‘अमन’चे स्वप्न पाहणारी जम्मू-काश्मीरची युवा पिढी

विवेक मराठी    16-Sep-2022   
Total Views |
प्रधानमंत्री स्पेशल स्कॉलरशिप स्कीम (PMSSS) या योजनेअंतर्गत मुंबईतील वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये पदवी शिक्षण घेणार्‍या जम्मू-काश्मीरधील विद्यार्थ्यांशी संवादाच्या कार्यक्रमाचे पॉलिसी अ‍ॅडव्होकेसी अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर्स (पार्क)च्या वतीने 10 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्याद्वारे आपल्या भागाचा उत्कर्ष साधण्याचा आशावाद या विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला.

kashmir
 
अस्थिरतेच्या, असुरक्षिततेच्या धुक्यात अनेक दशके अडकलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये आता स्थैर्याची, विकासाची किरणे अगदी आतपर्यंत पोहोचू लागलीत याची साक्ष देणारा एक कार्यक्रम नुकताच अनुभवता आला. विवेक समूहाच्या पॉलिसी अ‍ॅडव्होकेसी अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर्स (पार्क)च्या वतीने जम्मू-काश्मीरमधून मुंबईत महाविद्यालयीन शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांशी गप्पांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पार्कबरोबरच फाउंडेशन फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट इन अ‍ॅकॅडेमिक फिल्ड (FHDAF) व गुलशन फाउंडेशन या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.
 
 
 
जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांना भारताच्या कोणत्याही भागात पदवी शिक्षण घेण्यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री स्पेशल स्कॉलरशिप स्कीम (PMSSS) ही योजना रावबली जाते. या योजनेअंतर्गत मुंबईतील वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये शिकत असलेले 14 विद्यार्थी या कार्यक्रमात आले होते आणि आपले अनुभव, आपली स्वप्नं याविषयी भरभरून बोलत होते.
 
 
16 September, 2022 | 15:4
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 व 35 अ हटवल्यापासून या भागातील नागरिकांवर कसा अन्याय होतोय हे ओरडून ओरडून सांगणारे लोक या केंद्रशासित प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार ज्या काही योजना राबवत आहे, त्याविषयी क्वचितच बोलतील. तिथे होत असलेल्या विकासाकडे, निर्माण होत असलेल्या नव्या संधींकडे आणि तिथे घडत असलेल्या सकारात्मक बदलांकडे ते तुमचं लक्ष वेधणार नाहीत. ही वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी फाउंडेशन फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट इन अ‍ॅकॅडेमिक फिल्ड (FHDAF) किंवा गुलशन फाउंडेशन किंवा पार्क यांसारख्या त्या भागासाठी आणि तेथील लोकांसाठी प्रत्यक्ष काम करणार्‍यांचे अनुभव ऐकावे लागतील. नाहीच तर तिथल्या नव्या पिढीच्या बदलेल्या दृष्टिकोनाचे साक्षीदार व्हावे लागेल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तेच घडले.
 
 
जम्मू-काश्मीर प्रशासानासाठी क्रीडा धोरण तयार करणे, तेथील शेतकर्‍यांच्या मालासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे आदी पार्कचे जम्मू-काश्मीरमधील काम परिचयाचे होतेच. पार्कमध्ये या कामाच्या प्रमुख असलेल्या रुचिता राणे यांनी त्याविषयीची आणि पार्कच्या एकूणच कामाची माहिती यावेळी दिली.
 
 
FHDAFही दिल्ली स्थित सेक्शन 8 अंतर्गत चालणारी आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी सामाजिक संस्था आहे. देशभरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अडचणी सोडवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून ही संस्था काम करते. माधुरी सहस्रबुद्धे या संस्थेच्या संस्थापक आहेत. या संस्थेच्या सक्रीय कार्यकर्ता असलेल्या सीए शीतल वैद्य आणि भारती भिडे यावेळी उपस्थित होत्या. सीए शीतल वैद्य यांनी जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांसाठी केल्या जाणार्‍या कामाची माहिती यावेळी दिली.
 
