चीनमधील दुष्काळ आणि भारत

विवेक मराठी    16-Sep-2022
Total Views |
 @श्रीकांत कुवळेकर। 8369158768
 
 
चीनमध्ये तीव्र उष्णतेची लाट येऊन आज तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. या लाटेच्या तडाख्यात 45 लाख चौ. किलोमीटरचे क्षेत्र - म्हणजे या महाकाय देशाचा जवळपास अर्धा भूभाग आला आहे. देशाच्या उत्तरेला असलेल्या हुबेई प्रांतानंतर हा दुष्काळ मध्य आणि दक्षिण भागात पसरला आहे. या दुष्काळाची तीव्रता लक्षात घ्यावी, तर 66 नद्या जवळपास आटल्या आहेत. या दुष्काळामुळे निर्माण होणार्‍या अन्नटंचाईमुळे भारतासह अनेक देशांची अन्नसुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे.

china

जागतिक तापमानवाढीमुळे होणार्‍या हवामान बदलांमुळे कृषी क्षेत्रच नव्हे, तर एकंदरीतच अर्थव्यवस्थांवर विपरीत परिणाम होणार, तसेच तापमानवाढीचा परिणाम होऊन समुद्राची पातळी वाढून अनेक शहरे बुडणार.. जगाच्या एका भागात प्रचंड महापूर आणि दुसर्‍या भागात तीव्र दुष्काळ अशा घटनांचा शेतीवर विपरीत परिणाम होऊन अन्नसुरक्षा धोक्यात येणार.. असे एक ना अनेक अहवाल मागील दशकात प्रसिद्ध झाले. त्यातून संपूर्ण मानवजातीला पुढील 25-50 वर्षांत येऊ घातलेल्या संकटांचे इशारे आणि त्यांचा सामना करण्यासाठी सिद्ध करण्याच्या दृष्टीने घ्यावे लागणारे कठोर निर्णय याबाबत ऊहापोह केलेला असायचा. अर्थात किमान 25 वर्षांनी येणार्‍या संकटांची आणि पुढल्या पिढीच्या भविष्याबाबत काळजी करावी, ही आपल्याच पिढीच्या कल्याणाबाबत जागरूकतेचा अभाव असलेल्या लोकांकडून अपेक्षा करणेदेखील फोल आहे.
 
 
परंतु पुढील दोन-तीन दशकांमध्ये येऊ घातलेले हवामान बदलाचे संकट प्रत्यक्ष 2-3 वर्षांतच आपल्यापर्यंत येऊन थडकेल, याची कुणालाच कल्पना नसावी. यामध्ये 2020 साली आलेल्या कोरोना साथीचा उद्भव नक्की कसा झाला, त्यात हवामान बदलाचा काही संबंध आहे किंवा नाही, किंवा पुढील काळात हवामान बदलामुळे अशाच प्रकारचे जीवघेणे साथीचे रोग येतील का.. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यातच राहतील. परंतु या साथीच्या साथीनेच हवामान बदलामुळे प्रलयांची आणि तीव्र दुष्काळाची मालिकादेखील सुरू झाली आहे आणि कोरोना जवळपास नाहीसा झाला असला, तरी हवामान बदलाचे परिणाम सरल्या दिवसागणिक अधिक तीव्रतेने होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यातून कुणीही सुटलेला दिसत नाही. फक्त काही जण सुपात आहेत, एवढेच. सर्वच जगातील शेती संकटात सापडली असून अन्नोत्पादनात घट स्पष्ट दिसत आहे. अमेरिका खंडातील कॅनडा, ब्राझिल, अर्जेंटिना आणि पॅराग्वे यासारखे जगाला खाद्यतेल आणि पशुखाद्य पुरवणारे देश दोन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करताना दिसत आहेत. कॅलिफोर्नियात ऊर्जासंकट, पाणीसंकट आणि उष्णतेचा उच्चांक आणि वीजटंचाई यांचा सामना करताना या संपन्न प्रांताच्या नाकी नऊ आले आहेत. तेथील महाकाय वणव्यांमध्ये हजारो किलोमीटर्सची जंगलसंपत्ती नष्ट होत आहे.
 

