राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू झाल्यापासून अनेक राज्यांत काँग्रेसला मात्र गळती लागली आहे. एकीकडे काँग्रेस पक्षाची ‘भारत जोडो यात्रा’, दुसरीकडे कार्यकर्त्यांची ‘काँग्रेस छोडो यात्रा’ असे विरोधी चित्र सर्वत्र दिसून येत आहे. यामुळे जोडले काय जाते, हा प्रश्नच आहे; पण गमावले काय जाते, हे मात्र दिसून येत आहे.

सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेत राहुल गांधी अगदी सावधपणे पावले टाकत आहेत. सोशल मीडियाद्वारे मूक प्रसिद्धी देण्याकडे त्यांचा जास्त भर दिसत आहे. त्यातूनच कधी संघाला अप्रत्यक्ष लक्ष्य करण्याचा विषय असो वा हिजाब घालणारी मुलगी सोबत घेऊन चालताना फोटो असो.. अगदी नियोजनबद्ध सगळे दिसत आहे. असे नियोजनबद्ध चालू असूनही त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही, असे दिसते. स्वत:होऊन वाद निर्माण करायचा आणि उथळ माध्यमांतून प्रसिद्धी मिळवायची, हा सध्या प्रसिद्ध होण्याचा नवा फंडा राहुल गांधीही आजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण माध्यमेही त्यांना तितकीशी प्रसिद्धी देत नसल्याचे दिसून येत आहे.
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू झाल्यापासून अनेक राज्यांत काँग्रेसला मात्र गळती लागली आहे. एकीकडे काँग्रेस पक्षाची ‘भारत जोडो यात्रा’, दुसरीकडे कार्यकर्त्यांची ‘काँग्रेस छोडो यात्रा’ असे विरोधी चित्र सर्वत्र दिसून येत आहे. यामुळे जोडले काय जाते, हा प्रश्नच आहे; पण गमावले काय जाते, हे मात्र दिसून येत आहे.
गेल्याच आठवड्यात गोव्यातील निष्ठावंत व माजी मुख्यमंत्री दिगंबर नाईक यांच्यासह काँग्रेसच्या सात आमदारांनी काँग्रेसला रामराम केला. त्यामुळे राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. एकेकाळी राज्यात मजबूत सत्ताधारी पक्ष म्हणून असलेला काँग्रेस आता गोव्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. हे झाले गोव्यातील, तर दुसरीकडे पंजाबमधील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. भलेही अमरिंदर सिंग हे एक वर्षांपूर्वीच काँग्रेसला सोडून गेले असतील, तरीही पुन्हा आपल्या मूळ पक्षात त्यांना सामावून जात पंजाबमधील वाढत्या पडझडीला थांबवता आले असते. पण राहुल गांधी यांची कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याऐवजी नवज्योत सिद्धू यांच्यावर कृपादृष्टी असल्याने अमरिंदर सिंग यांच्या ते नेहमीच विरोधात राहिले. अखेर व्हायचे ते झाले. आज काँग्रेसची पंजाबमधील अवस्था अत्यंत बिकट आहे. अमरिंदर सिंग यांची मनधरणी करून पुन्हा पक्षात घेतले असते, तर पक्षाला मोठा फायदा झाला असता. आणि खर्या अर्थाने भारत जोडो झाले असते. पण तसे करतील तर राहुल गांधी कसले! अखेर व्हायचे ते झाले... आणि अमरिंदर सिंग यांच्या सारखा नेता भाजपाला जाऊन मिळाला आहे. त्यांच्या रुपात पंजाबमध्ये भाजपाला लढवय्या नेता मिळाल्याने भाजपाची पंजाबमधील ताकद दुप्पट होण्याची शक्यता आहे. याचबरोबर महाराष्ट्रात ही यात्रा येणार आहे. याच्या आसपास कदाचित मराठवाड्यातील काँग्रेसचा एक वजनदार नेता भाजपात येण्याचा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. जर असे झाले, तर काँग्रेसचे महाराष्ट्रातील अस्तित्वही अगदी नगण्य होईल. अगोदर महाराष्ट्रात काँग्रेस म्हणजे स्वयंभू नेत्यांनी जिवंत ठेवलेला पक्ष आहे. विधानसभा निवडणुकीत कोणतेही केंद्रीय पाठबळ नसतानासुद्धा महाराष्ट्रात काँग्रेसचे 42 आमदार निवडून आले होते. आता काँग्रेसची ही स्वयंभू संस्थाने ढासळू लागली आहेत. अगदी विधानपरिषद पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या झालेल्या पराभवास कारणीभूत असलेल्या आमदारांची कानउघडणी करण्याचेही धाडस पक्षश्रेष्ठींनी करता केले नाही. यावरून लक्षात येते की, राहुल गांधी यांचे राज्यातील अंतर्गत कलहाकडे किती लक्ष आहे ते दिसून येते.
