आर्थिक नियोजनात टाळा चुका

विवेक मराठी    10-Sep-2022
Total Views |
 
आर्थिक नियोजन करताना टाळायला हव्या अशा दहा चुका कोणत्या, या चुकांचे दुष्परिणाम काय होतात, याविषयीची माहिती देणारा लेख.
 
economy
 
आर्थिक नियोजन ही अतिशय महत्त्वाची बाब आहे, ज्याकडे बहुतांश वेळा दुर्लक्ष होते. पण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे - - "If you fail to plan, you are planning to fail'. ह्या उक्तीप्रमाणे आर्थिक नियोजन केलेच पाहिजे आणि ते करत असताना कुठल्या महत्त्वाच्या चुका आहेत, ज्या प्रत्येकाने टाळव्या? तर खालील दहा चुका टाळल्या, तर आर्थिक नियोजन एकदम परिपूर्ण आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही.
 
 
1. पोर्टफोलिओ रीबॅलन्स करण्यात अपयश येणे
 
 
गुंतवणूक कधीही एकाच ठिकाणी करू नये. नेहमी विविध अ‍ॅसेट क्लासमध्ये - म्हणजे सोने, जमीनजुमला, म्युच्युअल फंड, काही प्रमाणात हातात रोख इत्यादी.. गुंतवणूक करावी. मालमत्तेच्या कुठल्याही एका वर्गामध्ये सगळी रक्कम न ठेवता उचित वर्गात उचित रक्कम गुंतवायला हवी. आता हा प्रश्न पडू शकतो की नेमकी कुठल्या वर्गात किती गुंतवणूक करावी? तर आपल्या आर्थिक सल्लागाराची मदत घेऊन, जोखीम घेण्याची क्षमता, लागणारी रोख, भविष्यातील आर्थिक ध्येय, कर्ज, विद्यमान गुंतवणूक ह्या सगळ्याचा विचार करून ते ठरवायला हवे. वय वाढले, एखाद्या कर्जाचा हप्ता संपला अथवा सुरू झाला, बाजारात काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या, घरातील एखादा सदस्य कमी झाला अथवा वाढला.. अशा प्रकारच्या कुठल्याही परिस्थितीत आपल्या पोर्टफोलिओ रीबॅलन्स करून घेणे आवश्यक असते, नाही तर नेमके नको त्या वर्गात जास्त रक्कम झाली आणि गरज असलेल्या वर्गात रक्कम नसेल, तर त्याचे नकारत्मक परिणामसुद्धा होऊ शकतात.
 
 
2. आकस्मिकता निधी (कॉन्टेंजन्सी फंड) तयार ठेवण्यात अपयश
 
 
आकस्मिकता निधी म्हणजे नेमके काय? आपल्याला जगायला लागणारी रक्कम - ज्यात मासिक हप्ता, घरखर्च, वाहन हप्ता (असल्यास) इत्यादी जी खर्च करावीच लागते, ती रक्कम - तो मासिक खर्च गुणिले 6. म्हणजे महिन्याला एखाद्याचा 30 हजार खर्च असेल, तर त्या व्यक्तीकडे आकस्मिकता निधी म्हणून 30 हजार ु 6 = 1 लाख 80 हजार रुपये इतकी रक्कम असावी, जेणेकरून चुकून नोकरी गेली, काही वैद्यकीय अडचण आली आणि आपण 6 महिने काम करू शकणार नाही आहोत, तर अशात किमान 6 महिने घर चालेल एवढा पैसा गाठीशी असायलाच हवा. कारण जर का काही अडचण आली तर ह्याच आकस्मिकता निधीच्या साहाय्याने आपण त्यातून बाहेर निघू शकतो. त्यामुळे जर का कुणाकडे हा आकस्मिकता निधी नसेल तर ही नक्कीच धोक्याची घंटा आहे. हे प्रत्येकाने टाळावे.
 
3. कमी विमा संरक्षण (इन्श्युरन्स कव्हर) असणे
 
इन्शुरन्स आपल्या देशात काही खूप सकारात्मकपणे घेतला जातो असे नाही. आपण गेल्यावर आपल्याला काय? अशी मानसिकता असेल तर नैतिकतेच्या दृष्टीनेसुद्धा चुकीचे आहे, मग ते टर्मचे कव्हर असो, मेडिकलसह कव्हर असो किंवा गाडीचा विमा असो. कमी प्रीमियम लागते म्हणून केवळ थर्ड पार्टी इन्श्युरन्स घेतो. पोलिसांची भीती तर निघून जाते, पण गरज भासल्यास त्याची पूर्तता करणे हे खूप खर्चीक काम होऊन बसते. त्यामुळे कदाचित सुरुवातीच्या काळात प्रीमियमचा भार वाटेल, पण कालांतराने ते खूप सोयीचे ठरेल. आपल्याला नेमके कितीचे कव्हर घायचे, हे एकदा तुमच्या आर्थिक सल्लागाराला विचारून ठेवा.
 
economy

4. आपले आर्थिक ध्येय साध्य करण्यास उशीर करणे
 
गुंतवणुकीची चर्चा झाली आणि एखादे ध्येय 20 वर्षे दूर असेल, तर सहसा आपण विचार करतो की अरे, आणखी 20 वर्षे बाकी आहेत, कुठे आजपासून उगाच पैसे अडकवायचे? पण जसजशी वेळ जवळ येते, तसे ते ध्येय गाठणे कठीण होऊन बसते. 20 तासाऐवजी 10 तासातच ध्येय गाठायला सांगितले तर ते गाठणे कठीण दिसते. एकतर आपला वेग वाढवावा लागेल किंवा ध्येयकाळ तरी कमी करावा लागेल. म्हणजेच काय, आपले ध्येय साध्य करण्याच्या प्रक्रियेला उशीर करू नये. एकदा उशीर झाला तर मग ती वेळ मॅच करणे कठीण होऊन बसते.
 
