वेडात दौडला सच्चा स्वयंसेवक एक

विवेक मराठी    19-Sep-2022
Total Views |
केडगाव येथील संघस्वयंसेवक व भाजपाचे माजी नगरसेवक जगन्नाथ निंबाळकर उपाख्य तात्या यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा आणि त्यांचा कार्यप्रवास चित्रित करणारा श्रद्धांजली लेख.


rss
 
3 सप्टेंबरची ती सकाळ. नित्याप्रमाणे प्रभात शाखा संपल्यावर मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅपवर नजर टाकली, तर तात्यांच्या म्हणजेच जगन्नाथ निंबाळकरांच्या झालेल्या अचानक एक्झिटची पोस्ट पाहायला मिळाली अन पायाखालची जमीन सरकून गेली.
 
 
आम्ही सगळे विवेकानंद प्रभात केडगाव शाखेचे स्वयंसेवक असल्याने, भरतरावांसारख्यांच्या कट्टर शिस्तीत आमच्यावर संस्कार झाले. शारीरिकप्रधान कार्यक्रमांचा आग्रह, मिळालेल्या जबाबदारीचे पूर्ण ताकदीने वहन करण्याचा निग्रह, केंद्राकडून प्रांताकडून, जिल्ह्याकडून एखादा आलेला उपक्रमाचे, कार्यक्रमांचे काटेकोर, समयबद्ध कालावधीत पूर्णत्वासाठी केलेले नियोजन, कार्यवाही, पाठपुरावा याबाबत जगन्नाथ नेहमी आमच्यात अग्रेसर असायचा. अनेक संघ शिक्षा वर्गात व्यवस्थेत जबाबदार्‍या पार पाडताना आपलाही संघ शिक्षा वर्ग झाला पाहिजे याचाच सतत विचार तात्या करत असे. नगरच्या दादा चौधरी विद्यालयातील वर्गात केलेल्या प्राथमिक संघ शिक्षा वर्गातील तात्याचा उत्साह आजही डोळ्यासमोर स्वच्छ दिसतो आहे. 5-6 वर्षांपूर्वीच नगरमधील पेमराज सारडा महाविद्यालयात संपन्न झालेल्या प्रांताच्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाचा व्यवस्था प्रमुख म्हणून माझ्यासह अनिल रामदासी, महेश मुळे (आप्पा), उदय भणगे, महेंद्रभाई चंदे (मामाजी), अविनाश धर्माधिकारी, नवनाथ फुंदे यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांबरोबर रात्रंदिवस जागा राहून पाणीपुरवठा व्यवस्थेसारख्या खात्याची जबाबदारी पार पाडताना तात्याने एक मानदंड प्रस्थापित केलेला दिसून आला. संघाच्या स्वयंसेवकापासून ते अधिकार्‍याशी, सगळ्यांशी तात्यांचे चांगले संबंध होते. त्याला कारण तात्यावर त्यांच्या वडिलांकडून म्हणजे दत्तात्रय निंबाळकर उर्फ नानांकडून झालेले संस्कार होते. कोणालाही हव्या असलेल्या मदतीसाठी, सहकार्यासाठी तात्या सदैव तयार असे. कधी चुकीच्या माणसाला मदत केली याची त्याने खंत मांडतानादेखील पाहायला मिळाले नाही.
 
भारतीय जनता पक्षाची पहिल्यांदा जबाबदारी घेताना नानांशी झालेल्या तात्याच्या संवादाचा मी साक्षीदार आहे. कर्तव्यबुद्धीने सेवेचे व्रत स्वीकारायचे असेल तर दहा वेळा विचार करा. इतर राजकीय पक्ष आणि भाजपा यांच्यामध्ये खूप फरक आहे. आपण कितीही काम केले, तरी मी केले यांची वाच्यता करता कामा नये. कोणा पूर्वसुरींच्या कर्तृत्वावर मोठेपणा मिरवता येणार नाही.. या आणि अशा कितीतरी गोष्टी स्पष्टपणे सांगणारे पितृछत्र लाभले, हे तात्यांचे महद्भाग्यच होते. म्हणूनच भारतीय जनता पक्षात कार्यकर्ता ते शहर जिल्हा उपाध्यक्षपदापर्यंतच्या सगळ्या जबाबदार्‍या पार पाडताना ते तत्त्वापासून तसूभरही ढळलेले दिसले नाहीत.
 
