धर्मांध क्रौर्याचा बळी

विवेक मराठी    17-Sep-2022
Total Views |
@सागर शिंदे । 8055906039
  श्रीरामपूर तालुक्यातील भोकर गावात राहणार्‍या हिंदू आदिवासी (भिल्ल) समाजातील दीपक बर्डे या तरुणाने मुस्लीम तरुणीशी प्रेमविवाह केल्यामुळे तिच्या धर्मांध नातेवाइकांनी त्याची हत्या केली. एरवी दलित, आदिवासी समाजावर अत्याचार झाला की ओरडणारे गट दीपकच्या हत्येबाबत मात्र मौन बाळगून आहेत. याचे कारण त्याला मारणारे मुस्लीम आहेत हे या प्रकरणात तरी स्पष्टच दिसत आहे.

vivek
आंतरधर्मीय विवाह, त्यातही हिंदू-मुस्लीम विवाह हा कायमच सामाजिक अशांततेसाठी कारणीभूत ठरल्याची अनेक उदाहरणे दिसतात. इस्लामी प्रवाह हा बिगरमुस्लीम समाजावर अन्याय करणारा असल्याने मुस्लीम व्यक्तीवर प्रेम, तिच्याशी लग्न करण्यास हिंदू समाजातून विरोध होताना दिसतो. बर्‍याचदा धर्मांतरणाच्या हेतूने ही प्रेमप्रकरणे किंवा विवाह केले जात असल्याच्या असंख्य घटना उघडकीस आल्या आहेत. त्यातूनच लव्ह जिहाद विरोधी आंदोलने होताना दिसतात. इस्लाममध्ये हिंदूला काफिर मानले जाते. हिंदू व्यक्तीवर प्रेम, तिच्याशी लग्न करणे इस्लामविरोधी कृत्य मानले जाते. यातूनच पुरोगामी महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात घडली.
 
 
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर गावात राहणार्‍या हिंदू आदिवासी (भिल्ल) समाजातील दीपक बर्डे याचे गावातील सज्ञान मुस्लीम युवती सानिया शेख हिच्यावर प्रेम होते. दोघांनी पळून जाऊन हिंदू पद्धतीने लग्न केले होते. याला युवतीच्या कुटुंबाचा विरोध होता आणि म्हणून त्यांनी 31 ऑगस्ट 2022 रोजी पुण्यातील वाघोली परिसरातून दीपकचे अपहरण केले. पुढे त्याची निर्घृणपणे हत्या करून मृतदेह भोकरच्या शेजारीच असलेल्या कमलापूरजवळ गोदावरी नदीत फेकून दिला. पोलिसांना अजूनही दीपकचा मृतदेह सापडलेला नाही.
 
 
 
विवेक विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी पीडित कुटुंब व पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली. त्यांनी पीडितांच्या बाजूने पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले असून पुढील पाठपुरावा करत आहेत. सुरुवातीपासूनच या प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी दीपकला सानियाच्या नातेवाइकांनी जीवे मारायची धमकी दिल्याचे त्याचे वडील सांगतात. याबाबत तक्रार देण्यासाठी दीपक त्याच्या मामासोबत श्रीरामपूर पोलीस स्थानकात गेल्यावर त्यांना परतवून लावण्यात आले. मात्र धमकी दिल्यानुसार युवतीच्या कुटुंबीयांनी दीपकचे जीवन संपवले. पोलिसांनी दीपकच्या तक्रारीची दखल घेतली असती, तर कदाचित त्याचा जीव वाचला असता.
 
 
दीपक बर्डेच्या वडिलांनी या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सुरुवातीस आरोपींवर खुनाच्या हेतूने अपहरण व अ‍ॅट्रॉसिटीचे कलम लावून गुन्हा दाखल केला. मात्र तपास आणि दीपकचा शोध संथ गतीने सुरू होता. पोलिसांनी मजनू शेख, इम्रान अब्बास, अजीज शेख, राजू शेख, समीर शेख व इतर दोन अशा सात जणांना अटक केली आहे. आरोपींना अटक होऊनही दीपकचा मृतदेह पोलिसांना सापडत नाही, यामुळे समाजात रोष निर्माण झाला आहे.
 
 
 
अखेर भाजपा आमदार नितेश राणे व माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्वाखाली हिंदू समाजाने जनआक्रोश मोर्चा काढून पोलिसांना जाब विचारला आणि मग तपासाला काही प्रमाणात वेग आला. पोलिसांनी दीपकचा खून झाला असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. हत्या आणि गुन्ह्याच्या कटरचनेबाबतची कलमे आरोपींच्या विरोधात लावण्यात आली. दीपकचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके नेमण्यात आली आहेत. मात्र आता कितीही झाले तरी दीपकचा जीव परत येणार नाही.
दोघांचे विवाहानंतरचे फोटो उपलब्ध आहेत. त्यात दोघेही अतिशय आनंदी दिसत आहेत. मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र स्पष्ट दिसत आहे. पण दीपकची हत्या करण्यात आली. हिंदू असणे किंवा मुस्लीम नसणे हा दीपकचा गुन्हा आहे काय?
 
 
दीपक इलेक्ट्रिकची कामे करायचा. त्याच्याकडे स्वतःची पल्सर दुचाकी होती. (तीसुद्धा गायब आहे). तो काही गुन्हेगार किंवा समाजकंटक नव्हता. धर्मांधांना लव्ह जिहाद प्रकरणांत हिंदू मुलींना फसवून मुस्लीम बनवणे चालते, पण स्वतःच्या घरच्या मुलीने प्रेम करून अन्य धर्मात गेल्याचे मात्र चालत नाही. एरवी दलित, आदिवासी समाजावर अत्याचार झाला की ओरडणारे गट दीपकच्या हत्येबाबत मात्र मौन बाळगून आहेत. याचे कारण त्याला मारणारे मुस्लीम आहेत हे या प्रकरणात तरी स्पष्टच दिसत आहे.
 
 
आतापर्यंत या प्रकरणाचा तपास लागायला हवा होता. पण काही पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर तपासात दिरंगाई केली. श्रीरामपूर पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. दीपकचे हत्येसाठी अपहरण आणि घातपात एक पूर्वनियोजित कट असल्याचे निष्पन्न झाले आहे. दीपकच्या हत्येने एका गरीब आदिवासी कुटुंबातील एकुलता एक आधार हरपला आहे. दीपकचे आई, वडील, बहीण व नातेवाईक यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज त्यांची एकच मागणी आहे की दीपकच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे व न्याय मिळाला पाहिजे.
 
 
राज्य संयोजक, विवेक विचार मंच महाराष्ट्र.