गौरवशाली शब्द-स्मारके

विवेक मराठी    16-Sep-2022
Total Views |
 @प्रिया सामंत (writetopriyasamant@gmail.com)
 
 
हे नावाचे स्वदेशीकरण जुन्या संदर्भांना सत्याशी जोडताना तळटीपांची यादी मोठी करेल. पण ह्या लांबलेल्या तळटीपांकडेही एक इतिहास असेल. नव्या रंगलेल्या फलकांवर आपल्या कथेचे सत्य त्रिकाल झळकेल. फलकांवरचे नवे शब्द सत्याची आवर्तने उठवेल. आपल्या गौरवशाली इतिहासाला विस्मरणाच्या शापातून मुक्त करेल. कारण.... हे नामाचे स्वदेशीकरण केवळ शब्द नसून ही आहेत गौरवशाली शब्द-स्मारके!
 

rajpath 
ऑगस्टची ती रात्र होती. बाहेरचा कानोसा घेत दहा-बारा तरुण हातोडे, छिन्नी घेऊन मार्गस्थ झाले. गल्लीबोळातून वाट काढत ते एका विस्तीर्ण, निर्जन मार्गाशी आले. जवळच मोठ्ठाल्या कमानीपाशी एक दगडी छत्री उभी होती. त्या छत्रीखालचा संगमरवरी पुतळा पाहताच सारे जागीच थबकले! पौर्णिमेच्या चांदण्यात तो पांढरा पत्थर जिवंत वाटत होता. त्याच्या डोळ्यांतले थंड जीवघेणे क्रौर्य पाहून त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला, तसा एक सरसर वर चढला. छिन्नी-हातोड्याचे घाव खणखणले. मुकुट, कान, नाक खडकले. सोबत आणलेले डांबर एकाने पुतळ्यावर ओतले. अंधारात गायब होण्यापूर्वी एकाने नेताजींचे चित्र पुतळ्याच्या चेहर्‍यावर चिकटवले.
 
 
 
rajpath
 
हा प्रसंग होता स्वतंत्र भारताची राजधानी दिल्लीतला, 1965 सालचा! जेव्हा स्वतंत्र भारताला 18 वर्षे पूर्ण होऊनही गुलामीची मानसिकता त्याला जखडून होती. त्या वेळी इंडिया गेटपाशी दिमाखात उभा असलेला ब्रिटनच्या राजाचा पुतळा भारताच्या लोकशाहीला जणू हसत होता. जॉर्ज पंचमच्या चेहर्‍यावर त्याच्याविरुद्ध शस्त्र उचलणार्‍या INAचे सेनापती सुभाषचंद्र बोस यांचे चित्र लावले होते! ह्या दहा-बारा तरुण पोरांच्या चमूचे नाव होते संयुक्त समाजवादी पार्टी, ज्याचे संस्थापक होते जॉर्ज फर्नांडिस! असे म्हणतात की जॉर्ज फर्नांडिस यांची आई ब्रिटनच्या राजाची चाहती होती. बाळाचा जन्मही राजाच्या वाढदिवशी, म्हणून नाव ठेवण्यात आले होते जॉर्ज! परंतु ह्या जॉर्जने मातृभूमीचा मान राखण्याचे ठरवले. त्याच्या चमूने इंडिया गेटसमोर जुलमी राजास तोडून स्वाभिमानाचे मूर्त रूप स्थापित केले.
 
 

rajpath

स्वातंत्र्याचे, ऐतिहासिक वारशाचे
नवे स्मृतिचिन्ह
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा

 
ह्याआधीही 1942-43च्या छोडो भारत आंदोलनात मन्नुभाई शाह व हेमवती नंदन बहुगुणा ह्यांनी जॉर्ज पंचमच्या ह्या पुतळ्यावर चढून त्याचे नाक तोडले होते. त्यावर ‘डेथ टू द टायरंट’ म्हणजे जुलमी राजाला मृत्युदंड असे लिहिलेला एक मोठा काळा झगा घालून दोघे अंधारात पसार झाले. महिन्याभरापूर्वी ह्या जोडीने आपल्या साथीदारांसह दिल्ली व आसपासच्या सुमारे 5000 रस्त्यांची नावे एका रात्रीत बदलली होती. ज्या रस्त्यांना ब्रिटिश अधिकार्‍यांची नावे होती, तेथे आपल्या स्वातंत्र्यसेनानींच्या नावाची पोस्टर्स चिकटवण्यात ते यशस्वी झाले होते. ही पोस्टर्स हिंदुस्थान टाइम्सच्या प्रेसमध्ये छापण्यात आली होती. पोस्टर्स छापण्यासाठी मदत करणारे होते हिंदुस्तान टाइम्सचे संपादक देवदास मोहनदास गांधी! पुढे स्वतंत्र भारतात शाह व बहुगुणा ह्यांना काँग्रेसमार्फत कॅबिनेट मंत्रालये देण्यात आली.
 