 
 
भारतीय जनता पक्षात कार्यरत असताना संघविचार करता येतो, पक्षवाढीबरोबर संघविस्तार करता येतो, कार्यकर्ता घडणीत सेवाभावी स्वयंसेवकाचाच आचार ठेवता येतो याचा साक्षात्कार तात्याला बालपणापासूनच प.महाराष्ट्र प्रांत संघचालक राहिलेल्या माणिकराव पाटील उर्फ दादांच्या परीसस्पर्शाने झालेला होता. तात्यांच्या ज्येष्ठ बंधूंपैकी एक व सध्या नगर तालुका संघचालक असलेल्या भरतरावांच्या कडव्या संघनिष्ठेचाच प्रभाव त्यांच्यावर होता. स्व. दादा सहाणे यांचेही मार्गदर्शन तात्यास लाभलेले होते. प्रसंगी विरोधी ताकदीच्या प्रचंड दबावालादेखील न जुमानता कधी सामोपचाराने, कधी कर्मठ कार्यकर्त्यांच्या भूमिकेने संघाने दिलेल्या ‘सर्वेषां अविरोधेन’ या मंत्राच्या ताकदीच्या जोरावर तात्यांनी आपले पक्षवाढीचे काम अविरत चालू ठेवले होते.
 
 
1982 साली निंबाळकर कुटुंब उदरनिर्वाहासाठी नगरला स्थलांतरित झाले. त्यानंतर हे कुटुंब नालेगाव भागात स्थिरावले. त्या काळात फटाक्यांची विक्री सुरू केली. सन 1988पासून केडगाव, भूषण नगर येथे तात्यांचे वास्तव्य होते. तेच त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व शेवटी राजकीय कार्याचे क्षेत्र बनले. उदरनिर्वाहाचे साधन म्हणून नोकरीच्या मागे न लागता नगर शहरातील केडगाव, भूषण नगर येथील मनोरमा आर्ट्स या नावाने एका शेडमध्ये सुरू केलेला गणेशमूर्ती तयार करण्याचा कारखाना हे निंबाळकर कुटुंबीयांचे मोठे धाडसच होते.
 
 
 
त्या काळी प्रतापराव उर्फ जिजाभाऊ हे ज्येष्ठ बंधू, तात्यांचे मामा व नगर जिल्ह्यातील प्रथितयश सी.ए. उत्तमराव कदम यांच्या कार्यालयात सेवेत होते. काही काळ शिंगोटे व इतर कंपन्यांमध्ये सेवेत होते. तात्यांचा संसार सुवर्णावहिनींच्या साथीने सुरू झाला. त्यांना शुभदा व अनुष्का ही दोन कन्यारत्ने आहेत.
 
 
 
1990 साली केडगावमध्ये भारतीय जनता पक्षाची मुहूर्तमेढ रोवली गेली, तेव्हा हे ग्रामपंचायत क्षेत्र असल्याने नगर तालुक्यात होते. तात्यांची राजकीय कारकिर्द केडगाव मंडल अध्यक्षांपासून सुरू झाली. नंतर नगर तालुका अध्यक्ष, नगर शहर सरचिटणीस व नंतर नगर शहर जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. त्यांना या काळातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नानासाहेब झरकर, दिलीपजी गांधी, वसंतसेठ लोढा, अभयजी आगरकर, भानुदास बेरड, अनिल मोहिते इ. कार्यकर्त्यांची साथ व मार्गदर्शन लाभले, तर केडगाव परिसरातील साहेबराव विधाते, सुनीलराव उर्फ बंडू देशमुख, प्रसन्न पुरोहित, धनंजय जामगावकर, पंकज पुरोहित, राजेंद्र सातपुते इ. कार्यकर्त्यांची साथ मिळाली.
 
