पद्मभूषण अण्णा हजारे व पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते 'महाराष्ट्राचे कृषिनायक' ग्रंथाचे प्रकाशन
"महाराष्ट्राचे कृषिनायक" हा ग्रंथ शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक" - पद्मश्री पोपटराव पवार
विवेक मराठी 24-Sep-2022
Total Views |
राळेगणसिद्धी येथे सरपंच परिषदेचा चौथा वर्धापनदिन सोहळा संपन्न
राळेगणसिद्धी : "विवेक व्यासपीठ व पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर (पार्क) प्रकाशित 'महाराष्ट्राचे कृषिनायक' हा सर्व कृषी घटकांचा समावेश असलेला व त्यांच्या यशोगाथांचा समावेश असलेला ग्रंथ आहे. त्यामुळे हा ग्रंथ सर्व शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल. अशाच प्रकारे या संस्थेने राज्यात सर्वांगीण विकास घडवून आणलेल्या व रोल मॉडेल ठरलेल्या ग्रामपंचायतींवर ग्रंथ प्रकाशित करावा" असे ग्रामविकासाचे प्रवर्तक, पद्मश्री पोपटराव पवार यांनी आवाहन केले.
ग्रामविकासाची पंढरी समजल्या जाणाऱ्या राळेगणसिद्धी येथील हिंदवी स्वराज्य संस्थेच्या प्रशिक्षण सभागृहात शुक्रवार, दि. २३ सप्टेंबर २०२२ रोजी सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) यांचा चौथा वर्धापनदिन सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी विवेक व्यासपीठ व पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर (पार्क) प्रकाशित 'महाराष्ट्राचे कृषिनायक' ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे व पद्मश्री पोपटराव पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमास पाटोदा (जि. संभाजीनगर) येथील माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, प्रदेश सरचिटणीस अॅड. विकास जाधव, परिषदेचे स्वागताध्यक्ष आबासाहेब सोनवणे, सरपंच महिला प्रदेशाध्यक्षा राणी पाटील, 'कृषी विवेक'चे संचालक आदिनाथ पाटील, 'कृषी विवेक'चे समन्वयक विकास पांढरे, पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर (पार्क)च्या संशोधन माहिती विश्लेषक रसिका गोगटे, पाटोदा येथील सरपंच सुभाष पाटील यांच्यासह राज्यभरातील सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.
ही गाथा आहे महाराष्ट्रातील ३०हून अधिक जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांची.. विविध कृषी घटकांत अभूतपूर्व कृषी -क्रांती घडवून आणणार्यांची… शेती व्यवसाय करणाऱ्या सर्वांनाच हा ग्रंथ निश्चितच प्रेरणादायी ठरेल… ५०० रु /-
पद्मश्री पोपटराव पवार पुढे म्हणाले, "आज ग्रामीण समाजव्यवस्थेपुढे जमिनीचा बदलेला पोत, दुष्काळ, आणि बदलते तापमान ही प्रमुख आव्हाने आहेत. यापुढे जमिनीचा
कर्ब वाढविण्यासाठी सरपंचांनी महत्त्वाची भूमिका घ्यावी. पंचायत राज व्यवस्थेमुळे सरपंचांना ग्रामीण विकास करण्याची संधी मिळाली आहे, या संधीचा सरपंचांनी लाभ घ्यावा" असेही त्यांनी आवाहन केले.
पद्मभूषण अण्णा हजारे म्हणाले, "संघटनेमध्ये खूप मोठी शक्ती असते. सरपंच परिषदेने राज्यात संघटन वाढवावे, त्यासाठी संघटनेत आचार आणि विचार शुद्ध असला पाहिजे."
'कृषी विवेक'चे संचालक आदिनाथ पाटील म्हणाले, "२०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भरड धान्याची लागवड होत असते. नैसर्गिक संकटातही ही पिके घेता येतात. पौष्टिक आहार म्हणून भरड धान्याचा वापर करता येतो. या धान्याचे मूल्यवर्धन झाल्यास शेतकऱ्यांचा शाश्वत विकास होण्यास मदत होईल. इतर राज्यांत भरड धान्याचे धोरण आहे, असे धोरण महाराष्ट्र राज्य सरकारने अंगीकारले पाहिजे, त्यासाठी पद्मश्री पोपटराव पवार व सरपंच परिषदेने पुढाकार घ्यावा" असेही त्यांनी शेवटी आवाहन केले.
या वेळी माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी आपल्या मनोगतातून ग्रामीण विकास, ऊस, ओला दुष्काळ, गावातील गावठाण, जागेची नोंदणी आदी विषयांवर भाष्य केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मनोगतातून प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी सरपंच परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला. "राज्यात सरपंचांची पुन्हा थेट जनतेतून निवड व्हावी, यासाठी सरपंच परिषदेने लढा उभा केला. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर पुन्हा या मागणीचा न्याय दिला गेला. हा सरपंच परिषदेचा खरा विजय आहे." असेही त्यांनी सांगितले.
या वेळी विधान परिषदेचे आ. श्रीकांत भारतीय यांनी आभासी पद्धतीने परिषदेला मार्गदर्शन केले. परिषदेच्या पुढील वाटचालीस व 'महाराष्ट्राचे कृषिनायक' या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.