 
5. गुंतवणुकीच्या पारंपरिक साधनांच्या पलीकडे न बघणे
 
गुंतवणुकीची चर्चा केली तर खूप लोक एकच उत्तर देतात - मेरे पास एलआयसी है. पण ह्या पारंपरिक साधनांच्या पलीकडे बरीच अशी साधने आहेत, जी केवळ महागाईला मागे टाकत नाहीत, तर त्याउप्परसुद्धा परतावा देतात. पण आपली तयारी नसते. कुठल्याही गोष्टीवर विश्वास, त्याबद्दलच्या संपूर्ण माहितीवरून, त्याबाबतच्या अभ्यासावरून येतो. आणि पारंपरिक साधनांच्या पलीकडे न बघणे एकतर भविष्यातील नुकसान आहेच, तसेच ते आपल्या त्या विषयीचे अज्ञान दर्शवते, जे करणे टाळावे.
 
6. भावनेच्या आहारी जाऊन, मित्र-नातेवाईक ह्यांच्यामार्फत गुंतवणूक करणे
 
एक गोष्ट समजायला हवी की आपल्या पैशावर आपल्यापेक्षा जास्त प्रेम कुणी करूच शकत नाही. जर का कुणी केले, तर समजून घ्यायचे की दाल मे कुछ काला है.. त्यामुळे केवळ आणि केवळ अभ्यासावर आपण लक्ष केंद्रित करून उगाच भावनेच्या आहारी जाऊन नातेवाइकांमार्फत, मित्रांमार्फत गुंतवणूक करणे थांबवले पाहिजे.
 
 
economy
 
7. इन्श्युरन्स आणि गुंतवणूक ह्यात गफलत करणे
 
इन्श्युरन्स म्हणजे गुंतवणूक नव्हे, हे प्रत्येकाने समजून घ्यायलाच हवे. कारण इन्शुरन्ससोबत येणार्‍या गुंतवणुकीत काही खूप महान परतावा मिळेल असे वाटत नाही. तेव्हा ही चूक टाळावी. इन्श्युरन्स काढताना टर्म इन्श्युरन्स आणि गुंतवणूक करताना थेट म्युच्युअल फंड अथवा इक्विटी. सहसा ह्या दोन्हींचे मिश्रण असलेल्या प्रॉडक्टची कामगिरी खूप काही चांगली नसते.
 
 
8. सेवानिवृत्तीचे नियोजन करताना महागाईला गृहीत न धरणे
 
सेवानिवृत्तीचे नियोजन करत असताना सहसा ते दीर्घावधीसाठीच असते आणि ह्यात आपण महागाई हा घटक विचारात घेतला नाही, तर आपण ठरवलेले ध्येय गाठूच शकणार नाही, कारण चक्रवाढ व्याजाच्या सूत्रात टक्केवारी दीर्घावधीमध्ये जास्त कमाल दाखवते. अशात महागाई हा घटक विचारात घेतला नाही, तर भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो, ज्याचा विचार करायला हवा.
 
 
 
9. इन्श्युरन्सचे हप्ते भरताना योग्य वारंवारता न निवडणे
इन्शुरन्सचे हप्ते हे मासिकपेक्षा त्रैमासिक बरे, त्रैमासिकपेक्षा अर्धवार्षिक बरे आणि त्यापेक्षा वार्षिक बरे. पण बरेचदा कमी पैसे भरावे लागणार म्हणून आपण मासिक किंवा त्रैमासिक पर्याय निवडतो, ज्याचे कधीकधी भयावह परिणाम दिसू शकतात, तेव्हा ही चूक टाळावी.


10. कर्जाचा हप्ता महिन्याच्या शेवटी भरणे
कर्जाचा हप्ता जेव्हा महिन्याच्या सुरुवातीला भरतो, तेव्हा त्या दिवसापर्यंतचे व्याज लावून आपण हप्ता भरतो. आपण हप्ता भरायला जेवढा उशीर करणार, तेवढा हप्ता वाढेल, कारण चक्रवाढच्या सूत्रात काळ वाढतो. त्यामुळे ते पुन्हा महिन्याच्या सुरुवातील भरणे सुरू करावे लागेल. त्यामुळे हे असे करणेसुद्धा टाळावे.
 
 
ह्या आहेत काही महत्त्वाच्या पण अगदी प्राथमिक बाबी, ज्यात चुका करणे प्रत्येकाने टाळले, तर तुम्ही चांगल्या प्रकारे परिपूर्ण आर्थिक नियोजन करू शकाल. ह्या सणावाराच्या दिवसांत निदान म्युच्युअल फंडात एखादी एसआयपी करून सुरुवात करायला काही हरकत नाही. कुठल्या चुका टाळाव्या हे तर आज बघितले. काही प्रश्न असतील तर संपर्क करून नक्की विचारू शकता. तोवर बिनधास्त गुंतवणूक करा, फक्त जरा जपून!

 
लेखिका आर्थिक गुंतवणूक सल्लागार आहेत.

शिवानी दाणी वखरे
9860133860