 
जगन्नाथ निंबाळकरांनी आपल्यातील स्वयंसेवक सतत जिवंत राहील याची जाणीवपूर्वक काळजी घेतली. भूषण नगर (राहिंज मळा) भागात 2000 साली उद्भवलेला हिंदू-मुस्लीम तणावाचा प्रसंग एका गणेशोत्सवात निर्माण होत असताना त्या काळात पोलीस प्रशासनाने तात्यांना विश्व़ासाने ह्या प्रसंगातून मार्ग काढण्याची जबाबदारी दिली होती. अगदी पत्रकार परिषदेत जबाबदार कार्यकर्त्यांकडून दिलगिरी व्यक्त करवून घेऊन कौशल्याने प्रसंगातून वाट काढली.
 
 
 
विनायक नगर भागात पुराची आपत्ती उद्भवली, तेव्हा तेथे मदतकार्यासाठी धावलेला पहिला कार्यकर्ता तात्याच होता. प्रसंगावधान दाखवून त्यांनी केलेले सहकार्य ‘सेवा है यज्ञकुंड समिधासम हम जले’ या संघशाखेतील गीताचाच प्रत्यक्ष आविष्कार होता. केडगाव येथील पाणीप्रश्नी तात्याच्याच पुढाकारातून निघालेला प्रचंड हंडा मोर्चा अभूतपूर्व असाच होता. त्याची दखलदेखील तेवढ्याच गांभीर्याने घेतली गेली. नगर पंचायतीची निर्मिती व नंतर नगर पंचायतीचा नगरपालिकेत समावेश आणि महानगरपालिकेत केडगावचा समावेश ह्या तात्यांच्या राजकीय इच्छाशक्तीची परिणती आणि लढाऊ कार्यकर्त्यांना आदर्शवत अशा घटना आहेत. जनतेतून थेट नगराध्यक्ष पदी निवड झालेल्या अनिता आगरकर यांच्या काळात पक्षानेही तात्यांच्या या सगळ्या कार्याची दखल घेऊनच त्यांच्याकडे स्वीकृत नगरसेवकपदाची जबाबदारी दिली.
 
 
 
राजकीय, सामाजिक क्षेत्राबरोबरच डॉ. हेडगेवार नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, 2004 साली श्री विठ्ठल मंदिर व स्वामी समर्थ मंदिर निर्मिती अशा अनेकविध संस्थांनी जबाबदारी देऊन तात्यांवर विश्वास दाखवला.
 
 
जि.प. नगर येथील घेतलेल्या शासकीय कामाचीदेखील अनेक वर्षांपासूनची चालू असलेली कृती तात्यांच्या अंगी मुरलेल्या सेवावृत्तीचेच दर्शन देत आहे. नुकताच मा. सरसंघचालक मोहनजी भागवत यांचा निंबाळकर कुटुंबात झालेला संपर्क प्रवास हा तात्यांसारखा सगळ्यांच्याच कृतार्थतेचा, धन्यतेचा बहुमोलाचा प्रसंग होता.
 
 
 
निंबाळकर परिवारातील सर्व सदस्यांना या अचानक आलेल्या अत्यंत दु:खद प्रसंगातून सावरण्यासाठी सर्वसाक्षी परमेश्वऱ शक्ती देवो, हीच नम्र प्रार्थना व तात्यांच्या पवित्र आत्म्याला सद्गती लाभो ही विनम्र शब्दांजली, श्रद्धांजली.
 
 
-अभय जामगावकर