हिंदुत्व म्हणजे नक्की काय....?
साप्ताहिक विवेकच्या आगामी 'हिंदुत्व' ग्रंथातून नेमकं हेच उत्तर आपल्याला मिळणार!
"हिंदुत्व ग्रंथ" नोंदणी अभियान
https://www.evivek.com/hindutva-granth/

 
 
 
एडविन लुटेन्स आणि हर्बर्ट बेकर ह्यांनी ब्रिटिशांची राजधानी दिल्लीत उभारली. इंडिया गेट, व्हाइसरॉय हाउस, हाउस ऑफ पार्लमेंट, कॉर्नेशन पार्क.. सर्वत्र आपल्या पारतंत्र्याची स्मृतिचिन्हे उभी राहिली. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय जनसंघाने, समाजवादी नेत्यांनी व सामान्य जनतेने नेहरू सरकारवर ब्रिटिशांचे पुतळे हटवून तेथे राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांसारख्या भारतीय क्रांतिवीरांचे पुतळे उभारण्यासाठी दबाव आणला. मात्र पंतप्रधान नेहरू आपल्या धोरणावर ठाम राहिले. आंतरराष्ट्रीय तेढ उद्भवणार नाही अशी खबरदारी बाळगूनच जमेल तेवढी राष्ट्रीय सद्भावना जपण्याचे नेहरूंनी निश्चित केले! ऐतिहासिक नोंदीनुसार, नेहरूंना पुतळ्यांवरून ब्रिटनशी असलेले आपले राजकीय, आर्थिक संबंध ताणले जाण्याची भीती वाटत होती. पुढे 1959 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर भारतभेटीवर आले, तेव्हा स्वतंत्र भारताच्या राजधानीत किंग जॉर्ज पंचमचा पुतळा पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांना प्रश्न पडला की स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळात अमेरिकेने किंग जॉर्ज तृतीयचा पुतळा सहन केला असता?
 
 
rajpath
 
इंडिया गेटजवळचा हाच परिसर पंतप्रधान मोदींनी देशाचा Power Corridor असल्याचे जाणले आणि त्यांनी 2019मध्ये सेंट्रल व्हिस्टा प्रॉजेक्टची घोषणा केली. ल्युटिअन्स दिल्लीचा वसाहतवादी वारसा मोडीत काढून, पारतंत्र्याच्या प्रतीकांचे रूपांतरण भारतीय परंपरांनुसार, विचारांनुसार करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प फार महत्त्वाचा आहे. राष्ट्रपती भवन, पंतप्रधान निवास, संसद भवन, केंद्रीय सचिवालयाची वास्तू यांच्या व परिसराच्या नूतनीकरणाचा मोदींचा हा प्रकल्प 2024पर्यंत पूर्ण होईल.
 
 
त्या काळी इंडिया गेटपासून व्हाइसरॉय हाउसकडे (आताचे राष्ट्र्पती भवन) जाणारा मार्ग King's way म्हणून प्रचलित होता. ‘राजपथ’ हे नेहरूंच्या काळात झालेले त्या King's wayचे नामकरण स्वदेशीकरण नव्हते, तो केवळ स्थानिक भाषेतील अनुवाद होता. ह्या मार्गाने अनेक स्थित्यंतरे पाहिली. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अनुभवला, पर्यटकांचा आनंद साजरा केला. लोकशाही सरकारविरोधी आंदोलनेही झेलली. ह्या मार्गाचे ‘राजपथ’चे ‘कर्तव्य पथ’ हे केवळ नामांतर नाही. आपल्या देशाने पारतंत्र्याकडून लोकशाहीकडे केलेल्या वाटचालीचे ते द्योतक आहे. आज आपला देश जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून गणला जात असताना ब्रिटन मात्र अजूनही घटनात्मक राजेशाहीत अडकला आहे. मोदींचा हा ‘कर्तव्य पथ’ देशाचे नेतृत्व करणार्‍या पक्षाला सत्ताधारी न बनता ‘सेवक’ म्हणून कार्यरत राहण्याचे, तर देशाच्या नागरिकाला मूलभूत अधिकार उपभोगताना ‘कर्तव्यदक्ष’ होण्याचे कायम सूचित करेल.
 
