मीनाक्षी मंदिर, मदुराई, तामिळनाडू

६ वा लेख

विवेक मराठी    24-Sep-2022
Total Views |
स्वप्ना कुलकर्णी
कोरीवकाम, सुरेख रेखीव मूर्ती यासाठी मदुराईतील मीनाक्षी मंदिर प्रसिद्ध आहे. या देवळातील प्रत्येक दगडाची आणि प्रत्येक मूर्तीची एक तरी कहाणी असेलच! यातील मीनाक्षी देवीची कहाणी आपण जाणून घेऊ या.
 
devi
 
पौराणिक काळात मदुराईचा राजा मलयध्वज पंड्यान आणि राणी कांचनमाला यांनी राज्याला वारस मिळावा म्हणून यज्ञ व होमातील अग्नीसमोर प्रार्थना केली. वारस म्हणून मुलगा न होता त्या अग्निकुंडातून तीन वर्षांची एक मुलगी बाहेर आली, जिचे डोळे मत्स्याकार होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिला तीन स्तन होते. राजा आणि राणी यांनी ‘तडातकाई’ असे आपल्या अपत्याचे नाव ठेवले.
 
 
या मुलीला त्यांनी मुलाप्रमाणेच वाढवले, शस्त्र-शास्त्र-अस्त्रविद्या दिली. ती खूप हुशार आणि पराक्रमी होती, युद्धकलेत पारंगत होती. काही युद्धात ती राजाबरोबर लढायलादेखील गेली. पुढे वडील वयोवृद्ध झाल्यावर तिने मदुराईचे राज्यशकट हाकायला घेतले.
 
 
पुढे तडातकाई दिग्विजय प्राप्त करायला निघाली. तिने अनेक भूभाग जिंकले. तिच्या शस्त्रनैपुण्यापुढे अनेक राजे पराजित झाले, तिला शरण गेले. संपूर्ण जगात तिच्याइतकी अनन्यसाधारण वीरबाला शोधूनही सापडत नव्हती. तिच्या कीर्तीचा डंका सर्वदूर पसरला.
 

devi
 
तडतकाई देवी 
 
 
याच दिग्विजयादरम्यान शिवशंकराच्या सैन्याशी तिची गाठ पडली. तिने त्यादेखील सैन्याचा पराभव केला. आता मात्र देवों के देव महादेव तडातकाईबरोबर दोन हात करायला उतरले. जेव्हा खुद्द शंकर समोर आले, तेव्हा तडातकाई अवाक झाली. शिवाचे देखणे रूप पाहून ती एक लाजाळू आणि अप्रतिम सौंदर्यवती कन्या झाली. तिच्या छातीवर असलेला तिसरा स्तन आपोआपच गायब झाला.
 
 
 
पुढे शिव आणि तडातकाई यांचे लग्न झाले आणि ते दोघे जण कित्येक वर्षं मदुराईत राहून त्यांनी संसार आणि राज्य केले. येथील शंकराच्या देखणेपणामुळे त्याला ‘सुंदरेश्वर’, तर तडातकाईच्या मत्स्याकार डोळ्यांमुळे तिला ‘मीनाक्षी’ संबोधतात.