राजकारणाची संस्कृती बदलणारा सेवा पंधरवडा

विवेक मराठी    19-Sep-2022
Total Views |
@डॉ. दिनेश थिटे 
 
भारतीय जनता पार्टी हा उपक्रम केवळ यंदाच करत आहे, असे नाही. मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून दर वर्षी त्यांचा वाढदिवस सेवा कार्यानेच साजरा होतो. अशा प्रकारच्या विधायक कार्याला आणि सकारात्मकतेला मीडियाच्या दृष्टीने न्यूजव्हॅल्यू नसते आणि त्यामुळे सेवा कार्याची फारशी बातमी होत नाही. त्यामुळे जनतेत त्याची चर्चा होत नाही. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदललेली राजकीय संस्कृती आणि भाजपाकडून विविध निमित्तांनी होणारी सेवा कार्य हा महत्त्वाचा बदल आहे. लोकशाहीवरील जनतेचा विश्वास बळकट करणारी ही आश्वासक घडामोड आहे. 
 
bjp
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस - 17 सप्टेंबर - देशभर सेवा कार्ये करून भारतीय जनता पार्टीतर्फे साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी केवळ एक दिवस नाही, तर मोदी यांच्या वाढदिवसापासून महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत, म्हणजे 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा, स्वदेशी आणि वैचारिक आदानप्रदानाचे भरगच्च कार्यक्रम भाजपाने आखले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही सूचना केली आहे. त्यानुसार संपूर्ण देशभर सेवा पंधरवडा साजरा होत आहे. महाराष्ट्रात त्यानुसार 17 सप्टेंबरपासून अनेक उपक्रम सुरू झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
 
 
 
सेवा पंधरवड्याच्या कार्यक्रमात अनेक उपक्रमांचा समावेश आहे. आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये स्वच्छता, रक्तदान, विनामूल्य आरोग्यतपासणी, दिव्यांगांना कृत्रिम अवयव व उपकरणे देणे, टीबी झालेल्यांना मदत करणे आणि कोरोना लसीकरणाचा बूस्टर डोस घेण्यास नागरिकांना मदत करणे यांचा समावेश आहे. पर्यावरणाच्या रक्षणाची जाणीव होण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम आणि जलाशयांची स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. कार्यकर्ते घरोघर जाऊन जलसंरक्षणाचा संदेश पोहोचवतील.
 


bjp 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कामाचा केंद्रबिंदू सामान्य माणूस आहे. त्यांच्या योजनांचा सर्वसामान्य लोकांना लाभ झाला आहे. अशा लाभार्थींशी कार्यकर्ते संपर्क साधतील. पंतप्रधानांच्या जनकल्याणकारक धोरणांची व कार्यक्रमांची होर्डिंग व बॅनर लावण्यात येतील. तसेच याविषयी सोशल मीडियावरून जनजागृती मोहीम राबविण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य याची चर्चा करणारी वैचारिक संमेलने या पंधरवड्यात पक्षातर्फे आयोजित करण्यात येतील. पंतप्रधान व त्यांच्या सरकारविषयी विविध वृत्तपत्रांमध्ये पक्षाचे मान्यवर नेते लेख लिहितील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन व कार्य याविषयी पक्षातर्फे ठिकठिकाणी प्रदर्शने आयोजित करण्यात येतील. तसेच त्यांच्याविषयीच्या पुस्तकांची माहिती देऊन ती उपलब्ध केली जातील.
 
 
19 September, 2022 | 18:36
एकूण या पंधरवड्यात भारतीय जनता पार्टीच्या सर्वोच्च पातळीवरील नेत्यांपासून बूथपर्यंतचे कार्यकर्ते समाजासाठी वेगवेगळ्या प्रकारे सेवा कार्ये करतील आणि लोकांशी संपर्क साधतील. याच काळात भाजपाच्या केंद्र सरकारच्या कामगिरीविषयी वैचारिक आदानप्रदान होऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका पक्की होण्यास मदत होईल, तसेच समाजात सरकारच्या कामाची चर्चाही होईल.
 
 
 
याच काळात जनसंघाचे नेते आणि भाजपाचे वैचारिक प्रेरणास्रोत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती 25 सप्टेंबर रोजी पक्षातर्फे साजरी करण्यात येईल. वाचकांच्या माहितीसाठी सांगतो की, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेले ‘एकात्म मानव दर्शन’ ही भाजपाची प्रमाण विचारधारा आहे. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर रोजी साजरी करणे, त्या दिवशी स्वच्छता मोहीम करणे आणि खादी खरेदी करणे हे उपक्रमही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी करण्याचे नियोजन आहे.
 