 
सीए शीतल वैद्य म्हणाल्या, “2016पासून आम्ही जम्मू -काश्मीरच्या विद्यार्थ्यांसाठी काम करत आहोत. हे काम आम्ही मातृत्वाच्या भावनेने करतो. त्यात कोणाचाही राजकीय किंवा अन्य हेतू नसतो. या संस्थेसाठी काम करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते, मग ते स्त्री असो किंवा पुरुष आम्ही मातृत्वाच्या भावनेने हे काम करतो. कारण जिथे आई असते, तिथे स्वार्थ नसतो. आई सर्वांच्याच भल्याचा विचार करते. जरी एखादा वाईट अनुभव जरी आला, तरी ती त्यातूनही चांगलंच करणार.”
 

kashmir
 
PMSSS या योजनेच्या अंमलबजावणीतही ही संस्था मोलाची कामगिरी बजावत आहे. कारण कितीही चांगली योजना असली तरी जास्तीत जास्त गरजूंपर्यंत ती पोहोचल्याशिवाय ती यशस्वी होत नाही. त्याबाबत शीतल वैद्य म्हणाल्या, “या संस्थेच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही दोन महत्त्वाच्या गोष्टी आम्ही करू शकलो. एक म्हणजे आमच्या संस्थेच्या पुढाकारामुळे प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी (PMSSS) येणार्‍या अर्जांमध्ये गेल्या काही वर्षात लक्षणीय वाढ झाली. हे आमचे महत्त्वाचे यश आहे. दुसरं म्हणजे अन्य भागात शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबांचा विश्वास जिंकण्यात, त्यांच्या सुरक्षेविषयी पालकांना दिलासा देण्यातही आम्ही यशस्वी झालो.
 
 
 
2014ची जी शिष्यवृत्ती योजना होती. त्यात अनेक प्रमाणित नसलेले नियम होते. AICTE च्या माध्यमातून हे नियम प्रमाणित करून घेण्यात आले. त्यानंतर आम्ही त्यासाठी काम सुरू केले. सुरुवातीला या योजनेसाठी साधारण 3000 अर्ज येत असत आणि त्यापैकी 700-800 विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकायचे. त्यामागे अनेक कारणे होती. या योजनेविषयी विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती नसायची, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात त्याविषयी माहिती नसायची, अनेक जण विद्यार्थ्यांना चुकीची माहितीही द्यायचे. या सर्व समस्या सोडवण्यासाठी 2016पासून आम्ही काम सुरू केलं. आता या योजनेला मिळणार्‍या प्रतिसादाचे चित्र खूपच चांगले आहे. आकडेवारीनुसार 5000 जागांसाठी सुमारे 25-30 हजार विद्यार्थी अर्ज भरतात. आणि सर्वच्या सर्व 5000 जागांसाठी स्कॉलरशीपसाठी विद्यार्थ्यांची निवड होते.
 
 
त्याशिवाय दरवर्षी आमचे कार्यकर्ते जम्मू-काश्मीरला जातात आणि या योजनेचा लाभ घेऊन आमच्या सोबत जोडलेल्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना भेटून त्यांच्या मुलांच्या प्रगतीविषयी त्यांना माहिती देतात.“
 
 
जम्मू-काश्मीरमधून येथे शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे पालक आणि शैक्षणिक संस्था यांच्यामधील पूल म्हणून ही संस्था काम करते. त्याशिवाय ‘मदर्स ऑन व्हिल्स’ या त्यांच्या एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाविषयीही शितल वैद्य यांनी माहिती दिली.
 
 
16 September, 2022 | 15:4
 
इरफान अली पिरजादे हे गुलशन फाऊंडेशनचे सचिव. 2011 साली सामाजिक सहलीसाठी ते जम्मू-काश्मीरला गेले होते. त्यावेळी तेथील शिक्षणाची अवस्था पाहून ते अस्वस्थ झाले होते. 2014पासून तेही जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांसाठी काम करत आहेत. ते म्हणाले, “दरवर्षी जम्मू-काश्मीरचे सुमारे 5000 विद्यार्थी देशाच्या अन्य भागात शिक्षणासाठी पाठवले जातात. त्या त्या भागातील वातावरण, विकास पाहून त्याची प्रतिकृती ते आपल्या राज्यात, आपल्या गावात/शहरात तयार करतील आणि आपल्या भागाचाही तसाच विकास करतील असा आमचा विश्वास आहे.”
 