पहिल्यांदाच गांधी परिवाराच्या बाहेरल अशोक गेहलोत हे अध्यक्ष होण्याची शक्यता वाटत होती. ते जर काँग्रेस अध्यक्ष होणार असतील तर आमदारांनी गेहलोत मुख्यमंत्रीपदी राहावेत किंवा त्यांनी निवड केलेल्या व्यक्तीला हे पद देण्यात यावे अशी मागणी केली आहे. अन्यथा आम्ही राजानामे देऊ, त्यामुळे सरकार कोसळलं तरी आपण आपल्या मागणीवर ठाम राहू असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे हा काँग्रेसला हा मोठा धक्काच म्हणावे लागेल?
राहुल गांधी काँग्रेसचीही बुडती नौका वाचवण्यास असमर्थ असल्याचे दिसून येत आहे. राजस्थान वगळता देशात कुठेही काँग्रेस मजबूत स्थितीत नव्हती. पण आज राजस्थानमध्येही काँग्रेस फुटीच्या मार्गावर आहे. देशात सर्वत्र काँग्रेसमध्ये गटबाजी, घराणेशाही आणि आयाराम आणि गयाराम यांनी भरलेली आहे. जी-23सारख्या काँग्रेसमधील अनुभवी नेत्यांच्या फळीतील कपिल सिब्बल, गुलाम नवी आझाद यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसला रामराम केले आहे, तर इतर नेत्यांच्या सूचनेला राहुल गांधी केराची टोपली दाखवतात. यामुळे काँग्रेसमध्ये फक्त गांधी एकाधिकारशाही चालते हाच संदेश अनेक कृतींमधून त्यांनी आजवर दिला आहे. आताही काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणुका आहेत. तेथेही उद्या गांधी घराण्याव्यतिरिक्त जरी अध्यक्ष झाला, तरी गांधी घराण्याला विचारल्याशिवाय ती व्यक्ती कोणताही निर्णय घेऊ शकत नाही असे दिसते.
ही यात्रा काढण्यामागे आणखी दोन कारणे आहेत - एक म्हणजे देशात राहुल गांधी यांची प्रतिमा सध्या कार्यकर्त्यांना न भेटणारा अध्यक्ष अशी होती. फारसा जनसंपर्क नसल्यामुळेही त्यांची ही प्रतिमा सुधारण्याचा केविलवाणा प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे. दुसरे म्हणजे काँग्रेसशिवाय यूपीए निर्माण होऊ शकत नाही. आम्हाला व आमच्या नेत्याला किती पाठिंबा आहे हासुद्धा संदेश काँग्रेसला तिसर्या आघाडीला द्यायचा आहे. पण राहुल गांधी आपल्या मूळ स्वभावानुसार यात्रेत चालत आहेत. त्यामुळे नको त्या गोष्टीला वाद फुटत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचा सोशल मीडिया नियोजनबद्ध संघाला, भाजपाला सोशल मीडियावरून दूषणे देण्याचे काम करत आहे. मात्र पण याचे परिणाम भाजपावर न होता उलट काँग्रेसवर होताना दिसत आहेत, कार्यकर्ते भारत जोडो न करता काँग्रेस छोडो करत आहेत.
- अभय पालवणकर