सेनेचा धुमसता बालेकिल्ला

विवेक मराठी    15-Sep-2022
Total Views |
 @अभय पालवणकर 
 
दादर, प्रभादेवी, वरळी, लालबाग-परळ हा गिरणगाव परिसर म्हणजे शिवसेनाचा बालेकिल्ला. काही वर्षांपूर्वी येथे शिवसेनेला आव्हान देण्याची कोणत्याही राजकीय पक्षाची हिंमत नव्हती. पण गेल्या काही वर्षांपासून मनसे, भाजपा आणि आता शिंदे गट हे शिवसेनेला शिंगावर घेत असल्याचे चित्र दिसत आहे.
 
vivek
 
शिवसेनेच्या स्थापनेपासूनच सेनेचा बालेकिल्ला म्हणजे गिरणगावातील दादर, प्रभादेवी, माहीम, परळ, वरळी, लालबाग हा भाग! बाळासाहेबांनी एक आवाज दिला तरी लाखोच्या संख्येने शिवसैनिक जमत असत. बाळासाहेबांनी एखादा आदेश दिला तर त्याचे पालन प्रथम गिरणगावातच होत असे. हाडाचे शिवसैनिक काय असतात ते येथील शिवसैनिकाकडे पाहिल्यानंतर दिसून येत असे. ‘अरे आवाज कुणाचा..’ ही घोषणा दिली की, प्रतिध्वनी यायचा तो शिवसेनेचाच. शिवसेना विस्तारली ती येथूनच. पण गेल्या काही वर्षांपासून गिरणगावातील शिवसेनेचा आवाज क्षीण होत चालला आहे. हाडाचे शिवसैनिक शोधून सापडत नाहीत. भाजपा, मनसे यांनी गिरणगावात आपले बस्तान अगदी पद्धतशीरपणे बसवले आहे. शिवसेनेच्या ‘अरे’ला ‘का रे’ करण्याची हिंमत भाजपा-मनसे आणि आता शिंदे गट करू लागला आहे. कधीकाळी शिवसेनेची भाषा चालणार्‍या या भागात आता शिवसेनेचे चालेनासे झाले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील राडा याचेच घोतक आहे. यावरून शिवसेना संपली का? असा प्रश्न येईल; शिवसेना संपली नाही, पण शिवसेनेची दादागिरी संपत चालली आहे, असे दिसून येत आहे. शिवसेना आणि राडा हे समीकरणच आहे. बाळासाहेबांची भाषाच तशी होती. कोणी अंगावर आले तर त्याला शिंगावर घ्या... त्यामुळे या विचारात घडलेले शिवसैनिक नेहमी आपल्या स्टाइलने अंगावर आलेल्या उत्तर देत असत. त्यामुळेच दादर, प्रभादेवी परिसरात अशा प्रकारे राडे अनेक वेळा झाले आहेत.
 
 
vivek
 
बाळासाहेब राजकारणात सक्रिय असेपर्यंत या भागात शिवसेनेच्या ‘अरे’ला ‘का रे’ करण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. पण राज ठाकरे व नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यानंतर शिवसेनाला दादर, प्रभादेवी या भागात शिवसेनाला आव्हान मिळू लागले. याची पहिली ठिणगी पडली ती नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर. नारायण राणे यांना सामना वृत्तपत्रातून लक्ष्य करण्यात आले होते. नारायण यांचे नववधू असे व्यंगचित्र काढून ते प्रसिद्ध करण्यात आले होते. यावरून संतप्त झालेले राणे समर्थक सामना प्रेसवर हल्ला करण्यास आले. लागलीच स्थानिक शिवसैनिकांनी राणे समर्थकांशी दोन हात करीत हा हल्ला परतवून लावला. त्या वेळी आघाडीवर होते आताचे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर. यानंतर राणे समर्थक आणि शिवसेना यांच्यात छोटे-मोठे वाद घडत असायचे. त्यानंतर शिवसेनेला खर्‍या अर्थाने खिंडार पडले ते राज ठाकरे यांच्या बंडानंतर. राज ठाकरे यांनी पक्षाची बांधणीच अगदी शिवसेनेच्या धर्तीवर केली. राज ठाकरे म्हणजे प्रति बाळासाहेब! त्यांचे आचार, विचार आणि कार्यपद्धती यामुळे शिवसेनेतील असंख्य कार्यकर्ते मनसेत आले होते. एकाच परिवारातील फुटीचा परिणाम अगदी असंख्य कार्यकर्त्यांच्या घरात दिसून येत होता. वडील शिवसेनेत, तर मुलगा मनसेत अशी अवस्था होती. दोन्ही पक्षांचा बालेकिल्लाही गिरणगाव, तसेच दोन्ही पक्षांची मुख्य कार्यालये दादरसारख्या मराठमोळ्या भागात. त्यामुळे आपसूकच दोन्ही पक्षांमध्ये पक्षवाढीसाठी स्पर्धा झाली. यातून छोटे-मोठे वाद ठरलेलेच असायचे. यातील सर्वात मोठा वाद झाला होता तो 2007 साली. त्या वेळी बॅनर लावण्यावरून शिवसेना व मनसे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला होता. दगडफेक झाली होती. दोन्ही पक्षांतील मराठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते. त्यानंतर वर्षभर शिवाजी पार्क परिसराला अगदी छावणीचे रूप आले होते. यानंतर दादर-प्रभादेवी या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात छोटे-मोठे वाद होऊन बालेकिल्ला धुमसतच असायचा.
 

vivek 
 
गेल्या वर्षी भाजपाने शिवसेनेला बालेकिल्ल्यात आव्हान दिले. भाजपाच्या माहीम परिसरातील कार्यकर्त्यांनी सामना वृत्तपत्रातून होणार्‍या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना भवनाला घेराव घातला. यामुळे भाजपा आणि सेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यानंतर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाही ‘का रे’ करू लागल्याचे दिसून आले.
 
 
 
आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात राडा झाला. त्यामुळे पुन्हा एकदा हा परिसर धुमसताना दिसून आला. आता शिंदे गटाचे प्रतिसेनाभवन दादर परिसरातच बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे भविष्यात असे वाद झाल्यास नवल वाटायला नको. त्यातच महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या वेळी भाजपा आणि शिंंदे गट एकत्र येऊन निवडणुका लढवल्या जाणार आहेत. त्यामुळे महापालिकेत आपली सत्ता टिकवण्यासाठी शिवसेना जोरदार प्रयत्न करणार, हे निश्चित आहे. त्याचबरोबर भाजपाही शिंदे गटाला सोबत घेऊन पालिकेवर कमळ फुलवण्यास सज्ज झाली आहे. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रभादेवी, दादर परिसर पुन्हा एकदा धुमसताना दिसून येईल, असे दिसते.णार आहे.