 
सय्यद सुहील हेही सामाजिक कार्यकर्ते. 2016मध्ये  PMSSS योजनेतून मुंबईत शिकण्यासाठी आलेले सय्यद सुहील या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून कार्यक्रमात उपस्थित होते. मुंबईत आले तेव्हा सुहीलला सामाजिक कार्याची आवड होतीच. मुंबईत अनेक आव्हानांचा सामना करत असतानाच माधुरी सहस्रबुद्धे यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यावेळी जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांच्या अडचणींविषयी त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा करता आली. सुहीलनी त्यांना याबाबतची आपली मते, निरीक्षणे सांगितली. व्यवस्थेमध्ये, धोरणांमध्ये कशाप्रकारे बदल करण्याची गरज आहे याविषयी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्याशी कामाशी ते जोडले गेले.
 
 
“बारावीनंतर काय करायचं? कुठल्या विषयात शिक्षण घ्यायचं? कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा? असे प्रश्न जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांसमोर असतात. त्याशिवाय आर्थिक अडचणी आणि करिअर संधीविषयीची अपुरी माहिती या समस्या असतात. पीएमएसएसएस या योजनेमुळे मी स्वत: जम्मू आणि काश्मीरमध्ये खूप मोठा बदल पाहत आहे. हा बदल सकारात्मक आहे. तरुणांना खूप चांगल्या करिअर संधी मिळत आहेत. आम्हाला योग्य मार्गदर्शन करणारे, प्रोत्साहन देणारे लोक भेटले, गुलशन फाऊंडेशन आणि FHDAFसारख्या संस्थांशी आमचा संपर्क आला हे आमचे सुदैव आहे.” अशा शब्दात सुहील यांनी त्यांचे अनुभव मांडले. त्यांच्यानंतर इतर उपस्थित विद्यार्थ्यांनीही त्यांचे शिक्षणविषयक अनुभव व्यक्त केले.
 
 
सईद महम्मद एतेशाम हा आयटीमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी. मुंबईत आल्यावर सुरुवातीचा काही काळ भांबावलेल्या अवस्थेत होता. इथे इंग्रजीतून शिकवले जायचे ते पटकन कळायचं नाही. फळ्यावर लिहिलेली अक्षरं हवेत उडल्यासारखी वाटायची. सिक्युरिटी गार्डची नोकरी करत करत तो शिक्षण घेत होता. या योजनेमुळे मुंबईसारख्या शहरात शिक्षण घेता येत असल्याचे समाधान त्याने व्यक्त केले. जम्मू-काश्मीरमध्ये शिक्षणाच्या सुविधा आहेत, पण अजूनही शिक्षक चांगले मिळत नसल्याची खंतही त्याला वाटत होती.
 
 
कार्यक्रमाला दोनच विद्यार्थिनी होत्या. त्यांच्यापैकी शिनाली म्हणाली की जम्मू-काश्मीरमधून इथे शिक्षणासाठी येणार्‍या मुलींची संख्या अजूनही खूप कमी आहे. एकतर काळजीपोटी घरापासून लांब पाठवले जात नाही. शिवाय शिक्षणाविषयीच्या महत्त्वाकांक्षा असणार्‍या मुलींची संख्या अद्यापही कमी आहे. पण या याजनेतून बाहेरच्या राज्यांत शिकून येणार्‍या मुलींना पाहून आता बाकीच्या मुलींमध्येही जागृती निर्माण होत आहे, असे तिने सांगितले.
 
 
शिक्षणाासाठी घरापासून दूर पाठवण्याची पालकांची काळजी जशी मुलींबाबत असते, तशी ती मुलांबाबतही कमी-अधिक प्रमाणात असते. पण आधी घरातील अन्य भावंडांनी किंवा परिचयातील मुलांनी अशा प्रकारे शिक्षण घेतल्याची उदाहरणे पाहिल्यावर ही काळजी कमी होत असल्याचे मुलं सांगत होती. शिवाय शिकून आलेल्यांना चांगल्या संधी मिळतात, हेही आता अनेकांच्या लक्षात येऊ लागले आहे.
 
