टेनिसमधील जादूगार

विवेक मराठी    20-Sep-2022
Total Views |
@ॠजुता लुकतुके
सलग 237 आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम रॉजर फेडरर याने केला. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्याने देशाला सुवर्ण जिंकून दिलं. असं भव्यदिव्य तो करत राहिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नितांत सुंदर नैसर्गिक खेळ आणि सौजन्यशील वागणं यामुळे क्रीडारसिकांच्या मनावर गारूड करत राहिला. असं काय होतं रॉजरच्या खेळात? की, 24 वर्षांत लॉन टेनिस खेळात त्याने आपले वर्चस्व राखले... हेच सांगणारा लेख...
 
roger
 
स्वित्झर्लंडची राजधानी बेसिलमध्ये रॉबर्ट आणि लिनेट या दांपत्याच्या पोटी 8 ऑगस्ट 1981 या दिवशी पुत्ररत्न जन्माला आलं. वडील स्विस-जर्मन, तर आई दक्षिण आफ्रिकन. त्यामुळे मुलाला स्विस आणि दक्षिण आफ्रिकन अशी दोन्ही नागरिकत्वं मिळाली. शिवाय बिर्फेल्डेन, रिहेन, म्युन्शेनस्टाइन अशा जर्मन आणि फ्रेंच सीमेजवळ वसलेल्या गावांत बालपण गेल्यामुळे त्याच्यावर अगदी लहानपणापासून स्विस-जर्मन आणि प्रमाण जर्मन भाषेचेही संस्कार झाले. आईकडून इंग्लिशचं बाळकडू मिळालं, तर आजूबाजूच्या लोकांनी त्याला फ्रेंच आणि जुजबी इटालियन आणि स्वीडिश भाषा शिकवली.
 
 
 
इतरांनी शिकवली म्हणण्यापेक्षा खरं तर या छोट्या मुलाने विविधतेचा उपजत ध्यास असलेल्या आपल्या स्वभावाने या भाषा शिकून घेतल्या. हा मुलगा होताच तसा. शाळेत बास्केटबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन असे सगळे म्हणजे अगदी सगळे खेळ तो खेळायचा. कशाला नाही म्हणायचं नाही आणि सगळं नवीन शिकून घ्यायचं, हा तर त्याचा स्थायिभाव. अशीच कधीतरी लॉन टेनिस खेळायला सुरुवात झाली. खरं तर तेव्हा अंगात फुटबॉलचं वारं होतं आणि एफसी बेसल आणि स्विस राष्ट्रीय फुटबॉल टीम यांचा तो मोठा फॅन होता. पण इतक्यात एका स्थानिक टेनिस स्पर्धेत (स्विस इनडोअर्स) 1992 आणि 1993 अशी दोन वर्षं तो बॉलबॉय होता - म्हणजे खेळाडूंचे चुकलेले किंवा त्यांनी सोडलेले चेंडू त्यांना नेऊन देण्याचं काम त्याच्याकडे होतं. आणि त्याची नजर पहिल्यांदा खूप जवळून राष्ट्रीय स्तरावर खेळणार्‍या खेळाडूंच्या खेळावर गेली. नुसती गेली नाही, तर ती तिथेच खिळली.
 
 
20 September, 2022 | 16:33
 
काहीही चांगलं घडलं तर त्याने भारावून जायचं आणि मग तसं स्वत: करून बघायचं, हा त्याचा आणखी एक उपजत स्वभाव होता. आता लॉन टेनिस खेळाने भारावलेला हा लहान मुलगा राष्ट्रीय खेळाडूंना कॉपी करायला लागला. फुटबॉल सोडून टेनिसवर लक्ष केंद्रित करायला लागला आणि दोनच वर्षांत 14व्या वर्षी ज्युनिअर ग्रँडस्लॅॅम खेळायला लागला. तेवढी नैसर्गिक गुणवत्ता त्याच्याकडे होतीच. 1998मध्ये विम्बल्डन या पुढे त्याच्या लाडक्या ठरलेल्या स्पर्धेत त्याने पहिल्यांदा मुलांच्या गटात पुरुष एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही गटांत विजेतेपदं पटकावली. विम्बल्डन ज्युनिअर चषकावर पहिल्यांदा एक नाव कोरलं गेलं - रॉजर फेडरर! पुढे टेनिस रसिकांनी पुढची 24 वर्षं या नावाचा गजर केला.
 
