वारसा उभय भारतींचा

विवेक मराठी    23-Sep-2022
Total Views |
@अभिजीत खेडकर । 9420602780
 
 
न्यायशास्त्र, व्याकरण आणि मीमांसा या विषयांची संस्कृत महापरीक्षा शृंगेरीच्या शारदा मठात घेण्यात आली होती. जवळपास दीड ते पावणेदोन तास चाललेल्या या अतिशय कठीण परीक्षेत कल्याणी हर्डीकर आणि ऋतुजा कुलकर्णी या दोघी आणि त्याबरोबर प्रियव्रत पाटील आणि सुब्रह्मण्यम मंजुनाथ हे दोन विद्यार्थीही उत्तम श्रेणीत उत्तीर्ण झाले. कल्याणी आणि ऋतुजा या दोघी आधुनिक इतिहासात ह्या स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या प्रथम विद्यार्थिनी ठरल्या आहेत.

Sanskrit Mahapariksha
शृंगेरीच्या शारदा मठाचा तो रम्य आणि भव्य-दिव्य परिसर बघून त्या दोघी खरे तर हरखून गेल्या होत्या. आदल्या दिवशीच सार्‍या देशाने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा केला होता, दुसर्‍या दिवसावरही त्याची खुमारी अजून जाणवत होती. जितका ऐतिहासिक कालचा दिवस होता, कदाचित तसाच एक इतिहास आज 16 ऑगस्ट 2022ला घडणार होता. आज नगरच्या क्षीरसागर महाराज दत्त देवस्थानच्या वतीने घेतली जाणारी न्यायशास्त्र, व्याकरण आणि मीमांसा या विषयांची संस्कृत महापरीक्षा शृंगेरीच्या शारदा मठात, प्रत्यक्ष जगद्गुरू शंकराचार्य श्री विधुशेखर भारतीजी यांच्या पावन उपस्थितीत त्यांच्या अनुमतीने होणार होती.
 
 

साप्ताहिक विवेकच्या आगामी 'हिंदुत्व' ग्रंथातून नेमकं हेच उत्तर आपल्याला मिळणार!
"हिंदुत्व ग्रंथ" नोंदणी अभियान

https://www.evivek.com/hindutva-granth/


“काकू, सगळं होईल ना व्यवस्थित?” ऋतुजाने चौथ्यांदा तरी अपर्णाताईंना विचारले असेल. ती, कल्याणी, प्रियव्रत आणि सुब्रह्मण्यम चौघेही या महापरीक्षेसाठी शृंगेरीत दाखल झाले होते. या परीक्षेत प्रथमच कुणी विद्यार्थिनी सहभागी होत होत्या. आतापर्यंत या संस्कृतच्या महापरीक्षेत पुरुषांचेच वर्चस्व होते आणि त्यामुळेच त्या दोघींवर नाही म्हटले तरी थोडे दडपण आले होतेच. “चिंता करू नकोस, छान तयारी केलीये ना तुम्ही दोघींनीही? मग आत्मविश्वासाने परीक्षा द्या. मला विश्वास वाटतो तुमच्याबद्दल.” अपर्णाताईंनी दोघींना आशीर्वाद देत आश्वस्त केले.Sanskrit Mahapariksha
 
ऋतुजा तशी मूळची विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील निवासी, परंतु तिच्या वडिलांच्या - म्हणजे बाळकृष्ण कुलकर्णी यांच्या नोकरीच्या निमित्ताने ते काही वर्षांपासून मराठवाड्यात संभाजीनगर येथे स्थायिक झाले. शालेय शिक्षण पूर्ण करतानाच ऋतुजाचा संस्कृत भाषेशी परिचय झाला आणि संस्कृत भाषेची समृद्धी, न्यायशास्त्र, व्याकरण आणि वेद-पौराणिक साहित्याचा परिचय यांनी ती भारावून गेली. 2016 साली बारावी कला शाखेतील शिक्षण पूर्ण केल्यावर आता एखाद्या संस्कृत पाठशाळेत रीतसर प्रवेश घेऊन पुढे याच विषयात एखाद्या तज्ज्ञ गुरूंच्या मार्गदर्शनाखाली पुढील अध्ययन पूर्ण करावे, असे तिने ठरवले. योगायोगाने एका परिचितांनी तिला गोव्यातील रिवोणा येथे महामहोपाध्याय देवदत्त पाटील आणि त्यांच्या पत्नी अपर्णा पाटील यांनी सुरू केलेल्या पाठशाळेची माहिती दिली. स्वत: देवदत्त पाटील गुरुजी हे संस्कृत भाषेचे आणि न्यायशास्त्राचे अतिशय जाणकार अधिकारी व्यक्ती आणि तितकेच सिद्धहस्त शिक्षक. त्यांच्या पत्नी अपर्णाताई पाटील याही संस्कृत भाषेच्या विदुषी आणि शिक्षिका आहेत आणि ते दोघेही पुण्याहून काही वर्षांपूर्वी रिवोणा या गोव्यातील या छोट्याशा गावात राहून गुरुकुल पद्धतीने मुला-मुलींसाठी निवासी पाठशाळा चालवतात, अशी माहिती मिळाल्यावर ऋतुजा आईबाबांच्या अनुमतीने रिवोणाच्या पाठशाळेत दाखल झाली.
 
संभाजीनगरसारख्या विकसित शहरातील सुखासीन जीवन सोडून रिवोणासारख्या गोव्यातील एका दुर्गम खेडेगावात आई-वडिलांपासून दूर राहणे, तेही एक-दोन नाही, तर त्याहूनही अधिक वर्षांसाठी राहण्याची मानसिक तयारी करणे आवश्यक होते. घरी वेद अध्ययनाची किंवा गुरुकुल पद्धतीच्या जीवनशैलीची काही पार्श्वभूमी नसताना असा निर्णय घेणे हेदेखील एक दिव्यच होते. परंतु तिच्या जिद्दीने या सगळ्या अडचणींवर मात करत अखेर तिने रिवोणाच्या श्रीविद्या पाठशाळेत प्रवेश घेतला. पहाटे लवकर उठून उपासना, अध्ययन, पाठशाळेच्या दैनंदिन कामात मदत करणे, योगाभ्यास, खेळ, सायं उपासना, आणि गुरुजींच्या सान्निध्यात राहून न्यायशास्त्राचे अध्ययन अशा ठरलेल्या वेळेत ठरलेल्या गोष्टी करणे या आश्रमीय जीवनास सुरुवात झाली. सुरुवातीला पंडित दत्तानुभव टेंगसे गुरुजी आणि नंतरचे अध्ययन पंडित विजय विठ्ठल संदल गुरुजी आणि महामहोपाध्याय देवदत्त पाटील गुरुजी यांच्याकडून पूर्ण झाले. त्याचबरोबर कर्नाटक विद्यापीठातून संस्कृत विषयात पदवीपर्यंतचेही शिक्षण तिने पूर्ण केले.
कल्याणी तन्मय हर्डीकर ही ऋतुजा कुलकर्णीबरोबरच ही महापरीक्षा उत्तीर्ण झालेली खरे तर ज्येष्ठ विद्यार्थिनी, पूर्वाश्रमीची भार्गवी कालिदास सावईकर. सावईकर घराणे मूळचे माशेल, गोव्याचे. भार्गवीचे आजोबा राम सावईकर हे माशेलच्या मंदिराचे पारंपरिक पुजारी आणि माशेलचे पुरोहित. भार्गवीचे वडील कालिदास सावईकर हेदेखील पाठशाळेत याज्ञिकी आणि पौरोहित्य शिकून न्यायशास्त्र शिकण्यासाठी काशीला गेले होते. त्या वेळी महामहोपाध्याय देवदत्त पाटील गुरुजी हेदेखील त्यांचे सहाध्यायी होते. परंतु घरच्या काही अडचणींमुळे त्यांना न्यायशास्त्राचे अध्ययन अर्धवट सोडून गावी परत यावे लागले. त्यांनी नंतर कवळे येथे गौडपादाचार्य मठात वेद शिकवायला सुरुवात केली. भार्गवी आणि तिची मोठी बहीण शांभवी या दोघींना संस्कृत अध्ययनाचा घरातूनच पारंपरिक वारसा मिळाल्यामुळे आपोआपच संस्कृत शिक्षणाकडे दोघींची दिशा वळत गेली. दोघींनीही सायन्स विषय घेऊन त्या बारावीची परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्या.


