा शुद्ध असले पाहिजे. किंबहुना मी तर असे म्हणेन की, आपण जे साध्य करतो त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ते कोणत्या मार्गाने साध्य करतो, यावर जास्त लक्ष देणे हेच यशाचे रहस्य आहे.”
 
या दोन्ही गोष्टी वरवर पाहता परस्परविरोधी वाटू शकतील. परंतु, स्वामी विवेकानंद यांचे समग्र जीवन अभ्यासले तर ध्यानात येईल की, स्वामीजींनी उदात्त विचारांच्या नावाखाली भारतासमोरील धोक्यांकडे दुर्लक्ष केलेले नाही.

 
बलशाली भारतासाठी स्वामीजी सांगतात, ”तुमच्या धमन्या बळकट करा. आपल्याला हवे आहेत पोलादी स्नायू आणि पोलादी धमन्या. आपण खूप रडलो आहोत. आता हे रुदन थांबवा. आता आपल्या पायावर उभे राहा आणि ’पुरुष’ व्हा. आपल्याला असे पुरुष निर्माण करणारा धर्म हवा आहे. आपल्याला मनुष्यनिर्माणाचे सिद्धांत हवे आहेत. आपल्याला सर्वांगीण मनुष्यनिर्माण करणारे शिक्षण हवे आहे. इथेच सत्याची पारख होणार आहे. जे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या दुबळे करते, बौद्धिक दास्यात टाकते आणि आध्यात्मिक संभ्रमात लोटते त्याला विषसमान मानून अव्हेरा. त्यात काही जीव नाही. ते सत्य नव्हेच. जे आपल्याला सामर्थ्यशाली बनवते तेच सत्य होय. उपनिषदांकडे चला. देदीप्यमान, सामर्थ्य प्रदान करणारे झळाळते तत्त्वज्ञान त्यात आहे. आपल्याला दुबळे करणार्‍या सर्व गोष्टींपासून दूर राहा. वेगळे व्हा. उपनिषदातली सत्ये आपल्या समोर आहेत. त्यांचा स्वीकार करा. त्यांच्यासह जगायला शिका. भारतभूमीच्या मुक्तीचा मार्ग तुम्हाला गवसेल.” (खंड 3, पृष्ठ 224-225)

स्वामी विवेकानंदांनी जगाला जागृत करण्याबाबत खूप काही सांगितले आहे, पण त्यांनी आपल्यालाही आठवण करून दिली आहे.
 
”आम्ही कधी हातात तलवारी घेऊन आमच्या विचारांचा प्रसार केलेला नाही. आमचे काम सावकाश पण मूक, शुभ प्रभाती पडणार्‍या दवांसारखे न दिसणारे, न ऐकू येणारे, तरीही खूप मोठे फलदायी, शांत, संयत आहे. सर्व सहन करणार्‍या आध्यात्मिक स्वभावाच्या जातीचे हे कार्य विचार विश्वात झिरपणारे आहे.”
(खंड 3, पृष्ठ 110).
 
स्वामी विवेकानंद म्हणतात, “देशभक्तीसंबंधीची माझी स्वत:ची अशी खास कल्पना आहे. प्रथम तुमच्या अंत:करणात भावना जागृत होऊ द्या. आज तुमचे लक्षावधी देशबांधव उपाशी आहेत, याची तुम्हाला जाणीव आहे का? आपल्या देशावर अज्ञानाच्या अंधाराचे सावट पडले आहे, याची खंत तुम्हाला वाटते का? यामुळे तुम्ही कधी अस्वस्थ होता का? लोकांच्या दु:खामुळे तुम्ही जवळजवळ वेडे होऊन जाता का?... देशभक्त होण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे.”
 
तात्कालिक राजकीय संदर्भाने शत्रूशी दिलेला लढा हा आवश्यक असला तरी त्याचा दीर्घकाळ उपयोग नाही. या राष्ट्राच्या शाश्वत मूल्यांसाठी लढा उभारणे, मनुष्य निर्माण करणे हे खरे कार्य आहे. स्वामी विवेकानंदांनी या कार्याची पायाभरणी केली. वर्षामागून वर्षे, शतकामागून शतके जातील तसे हे कार्य वाढत जाणारे आहे. स्वामी विवेकानंदांची काळावर पडलेली सावली ही वाढत जाणारी आहे. ‘मनुष्य निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान’ हा संदेश स्वामी विवेकानंदांनी दिला. त्याग आणि सेवा या शाश्वत मूल्यांचे महत्त्व सांगितले. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रासाठी जीवन समर्पित करणार्‍या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शेकडो युवक पुढे येत आहेत. विवेकानंद विचारांच्या मुशीतून घडलेले अनेक जण आज देशाच्या नेतृत्वस्थानी येत आहेत, हा योगायोग नाही; ही या देशाची नियती आहे.
 