china
16 September, 2022 | 14:11
 
आशियाबाबत बोलायचे, तर इंडोनेशियाला आपली राजधानीच जकार्तामधून हलवण्याची पाळी आली आहे. कारण समुद्राच्या पातळीत होणार्‍या वाढीमुळे ते शहर पाण्याखाली जाण्याची प्रक्रिया सुरू झालीच आहे. अलीकडील काळात जपान, दक्षिण कोरिया आणि पाठोपाठ बांगला देशदेखील हवामान बदलाच्या तडाख्यात सापडल्याने तेथे प्रचंड नुकसान झाले आहे. तर पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे देशाचा 35% भाग अनेक दिवस पाण्याखाली बुडून राहिला. त्यामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले, 2 कोटी लोक बेघर झाले असून पुरामुळे निदान 30 अब्ज अमेरिकी डॉलर्सचे म्हणजे 240,000 कोटी रुपयांचे तरी नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परंतु संपूर्ण जगामध्ये आपल्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षेने आणि जागतिक व्यापारातील आधिक्य टिकवण्याच्या दृष्टीने सतत कुरापती काढीत राहणार्‍या चीन या बलाढ्य देशालाच आता अभूतपूर्व दुष्काळाचा सामना करावा लागतोय.
 
 
china
 
चीनमधील दुष्काळाची व्याप्ती
 
 
चीनमध्ये तीव्र उष्णतेची लाट येऊन आज तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. या लाटेच्या तडाख्यात 45 लाख चौ. किलोमीटरचे क्षेत्र - म्हणजे या महाकाय देशाचा जवळपास अर्धा भूभाग आला आहे. देशाच्या उत्तरेला असलेल्या हुबेई प्रांतानंतर हा दुष्काळ मध्य आणि दक्षिण भागात पसरला आहे. या दुष्काळाची तीव्रता लक्षात घ्यावी, तर 66 नद्या जवळपास आटल्या आहेत. काही भागातील तापमान 500 वर्षांतील सर्वाधिक असून पावसाचे प्रमाण 1961 सालात रेकॉर्ड करण्याची व्यवस्था सुरू झाली, तेव्हापासून सर्वात नीचांकी पातळीवर आले आहे. तापमानवाढीमुळे मोठ्या प्रमाणावर वणवे लागल्याने त्यात जंगलसंपत्तीची मोठी हानी झाली आहे. एकीकडे ही अवस्था असतानाच देशाच्या मंगोलिया आणि युन्नान यासारख्या काही प्रांतांना मागील महिन्यात वादळी पावसाने झोडपून काढले आहे.
 
 
 
आटलेल्या 66 नद्यांपैकी महत्त्वाची म्हणजे यांगत्से नदी. लांबीच्या मापदंडाने जगातील तिसर्‍या क्रमांकाची ही नदी असून 40 कोटीहून अधिक लोकसंख्येला पिण्याचे पाणी पुरवणार्‍या या नदीचा काही भाग संपूर्ण आटल्यामुळे लोक सुक्या पात्रात चालताना दूरचित्रवाणी वाहिन्यांवर अनेकदा दाखवले जात आहे. तेवढ्यावरच ही गोष्ट थांबत नाही, तर या नदीचे चीनच्या बलाढ्य अर्थव्यवस्थेमध्ये मोठे स्थान आहे. या नदीवर मोठ्या प्रमाणात जलविद्युत प्रकल्पांचे जाळे उभारलेले आहे, तसेच या नदीतून मोठ्या प्रमाणात वाहतूकदेखील चालते. परंतु नदी आटल्यामुळे अनेक कंपन्यांना आपले कामकाज थांबवावे लागले आहे, तर सिचुआन प्रांतांमधील 80% जनतेला वीजटंचाईचा शॉक बसला आहे. या संपन्न देशाला कधी विजेचे रेशनिंग करावे लागेल, असा कुणी स्वप्नातदेखील विचार केला नसेल. परिस्थिती इतकी चिंताजनक बनली की अखेर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ड्रोनची 75 उड्डाणे योजली गेली आणि त्यातून 15 लाख चौ.किलोमीटर क्षेत्रावर क्लाउड सीडिंग तंत्रज्ञानाचा वापर केला गेला.
 