Sanskrit Mahapariksha
बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघीही पुण्यात शास्त्र अध्ययनासाठी देवदत्त पाटील गुरुजींच्या पाठशाळेत दाखल झाल्या. तेथे पंडित दत्तभार्गव टेंगसे यांच्या मार्गदर्शनात भार्गवीने न्यायशास्त्र विषय शिकायला सुरुवात केली. वर्षभर पुण्यात अध्ययन केल्यावर पाटील गुरुजींनी पुण्यातील पाठशाळा गोव्याच्या रिवोणा येथे स्थलांतरित केल्यामुळे भार्गवीही रिवोणा येथे आली. तेथे वर्षभर अध्ययन केल्यावर पुढील चार वर्षे पंडित दत्तभार्गव टेंगसे यांच्या काणकोण येथे वाग्वर्धिनी पाठशाळेत न्यायशास्त्र विषयाचे संपूर्ण अध्ययन केले. सन 2020मध्येच तिचे न्यायशास्त्राचे संपूर्ण अध्ययन पूर्ण होऊनही कोरोनाच्या काळात महापरीक्षेचे आयोजनच होऊ शकले नाही, त्यामुळे पुढील दोन वर्षे आधीच्या सगळ्या सत्र परीक्षा पूर्ण देऊन महापरीक्षा देण्यासाठी 2022 साल उजाडावे लागले.
 
न्यायशास्त्राचे संपूर्ण अध्ययन करून भार्गवीबरोबर परीक्षा देण्यासाठी 2021मध्येच तयार झालेल्या शांभवी आणि अवनी या तीन प्रथम विद्यार्थिनी. परंतु काही अडचणींमुळे शांभवी आणि अवनी या दोघी महापरीक्षा देऊ शकल्या नाही. त्यामुळे ही महापरीक्षा देणार्‍या प्रथम विद्यार्थिनी म्हणून ऋतुजा कुलकर्णी आणि कल्याणी हर्डीकर यांना हा मान मिळाला. दरम्यानच्या काळात फेब्रुवारी 2022मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आडिवरे गावचे पंडित तन्मय हर्डीकर यांच्याशी भार्गवीचा विवाह झाला आणि त्यानंतर ऑगस्ट 2022मध्ये तिने कल्याणी तन्मय हर्डीकर या नावाने शृंगेरीच्या शारदा मठात ही महापरीक्षा दिली. पंडित तन्मय हर्डीकर हेदेखील नुकतीच तेनाली येथे व्याकरणशास्त्र विषयाची महापरीक्षा उत्तीर्ण झाले.
 