 
rajpath
 
मोदींच्या ह्या पॉवर कॉरिडॉरची, तिथल्या रस्त्यांच्या नावबदलाची बरीच खिल्ली उडवली जात आहे. कारण नेहरूंच्या काळात पोसलेली वसाहतवादी मानसिकता आजही टिकून आहे. क्रूर परदेशी राज्यकर्त्यांकडे आदराने पाहणारे, त्यांच्याशी संबंध जपण्याकरिता देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान दुय्यम मानणारे, राजकीय स्वार्थासाठी महापुरुषांचा अपमान करणारे ढोंगी आजही शिल्लक आहेत. हे सारे पाहिले की पद्मभूषण लेखक कमलेश्वर सक्सेना ह्यांची ‘जॉर्ज पंचम की नाक’ ही कथा आठवते. ती कथा थोडक्यात अशी आहे की ब्रिटनची राणी एलिझाबेथ नवर्‍यासोबत भारताच्या दौर्‍यावर निघते. राजधानीत तिच्या शाही स्वागताची जय्यत तयारी सुरू होते. वृत्तपत्रे बारीकसारीक तपशिलाने बरबटून निघतात. तेवढ्यात कुणाचे लक्ष इंडिया गेटकडच्या जॉर्ज पंचमच्या तुटल्या नाकाकडे जाते. ताबडतोब पुतळा दुरुस्त करण्याची मोहीम हाती घेतली जाते. शिल्पकार भारतभर फिरतो. राजासारखा पांढरा दगड देशात कुठेच सापडला नाही, म्हणून हताश होऊन माघारी येतो. राजधानीतला सभापती त्याला गुपचुप भारतीय क्रांतिकारकांच्या, महापुरुषांच्या पुतळ्याचे नाक तोडून आणावयास सांगतो. शिल्पकार पुन्हा हताश होऊन परततो, कारण ‘सभी की नाक जॉर्ज पंचम की नाक से बडी निकली!’ सभापती त्यास शहीद झालेल्या लहान मुलांचे नाक आणायला धाडतो, तीदेखील राजाच्या नाकापेक्षा कैक पट मोठी भरतात! आता मोठी अक्कल लढवली जाते. चाळीस कोटी जनतेपैकी कुणाचेही नाक कापून आणायचे ठरते. खरे नाक पुतळ्याला चिकटवले जाते. ते सडू नये, म्हणून पुतळ्याच्या आजूबाला थंडाव्यासाठी पाणी भरले जाते. ते पुन्हा कुणी तोडू नये, म्हणून सैनिक सज्ज होतात. वृत्तपत्रात बातमी छापून येते.. पुतळ्याला खरे नाक कापून लावल्याची! समारंभाच्या दिवशी मात्र वृत्तपत्रे रिकामी राहतात. कुणाचे न आगमन होते, न स्वागत! एका पुतळ्यासाठी चाळीस कोटी जनतेचे नाक कापले जाते.
 
 
 
जॉर्ज पंचमचा तो भग्न पुतळा नेहरूंच्या निधनानंतर हलवण्यात आला. पुतळ्याची ती जागा पुढे अनेक वर्षे रिक्त होती. तिथे गांधींचा पुतळा उभारण्याची विनंती पंतप्रधान इंदिरा गांधींनी मात्र कायम नाकारली. आज मोदींनी तिथे नेताजींचा पुतळा उभारून भारतीय जॉर्जचे स्वप्न पूर्ण केले आहे.
 
 
rajpath
 
इथे आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की नेताजींच्या इंडियन नॅशनल आर्मी (INA)चे सैनिक प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सर्वप्रथम 2019 साली सहभागी झाले! काँग्रेस काळात उपेक्षित राहिलेल्या, वयाची नव्वदी उलटलेल्या ह्या जवानांना नरेंद्र मोदींच्या सरकारने सन्मानित केले. सन्मान, स्वाभिमान केवळ नामबदलापुरता संकुचित राहिला नाही. तो जना-मनात उतरला.
 