 
 
अनेक विद्यार्थ्यांच्या बोलण्यातून एक गमतीशीर उल्लेख येत होता. हे विद्यार्थी मुंबईत वेगवेगळ्या अभ्यासक्रम शाखेचे पदवी शिक्षण घेत होते. कोणी बी.फ ार्म. करत आहेे. कोणी मानसशास्त्राची पदवी घेत आहे. तर बहुतेक विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या शाखांना शिकत होते. कोणी बीटेक, कोणी केमिकल इंजिनिअरिंग, कोणी इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, कोणी कम्प्युटर इंजिनिअरिंग. पण जम्मू-काश्मीरमधील सर्वसामान्यांना इंजिनिअरिंगची एकच शाखा माहीत होती, ती म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग. त्यामुळे इथे इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांविषयी तिथल्या लोकांना काळजी वाटायची. सिव्हिलला प्रवेश का नाही मिळाला? आता कसं होणार तुझं? कसं करिअर करणार? वगैरे प्रश्नांनी ते या विद्यार्थ्यांना हैराण करायचे. पण या मुलांना मात्र या नव्या शाखांचे महत्त्व चांगलेच कळले आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील पुढच्या पिढीसमोर सिव्हिल इंजिनिअरिंगशिवाय करिअरचे अन्य पर्यायही असणार आहेत. त्यातील नोकरीच्या संधी ते शोधतील असा विश्वास त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता. त्यांच्या पालकांनाही ते हे पटवून देऊ लागले आहेत. काही विद्यार्थ्यांनी केवळ सरकार किंवा प्रशासन यांच्यावर अवलंबून न राहता स्वतः रोजगार निर्माण करण्याची, आंत्रेप्रिनर बनण्याची इच्छा व्यक्त केली. स्मार्ट शहरे होत राहतील पण स्मार्ट नागरिक तयार होण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. जम्मू-काश्मीरचे नायाब राज्यपाल मा. मनोज सिन्हा यांनीही याच मुद्द्यावर कायम भर दिला आहे.
 
 
 
या मुलांची शिक्षणाविषयीची सकारात्मकता पाहून विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांनी अशा चर्चा सातत्याने घेण्याची आवश्यकता त्यांच्या समारोपाच्या भाषणात व्यक्त केली.
 
 
ही मुले जम्मू-काश्मीरमधील बहुतांश तरुणांचं प्रतिनिधित्व करत आहेत, ज्यांना शिक्षणाचे महत्त्व चांगल्या प्रकारे कळले आहे. शिक्षणाचा अभाव आणि बेरोजगारी यांच्या परिणामातून निर्माण होणारी अशांतता आधीच्या पिढ्यांनी भोगली आहे, या तरुणांनीही त्याची झलक अनुभवली आहे. पण ही परिस्थिती बदलण्याचा नवा मार्ग त्यांना अधिक शाश्वत आणि समृद्धीकडे नेणारा वाटत आहे.
 
 
 
आपण ज्या मार्गाने चाललो आहोत, त्या मार्गाने त्यांना जम्मू-काश्मीरमधील अनेक तरुणांना घेऊन जायचे आहे, हा आशावाद तर अनेकांच्या बोलण्यातून येत होता. हाच मार्ग ‘अमन’कडे जाण्याचा आहे, हे जम्मू-काश्मीरच्या तरुणांना कळून चुकलंय.
 
 
 
ऋकऊअऋकिंवा गुलशन फाउंडेशन यांसारख्या संस्था, त्यांचे कार्यकर्ते, सरकार आपापली जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण येत्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये खरा बदल अशी सकारात्मक मानसिकतेची तरुण पिढी घडवू शकते, यात शंका नाही.

सपना कदम

गरवारे मधून पत्रकारितेचे पद्व्युत्तर शिक्षण. सध्या सा.विवेक येथे उपसंपादक म्हणून काम पाहतात. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड.