शंभर वर्षांनंतर कॅनडातून भारतात परत आणलेली अन्नपूर्णा देवी

विवेक मराठी    26-Sep-2022
Total Views |
 
@स्वप्ना कुलकर्णी

devi
 
आपल्या प्रत्येकाच्या पूजेच्या देवांमध्ये माता अन्नपूर्णा आहे. माता अन्नपूर्णा माता पार्वतीचे एक रूप. अन्न शिजवून, खाणार्‍याची भूक तृप्त करणारी असा सरधोपट अर्थ. पण तरीही सुग्रास स्वयंपाक करणारी एखादी स्त्री असेल, तर “अगदी अन्नपूर्णा आहेस हो” म्हणून आपल्याकडे तिचे जास्तीचे कौतुक होतेच ते वेगळेच.
 
 
काशीतून पळवलेल्या आणि कॅनडाकडून शंभर वर्षांनंतर परत आलेल्या माता अन्नपूर्णेच्या मूर्तीबद्दल आपण सगळ्यांनीच वाचले आणि सोशल मीडियात शेयरही केले. दि. 15 नोव्हेंबर 2021ला मंत्रोच्चार, जयघोष आणि साग्रसंगीत पूजाविधी होऊन ही मूर्ती काशीत पुन:स्थापित झाली.
 

devi
 
माता अन्नपूर्णा आणि काशी यांचा खूप जुना संबंध आणि या संदर्भात आहेत दोन आख्यायिका -
 
 
फार फार वर्षांपूर्वी काशीच्या राजाला एक स्वरूपसुंदर कन्या झाली, तिचे नाव ठेवले अन्नपूर्णा. या बालिकेला लहानपणापासूनच स्वयंपाक करायची आणि खाऊपिऊ घालायची आवड. तिने केलेले सुग्रास अन्न न जेवलेला एकही माणूस काशीत नव्हता. आपली मुलगी उपवर झाल्यावर काशीच्या राजाने ठरवले की, जो कोणी आपल्या लेकीने बनवलेले अन्न संपवेल, तोच तिच्याशी लग्न करेल. आजूबाजूचे राजे, राजकुमार, सरदार खूश झाले, आपण हा पण सहजी जिंकणार असे त्यांना वाटले. पण तसे झाले नाही. सरतेशेवटी भगवान विश्वनाथ आपले भिक्षापात्र घेऊन काशी राजाच्या दरबारात हजर झाले. इकडे अन्नपूर्णा अन्न शिजवतेय आणि वाढतेय, पण विश्वनाथाचे भिक्षापात्र रिकामेच!! हा चमत्कार राजाला समजला आणि त्याच्या लक्षात आले की खुद्द महादेव आपल्या मुलीचा हात मागायला आले आहेत. काशी राजाने वाजतगाजत आपल्या मुलीचे लग्न लावून दिले.
 
 
तर देवी भागवत आणि स्कंद पुराणातील आख्यायिकेनुसार, शंकर-पार्वती कैलासावर द्यूत खेळत होते. हा खेळ इतका चालला की त्यांनी आपल्याकडील वस्तू पणाला लावल्या. पार्वतीने तिचे दागिने, तर महादेवांनी त्यांचा त्रिशूल. देवीने हा डाव जिंकला आणि त्रिशूल तिच्याकडे आला. नंतरच्या फेरीत त्रिशूल परत मिळवण्यासाठी शंकरांनी वासुकी पणाला लावला आणि तोही हरला. आपल्या या वस्तू परत मिळवायला महादेव अनेक फेर्‍या खेळले आणि त्यांनी रुद्राक्ष, डमरू सगळेच गमावले. सरतेशेवटी आपले भिक्षापात्र (कपाल) पणाला लावले आणि तेही हरले. अपमानित होऊन जंगलात निघून गेले. तेथे त्यांना भगवान विष्णू भेटले. त्यांनी विचारले, “कैलास पर्वतावरून तुम्ही इथे जंगलात येऊन का राहत आहात?” द्यूतातील आपला पराभव आणि गमावलेल्या वस्तू यांबद्दल महादेव भगवानांनी विष्णूला सांगितले. भगवान विष्णू त्याला म्हणाले, “परत जा आणि खेळायला बसा, या वेळेस तुम्ही नक्की जिंकाल.”
 

 
कैलास पर्वतावर जाऊन शिवशंकरांनी आपल्या पत्नीस सांगितले, “एक खेळ परत खेळू या.” या वेळी भगवान विष्णूंची साथ असल्याने शंकर जिंकायला लागले. पार्वतीस संशय आला आणि खेळात फसवत आहात असा तिने आरोप केला. अर्थातच शंकरांना हा आरोप अमान्य होता. त्या दोघांत खूप मोठे भांडण झाले आणि ते भगवान विष्णूंना ऐकू गेले. ते कैलास पर्वतावर आले आणि त्यांनी दोघांना समजावले की, ही सर्व माया आहे आणि मी ती निर्माण केली आहे.
 
 
भगवान विष्णू निघून गेल्यावर, शंकर पार्वतीला चिडवायला लागले, तुझे दागिने, माझी शस्त्रे वगैरे सारी माया आहे. पार्वती चिडलेली बघून “हा संसार, अगदी अन्न ही मायाच आहे” असे म्हणाले. पार्वतीने आपली एक भृकुटी उचलून “नक्की का?” असे विचारून गुप्त झाली. माता पार्वती म्हणजे जगन्माता. ती अदृश्य झाल्याने पृथ्वीवर दुष्काळ पडला, अगदी देवलोकातही हाहाकार उडाला, सगळे देव आणि ऋषी खंगायला लागले.
 
 
जगन्मातेला आपल्या मुलांचे हाल बघवले नाहीत, म्हणून तिने परत येण्याचा निर्णय घेतला आणि ती काशीला जाऊन राहिली. तिथून तिने स्वत:च्या हाताने अन्न शिजवून लोकांना खायला घातले. अशा रितीने रोज हजारोंच्या संख्येने लोक जेवू लागले. पार्वती पृथ्वीवर आली असून काशीत बसून सगळ्यांना जेवू घालत आहे असे शंकरांना समजल्यावर ते आपले भिक्षापात्र घेऊन तिच्यासमोर उभा राहिले आणि अन्न ही माया नसून गरज आहे याची कबुली दिली.
 
 
या प्रसंगानंतर जगन्मातेला अन्नपूर्णा नाव पडले आणि खुद्द भगवान महादेवाने काशीत अन्नपूर्णेचे देऊळ बांधले आणि आपल्या पत्नीचा सन्मान केला.