 
 
या काळात त्याने 20 ग्रँडस्लॅम (टेनिसमधल्या सर्वोच्च मानाच्या) स्पर्धा जिंकल्या. 103 एटीपी विजेतेपदं पटकावली. सलग 237 आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम केला. एकूण 310 आठवडे तो अव्वल क्रमांकावर राहिला. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्याने देशाला सुवर्ण जिंकून दिलं. असं भव्यदिव्य तो करत राहिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नितांत सुंदर नैसर्गिक खेळ आणि सौजन्यशील वागणं यामुळे क्रीडारसिकांच्या मनावर गारूड करत राहिला. असं काय होतं रॉजरच्या खेळात? आणि 24 वर्षांत त्याने आम्हाला असं काय दिलं?
 
 
नितांतसुंदर नजाकतभरा खेळ!
खरं तर हा शब्द माझा नव्हे. स्काय स्पोर्ट्सचे क्रीडापत्रकार राझ मिर्झा यांनी फेडररचा तसा उल्लेख केलेला आहे.. मला तो शब्दश: पटला. कारण, फेडररसारखं कौशल्य, खेळातली ती नजाकत देवानेच दिलेली भेट आहे आणि आम्हाला त्याचं कौशल्य पाहता येणं हे आम्हाला मिळालेलं वरदान आहे.
 
 
निवृत्त होताना तो म्हणाला, “मागची 24 वर्षं, 24 तासात घडल्यासारखी वाटतायत!” फेडररसारख्या कर्तृत्वाच्या माणसाला तसं वाटतही असेल आणि त्याची कारकीर्द 24 तासात त्याच्या डोळ्यासमोरून झर्रकन घालवणं त्याला शक्य असेल. पण आम्हा फेडरररसिकांना त्याचा एक डौलदार फोरहँड आणि एका हाताने मारलेला बॅकहँडचा फटका, गवतावर सर्व्ह अँड व्हॉलीसाठी त्याने नेटजवळ नजाकतीने घेतलेली धाव, त्याची प्रत्येक मॅच आणि प्रत्येक विजेतेपद अशी प्रत्येक गोष्ट किमान महिनाभर चघळायला आवडते. त्याच आठवणीत राहायला आवडतं.
 
 
2003च्या विम्बल्डन स्पर्धेत आम्ही त्याला पहिल्यांदा चषक उंचावताना पाहिलं. त्याने ऑस्ट्रेलियन मार्क फिलिपॉसिसला अंतिम स्पर्धेत तीन सेटमध्ये हरवलं आणि विजेतेपद पटकावलं. मोठ्या केसांचा मागे पोनी टेल बांधलेला आणि सैलसर टीशर्ट आणि सैल हाफपँट घातलेला तेव्हाचा फेडरर मला आठवतो. पण अंतिम सामन्यानंतर लक्षात राहिलं ते त्याचं रडू. जिंकल्यापासून ते विजयाचं भाषण देईपर्यंत तो रडत होता. अर्थात आनंदाश्रू होते ते. माझा वैयक्तिक टेनिस हिरो आंद्रे आगासी होता आणि त्या वर्षी तो चौथ्या फेरीत हरला होता. अव्वल खेळाडू ल्युटन हेविट तर पहिल्याच फेरीत गारद झाला. टेनिस खेळाची नवी आशा समजला जाणारा अँडी रॉडिक उपान्त्य फेरीत हरला आणि तेव्हाचा टेनिस सुपरस्टार पीट सँप्रास दुखापतीमुळे खेळतच नव्हता. नावाजलेल्या या एकाही खेळाडूशी सामना न करावा लागता फेडरर विम्बल्डन जिंकला, म्हणून मला तो फारसा लक्षवेधीही वाटला नव्हता. त्याचा खेळ वेगवान आणि नजाकतीने भरलेला होता एवढं कळत होतं. पण नंतर चषक स्वीकारल्यावरचं त्याचं भाषण ऐकलं आणि तो कायमचा माझ्या लक्षात राहिला.
 
 
20 September, 2022 | 16:34
 
 
इथपर्यंत कसे पोहोचलो हे तो सांगत होता. 1999मध्ये अव्वल शंभर खेळाडूंमध्ये स्थान मिळवल्यापासून काही वेळा तो ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या उपउपान्त्य फेरीपर्यंत गेला. एकदा त्याने त्याचं टेनिसमधलं दैवत पीट सँप्रासलाही हरवलं. पण अंतिम चारातही तो कधी पोहोचला नाही. आपण छान खेळतो असा विश्वास असतानासुद्धा यश चार वर्षं हुलकावणी देत होतं आणि त्याला याची सल होती. नैसर्गिक खेळाला ताकदीची जोड असावी, म्हणून त्याने व्यायामही भरपूर आणि पद्धतीशीर केला होता. पण ज्याला समोर फक्त सर्वोत्तम गोष्टीच दिसतात आणि त्याच मिळवण्याचा ध्यास जो बाळगतो, त्याचं उपउपान्त्य फेरीने कसं समाधान होणार? त्याला तर सँप्रास आणि प्रभृतींना कॉपी करायचं होतं! हे त्याचं स्वप्न 2003मध्ये साकार झालं. म्हणून त्याच्या डोळ्यात अश्रू होते.
 
 
 
 
यशाबरोबरच सर्वोत्तम खेळाचा ध्यास घेणारा, त्यासाठी धडपडणारा, स्वत:वर विश्वास दाखवणारा आणि यश मिळाल्यावर भावनाशीलतेचं दर्शन घडवणारा फेडरर नकळत आवडायला लागला.
 
 
पुढे 2003नंतर त्या दशकात फेडरर कायम जिंकत राहिला. जिंकल्यानंतर प्रेक्षकांसमोर जराही न लाजता अश्रूंना वाट मोकळी करून देत राहिला. या प्रत्येक वेळी त्याने पाहिलेलं स्वप्न आणि उद्दिष्टं वेगळं होतं आणि ते पूर्ण केल्याचं समाधान त्याला मिळत होतं.


roger
 
फेडररच्या यशाची आणखी एक गंमत होती. फेडरर जिंकण्यावर मेहनत घेत होता, तसंच तो टेनिसमधल्या वेगवेगळ्या फटक्यांवर आणि एकूणच खेळाच्या शैलीवरही मेहनत घेत होता. नैसर्गिक गुणवत्ता ठासून भरलेल्या या खेळाडूकडे ताकदीपेक्षा कांकणभर जास्त नजाकतही होती. त्याने मारलेला प्रत्येक फटका अचूकतेबरोबरच देखणाही असायचा. फटक्यांचं वैविध्य आणि त्यात सौंदर्यभाव असा तो अभावाने जमून आलेला मिलाफ होता. शिवाय आदबशीर, भावनाशील वागण्यामुळे तो रसिकांना कायम जवळचा वाटला. तो जिंकला की आपण जिंकल्याचा भास रसिकांना व्हायचा. त्याच्या विजयामुळे रसिकांचा किमान आठवडा चांगला जायचा.
 
 
त्याच्या सुंदर आणि सहज खेळाबद्दल तो म्हणतो, “मी टेनिसकडे नेहमी वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं. माझ्यासाठी किती ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या इतकंच महत्त्वाचं नाही. मला या खेळात सौंदर्य शोधता आलं. टेनिस कोर्टवर मी ते जगाला दाखवलं.” पुढे तो असंही म्हणाला की, “टेनिसमध्ये सौंदर्य हा निकष असेल तर रॉजर फेडररची जागा कुणी घेऊ शकणार नाही.” हा खेळाडू म्हणून त्याच्यातला आत्मविश्वास.


roger
फेडरर वि. नदाल वि. जॉकोविच जुगलबंदी

 
रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोवाक जॉकोविच अशी खेळातली अप्रतिम जुगलबंदी आमच्या पिढीने पाहिली. यातल्या एकाचा खेळ नजाकतभरा, दुसर्‍याचा जिद्दीची शिकस्त करणारा आणि तिसरा खेळात ‘नो नॉनसेन्स’ दृष्टीकोन ठेवणारा.
 
 
2003मध्ये फेडररने पहिली विम्बल्डन स्पर्धा जिंकली, त्याच सुमारास 17 वर्षांचा एक स्पॅनिश तरुणही टेनिसमध्ये आपलं नशीब आजमावायचा प्रयत्न करत होता. कधीही हार न मानण्याची वृत्ती आणि संधी मिळताच प्रतिस्पर्ध्याला नेस्तनाबूत करण्याची जिगर असलेला हा खेळाडू कुणासाठी थांबायला तयारच नव्हता. त्यामुळे पंधराव्या वर्षीच त्याने व्यावसायिक कारकिर्द सुरू केली आणि पुढच्या चार वर्षांत 2005मध्ये त्याने फ्रेंच ओपन ही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलीही.
 
 
 
तिसरा गडी नोवाक जॉकोविच सुरुवातीला या दोघांच्या छायेत वावरत होता. पण 2008पासून त्यानेही गियर बदलला आणि ग्रँडस्लॅम जिंकण्याचा सपाटा लावला. 1990 आणि 2000 दशकाच्या सुरुवातीला लॉन टेनिसने पीट सँप्रास आणि आंद्रे आगासी यांच्यातलं द्वंद्व पाहिलं होतं. आता फेडरर, नदाल आणि जॉकोविच यांनी हा मुकाबला आणखी वरच्या पातळीवर नेला.
 
 
 
चॅम्पियन खेळाडू हा विजयी होण्याच्या ध्यासाने भारलेला असतो. त्याची विजयाची भूक मोठी असते. आणि 2000च्या दशकात एकाच वेळी तीन चॅम्पियन खेळाडू एकमेकांशी स्पर्धा करत होते. टेनिस रसिकांना मात्र त्यातून सर्वोच्च टेनिसचा आनंद मिळत होता. नदाल आणि जॉकोविच यांच्याशी स्पर्धेतून आपण माणूस बनलो, असं फेडरर म्हणतो.
 
 
त्याचा पोनी टेल लूक, मित्रांबरोबरची दंगा-मस्ती सगळं छान चाललं होतं. पण दोन घटनांनी त्याच्यावर आघात केला आणि त्यातून त्याचं आयुष्य बदललं. एक म्हणजे 2002मध्ये त्याचे कोच आणि जवळचे मित्र पीटर कार्टर यांचा मृत्यू. त्यातून तो कारकिर्दीच्या बाबतीत गंभीर झाला. आणि दुसरा म्हणजे 2008मध्ये राफेल नदालशी विम्बल्डन फायनलमध्ये झालेला पराभव. 4-6, 4-6, 7-6, 7-6 आणि 7-9 अशी जवळजवळ पाच तास चाललेली ही फायनल फेडररने गमावली आणि गवतावरची त्याची सद्दीही नदालने मोडून काढली, असंच चित्र तेव्हा निर्माण झालं. फेडरर स्वत: आतून हलला होता. पण तरीही काही काळ गेल्यावर का होईना, त्याने त्या सामन्याकडे स्थितप्रज्ञासारखं बघितलं. आणि तो म्हणाला, “अनेक अर्थांनी हा सामना लक्षात राहण्यासारखा होता. पण या सामन्याने कदाचित मला जास्त माणूस बनवलं. पराभव स्वीकारून मोठं व्हायला शिकवलं आणि पराभव मान्य करायला शिकवलं.” तिथून पुढे दुखापती आणि फॉर्ममुळे कारकिर्दीत चढ-उतार आले. पण फेडररने खरंच ते दिलदार वृत्तीने स्वीकारले. प्रयत्न तो करतच राहणार होता. त्यामुळेच तो 2016मध्ये पुन्हा ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डन विजय मिळवू शकला, 36व्या वर्षी पुन्हा नंबर वन होऊ शकला आणि या गोष्टीचं श्रेय त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना देऊनही टाकलं.
 
 
 
फेडररचा नदालविरुद्धचा रेकॉर्ड 16 विरुद्ध 24 असा आहे. तर जॉकोविच विरुद्ध 23 विरुद्ध 27. ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या बाबतीत फेडररकडे 20 विजेतेपदं आहेत, तर जॉकोविचकडे 21. आणि हे दोघे आणखी काही वर्षं खेळत राहणार आहेत. पण तिघांच्या जुगलबंदीत फेडररने तयार केलेली जागा त्याच्यासाठी अढळ राहणार आहे.
 
 
फेडररची लोकप्रियता
 
 
फेडररच्या शालीन आणि साध्या स्वभावामुळे, तसंच नैसर्गिक खेळामुळे चाहत्यांच्या मनात फेडररसाठी कायम खास जागा राहिली. तो जिंकत होता आणि कधीकधी हरला, तेव्हाही त्याच्या भोवतीची गर्दी कमी झाली नाही. म्हणूनच टेनिस डॉट कॉम या वेबसाइटने त्याला खुल्या टेनिस स्पर्धांच्या जमान्यातला सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरस्कार दिला. एटीपी हंगामात खिलाडूवृत्तीसाठी एक पुरस्कार दिला जातो आणि सर्किटमध्ये खेळणारे टेनिसपटूच त्यासाठी मत देतात. फेडररला त्याच्या बरोबरच्या खेळाडूंनी तब्बल 13 वेळा हा मान दिला, तर क्रीडा रसिकांनी सलग सतरा वर्षं त्याला एटीपी सर्किटवरचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडलं. टेनिस आणि बाहेरच्या जगातही फार क्वचित असं प्रेम एखाद्या खेळाडूच्या नशिबी येतं. म्हणूनच असं वाटतं की, त्याचा फक्त खेळच नाही, तर त्याचा अख्खा वावरच दैवी आहे आणि आम्हाला मिळालेली ती अमूल्य गिफ्ट आहे.