मुंबईच्या भटक्याची कोकणातील दर्या फिरस्ती

विवेक मराठी    05-Aug-2022   
Total Views |

महाराष्ट्राला लाभलेल्या लांबलचक कोकण किनाऱ्यावर अनेक मंदिरे, इतर धर्मियांची श्रद्धास्थाने, स्थापत्य कलेचे उत्तमोत्तम नमुने, कातळशिल्पे, शिवकालीन किल्ले आहेत. महाराष्ट्रातील किल्ले इतर राज्यातील किल्ल्यांच्या तुलनेत पडक्या अवस्थेत आहेत. साहजिकच महाराष्ट्रातील पर्यटकही गुजरात राजस्थानकडे वळू लागले, पर्यायाने महाराष्ट्रातील किल्ल्यांकडे दुर्लक्ष होऊ लागले. यातूनच चिन्मय भावे यांची दर्या फिरस्ती सुरु झाली.

1
 
 चिन्मय म्हणतात, ''आजच्या पिढीला इतिहास माहिती नसल्याने त्यांचे दुर्लक्ष होणे साहजिक आहे. त्यांना इतिहास, आपल्या राजांचे शौर्य माहिती करून द्यायला हवे.'' पत्रकारितेचे शिक्षण घेऊन त्या क्षेत्रातच नोकरी करताना चिन्मय यांना आपली संस्कृती, आपलं कोकण याविषयी आस्था वाटू लागली आणि त्याच वेळी कोकणचा इतिहास वाचनात आला. कोकणावर निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे तसेच या भूमीला हजारो वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. याच कोकणात पर्यटन सुरु झाले तर पर्यटक कोकणाकडे वळतील. त्यातून स्थानिकांचे अर्थार्जनाचे नवे मार्ग खुले होतीलच तसेच कोकणाविषयी, इथल्या वैशिष्ट्यांविषयी जागृतीसुद्धा होईल. चिन्मय यांनी आपल्या ब्लॉगमधून इतिहास व माहितीसोबतच छायाचित्रे व व्हिडीओसुद्धा मोफत उपलब्ध करून दिले आहेत. येत्या दसऱ्याला ते दर्या फिरस्तीच्या संकेतस्थळाचेही उदघाटन करत आहेत. या संकेतस्थळावरून कोकण कसे पाहाल? कोकणात काय पाहाल? कसे पोहोचाल? जेवणाची तसेच मुक्कामाची व्यवस्था कुठे व कशी होऊ शकेल? याबाबत माहिती मिळेल.
 

1 
 
२००४ पासून चिन्मयची कोकण भटकंती एमएटी वरून सुरु झाली. मूळचे कोकणस्थ असल्याने चिन्मयला कोकणाविषयी ओढ होतीच परंतु बालपण मुंबईतील पार्ल्यात गेल्याने गावाशी फार संबंध आला नाही. भटकंतीला सुरुवात करताना त्यांच्या लक्षात आले की कोकणचा इतिहास बऱ्याच इतिहासकारांनी लिहून ठेवलेला आहे. परंतु तो जनमानसात पोहोचवण्यासाठी दृक्श्राव्य माध्यमातून ही माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यासाठी उत्कृष्ट दर्जाची छायाचित्रे आणि व्हिडीओ असणे अत्यंत आवश्यक होते. म्हणून त्यांनी ड्रोन कॅमेरा व व्हिडीओ कॅमेरा खरेदी केला. अभ्यास करण्यासाठी अनेक पुस्तके खरेदी केली. त्यासाठी लागणारा निधी क्राउड फंडिंग द्वारे गोळा केला. त्यांना एका मैत्रिणीने कॅमेरा भेट दिला, तर आईने व पत्नीनेसुद्धा मदत केली अशा प्रकारे जवळ जवळ ५ लाखांपर्यंत मदत मिळाली आहे. परंतु ती पुरेशी नाही. येत्या दसऱ्याच्या दिवशी चिन्मय आपल्या 'दर्या फिरस्ती' संकेतस्थळाचे लोकार्पण करत आहेत. आय आय टी मुंबईत शिकत असताना त्यांनी एक लघुपट बनवला होता. मूळ जर्मनीतील व सध्या राजस्थानात हॉकी शिकविणाऱ्या शिक्षिकेला सोबत घेऊन जर्मनीत व राजस्थानात या लघुपटाचे चित्रीकरण झाले होते. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, छायाचित्रांपेक्षा व्हिडीओ माध्यमातून मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचता येतं. संस्कृती आणि वारसा याबद्दल आवड असल्याने कोकण संस्कृती दाखवण्यासाठी समुद्रकिनारे आणि त्याभोवतालची संस्कृती असा विषय घेतला. रायगड हा विषय निवडून एक विहिओ तयार केला. त्या व्हिडिओला उत्तम प्रतिसाद मिळाला व त्यानंतर दर्या फिरस्तीचे चॅनेल मॉनिटाईझही झाले. कोकणाचा दोन हजार वर्षांचा लिखित इतिहाससुद्धा उपलब्ध आहे, त्या आधारे त्या त्या भागात फिरून तेथील संस्कृती जाणून घेऊन, त्यांची छायाचित्रे व व्हिडीओ घेतले. या फिरस्तीत ऐतिहासिक वास्तू, कोकण दुर्ग, कोकणातील नद्या, वाखाणण्याजोगी व्यक्तिमत्वे, खोदीव लेणी, ग्रामकथा, ग्रामदैवते, इतर धर्मियांची श्रद्धा स्थाने, जागतिक वारसा स्थळे, सागरी किल्ले, खाडीच्या मुखावरचे किल्ले, या साऱ्यांची छायाचित्रे जमवणे, वेगवेगळ्या वेळच्या समुद्राचा आवाज ध्वनीमुद्रित करणे. ओहोटीच्या समुद्र, भरतीच्या लाटांचा खळखळाट, खडकावर आदळणाऱ्या लाटांचा आवाज, उथळ समुद्रातील लाटा या सर्वांचा आवाज वेगळा असतो, त्यासाठी वेगळ्या ध्वनीक्षेपकाची गरज होती. अशा सर्व साधनांची खरेदी करून त्याचा उत्तम रीतीने उपयोग त्यांनी आपल्या व्हिडीओ व छायाचित्रांत केलेला आहे.

1 

प्रत्येक गावात जाऊन समुद्र किनाऱ्यापासून साधारण ५ किलोमीटरच्या प्रदेशातील मंदिरे, लेणी, पुरातत्व वारसा स्थळे यांचा अभ्यास करत तसेच गावकऱ्यांच्या त्या वास्तूंबाबत काय मान्यता आहेत, काय आख्यायिका आहेत, याचा आढावा घेत त्याचा प्रवास पुढे चालू राहतो. सध्या त्यांचे रेवस ते तेरेखोल डॉक्युमेंटेशन करणे सुरु आहे. यानंतर पुढच्या टप्प्यात उत्तर कोकणातील ठाणे आणि मुंबईच्या उत्तरेकडील भाग यांचा अंतर्भाव असेल.
चिन्मय यांचा हा प्रवास असाच प्रवाही राहावा आणि दर्या फिरस्तीच्या माध्यमातून कोकणातील नव्या नव्या गोष्टींचा उलगडा होत राहावा अशा साप्ताहिक विवेक कडून त्यांना सदिच्छा!


1

मृगा वर्तक

मुंबई विद्यापीठातून पत्रकारिता व संज्ञापन विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयांवर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी  विषय घेऊन मुक्तछंदात काव्यलेखनाची आवड.