 
 
भाजपाच्या पद्धतीने या सेवा पंधरवड्यासाठी पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाकडून सविस्तर कार्यक्रम पत्रिका उपलब्ध होणे, त्यानुसार प्रदेशामध्ये व जिल्ह्यांमध्ये समित्या स्थापन करून जबाबदार्‍यांचे वाटप करणे आणि काटेकोर अंमलबजावणी करून त्याचा आढावाही घेणे हा भाग आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी, म्हणजे 17 सप्टेंबर रोजी राज्यभर रक्तदान शिबिरे आयोजित करून या पंधरवड्याला उत्साहात सुरुवात झाली आहे.
 
 
राजकीय संस्कृती बदलण्याचा उपक्रम
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्याचे महत्त्व आहे. यामुळे राजकीय संस्कृती बदलण्यास चालना मिळते.
 
 
bjp
 
आतापर्यंत आपला सामान्य लोकांचा राजकारणाबद्दलचा अनुभव वेगळा होता. एखाद्या राजकीय नेत्याचा वाढदिवस साजरा करायचा म्हणजे चौकात प्रचंड मोठी होर्डिंग, फ्लेक्सबोर्ड लावायचे, मोठा केक कापून नेत्याचा वाढदिवस साजरा करायचा, कार्यकर्त्यांची आणि बगलबच्च्यांची जंगी पार्टी आणि नुसता जल्लोश करायचा. नेत्याची आणि त्याच्या समर्थकांची जशी आर्थिक कुवत असेल तसे पार्टीला रंगत येण्यासाठी ऑर्केस्ट्रा आणायचा, नाचगाणे करायचे. हात मोकळा सोडला तर दारूचा ओलावाही असणार. नेत्याच्या भोवती दिवसभर नुसता स्तुतिपाठकांचा गराडा आणि पुष्पगुच्छांचा ढिगारा. सोबत नजराणे येणार ते वेगळेच.
आता या आपल्या अंगवळणी पडलेल्या वरील दृश्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांची तुलना करून पाहा. केक नाही, पुष्पगुच्छ नाहीत, नजराणे नाहीत, पार्टी नाही, धिंगाणा नाही, नाचगाणे नाही, ओंगळवाणे होर्डिंग नाहीत. मग कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या वाढदिवसाला करायचे काय? तर त्यांनी सेवा करायची. त्यांनी रक्तदान करायचे, दिव्यांगांना मदत करायची, आरोग्य शिबिरांमधून जनसामान्यांना मदत करायची आणि मुख्य म्हणजे सर्वांनी स्वच्छता करायची. किती मोठी पार्टी दिली किंवा किती मोठी भेटवस्तू दिली यावरून नाही, तर किती स्वच्छता केली आणि रक्ताच्या किती बाटल्या गोळा केल्या यावरून कार्यकर्त्यांच्या कामाचे महत्त्व ठरणार.
 
19 September, 2022 | 18:37
 
राजकारणाची संस्कृती बदलणारा आणि सुधारणारा हा प्रकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जबरदस्त लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने सातत्याने निवडणुका जिंकल्या आहेत. पक्षाकडे देशातील सर्वाधिक मंत्री, खासदार आणि आमदार आहेत. महानगरपालिकांचे नगरसेवक, जिल्हा परिषदांचे सदस्य, नगराध्यक्ष, सरपंच अशी स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींच्या संख्येच्या बाबतीतही भाजपा अव्वल आहे. संसाधनांच्या बाबतीत अडचण नाही. पारंपरिक राजकीय नेत्यांप्रमाणे वाजतगाजत आणि स्तुतिसुमने उधळत मोदी यांचा वाढदिवस साजरा करायचा ठरविले, तर भाजपाचा हात कोणी धरू शकणार नाही. जुन्या अनुभवांमुळे सर्वसामान्य लोकांनाही ते स्वाभाविकच वाटेल. पण तसे घडत नाही. कारण मोदींना इतर राजकारण्यांप्रमाणे वाढदिवस साजरे करणे आवडत नाही.
 