china 
 
कृषी क्षेत्रावरील परिणाम
 
 
अशा प्रकारचा तीव्र दुष्काळ पडल्यास मोठ्या प्रमाणावर केवळ पावसावर अवलंबून असलेल्या भारतातील शेतीउत्पादनावर काय होतो, हे आपण 2016 किंवा 2007मधील दुष्काळसदृश वर्षांमध्ये अनुभवले आहे. कधी अव्वाच्या सव्वा भावाने गहू आयात करावा लागला होता, तर कधी कडधान्यांच्या आणि डाळींच्या किमती गगनाला भिडल्यामुळे त्यांचीदेखील आयात करावी लागली होती. परंतु त्या मानाने चीनमधील धान्यउत्पादनात मोठी घट येणार नाही, असे खुद्द चीनने आणि ‘फीच’सारख्या जागतिक संशोधन संस्थांनी म्हटले आहे. असेही चीनमधील नकारात्मक माहिती विशेष बाहेर जात नाही. तसेच देशांतर्गत प्रसिद्ध केलेल्या माहितीवर खुद्द चिनी लोकदेखील फारसा विश्वास ठेवत नाहीत. परंतु ब्लूमबर्गसारख्या प्रसिद्धी माध्यमांच्या बातम्या आणि काही संशोधन संस्था यांच्या अहवालानुसार चीनमधील तांदळाचे उत्पादन 1 ते 1.4 कोटी टनांनी कमी होऊ शकते - म्हणजे जेमतेम 5% घट येऊ शकेल. तर मक्याच्या उत्पादनात 2-3% म्हणजे 50-70 लाख टन एवढीच घट येईल. चीनच्या सुमारे 67 कोटी 50 लाख टन वार्षिक अन्नधान्य उत्पादनात तांदूळ, गहू आणि मका यांचा वाटा सुमारे 90% एवढा आहे. तरीही अन्नधान्यातील अपेक्षित घट आयातीद्वारे भागवता येऊ शकेल. असे असले, तरी हवामानविषयक परिस्थितीत मोठा बदल झाला नाही, तर पुढील काळातील पिकांवर त्याचा नक्कीच परिणाम होईल. कारण लोकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी शेतीला जाणारे पाणी थांबवण्याची वेळ काही प्रांतांत येणे अशक्य नाही.
 
 
मागील वर्षभरात जगात महागाईचा आगडोंब उसळलेला असताना चीन महागाईला लगाम घालण्यात यशस्वी झाला होता. परंतु आता मात्र परिस्थिती बिकट होऊ लागली आहे. जलविद्युत क्षमता कमी झाल्यामुळे कोळशावरील वीजनिर्मिती वाढवावी लागत आहे. कोळशाच्या दामदुप्पट झालेल्या किमतींमुळे प्रचंड खर्च आणि कार्बन उत्सर्जनात मोठी वाढ या समस्यांशी देशाला झुंजावे लागत आहे. अनेक कंपन्या बंद पडून कामगार बेकार होत आहेत. आधीच रिअल इस्टेट क्षेत्र कर्जसापळ्यात सापडल्यामुळे मोठी उलथापालथ होऊन त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक संकटांचा मुकाबला करतानाच त्याहून मोठे संकट देशावर आल्यामुळे सरकारची चिंता वाढली असल्यास नवल नाही. परंतु जागतिक मंदीने ग्रासलेल्या पाश्चिमात्य अर्थव्यवस्थांवर आणि जागतिक कमोडिटी, शेअर्स आणि चलन बाजारावर त्याचे काय परिणाम होतील, याबाबत चिंता व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत.
 
 
भारतातील परिस्थिती
 
 
चीनमधील दुष्काळामुळे भारताला फार मोठे फायदे होतील अशी परिस्थिती नाही. कारण भारतात एवढा तीव्र दुष्काळ नसताना केवळ महिन्याभराच्या उष्णता लाटेमुळे गव्हाच्या उत्पादनात किमान 70 लाख ते 1 कोटी टन घट अपेक्षित आहे, तर तांदळाचे उत्पादनदेखील अनुमानापेक्षा 1-1.2 कोटी टन कमी होईल, असे स्पष्ट होत आहे. या दोन्ही कमोडिटीजच्या निर्यातीवर याआधीच बंदी घातली असून गव्हाची निर्यात सोडाच, पण हंगामाअखेर आपल्याला आयात करावी लागेल असेही म्हटले जात आहे. नाही म्हणायला मक्यामध्ये निर्यातीला संधी आहे आणि 10-20 लाख टन मका चीनला लागल्यास देणे शक्य होईल. परंतु सरकारी पातळीवर असा निर्णय होणे कठीण आहे. कारण देशांतर्गत मक्याच्या किमती उच्चांकी स्तरावर असल्यामुळे स्टार्च उत्पादक आणि पोल्ट्री कंपन्या आधीच तोट्यात चालल्या आहेत. परंतु कृषी क्षेत्राबाहेर पाहता अनेक परकीय कंपन्या त्यांचा कारभार भारताकडे वळवण्याची शक्यता आहे. यामध्ये केमिकल, इलेक्ट्रॉनिक आणि औषध क्षेत्र हे महत्त्वाचे उद्योग समाविष्ट आहेत.
 
 
 
एकंदरीत पाहता चीनची डोकेदुखी भारताला फायदेशीर ठरण्याची फारशी शक्यता नसली, तरी जर चीनने कृषिमालाची आयात मोठ्या प्रमाणात सुरू केली, तर अन्नधान्याच्या किमतींमधील महागाई अधिक तीव्र होऊ शकेल आणि त्यातून अनेक देशांची अन्नसुरक्षा धोक्यात येईल, हे नक्की. त्यामुळे पुढील तीन महिने चीनमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याची सर्वच देशांना गरज आहे.