 
 
शहरांचे, मार्गांचे नाव बदलणे ही काही नवीन बाब नाही. विजयाचे प्रतीक, शासनकर्त्याची आठवण म्हणून जगात ठिकठिकाणची नावे बदलली गेली. वसाहतवाद्यांना तर हे नामकरण हक्क गाजवण्यासारखेच होते. जेते आले-गेले, नावे बदलत राहिली. लोकशाहीत नामकरण Power Politicsचा भाग बनले. परंतु ज्यांच्या पूर्वजांना त्यांच्या मातृभूमीतून हाकलून देण्यात आले, अस्तित्वाच्या लढाईत कत्तली, गुलामी, सांस्कृतिक नरसंहार ज्यांच्या नशिबी आला, त्यांचे वंशज असलेल्या आपण हिंदूंचे काय? आपल्यासाठी हे नामबदल आपल्या स्वातंत्र्याची, आपली भाषा-संस्कृती-परंपरा यांच्या आणि जीवनशैलीच्या पुन:स्थापनेची, त्याच्या नूतनीकरणाच्या व्यापक संघर्षाची गाथा सांगते.
 
 
एखाद्या ठिकाणाचे नाव तिथल्या चेतनेला शब्दरूप देते - जसे अयोध्या म्हटले की हसर्‍या रामलल्लाची छबी प्रकट होते. त्या स्थळाचे पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक किंवा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे सामर्थ्य त्याच्या नावात असते. तो वारसा त्याच्या नावामुळेच आपल्या दैनंदिन जीवनात सहज प्रवेश करतो, आपल्या दृष्टीकोनाचा तो आधार बनतो, तिथल्या मातीशी आपले नाते घट्ट करतो.
 
 
अलीकडेच भारतीय नौदलाच्या झेंड्याचे स्वदेशीकरण झाले. ब्रिटनच्या ध्वजाशी साम्य असलेल्या जुन्या झेंड्याला रद्दबातल ठरवण्यात आले. भारतीय नौदलाच्या झेंड्यावर आता देशाचे पहिले आरमार उभारणार्‍या शिवरायांच्या बोधचिन्हाचा समावेश करण्यात आला. ऐतिहासिक वारसा जपण्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
 
 
 
कुठल्याही कथानकाची दोन अंगे असतात - सत्य आणि असत्य. सत्याला म्हणे नग्नतेचा श्राप असतो, म्हणून ते कदाचित जीर्ण बखरीत, दूर निर्जन स्थळी बांधलेल्या प्रयोगशाळेत लपून राहते. लाखांत कुणी एक योगी सत्य जगासमोर आणायला आपले आयुष्य वेचतो, तरी गलिच्छ राजकारणात ते पुन्हा दडपले जाते. विस्मरणात जाते. असत्य मात्र उजळ माथ्याने लोकांमध्ये वावरताना दिसते. लोककथेत रमणार्‍या अज्ञानी समाजाला तेच खरे भासते. मग उंचाले ध्वज फडकवले जातात, पुतळे उभारले जातात. सत्याला प्रकाशात आणण्याचे प्रयत्न सुरू होतात. त्यावरही आक्षेपांचे लोटच्या लोट येतात, खर्चाचे आकडे फुगवून भुकेल्याला जेवू घाला म्हणतात! मग कुणी शक्कल लढवते. शहर, मार्गांची नावे बदलली जातात. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर होते. King's wayला कर्तव्य पथ म्हटले जाते. देशाचा प्रधान सेवक Race Course Road न राहता आता कायम ‘लोककल्याण मार्गा’वर राहू लागतो. कुठलाही भेदभाव न करता राष्ट्राच्या, समाजाच्या व आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी कर्तव्यनिष्ठ राहण्यासाठी प्रेरित करतो.
 
 
 
नावाच्या स्वदेशीकरणाच्या मोहिमेतली खर्चाव्यतिरिक्त आणखी एक त्रुटी म्हणजे आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक संदर्भात ह्यांना स्थान नसते. उदाहरणार्थ, ऐतिहासिक नकाशात ‘प्रयागराज’ हे ‘अलाहाबाद’ नावेच असेल! हे नावाचे स्वदेशीकरण जुन्या संदर्भांना सत्याशी जोडताना तळटीपांची यादी मोठी करेल. पण ह्या लांबलेल्या तळटीपांकडेही एक इतिहास असेल. नव्या रंगलेल्या फलकांवर आपल्या कथेचे सत्य त्रिकाल झळकेल. फलकांवरचे नवे शब्द सत्याची आवर्तने उठवेल. आपल्या गौरवशाली इतिहासाला विस्मरणाच्या शापातून मुक्त करेल. कारण....
 
 
हे नामाचे स्वदेशीकरण केवळ शब्द नसून ही आहेत गौरवशाली शब्द-स्मारके! जय हिंद!