स्वामी विवेकानंद म्हणतात,“स्वदेशासाठी सर्वस्व अर्पण करणारे आणि पूर्णपणे निष्कपट असे लोक जेव्हा तुमच्यामधये निपजतील तेव्हा हिंदुस्थानही सर्व दृष्टींनी महान होईल. माणसांनीच तर देश महान बनत असतो. नुसत्या जमिनीच्या तुकड्यात काय आहे.”
 
स्वामी विवेकानंदांचा तरुण पिढीवर विश्वास होता. ते म्हणतात, “सुशिक्षित तरुणांमध्ये कार्य करा, त्यांना एकत्रित आणा, त्यांची संघटना करा. श्रेष्ठ त्यागातूनच श्रेष्ठ कार्य उभे राहते. माझ्या शूर, गुणी मुलांनो, आपल्या योजनांवर काम करण्यासाठी स्वत:ची सर्व शक्ती वेचा! नाव, कीर्ती किंवा असल्या क्षुद्र गोष्टींच्या मागे लागू नका. झोकून देऊन काम करा. लक्षात ठेवा. सुके गवत जेव्हा दोरखंडात गुंफले जाते तेव्हा त्यामध्ये पिसाट हत्तीलासुद्धा बांधून ठेवण्याचे सामर्थ्य येते.”
 
 
आधुनिक हिंदूंनो, या मोहनिद्रेतून जागे व्हा! ते कसे व्हायचे याचा मार्ग आपल्या आध्यात्मिक ग्रंथांमध्ये आहे. आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान करून घ्या. इतरांना करून द्या. आपल्यातल्या सुप्त आत्मशक्तीला आवाहन करा. मग पाहा ती कशी जागृत होऊन उठते ते! ही सुप्त आत्मशक्ती जागृत कार्यशक्तीच्या रूपाने प्रकट झाली म्हणजे प्राप्त होणार नाही असे काय आहे? सामर्थ्य येईल, वैभव येईल, सद्गुण येतील, शुचिता येईल! जे उदात्त, उत्तम, उन्नत आहे ते सारे येईल!
 
 
मृत्यूच्या जबड्यात प्रवेशतील, अथांग सागर पोहून पार करतील असे बुद्धिमान आणि धैर्यशील युवक मला हवेत! ध्यासपूर्तीची धग त्यांच्या हृदयात हवी! असे शेकडो युवक आणि युवती पाहिजेत. या एका ध्यासाने वेडे व्हा. हेच वेड अनेकानेकांना लागू द्या. आणि मग त्यांची घडण, त्यांचे उदात्तीकरण आपण आपल्या पद्धतीने करू. ठिकठिकाणी केंद्रे उघडा आणि आपल्या कार्यात अधिकाधिक व्यक्तींना समाविष्ट करून घ्या.
 
पावित्र्याच्या तेजाने तळपणारे, ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यालेले, मृगेंद्राचे सामर्थ्य नसांत स्फुरत असलेले, दीनदलितांबद्दल हृदयात अपार करूणा असलेले हजारो युवक-युवती हिमाचलापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र संचार करतील; मुक्ती, सेवा आणि सामाजिक उत्थानाचे आणि सर्व प्रकारच्या समानतेचे आवाहन करतील आणि हा देश पौरुषाने मुसमुसून उठेल.”
 
स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘’मी भविष्यकाळात डोकावून पाहात नाही. तसे करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. पण एक चित्र माझ्या दृष्टीपुढे साक्षात उभे राहते : ही प्राचीन माता पुन्हा एकदा जागी झाली आहे. सर्व वैभवासह पुनश्च आपल्या सिंहासनावर आरूढ झाली आहे.
 
शांतीमंत्रांनी आणि आशीर्वचनांनी तिचे आगमन जगापुढे प्रकट करूया!”

 
व्यापार, शेती, आधुनिकता, विज्ञान, समाजशास्त्र, विषमता व अंधरुढी निर्मूलन, परराष्ट्र संबंध, देशभक्ती, क्रीडा, धर्म, आध्यात्म, मानसिक आरोग्य, संघटन, सामाजिक सुधारणा, इतिहास, विश्वबंधुत्व, कारखाने, मार्केटिंग, तर्कशास्त्र, संवादकला, वक्तृत्व अशा एक ना अनेक बाबतीत स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा अमिट प्रभाव सध्याचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृतीतून गेल्या 7 वर्षांत व्यक्त होताना जगाने पाहिले आहे. आत्मनिर्भर भारत, न्यू इंडिया आदी संकल्पना अन् विश्व योग दिवससारखे उपक्रम जगद्गुरू भारत या दिशेने जाणार्‍या आहेत, यात संशय नको.
 
संपादक, विवेक विचार