 
bjp
 
 
वाढदिवसाला मोदी नियमितपणे आईला भेटायला जातात आणि आईचा आशीर्वाद घेतात. यंदा मध्य प्रदेशातील कार्यक्रमामुळे त्यांना आईला भेटायला जाता आले नाही, तर त्यांनी स्थानिक आदिवासी महिलांच्या मेळाव्याला संबोधित करून त्यांचे आशीर्वाद घेतले. नात्यांचा जिव्हाळा जपणे, साधेपणा, सहजता या गोष्टींना मोदी महत्त्व देतात. त्यांना बडेजाव आणि दिखावा केलेला आवडत नाही. स्वाभाविकपणे भाजपाने सेवा करून त्यांचा वाढदिवस साजरा केला. केवळ एक दिवस नाही, तर पंधरा दिवस विविध सेवा कार्यक्रमांचे नियोजन केले. गंमत म्हणजे काँग्रेस पक्ष महात्मा गांधींना सोडून राहुल गांधींचा अनुयायी झाला असताना भाजपाने मात्र पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमात सर्व कार्यकर्त्यांना गांधीजयंती साजरी करण्याची व त्या निमित्ताने स्वच्छता मोहीम करून खादी खरेदी करण्याची सूचना केली. एकेकाळी काँग्रेसमध्ये स्वच्छता, साधेपणा, स्वदेशी यांचे महत्त्व होते. काँग्रेसने तो मार्ग सोडला आणि भाजपाने त्याला महत्त्व दिले, हा काळाचा महिमा आहे. पण या सगळ्यातून राजकीय संस्कृती बदलत जाते. राजकारणात कशाला महत्त्व मिळणार आणि कशाची उपेक्षा होणार याचा स्पष्ट संदेश कार्यकर्त्यांना दिला जातो आणि समाजालाही त्याची हळुहळू जाणीव होते.
 
 
जुन्या राजकारणाचा आणि राजकारण्यांचा उबग आल्यामुळे समाजातील एका मोठ्या वर्गाने परिवर्तनाच्या अपेक्षेने 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भरभरून मतदान केले. त्यांच्यापैकी अनेकांचे सरकारकडे काहीही काम नव्हते. फक्त ही व्यवस्था बदला, सुधारा, एवढीच अपेक्षा होती. ते काम मोदी आपल्या वर्तनाने करत आहेत. त्यांच्याकडे पाहून भाजपाचे नेतेही सेवेची, साधेपणाची, नाती जपण्याची, सहजतेची संस्कृती अंगिकारत आहेत. सर्वोच्च नेत्याच्या वाढदिवसाला जंगी पार्टी देऊन धिंगाणा केला जात नाही, तर आपण तरी कसा करायचा या जाणिवेने नेते मर्यादा पाळतात. आपोआप कार्यकर्त्यांनाही मर्यादेची जाणीव होते. मोदी यांना मतदान करणार्‍यांना आपले मत वाया गेले नाही याची खात्री पटविणारी ही घडामोड आहे.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपाने आयोजित केलेल्या सेवा पंधरवड्याचा कार्यक्रम पाहा. समाजातील गोरगरीब, वंचित, पीडित वर्गातील लोकांपर्यंत कार्यकर्ते पोहोचतील आणि सेवा करतील अशी योजना आहे. समाजातील बुद्धिजीवी वर्गात कार्यकर्ते जातील आणि वैचारिक चर्चा करतील अशी योजना आहे. कार्यकर्ते घरोघर जातील आणि मोदी सरकारच्या कामाची माहिती देतील अशीही योजना आहे. कार्यकर्ते सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करतील आणि त्यांनी केलेली समाजसेवा समाजाच्या साक्षीने होईल अशीही योजना आहे. पंधरा दिवस पक्षाचे सर्व स्तरावरील नेते व कार्यकर्ते अशा प्रकारे समाजाच्या विविध घटकांशी जोडले जातील.आपल्या भोवतालच्या समाजाचे वास्तव काय आहे, याची कार्यकर्त्यांना जाणीव होईल. लोकांना भाजपाचे कार्यकर्ते माहीत होतील. हा संवाद लोकशाहीमध्ये खूप महत्त्वाचा असतो. सरकारची धोरणे, कार्यक्रम, पक्षाचा विचार कार्यकर्त्यांमार्फत समाजापर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक अधिक पक्की करणारा उपक्रम आहे.
 
 
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी हा उपक्रम केवळ यंदाच करत आहे, असे नाही. मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून दर वर्षी त्यांचा वाढदिवस सेवा कार्यानेच साजरा होतो. अशा प्रकारच्या विधायक कार्याला आणि सकारात्मकतेला मीडियाच्या दृष्टीने न्यूजव्हॅल्यू नसते आणि त्यामुळे सेवा कार्याची फारशी बातमी होत नाही. त्यामुळे जनतेत त्याची चर्चा होत नाही. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदललेली राजकीय संस्कृती आणि भाजपाकडून विविध निमित्तांनी होणारी सेवा कार्य हा महत्त्वाचा बदल आहे. लोकशाहीवरील जनतेचा विश्वास बळकट करणारी ही आश्वासक घडामोड आहे.
लेखक राजकारणाचे अभ्यासक आहेत.