खीर भवानी पीठ, तुलमुल

लेख 5 वा

विवेक मराठी    24-Sep-2022
Total Views |
@स्वप्ना कुलकर्णी
भवानी माता किंवा मां भगवतीला समर्पित असे हे देऊळ काश्मीरस्थित तुलमुल येथे आहे. तुलमुल श्रीनगरच्या उत्तरेस 24 किलोमीटरवर आहे. काही शतकांपूर्वी तुलमुल हे मोठे शैक्षणिक केंद्र होते. सिंधू नदीच्या एका उपनदीच्या मध्यावर एक पवित्र तलाव आहे आणि तिथेच उभे आहे महारजनी किंवा खीर भवानी मंदिर. तुलमुलचा उल्लेख तर कल्हणाने लिहिलेल्या राजतरंगिणी या काश्मीरमधील महाकाव्यात आढळतो.
 
vivek
 
श्री परमानंद रिसर्च इन्स्टिट्यूट, श्रीनगर, श्री श्री महारजनी प्रादुर्भाव या त्यांच्या प्रकाशित लेखात खालील गोष्टी उद्धृत करतात.
ब्रंगिशा संहितेमध्ये काश्मीरमधील अनेक देवळांचा उल्लेख आहे. त्यातीलच एक तुलमुल येथील देऊळ. रावणाचे वडील पुलस्त्य काश्मीरवासी होते. रावण स्वत: देवी महारजनीची पूजा करायचा, ती देवी श्यामा या तिच्या रूपात. या देवीने रावणाला अनंत वर दिले होते. राम-रावण युद्धात देवीने आपल्याला मदत करावी म्हणून रावणाने हर प्रकारची आमिषे दाखवली. रावणावर चिडून आणि शापवाणी उच्चारून देवीने हनुमानाला आज्ञा केली की सर्पराज अनंत याच्याबरोबर तिला सतीसार, काश्मीर येथे नेण्यात यावे. देवी मां अशा रितीने तीनशे साठ सर्प आणि नागांसहित काश्मिरात दाखल झाली. ज्या रात्री देवी मांचे काश्मीरमध्ये आगमन झाले, ती रात्र ‘रजनी-रात्री’ म्हणून ओळखली जाते, तर देवी मां ‘महारजनी’ म्हणून. पुढील अनेकानेक वर्षे हे पीठ पाण्याखालीच राहिले होते.
 
 
 
आख्यायिका सांगते की पंडित गोविंद यांच्या स्वप्नात येऊन मां भगवतीने त्यांना तुलमुलला जाण्यास सांगितले. पंडितजींनी सोवुरा घाट येथून एक नाव केली आणि नावेतून प्रवास सुरू केला. देवीसाठी दुधाने भरलेले अनेक कलश घेऊन ते निघाले. जेव्हा त्यांना हा झरा सापडला, तेव्हा त्यांनी कलशातील दुधाचा अभिषेक करायला सुरुवात केली, म्हणून या स्थानाचे नाव ‘खीर भवानी’ असे पडले.
 
 
 
दुसरी आख्यायिका सांगते की कृष्ण पंडित या ब्राह्मणाला बृहद कथा या ग्रंथात या पवित्र झर्‍यासंबंधी माहिती वाचायला मिळाली. कथा वाचल्यावर त्यांना एक दृष्टान्त झाला, ज्यात त्यांना हा पवित्र झरा तुलमुल या गावी दलदलीत गाडला गेला आहे असे समजले. तसेच या ठिकाणी कसे जायचे याच्या सूचनाही मिळाल्या. एका सर्पाच्या मागे शदीपोरहून ईशान्येस जात राहावे, असे त्यांस सांगण्यात आले. तो सर्प जिथे थांबला, तिथे कृष्ण पंडित यांनी खुणा करून ठेवल्या. तो सर्प एक आयताकृती तयार करत निघून गेला. ही जागासुद्धा कृष्ण पंडित यांनी चिन्हांकित केली. याच जागेवर नंतर एक दगडी देऊळ बांधण्यात आले.
 
 
 
एके दिवशी कृष्ण पंडित पूजा करत असताना, एक भूर्जपत्र वाहत आले. त्या भूर्जपत्रात देवीचे वर्णन करणारा एक श्लोक होता. या श्लोकात जितके शब्द होते, तितक्या कडव्यांचे स्तोत्र कृष्ण पंडित यांनी लिहिले. आजही हे स्तोत्र ‘रजनी स्तोत्र’ म्हणून प्रसिद्ध आहे. जरी आषाढातील शुक्ल सप्तमीला या झर्‍याचा शोध लागला असला, तरी भाविक अष्टमीलाच या देवळात गर्दी करतात.
 
 
 
हा झरा सप्तकोनी असून त्याचे शिखर (मुख) पूर्वेला आहे आणि ते पद या नावाने ओळखले जाते. याच्या दक्षिणोत्तर बाजू पश्चिमेपेक्षा मोठ्या आहेत. पश्चिम बाजू शीर म्हणून प्रसिद्ध असून या झर्‍याचा आकार ॐसारखा आहे. याच झर्‍याच्या मधोमध देवी महारजनीचे देऊळ उभे आहे.
 
 
 
या झरा ज्या ठिकाणी सापडतो, तिथे सिंधमधून येणारा गंगाखाई हा कालवा वळसा घालून/वेढून जातो. हा झरा तीनशेहून जास्त छोट्या छोट्या झर्‍यांनी वेढला गेला आहे. आपण सध्या जे देऊळ बघतो, ते महाराज प्रताप सिंह यांनी 1910मध्ये उभारले आहे. पुढे राजा हरिश्चंद्र सिंह यांनी या देवळाचे नूतनीकरण आणि डागडुजी केली.