 
या महापरीक्षेच्या सहा वर्षे आधी सत्र परीक्षांचा क्रम सुरू होतो. न्यायशास्त्र विषयाच्या महापरीक्षेसाठी एकूण 19 वेगवेगळ्या विषयांवरील ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो. हे सर्व ग्रंथ मुखोद्गत करणे, त्यातील विषय समजून घेणे आवश्यक असते. त्यानंतर दर सहा महिन्यांनी दत्त देवस्थान ट्रस्टच्या वेदान्त विद्यापीठाच्या माध्यमातून एक किंवा अधिक ग्रंथांची परीक्षा द्यावी लागते. या आधीच्या परीक्षा लेखी आणि मौखिक असतात. प्रत्येक ग्रंथावर तीनशे गुणांची परीक्षा असते. यात शंभर गुणांसाठी दीर्घोत्तरी लेखी परीक्षा, शंभर गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांची परीक्षा आणि शंभर गुणांसाठी तोंडी परीक्षा, अशा सहा वर्षांत तेरा सत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नंतर महापरीक्षा देण्याची अनुमती मिळते. शृंगेरीच्या शारदा मठात जगद्गुरू शंकराचार्य यांच्या अनुमतीने आणि त्यांच्या उपस्थितीत ही महापरीक्षा होत असते. या महापरीक्षेसाठी पूर्ण 19पैकी निवडक सात ग्रंथ निवडले जातात. या ग्रंथांवर कोणत्याही क्रमाने कोणत्याही विषयावर तोंडी प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न विचारणारे परीक्षक त्या त्या विषयातील तज्ज्ञ अधिकारी असतात, जे जगद्गुरू शंकराचार्य नेमून देतात. त्यामुळे ही परीक्षा खूप महत्त्वाची, उच्च स्तराची मानली जाते.
 
 
 
विदुषी कल्याणी आणि विदुषी ऋतुजा यांच्या आधीच्या सत्र परीक्षांचा निकाल आणि गुणवत्ता बघून आणि या महापरीक्षेसाठी त्यांनी केलेली तयारी बघून जगद्गुरू शंकराचार्य श्री विधुशेखर भारतीजी यांनीही अतिशय संतोष व्यक्त केला. जवळपास दीड ते पावणेदोन तास चाललेल्या या अतिशय कठीण परीक्षेत या दोघी आणि त्याबरोबर प्रियव्रत पाटील आणि सुब्रह्मण्यम मंजुनाथ हे दोन विद्यार्थीही उत्तम श्रेणीत उत्तीर्ण झाले. कल्याणी आणि ऋतुजा या दोघी आधुनिक इतिहासात ह्या स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या प्रथम विद्यार्थिनी ठरल्या आहेत.
 
 
 
आगामी काळात पाठशाळेत राहूनच न्यायशास्त्राचे अधिक अध्ययन करण्याचा ऋतुजा कुलकर्णी यांचा मानस आहे, तर कल्याणी हर्डीकर या आपले पती पंडित तन्मय हर्डीकर यांच्याबरोबर रिवोणाच्या श्रीविद्या पाठशाळेत न्यायशास्त्र या विषयाच्या अध्यापनाचे कार्य करीत आहेत. परीक्षेच्या तयारीच्या आधी महामहोपाध्याय देवदत्त पाटील गुरुजी यांनी सांगितलेले वाक्य त्यांच्यासाठी सदैव प्रेरणादायक वाटते - “या शिक्षणाचा हा मार्ग खूप खडतर, कठीण आहे. लौकिक जीवनात याचा काय उपयोग असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु आपली संस्कृती आणि परंपरा शाश्वत ठेवण्यासाठी हा मार्ग खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही या मार्गावर चालायला सुरुवात केली, तर सुरुवातीला असंख्य अडचणी येतील, कारण येथे तुमचे मार्गदर्शक कुणीही नाही. तुम्हालाच याची सुरुवात करायची आहे, जेणेकरून पुढच्या पिढीला हा मार्ग सोपा आणि सुकर होईल.”
 
 
 
प्राचीन काळात आद्य शंकराचार्य आणि मंडणमिश्र यांच्या ऐतिहासिक वाद-विवादात, मंडणमिश्रांची पत्नी थोर वेदज्ञाती उभय भारती यांनी त्या विवादाचा निर्णय करण्याची महत्त्वाची भूमिका निभावली होती. कल्याणी आणि ऋतुजा याही या थोर वारशाच्या वाटेवर अग्रेसर होत आहेत.
 
 
 
रुळलेली वाट सोडून आव्हानात्मक वेगळी वाट चोखाळणार्‍या या उभय भारतींच्या लेकींना सादर प्रणाम.